वृत्तपत्र - एका वाचकाच्या नजरेतून

0
0

The public have an insatiable curiosity to know everything. Except what is worth knowing. Journalism, conscious of this, and having tradesman-like habits, supplies their demands.
Oscar Wilde

If you're not careful, the newspapers will have you hating the people who are being oppressed, and loving the people who are doing the oppressing.
Malcolm X

छोटा शर्व नुकताच वाचायला शिकलाय. सकाळी सकाळी आलेला सकाळ वाचायचा त्याचा प्रयत्न चालला होता. एक एक अक्षर जोडून स्वारी वाचायला लागली; "क रा ड म धे वा ळू मा फि या चा भ र दि व सा खू न". मी वैतागून त्याच्या हातातन पेपर काढून घेतला आणि त्याला चांदोबाच पुस्तक दिल.

मी स्वतः साधारणपणे वर्षापूर्वी रोजच वृत्तपत्र घ्यायच बंद केल. रोज उठून हेच वाचायच असेल तर कशाला विकतची पिडा. सव्वाशे कोटींच्या या देशात फक्त आणि फक्त वाईटच घटना घडतात अस वाटायला लागल. इथे वाईट घटना घडतात मान्य आहे पण चांगल्या घटना घडतच नाहीत का? मागे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा एक लेख फिरत होता. ते इस्त्रायलला गेले असता तिथल्या वृत्त्पत्रांमधे पहील्या पानावरती चांगल्याच घटना होत्या. वास्तविक तिथे आदल्या दिवशी एक स्फोटात ८-१० लोक ठार झाले होते. ही बातमी देखील सगळ्या वृत्तपत्रांमधे होती, पण दुसर्‍या पानावर. त्यांनी प्रश्न विचारला होता की आपल्या देशात हे का घडत नाही.

जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करून सोडावे सकळ जन || अस काहीतरी वृत्तपत्रांच्या अस्तित्वाच कारण असाव, बहुतेक. चांगल्या वाईट घटना ह्या समाजात घडणारच, त्यात नवल नाही पण त्यातल्या वाईटच गोष्टींच भांडवल कराव आणि लोकांना सतत भीतीच्या छायेत ठेवाव हा अट्टाहास का? समा़जात आता सर्व काही वाईट घडत आहे, इथली लोकशाही कोसळणार आहे, कलीयुग आल आहे अशा काहीतरी भावना निर्माण व्हाव्यात अशा पध्दतीन घटनांच सादरीकरण का कराव?

जनतेच्या मनात कसली ना कसली भीती असावी ही गोष्ट जगातल्या सर्वच्या सर्व सरकारांच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे, मग ते कधी एखाद राष्ट्र असेल, कधी एखादी विचारसरणी असेल तर कधी एखादा रोग, जे काही असेल ते, हे मान्य. वृत्तपत्रांची अशी कोणती हतबलता आहे? पण नाही, समाजाला सतत कसल्या ना कसल्या तरी भीतीखाली ठेवल नाही तर आपल्याला अस्तित्वच नाही अशी भीती वृत्तपत्रांना वाटते की काय कोणास ठाउक. प्रत्येक घटनेची सनसनाटी बातमी केली की आपण कृतार्थ झालो असा भाव सगळ्या वृत्तपत्रांच्या ठायी दिसतो.

