इंद्रधनुष्याचा आठवा रंग

0
0

इंद्रधनुष्याचा आठवा रंग

काही दिवसांपूर्वी ऑर्कूटवरच्या एका कम्युनिटीवर एक चारोळी टाकली.

या इंद्रधनुष्याचं
मला कौतुक नाही
सात रंग आहेत त्यात
पण गुलाबीच नाही!

एक दोघांनी म्हटलं, "नाही, असतो त्यात गुलाबी" मी म्ह्टलं "आपण लहान असल्या पासून इंद्रधनुष्यातल्या सात रंगांबद्दल ऐकून आहोत. ता (तांबडा), ना (नारंगी), पि (पिवळा), हि (हिरवा), नि (निळा), पा (पारवा) आणि जां (जांभळा). यात गुलाबी कुठय दाखवा. " त्यालाही आश्चर्यच वाटलं. "मी हा विचारच कधी केला नाही" असं त्यानं मोकळेपणी कबूल ही करून टाकलं. हे असंच होतं नेहेमी. बर्याच गोष्टी आपण गृहीत धरून चालतो.

इंद्रधनुष्य़ बघून फुलारून आला नाही असा माणूसच विरळा. ते वातावरणही फूलारून येण्यासारखंच असतं. संध्याकाळची वेळ असते. पाऊस पडून गेलेला असतो. अजून यावं की आवरतं घ्यावं या दुविधेत पाऊस असतो. सूर्यही ऑफिसातून घरी जाणार्या नोकरदारासारखा कामं आवरायच्या गडबडीत असतो. पण एखादी खूप जूनी, महत्वाची फाइल सापडल्यावर नाईलाजान थोडं जास्त थांबावं लागल्या सारखी त्याची स्थिती झालेली असते. आपला उन्हाचा पसारा आवरतांना काही थोड्या तिरीपा राहून गेलेल्या असतात. त्यांनाही पृथ्वीतलावर काही तरी लक्ष्यवेधक दिसल्या सारखे ते किरण रेंगाळलेले असतात. सूर्याच्या भितीने ढगाआडून ते किरण कशाकडे तरी पहाताहेत असा भास होतो. आकाशात ढगांची दाटीवाटी असते आणि अचानक हे इंद्रधनुष्य दिसायला लागतं.

अचानक उगवणार्या पाव्हण्यासारखं हे इंद्रधनुष्य अचानक उगवतं, थोडा वेळ रहातं आणि हूरहूर लावून नाहीसं होतं. कधी कधी दोन इंद्र्धनुष्यं दिसतात. असे प्रसंग अत्यंत दुर्मिळ. इंद्रजाल कॉमिक्सच्या वेताळाच्या कथा मी लहानपणी सपाटून वाचत असे. त्यात आकाशात दोन इंद्र्धनुष्य दिसली की वेताळाचं आगमन होतं असं एका कथेत होतं. योगायोगाने त्याच पावसाळ्यात मी दोन इंद्रधनुष्यं पाहिली. आता वेताळ येणार या कल्पनेनं मी खूप एक्साइट झाल्याचं आठवतं. इंद्रधनुष्याचं हे असं अचानक येणं आणि जाणं चटका लावून जातं. ते बघायला मानेला फारसा त्रासही नाही द्यावा लागत. सरळ नजरेच्या टप्प्यात, पश्चिम क्षितीज रेषेच्या आसपास त्यानं आपली जागा ठरवून घेतलेली असते. पूर्वेला किंवा सकाळी इंद्रधनुष्य दिसल्याचं ऐकिवात नाही. हा संध्याकाळीच येणारा, पाच दहा मिनीटंच फक्त दर्शन देणारा पाहूणा. कधी मधीच येणारा आणि म्हणून हवाहवासा.

