आंधळी
हेलन केलरची जीवनगाथा जगातील सर्व अंध अपंगांसाठी जिने आपले जीवन समर्पित केले त्या हेलन केलरचे जीवनचरित्र समजून घ्यायचे तर "आंधळी' हे पुस्तक वाचलेच पाहिजे. व्यक्तीच्या अंगी दुर्दम्य आशावाद असतो त्या व्यक्ती जीवनातल्या अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जाऊन आपलं असामान्यत्व सिद्ध करतात. त्यापौकी हेलन केलर ही एक होय. 27 जून 1880 रोजी जन्मलेली हेलन केलर एका जीवघेण्यात दुखण्यात आपली तीन ज्ञानेंद्रिये गमावते आणि एका बुद्धिमान मुलीचे जग काळोखात व्यापले जाते. पण ही आंधळी मुलगी डोळसपणे आपल्या भविष्याचा विचार करते. तिचे आईवडील, मिस फुलर, अॅन सॅलिव्हन या तिच्या शिक्षिका यांच्या सहाय्याने तिने शब्दांचा शोध घेतला. आपल्या स्पर्शातून तिने अनेक गोष्टी शिकून घेतल्या.तिच्या स्पर्शसंवेदना फार तीव्र होत्या. नुसत्या हवेच्या वासावरून ती वादळ होणार आहे हे सांगत असे. आपण स्वत:च्या अपेक्षा वाढवल्या की, त्या पुर्या करण्याची वृत्ती आपोआप आपल्यात निर्माण होते ही खूणगाठ तिने आपल्या मनाशी बांधली होती. पराभव हा शब्द तिला माहीत नव्हता. पदवी घेताना आपल्या भाषणात ती म्हणते, ""अंत:करणात जेव्हा उंच भरारण्याची महत्त्वाकांक्षा असते तेव्हा भुईवर सरपटणे कुणालाच मानवत नाही. काळोख आणि नि:शब्दता ही आत्म्याच्या प्रगतीच्या आड येत नसते.'' अशी चरित्रे ही स्फूर्तिदायी असतात. अंधांचे जीवन कळले म्हणजे डोळसांनाही जीवन जगताना वेगळी प्रेरणा मिळते. एकूणच "आंधळी' हे पुस्तक वाचनीय आहे. - ज्योत्स्ना आफळे