बर ज्या वाइट घडामोडी ठळकपणे देतात, त्यांचा तरी नीट अभ्यास केलेला असतो, पूर्ण माहीती घेतलेली असते अस फार फार कमी कमी वेळेला दिसत. समस्या मांडताना एखाद्या माणसान भडक वक्तव्य केल की तवढच छापून रीकाम व्हायचं. बाळासाहेबांच किंवा राजसाहेबांच नाव घेतल की हे लगेच स्पष्ट होइल. ते जे मुद्दे मांडतात ते सोडून त्यांच्या शब्दांवरतीच सगळीकडे भर दिसतो. किंवा अनेकदा दोन कुटूंबाच्यातल्या वैरातून भांडण होतात आणि किमान पच्चीम महाराष्ट्रात तरी ही परंपरागत असतात. आता जर ही कुटूंब वेगवेगळ्या जातीची असली की झालच, हमखास दुसर्‍या दिवशीचा मथळा असतो जातीय दंगली. वास्तविक उरलेल्या जातीला यांच्याशी काही देणघेण नसत, पण नाही, सत्य लिहील तर वाचणार कोण? विदर्भातल्या आत्महत्यांविषयी कोणी स्वतः दहा-पाच गाव फिरून, कागद बघून, चौकशी करून काही लिहील आहे अस माझ्या वाचनात तरी कुठे आल नाही. सत्ताधारीपक्षवाल्यांनी छापायच की लोक दारू पिउन मरतात, विरोधकांनी छापायच की सगळेच आत्महत्त्या करतात. शिवाय हे करताना आत्महत्त्या ह्या घातकी प्रकाराची जाहीरात होते तिकडे तर कोणाला लक्ष द्यायलाच वेळ नाही.
वास्तविक, किमान महाराष्ट्राला तरी, पत्रकारिता ही काही नवीन गोष्ट नाही. एक शतकापेक्षा जास्त अनुभव गाठीशी असलेल्या क्षेत्रात प्रगल्भता आणि सर्वसमावेषकता वाढण्याच्या ऐवजी बालीशपणा आणि संकुचितता वाढत चाललेली दिसते.

सगळी वृत्तपत्र ही कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारसरणीची (किंवा त्यातल्याच कोणाच्या तरी मालकीची) असतात. पण त्या पुढार्‍यांच्या एकमेकातल्या लाथाळ्यांपायी वृत्तपत्रांनी आपली पातळी सोडण हा हीनतम प्रकार आहे. ह्याच ताज उदाहरण म्हणजे सकाळ आणि पुढारी मधे रंगलेला कलगीतुरा. ह्यान कोल्हापूरकरांची काही काळ तरी चांगलीच करमणूक केली. त्यात सामील असलेले लोक किती स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही कितीतरी काळ वृत्तपत्रांसारख अत्यंत महत्त्वाच माध्यम ह्या लोकांनी स्वतःची मळमळ बाहेर काढायला वापरल.

व्यक्तीशः माझ्या दृष्टीन दृकश्राव्य प्रसारमाध्यमांपेक्षा छापील प्रसारमाध्यमांना खूप जास्त महत्त्व आहे. कारण दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम हा तत्काळ आणि प्रभावी असला तरी तो टिकाउ नसतो. त्यामुळच त्यांचा दर्जा हा वृत्तपत्रांपेक्षा कितीतरी खालचा असला तरी त्यावर लिहावस देखील वाटल नाही.

जे सकस ते लोकांपुढ ठेवाव का जे, लोकांना जस आहे अस वाटत, तेच त्यांना सांगाव असा प्रश्न ह्या क्षेत्रातल्या लोकांना पडायचा बंद झाला असावा अन्यथा कुठल्यातरी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी झटणार्‍या दादाच नाव हे आमटे, बंग, प्राचार्य शिवाजीराव भोसले असल्या चांगल्या गोष्टींसाठी आयुष्य खर्च करणार्‍या माणसांपेक्षा जास्त लिहील गेल नसत.

'प्रसार'माध्यम ह्या प्रकारात बसणार्‍या वृत्तपत्रांनी स्वतःचा क्षेत्रीय अवाका इतका मर्यादीत ठेवावा ह्या गोष्टीच देखील मला नवल वाटत आल आहे. पच्चीम महाराष्ट्रातल्या कोणत्याही बातमीत विदर्भाचा संदर्भ हा फक्त आणि फक्त आत्महत्यांशी लावला जातो तर विदर्भातल्या वृत्तपत्रांमधे पच्चीम महाराष्ट्र हा फक्त लाटलेल्या निधीविषयीच येतो. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले अस म्हणणार्‍या महाराष्ट्राला या राष्ट्राच्या पूर्व सीमेवरती कोणत राज्य आहे हे तरी माहीती आहे का? हाच प्रश्न राष्ट्रीय वृत्तपत्र म्हणवून घेणार्‍यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय गोष्टींबाबत विचारावा. महासत्ता बनायला निघालेल्या आपलेल्या देशाला स्वतःच्या शेजारी काय चाललय ते माहीत नाही.