निसर्गाच्या या चमत्काराला "इंद्रधनुष्य" हे नाव ज्या कुणाला सुचलं त्याच्यावरून असले दहा इंद्रधनुष्य कुर्बान! इंग्रजीत त्याला रेन-बो म्हणतात हे तर आपण जाणतोच. पण त्याला इंद्राशी जोडून मोठीच कमाल केलीय. इंद्र योद्धा म्हणून फारसा प्रसिद्ध नाहीच. किंबहूना उठ्सूठ कुठल्या तरी राक्षसा कडून पराभव स्विकारून विष्णू, शंकर यांना अडचणीत आणणारा म्हणूनच आपल्याला हा माहित. क्रिकेट मधे भारत ज्याच्याशी हरला नाही असा देश नाही आणि इंद्र ज्याच्याशी हरला नाही असा राक्षसही बहुदा नसावा. मात्र हा देवेंद्र रंभा, उर्वशी, मेनका यांचा "आश्रयदाता" म्हणून आणि अहिल्येला अडचणीत आणणारा महाभाग म्ह्णून आपल्याला जास्त परिचयाचा. माझ्या डोळ्यांपुढे तर इंद्राचा दरबार म्ह्टलं की युद्ध किंवा राजकारणावर चर्चा चालली आहे हे चित्र येतच नाही. हे महाराज सिंहासनावर रेलून बसलेत. नारद, तुंबरू वगैरे मंडळी आब राखून बसली आहेत आणि रंभा, उर्वशी, तिलोत्तमा यांचं नर्तन चालू आहे हेच चित्र डॊळ्यांसमोर येतं. त्यामुळे असल्या "रंगीत" माणसाचं नाव निसर्गाच्या या चमत्काराला दिलंय ते योग्यच.

इंद्रधनुष्याच्या टोकाशी खजीना असतो असं म्हणतात. "Pot at the end of rainbow!" काही नशिबवानांनाच तो दिसतो अशी वदंता आहे! आम्ही या कल्पनेचा मागोवा घ्यायचाच असं ठरवलं आणि पोहोचलो ते थेट प्रसिद्ध आयरीश संत St. Patricks यांच्यापाशी! एक उल्लेख आढळला तो असा:

Most of the "fairy tales" about St. Paddy's Day involve a leprechaun. A leprechaun is said to be a short fellow with a red beard and a pot of gold. Supposedly, this pot of gold is hidden at the end of a rainbow. Because you can never find the "end" of a rainbow, you can't get the pot of gold. To get the gold, you've first got to catch the little Leprechaun.

माहितीचे आणखी काही सुवर्णकण माहितीच्या जालातून पदरी पडले ते असे:
The idea that a pot of gold can be found at the rainbow's end originated somewhere in old Europe. In Silesia, an obscure area of eastern Europe, it was said that the angels put the gold there and that only a nude man could obtain the prize.
The legends of many cultures see the rainbow as a kind of bridge between heaven and earth. One of the most beautiful sights in nature, the rainbow has become in western culture a symbol of renewed hope; something lucky to look upon. To Iranian Moslems, even the brilliance of the colors in a rainbow have significance. A prominent green means abundance, red means war, and yellow brings death. The Arawak Indians of South America recognize the rainbow as a fortunate sign if it seen over the ocean, while tribes in northeastern Siberia see it as the tongue of the sun. The North American Catawba Indians of the Southeast and the Tlingit of the Northwest both regard it as the bridge between the living and the dead

गजबजलेल्या महानगरात जिथं स्कायलाइनच दिसत नाही, तिथं क्षितीजावर दिसणारा हा निसर्गाचा चमत्कार दिसणंही दुरापास्त झालंय. त्यामुळे इंद्रधनुष्य दिसलं तरी पूरे, त्या खजिन्याचं नंतर बघू असं म्हणायची वेळ आलीय.

