मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
स्टिलबॉर्न
वास्तव वाटणारे काल्पनिक - "स्टिलबॉर्न'
पुस्तक परीक्षण
अंजली आमोणकर
लिखाणाच्या जगतात, लेखक- कवी- समीक्षक- नाटककार आपल्याला कल्पनेच्या जगतात असे लीलया घुमवून आणतात की, स्वतः लेखकाने जरी आपली कलाकृती वास्तव नाही, असे शपथेवर सांगितले तरी त्यावर वाचकांचा विश्वास बसणार नाही.
सुप्रसिद्ध दक्षिणी पत्रकार रोहिणी निलेकणी यांनी लेखनाव्यतिरिक्त, समाजकार्याच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. पती "आयटी' क्षेत्रातले नामवंत असल्यामुळे त्याही क्षेत्रात रस निर्माण होऊन त्यांनी बरीच बाजी मारली आहे. या सर्वांचा परिपाक होऊन एक अतिविलक्षण रहस्यमय कादंबरी जन्माला आली - "स्टीलबॉर्न'.
एम. आर. हिल्सवरच्या आदिवासी वस्तीत एका मृत विरूप अर्भकाचा जन्म आणि त्याचवेळी बेंगळूरमधील शोधपत्रकार पूर्वा पंडित हिला अपघात होणे... प्रथमदर्शनी या घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तरी त्यामधून सुरू होतो एक विलक्षण रहस्यमय प्रवास... पूर्वाचा!
अपघातग्रस्त पूर्वा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, तिच्या कानावर, डॉक्टरांचे काही अर्धवट संवाद पडतात. त्यातून तिला कळते की, डॉ. अंशुल हिरेमठ याने स्त्रियांसाठी संतती-प्रतिबंधक लस तयार करण्यात बाजी मारली आहे. प्रयोग पहिल्या टप्प्यावरच्या चाचण्यांमध्ये पूर्णतया यशस्वी होतो. दुसरा टप्पा संपताना या यशाला थोडे गालबोट लागते. लसीचे इंजेक्शन घेतलेले असताना देखील काही आदिवासी महिला गरोदर राहतात व त्यापैकी काहींचे नैसर्गिक गर्भपात होतात, तर काहींना मृत विरूप बाळे होतात. प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न होतो. पण, "केती' नावाची आदिवासी स्त्री वाढलेल्या गर्भाला जन्म देण्याचा निर्णय घेते व पूर्वाची हेरगिरी फळाला येते. यशस्वी लस परदेशी शास्त्रज्ञांना विकून, इथल्या लसीच्या डोसात फेरबदल करणारी व्यक्ती उघडकीस येते. डॉ. हिरेमठांची सहकारी डॉ. रीटाच हे काम करत असते.
संपूर्ण कथानकाला पत्रकारितेची पार्श्वभूमी दिली आहे. त्यामुळे त्या जगतातले बारकावे, स्पर्धा, स्वातंत्र्य, धोके हे आपोआपच चित्रित होतात. काही आदिवासींना लसीची चाचणी करण्याकरता निवडलेले असते. त्यामुळे आदिवासींची राहणी, श्रद्धा, खाणेपिणे, व्यवसाय, जीवनशैली वगैरे सर्व बारकाव्यानिशी यात येते. तिसऱ्या ठिकाणी ज्या लसीला केंद्रबिंदू बनवून ही कथा रचली आहे, त्या (काल्पनिक) लसीची सर्व (सत्य) वर्णने, गरजा, पार्श्वभूमी, उपयोगिता, वापरण्याची पद्धत, संभाव्य धोके वगैरे सर्व ऊहापोह लेखिकेने अनेक महिने अनेक डॉक्टरांशी चर्चा करून, विस्तृतपणे अतिशय मनोरंजक रूपात केला आहे. त्यामुळे त्या लसीच्या नामकरणापासून (एफ. आर. पी. ४१) सर्व काही सत्यच वाटत राहते. झोता पेल्सूसिडा (बीजांडा वरील एका प्रकारचं आवरण) यावरील डॉक्टर व पूर्वाची चर्चाही कंटाळवाणी वाटत नाही.
नायिकेची बहीण "फ्रेडरिक्स अटॅक्यिया' या दुर्धर रोगाने पीडित आहे. त्यावर उपाय नाही. मज्जा तंतूमधील ऱ्हास होणाऱ्या पेशी व त्यापायी निकामी होत जाणारे स्नायू बघत रुग्णाला मृत्यू येतो. त्यालाही कथानकात गरज पडेल तिथे चपखल बसवले आहे. इंटरनेटवर हॉकिंग करून शोधलेले "फुटीर' व्यक्तीचे नाव, नंतर परदेशातून खणलेली केसची पाळे-मुळे, हे सर्व स्वतंत्र विषय असूनही ज्या चलाखीने एकत्र गोवत कथानक पुढे नेले आहे त्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन.
या सर्व विषयांची केवळ वरवर माहिती असून जमणारी ही गोष्ट नव्हतीच. त्यामुळे लेखिकेचे चौफेर, गहिरे ज्ञान प्रकट होते. या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद श्रावण मोडक यांनी अतिशय मनोरंजक, पण तितक्याच समर्थपणे केला आहे. वैद्यकीय विषयांवरची ही कादंबरी, त्यामुळे थोडासा क्लिष्ट विषय असूनही "समजत नाही' अशी एक ही ओळ यात नाही, याचे श्रेय लेखकाला, तितकेच अनुवादकाला देखिल!स्टिलबॉर्न
मूळ लेखक : रोहिणी निलेकणी
अनुवाद : श्रावण मोडक
प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे
मूल्य : २२५, पृष्ठे : २७३
.jpg)