वर्तमानपत्राल्या सध्याच्या भाषेविषयी तर सगळाच आनंद आहे. मराठी वर्तमानपत्रात वापरली जाणारी भाषा ही बहुतांशवेळा हिंदीच शब्दशः भाषांतर करून कींवा हिंदीकडून उधार उसनवार शब्द घेउन लिहीली जाते, मराठीला शब्दांची भीक लागल्यासारखी. खरतर वार्ताहराकडून येणारी बातमी ही कोणाच्यातरी डोळ्याखालून जात असेल. पण प्रत्यक्ष वाचताना मात्र अशी काही व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का अशी शंका येते.

असो, इथे वर्तमानपत्रांप्रमाणेच, नुसत्या समस्या निर्माण करून जबाबदारी झटकण्यापेक्षा, वर्तमानपत्रांकडून असणार्‍या तुमच्या अपेक्षा तुम्हीही लिहा. वाचकाला जर काही किंमत असेल तर किमान हे वाचल जाइल एवढी अपेक्षा करायला हरकत नसावी.

माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा

1

किमान अपेक्षा:
पहिल्या पानावर शक्यतो हिंस्त्र बातम्या टाळाव्यात.
बातमी ही फक्त बातमी असावी, घडलेली घटना तटस्थपणे असावी.
भाषा शुदध असावी.
ज्या लोकांनी खरोखरच समाजोपयोगी कार्य केल आहे, करत आहेत अशा लोकांची जास्त नोंद घेतली जावी.
व्याप्ती वाढवावी. महाराष्ट्राला जर देशाच नेतृत्व करायच असेल तर आधी देश माहीत होण गरजेच आहे.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

मस्त लिहिलय! सकाळ कधीच

2

मस्त लिहिलय! सकाळ कधीच बाराच्या भावात गेलाय! Sad
एकूणच सगळी वृत्तपत्रे नावाला उरली आहेत...

मुद्दा सोळा आणे सच्ची.. पण

3

मुद्दा सोळा आणे सच्ची..
पण दोश दुहेरी आहे.. लोक पण चवीने वाचतात जो काही शिळा, सडका तुकडा समोर पडतोय तो... म्हणुन छापणारे छापतात.. असं दृष्टचक्र चालु..

इंग्रजी /हिंदी वृत्तपत्रांचे अनुकरण करण्याच्या नादात मराठी पत्रांचे असं झालं असावं का? मी जिल्हा पातळीवरच्या पत्रांना ह्यातुन वगळायला तयार आहे, कारण त्यांनी भुमिकाच स्थानीक घेतलेली असते स्पष्टपणे.. पण मटा, सकाळ सारखी सगळ्या महाराष्ट्राचे पत्र अश्या टिर्र्या बडवुन घेणारी उदाहरणे बघितली, तर ती तुम्ही दिलेल्या निकशांवर ती केवळ सकाळी वापरायच्याच लायकीची ठरतात हे नक्की.

अपेक्षा -

  • वृत्तपत्र हे एका सार्वजनीक विश्वस्त मंडळाच्या मालकीचे असावे.
  • धनिकांना त्याचे समभाग घ्यायला बंदी असावी,
  • समभाग संख्या व मालकी रोज छापावी
  • संपादक रीपोर्टींग टू ट्रस्ट अशी योजना असावी.
  • अशुद्धशिरोमणी हा पुरस्कार चालु करावा - तीन महिन्यातुन एकदा तो संपादकाला द्यावा (चपलांची माळ व त्याच्या संपुर्ण नावाचे अशुद्ध आणि अतीअपमानास्पद विडंबन असलेले अपमानपत्र, आणि हे स्वतःच्या पत्रात छापण्याची सक्ती)
  • ज्या संपादकाला असा पुरस्कार सलग २ वर्षे मिळेल ते पत्र बंद करावे आणि त्या संपादकाची पेन्शन बंद करावी.
  • जाहीरातीत कुपन पद्धती चालु करावी , ज्यामुळे आर्थीक स्वायत्तता येण्यास मदत होइल व धनिकांचा हस्तक्षेप कमी होइल.

हे वर्तमानपत्रांकडुन अपेक्षांबाबत..
वाचकांकडुन अपेक्षांबाबत सविस्तर प्रतीसाद लवकरच..