आमचे ऑर्कूट-स्नेही सूर्यकांत डोळसे इंद्रधनुष्याला "धरतीने आकाशाच्या गळ्यात टाकलेले हात" असं म्हणतात. इंद्रधनुष्य बघून मग अशा कविताही सुचायला लागतात. कुणाला "ति"च्या डॊळ्यातही ते दिसायला लागतं आणि मग "तो" म्हणून जातो:

इंद्रधनुष्य तर मला
तुझ्या डोळ्यातच दिसलं
आसवांचा पाऊस
ओसरल्यावर पाह्यलं

आमचे दुसरे ऑर्कूट स्नेही अभिजित यांना तर इंद्रधनुष्य बघितल्यावर "पूर्ण झाले आयुष्याचे कोलाज" ही भावना व्यक्त करावीशी वाटते. ते म्हणतात:

ती एक श्रावणसर, चिंब रंगवून गेली,
पहिल्या पावसातले इंद्रधनुष्य,
पूर्ण झाले आयुष्याचे कोलाज
आठवणींच्या रेखीव नक्षीला चढला नवा साज

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आपल्या "अंधाराला छेदण्याची गरज आहे" या कवितेत (हो, कवितेत!) म्हणतात:
.................
मी असा का झालो ? असुरक्षित ?
कधी निघणार मी बाहेर ? मीच बांधलेल्या थड़ग्यातुन ?
खरंतर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना ?
कधी चिमटणार मी आकाशाला ?
कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केसात ?
क्षितिजवरील सूर्याकडे मान वर करून पहाताना,
कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात ?
मला या चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं........

इंद्रधनुष्यावर अशा विविधरंगी कविता वाचल्या की वाटतं हाच तो इंद्रधनुष्याचा आठवा रंग ! कधी तो गुलाबी असेल नसेल पण पहाणार्याच्या डोळ्यात असेल तो रंग म्हणजेच इंद्रधनुष्याचा आठवा रंग. इंद्रधनुष्यात हा गुलाबी रंग नाही. पण तो त्यानं आपल्याला दिलाय आणि देणाराची थोडी तरी मालकी आपण मानू या की!

- डॉ. अशोक कुलकर्णी

चांगले लेखन

1

चांगले लेखन

सुरेख लिहिले आहे...खरच मीही

2

सुरेख लिहिले आहे...खरच मीही हे कधिच नोट केले नव्ते कि गुलाबी रनंग नाहिये ते..

छान

3

छान लिहिलंय डॉक्टरसाहेब!

>> इंद्रधनुष्य़ बघून फुलारून आला नाही असा माणूसच विरळा.
खरंच! आम्ही एकदा असेच एक टेकडी उतरत असताना इंद्रधनुष्य दिसू लागलं! आम्ही सगळेच लहान त्यात मुंबईत इंद्रधनु दिसणं म्हणजे अहोभाग्यम! त्यामुळे सगळेच एक्साईट झालो! आमचा एक मित्र उडी मारून जोरात ओरडला, "हायला, ते बघ रॅम्बो!"
Laughing out loud Laughing out loud

मस्त लेख ! इथे बरेचदा अगदी

4

मस्त लेख !

इथे बरेचदा अगदी माझ्या दारापुढे इंद्रधनुष्य दिसते... याची शिडी करून मायदेशी जाता येइल का असा विचार मनात येतो..हसते स्वतःला !


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

लेख आवडला.

5

लेख आवडला.

प्रतिसादाचा वेग

6

१२:५९ ला लेख साईट्वर टाकला आणि पहिली प्रतिक्रिया आली १३:१५ ला. क्या बात है.... धन्यवाद!


आपला स्नेहांकित...
-अशोक

खरंच छान आहे लेख. इंद्रधनुष्य

7

खरंच छान आहे लेख. इंद्रधनुष्य किंवा झालंच तर लोलकातून दिसणारे रंगीत कवडसे फार आकर्षक दिसतात. हास्य
(सप्तरंगी)


-पुण्याचे पेशवे

वाह, क्या बात है

8

वाह, क्या बात है काका........!!
इंद्रधनुष्याचे सर्व रंग एकत्रित करून तुम्ही लेखात भरलेत..........शुक्रीया.

प्रतिसादांचे इंद्रधनुष्य

9

प्रतिसादांच्या या इंद्रधनुष्याचे रंगही विलोभनीय


आपला स्नेहांकित...
-अशोक

तुम्ही नक्की कसले डॉक्टर हो..