सही

4

क्या बात है. पूर्णवटराव प्रथमच कोणीतरी नेमके उपाय सुचवण्याचा प्रयत्न केलेला पाहून अतिशय आनंद वाटला. नाहीतर डॉक्टर सगळे पैशाच्या मागे असतात, सगळे पोलिस चोर असतात, वकील सारे डॅम्बिस (हा कुठल्या भाषेतला शब्द आहे?), राजकारणी सगळे भ्रष्ट असे ओरडून ओरडून सांगणारे त्याबद्दलच्या सुधारणा वा उपायांबद्दल मात्र 'ती आमची जबाबदारी नाही' अशी भूमिका घेतात. असल्या वाचिवीरांपेक्षा निदान काही उपाय सुचवून आपल्यापुरते अंमलात आणणे अधिक चांगले. प्रतिसादाबद्दल लै लै धन्यवाद.

कसचं कसचं अवांतर - डॅम्बिस -

5

कसचं कसचं

अवांतर - डॅम्बिस - पुलंच्या लहानपणी बोक्याला इंग्रजीत डॅम्बिस म्हणत असावेत अस त्यांना उगीचच वाटत होतं..

गुर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!!!

6

हं!!! लक्ष आहे म्हंटलं आमचं!!!
Angry
पण असो!
धागा चांगला आहे, वाचतो आहोत!!!

(अवांतरः हा शब्द मुळात इंग्रजांकडून आला. इंग्रज हे आपल्या नेटिव्हांना शिव्या देतांना "यू डॅम बीस्ट!" म्हणत.
त्याचा डॅम बीस्ट -> डॅम्बिस्-> डांबिस झाला असावा...
हास्य

अगदी खरे !! कधी-कधी वाटत चौथा

7

अगदी खरे !!

कधी-कधी वाटत चौथा स्तंभ राजकारण्यांकडे गहाण राहिला की काय ?

"व्यक्तीशः माझ्या दृष्टीन दृकश्राव्य प्रसारमाध्यमांपेक्षा छापील प्रसारमाध्यमांना खूप जास्त महत्त्व आहे. कारण दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम हा तत्काळ आणि प्रभावी असला तरी तो टिकाउ नसतो. त्यामुळच त्यांचा दर्जा हा वृत्तपत्रांपेक्षा कितीतरी खालचा असला तरी त्यावर लिहावस देखील वाटल नाह""

त्रिकालाबाधित सत्य !!

"फंड मंजुर झाल्या-झाल्या 'वृत्तपत्रांना ' विदर्भाचा उमाळा येतो नाहीतर एरवी "शेतकर्‍यांच्या आत्महत्या" आहेतच.त्या मुद्द्याशीही सहमत !!

काही वर्तमान-पत्र तर साचे बध्द झाल्यासारखी दिसतात..ऊदा.

पहिल पान..हेडलाईन....ऊगाच झटका दिल्यासारखी जर आदल्यादिवशी एखादा राष्ट्रीय स्तरावरचा नेता ऊदघाटनानिमीत्त जरी आला असेल,तर त्याचा एक मोठा फोटो त्यानंतरच्या पानात..पहिल्या पानावरच्या उरलुआसुरल्या बातम्या,तिसर्‍या पानावार काही शहरी क्राईम बातम्या आणी जाहिरात ..चौथ्यापानावर अवाचनीय अग्रलेख.एक दोन कॉलमनिस्टांचे लेख ते ही प्रासंगिक(मग सावरकरांच्या पुण्यतिथीला सावरकांविषयीकिंवा मग असेच काहीतरी)....

लोकमत आधी जरा बरा वाटायचा ...त्या दर्डाची सुन काय करते? त्याच पोरग लंडनला गेल का? कशासाठी ? ह्या सर्व गोष्टींसाठी रकानेच्या-रकाने भरले जातात..

सकाळ तर केवळ रद्दीवाल्याला विकायच्या लायक झालाय ? पुढारीच तर काय सांगायलाच नको ...अक्षर/भाषा/बातम्यांपेक्षा फोटोज ला जास्त महत्व ...शिवाय वर्तमानपत्रे ही राजकीय पक्षांची "मुखपत्रे" झालीत !!