10

डॉक्टर असुनही चांगलं लिहिलय की.. wink ह. घ्या.
मस्त लिवलय.. एक ओळ मलापण आठवली..

मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे..
...
..
इंद्रधनुष्याच्या शिक्का कोपर्‍यात मारलेला.
..

कविता शोधुन देतो पुर्ण.. थांबा जरा..

डॉक्टर असूनही

11

आता ह्या प्रतिसादाचं काही वाटत नाही. "डॉक्टर असूनही तुम्ही कविता करता?", "डॉकटर असूनही तुम्हाला संगीताची आवड?", "डॉक्टर असूनही तुम्ही"नाटकात काम करता?".... यात कौतुक असतं हे मान्य. पण तरीही विचारावंसं वाटतं "का रे बाबा, आम्ही ही माणसंच आहोत. आमच्या ही छातीत तुमच्या सारखंच काळीज धदधड्तंय...." असो. असो...


आपला स्नेहांकित...
-अशोक

>>आमच्या ही छातीत तुमच्या

12

>>आमच्या ही छातीत तुमच्या सारखंच काळीज धदधड्तंय
असाय होय ते.. आम्हाला फक्त आमच्या छातीत धडधडलं कीच डॉ. आठवतो..

जाउद्या डॉक.. ती कवित देउन खुश करतो तुम्हाला थांबा..

भले

13

अहो अनेक डॉक्टरांची हे असले 'रिकामपणचे धंदे' करण्याबद्दल ख्यातीच आहे. अहो बी जे च्या खाणीतून जेवढे प्रसिद्ध डॉक्टर बाहेर पडले नाहीत तेवढे रंगकर्मी पडले आहेत. अगदी डॉ. लागू, डॉ. जब्बार पटेल यांच्यापासून अगदी डॉ. गिरीश ओक (आता हे बीजेचे आहेत का मला माहित नाही हां) येथपर्यंत रांग आहे. किंबहुना डॉक्टर मंडळी बरीच रंगीत (मी रंगेल म्हणत नाहीये हां) असतात असा माझा अनुभव आहे. डॉ. अवचटांसारखा सामाजिक लेखक आहे, डॉ. सलील कुलकर्णींसारखा संगीतकार आहे, किती उदाहरणे द्यायची हो. ठणकावून सांगा हो डॉक्टर मंडळी अधिक रसिक असतात (क्लिनिकली रसिक म्हणा हवे तर खी: खी: )

(नावामागे डॉ.लावूनही डॉक्टर नसलेला) रमताराम

+११११११११११११११११११११११११११११

14

+११११११११११११११११११११११११११११११११११ फॉर अशोक काका आणि रमताराम दा

बाकी काहीबी म्हना नावामागे डॉ

15

बाकी काहीबी म्हना नावामागे डॉ असले की एक समाजाचा बघण्याच्या दृष्टीकोनात वेगळाच रंग येतो.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वेगळा

16

म्हणजे नक्की कसा म्हणायचा आहे. आमच्या नावामागे डॉ. आहे हे उघड झाल्यावर आम्हाला लै मार पडला होता ब्वॉ.

आणि हो..

17

मी माणसांचा डॉक्टर आहे...!


आपला स्नेहांकित...
-अशोक

च्यायला मग आपण बिन्धास्त..

18

च्यायला मग आपण बिन्धास्त.. आपल्याला कायच उपयोग नाय wink

घ्या.. इन्द्रधनुष्याची आठवण

19

घ्या.. इन्द्रधनुष्याची आठवण काढल्याबद्दल, ही कविता डॉ़क्टर साहेबांना अर्पण..

मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे
डोळा ओलावून वाचे मजकुर पावसाचे
टपटपता मायना डोळ्यापुढूनी जाईना
घन दाटला संदेश ऋतू मनात माईना
वीश्व अवघे कसे हे निळ्या लिफाफ्यात साचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे. ----- १
इन्द्रधनुष्याचा शिक्का कोपर्‍यात मारलेला
शेवटाच्या ओळीतही ॠतु आहे भारलेला
गुलालाने ओसंडले तेरड्यांचे ओले ओझे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे. ----- २
घुमे थेंबाची घागर झिम्म गवताच्या ओठी
पोर हिरवळीची जशी फेर धरे पाणवठी
कृष्णसावली घनाची काळ्या डोहालाच लुचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे ----- ३
निथळत्या पाखरांची फडफड पावसाळी
मेंदी मातीची आळवी तळपायाशी भुपाळी.
लाल पावलांचे ठसे, जणु पहाटच नाचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे ----- ४
किर्र सावळ्या मेघांचे नदी भरिते अंजन
रुणझुणत्या सरींचे पायी झाडांच्या पैंजण
उलगडले भुईने मोरपिसारे तळ्यांचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे ----- ५
ऋतु अखेरीस बोले, सांगा किती बरसावे
किती उंच उसळावे अन खोल कोसळावे
येता भरूनी जे केले तेच ओलेपण जाचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे ----- ६
वृक्ष उन्मळले कोठे जर चुकुन माकुन
माझ्या भरून येण्याला घेशील का सांभाळुन
फक्त तुझा नी तुझाच, आर्जव हे पावसाचे
मला ढगाने धाडिले आहे टपाल थेंबाचे ----- ७
---- कवी - नलेश पाटील (एका ध्वनीचित्रफितीमधुन साभार)

अनेक

20

धन्यवाद हो अर्धवटराव (ओ ते नाव बदला ना प्लीज, तुम्हाला संबोधताना तुमचा अपमान करीत असल्याची अपराधी भावना होते उगाच). एकदम सुरेख कविता.

जाउद्या ररा.. भावनाओका क्या

21

जाउद्या ररा.. भावनाओका क्या है....

कविता खरच छान आहे.. फ्रेश आहे.. जरा मला.. नलेश पाटलांच्या एखाद्या कवितांसंग्रहाचे नाव माहित असेल तर सांगा ना..

नाय हो

22

आमास्नी ठावकी नाही. ह्या कविचे नावही तुमच्याकडूनच ऐकले आम्ही. कवितांच्या बाबतीतसुद्धा अंमळ कच्चेच आहोत.

छान लिहीले आहे.

23

छान लिहीले आहे.

डॉक्टरांचा आणी रॅम्बोचा आठवा

24

डॉक्टरांचा आणी रॅम्बोचा आठवा रंग छानच.
कल्पना, विनोद, रेफरन्स, आणी विचार एकत्र मांडण्याची शैलीही सुरेखच. हास्य

अजुन लिहावे ही विनंती.

डॉक्टरांचा आणी रॅम्बोचा आठवा

25

डॉक्टरांचा आणी रॅम्बोचा आठवा रंग छानच.
कल्पना, विनोद, रेफरन्स, आणी विचार एकत्र मांडण्याची शैलीही सुरेखच.

अजुन लिहावे ही विनंती. >>

हेच आणी अगदी असेच !!!!

धन्यवाद

26

धन्यावाद सर्वांचे!


आपला स्नेहांकित...
-अशोक

धन्यवाद

27

अर्धवटराव.... मी लिहिलं ते रागानं नाही तर एक ऑब्झर्वेशन म्हणून.. आता तर काय तुम्ही भन्नाट कविताच दिलीय, प्रश्नच मिटला...
रमातारामजी...
गिरीश ओक आयुर्वेदाचे तर सलील कुलकर्णी संगीताचे डॉक्टर. आणि लागूंचं म्हणाल तर त्यांच्या एक सहकलाकार अतिश्रमानं ग्लानी येवून पडल्या तेंव्हा दुसरा एक सहकलाकार त्यांनाच (लागूंना) म्हणाला: "डॉक्टरला बोलावा की"!
आता बोलवा... आपलं बोला!