चांगली चर्चा

8

चांगली चर्चा सुरू आहे. पण वाचकांची संख्या रोडावली आहे की काय?
वाचतो आहे!!!

वा मस्तं लेख आहे. अहो, आणि

9

वा मस्तं लेख आहे.
अहो, आणि अजून एक गोष्ट राहीली की. पक्षपात. कदाचित पाक्षिकांचा (पूर्वी सर्व पाक्षिकेच होती ना. दर्पण (अहो ते पहीले मराठी वृत्तपत्र) सुधा सुरुवातीला पाक्षिकच होते.) एखाद्याची एक बाजू कायम उचलून धरणे किंवा एखाद्याची एकाच चुकलेल्या बाजूवरन कायम टर उडवणे यावरूनच 'पक्षपात' हा शब्द आला असावा. wink
गोध्रा प्रकरणाच्या वेळेला याचा चांगलाच अनुभव मी घेतला. विषेशतः टाईम्स ऑफ इंडिया या अग्रणी (?) वृत्तपत्राकडून आणि अर्थात इतर सर्वच प्रसारमाध्यमांकडून. असो इतर प्रसारमाध्यमं हा आत्ताचा विषय नाही. तर हा टाईम्स पूर्वी पासूनच असा आहे असे कळते. म्हणजे किती तर टाईम्सने टिळकांच्या एखाद्या लेखावर, कृतीवर टीका केली नाही तर लोकमान्य परत ती कृती, वक्तव्य, लेख तपासून पाहत की आपण चुकलो नाही ना. आपण बरोबर योग्य गोष्ट मांडत असू तर टाईम्स टीका करणारच अशी खात्रीच टिळकांना होती. हास्य
आपल्या देशातील एक प्रगतीशील राज्य गुजरात. गुजरात सरकारच्या SWAGAT या उपक्रमाला UNPSA पुरस्कार मिळाला. आमच्या सकाळात बातमी कुठे ३ र्‍या पानावर ती सुधा २ इंची. का? कारण ते नरेंद्र मोदीनी केलेलं काम आहे ना.खरंतर असे उपक्रम प्रत्येक राज्याने आखावेत आणि गुजरातप्रमाणेच राबवावेत. पण ती गोष्ट लोकांपर्यंत पोचूच द्यायची नाही.
असो. हल्ली सर्व वृत्तपत्रे ही रां*सारखी झाली आहेत. त्यांचे निषेध देखील भारताच्या निषेध खलित्यासारखे रत्योत्तर श्वेतद्रव्यवत बुळबुळीत असतात. जाऊद्या. हल्ली मी पेपर फक्त छोट्या जाहीरातींसाठी घेतो.


-पुण्याचे पेशवे

+ १ काही जागी वर्तमानपत्रे जे

10

+ १

काही जागी वर्तमानपत्रे जे वागतात ते पाहून नवल वाटते. Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जरा वेगळे

11

मध्यंतरी एक नविन वर्तमानपत्र वाचनात आल प्रत्यक्ष अस नाव होत. बरच बर वाटल लेखही चांगले होते. त्याच्यावर बिगर राजकीय असे लिहीले होते


मीच तो Cool

चर्चाविषय छान आहेच......

12

हाताळलाय पण सुंदर प्रकारे. प्रतिसादकांचे प्रतिसाद देखील सकारात्मक आहेत.

नक्की लिहिन या धाग्यावर प्रतिसाद. आत्ता जरा कामात बुडालोय. मोकळा वेळ काढावा लागेल. तो पर्यंत वाचत राहिन हा धागा. बरेच आयाम आहेत या विषयाला. अन इथल्या चर्चेतुन अजुनही काही आयाम मिळु शकतील.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

वाट पाहतोय

13

प्रसन्नदा वाट पाहतोय.

@अर्धवट
रावसाहेब, वाचकांकडून असलेल्या अपेक्षांविषयी काय झाल?


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

उपाय...

14

@ अर्धवट
रावसाहेब तुमचे उपाय अतिशय चांगले अणि म्हणूनच युटोपियन आहेतस वाटत. संपत्ती वाटपाच्या मूलभूत पिरॅमीडच्या नियमामधे आपण काही बदल करू अस मला प्रामाणिकपणे वाटत नाही. म्हणूनच त्यांची मालकी ही कायमच श्रीमंत लोकांकडे असेल. पण धोंडो भिकाजी कडमडेकरंसाठीही काहीतरी उपाय असतीलच की.