आपला स्नेहांकित...
-अशोक

इंद्रधनुष्य का म्हणतात ? यावर थोडासा कवडसा

28

अशोककाका,
आपली लिहिण्याची पद्धत खूप छान आहे. लेख मनापासून आवडला.
बाकी इंद्राच्या गुणांबद्दल आपण लिहिले ते योग्यच आहे. खास करुन ऋषीमुनींच्या बायका फितवण्यात या इंद्राचा हातखंडा होता. wink


निसर्गाच्या या चमत्काराला "इंद्रधनुष्य" हे नाव ज्या कुणाला सुचलं त्याच्यावरून असले दहा इंद्रधनुष्य कुर्बान! इंग्रजीत त्याला रेन-बो म्हणतात हे तर आपण जाणतोच. पण त्याला इंद्राशी जोडून मोठीच कमाल केलीय.

याबद्दल थोडी भर टाकू इच्छितो.

इंद्र ही वेदकालापासून पावसाची देवता मानली गेली आहे. त्यामुळेच धनुष्याकृती दिसणारे इंग्रजीतील रेनबो मराठीत वा हिंदीतही इंद्रधनुष्य (इंद्राचे धनुष्य) झाले ते योग्यच आहे असे वाटते. हास्य
कृष्णाची एक कथा माहितच आहे की. पाऊस चांगला पडावा म्हणून सगळे गोपी इंद्राची पूजा करत असत. तेव्हा कृष्णाने सांगितले की आपण इंद्राची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. तेव्हा इंद्र कोपला व असा पाऊस पाडला की सगळे गाव बुडू लागले तेव्हा कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन तोलून सर्व गोपींना आसरा दिला.

आपल्या पुराणांत खूप दंतकथा आहेत. पण या दंतकथांच्या मुळाशी काहितरी सत्य असतेच. सहज आठवले म्हणून सांगितले. हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हम्म

29

इंद्र ही वेदकालापासून पावसाची देवता मानली गेली आहे.
मुळात वरुण ही पावसाची देवता तिचे/त्याचे इंद्राशी एकरुपत्व ही उत्तरकालीन कल्पना आहे. त्याबद्दल अधिक लिहीत नाही. त्यातून अनेक उपचर्चा सुरू होतील. इत्यलम्.

इंद्रः पावसाचा देव

30

सागर....
इंद्र पावसाचा देव हे आपण जाणतो ते गोवर्धन पर्वताच्या कथेमुळे. मग प्रश्न पडतो की वरूण कशाचा देव? की एक क्याबिनेट मंत्री आणि दुसरा राज्यमंत्री ?


आपला स्नेहांकित...
-अशोक

तुमचा अंदाज योग्य वाटतो...

31

वरुणदेव जरी पावसाचं खातं संभाळत असला तरी त्याचा रिपोर्टींग मॅनेजर इंद्र होता, त्यामुळे पाऊस किती पाडायचा याचं बजेट बहुदा इंद्रच आखून देत असावा वरुणाला... देवांचा राजाच ना तो... हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नाय पटेश

32

http://www.mi-marathi.com/node/2455#comment-33626
बाकी यावर चर्चा पुन्हा केव्हातरी.

हम्म....सहमत

33

रमतारामजी...हम्म....सहमत आहे. बघू नंतर केव्हातरी. आत्ता पुराणे चाळायची मला पण जास्त ईच्छा नाय. कारण महाभारत रामायण या आधी दिवोदासाची कथा आहे... ती वेदांतही तुटक आहे पण माझ्याकडे २ पुस्तके असल्याने बर्‍यापैकी माहिती आहे. त्यांतही वरुण व इंद्र या दोन देवता आहेत. महाभारतकाळातच इंद्राचा आणि पावसाचा कृष्णकथेमुळे संदर्भ मिळतो... डोक्याची मंडई होईल उगाचच Sad जाऊ देत


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लिंक...

34

रमतारामजी... ही कोणती लिंक दिलीत?

http://www.mi-marathi.com/node/2455#comment-33626

त्यावर टीचकी मारली तर हाच धागा (थ्रेड) दिसतोय पुन्हा!


आपला स्नेहांकित...
-अशोक