या ग्राहकप्रणीत अर्थव्यवस्थेमधे, समजा, आपण सगळ्या मराठी संकेतस्थळांवरून मोठ्या प्रमाणावरती "मराठी वृत्तपत्र नालायक आहेत" अस सांगण्यात यशस्वी झालो तर नाईलाजान का होइना त्यांना दखल घ्यावी लागेल. मग भले त्यांचे मालक श्रीमंत आणि शक्तीशाली पुढारी असले तरीही अस्तित्वासाठी त्यांना (नियतकालिकांना) बदलाव लागेल. जर एखाद वर्तमानपत्र स्वतःला काही लाख लोकांचा प्रतिनीधी म्हणवत असेल तर मोठ्या संख्येमधे आंतरजालावर लिहीणारा मराठी समाज हा जास्त मोठ्या महाराष्ट्राचा प्रतिनिधी असेल.

तुमच्या पाचव्या उपायाला मात्र पूर्ण अनुमोदन. आपण इकडेच अस काहीतरी चालू करुया.

@ सुहास
आचर्य अत्रेंनी 'सकाळ'विषयी काढलेल उद्गार;
"आमच्या लहान मुलांना सकाळ फार आवडतो. त्यांना तो रोज सकाळी लागतो"

@ पुपे
इंग्रजी सुधारायच असेल तर Times वाच अस मला सांगितल्यावरून मी तो पदरचे पैसे खर्च करून वाचायला लागलो. वर्ष दीड वर्ष वाचल्यावर माझ ठाम मत झाल की हे लोक मेकॉलेचे अत्याधुनीक अवतार आहेत म्हणून. भारतीय शरीरातील विदेशी मनांसाठीच नियातकालीक म्हणजे Times.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

निर्यातकालीक.. किवा..

15

निर्यातकालीक.. किवा.. मयतकालीक कसं वाटतय?

बंद करा सगळे !

16

बंद करा सगळे !

जरा स्पष्ट

17

हो
हो हो...बन्द करायला पाहिजे.
पण काय बन्द करायच ते तरी सांगा.

सातारकर, आणखी एक लेख लिहा आणि तुमचे ऊपाय सांगा

जय हिन्द!

सध्या अत्रे यांचे निवडक

18

सध्या अत्रे यांचे निवडक नवयुग वाचत आहे. असल्ली पत्रकारिता म्हणजे काय याचा एक एक नमुने समोर येत आहेत.
या चर्चेची आठवण झाली म्हणून वर घेऊन येत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वरील सर्वांशी सहमत

19

वरील सर्वांशी सहमत

महान पेपर संध्यानंद विषयी

20

महान पेपर संध्यानंद विषयी चर्चा नाही ? म्हणजे ही चर्चा न्युजपेपर बद्दल नक्कीच नाही


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चांगला विषय

21

चला आपल्यासारखे दुसर्‍या कोणाचे तरी विचार आहेत म्हणायचे. नेहेमी मी घरातल्या लोकांना सांगायचो
तुम्हाला वर्तमान पत्रातलं मराठी खटकत नाहि का ? तर "असले निरुद्योगी उद्योग तुम्हीच करा. अशी उत्तर मिळायची. माझ्या मते वर्तमान पत्र
प्रसिद्धिस तयार झाल्यावर डोळ्याखालून घालण्याची जुनी पद्धत मोडीत काढली असावी. संध्यानंद पेपरात तर काय सगळे फोटो परदेशी लोकांचे
असतात. त्यामुळे कुणातरी परदेशी माणसाचा हा पेपर असावा असं माझं मत आहे. त्यातील दिव्य मराठी बद्दल बोलणेच नको. फार चांगल्या विषयाला
तोंड फोडालत राव.


अरूण कोर्डे.

संध्यानंद बद्दल काही बोलायचे

22

संध्यानंद बद्दल काही बोलायचे नाही हां आधीच सांगतो wink
आपला आवडता पेपर आहे तो सध्याच्या काळातील Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."