शांताराम
मुळ किंमत : ९९० रु.
‘मेहता प्रकाशन’च्या या पुस्तकातील हा काही अंश-
मा झ्या आयुष्याची कहाणी मोठी आहे. लांबलचक, गुंतागुंतीची आणि गजबजलेली.
कोण आहे मी? कोण होतो?
हेरॉईनच्या नशेत आदर्शाचा विसर पडलेला, सारी मूल्यं गमावून बसलेला क्रांतिकारक.
गुन्हेगारीच्या पाशात अडकता-अडकता विचारांची प्रामाणिक बैठक हरवलेला तत्त्वज्ञ.
.. आणि कडेकोट बंदोबस्तातल्या अंधाऱ्या तुरुंगात, गंजलेल्या भ्रष्ट आत्म्याचा बळी दिलेला एक कवी!
डोळ्यांत तेल घालून बंदुका रोखलेल्या पहारेकऱ्यांच्या नजरेत धूळ फेकून, कडेकोट तुरुंगाच्या मुख्य दारातून दिवसाउजेडी मी पसार झालो. त्या क्षणी माझ्या देशात मला नवी ओळख मिळाली.
मोस्ट वॉण्टेड मॅन.
पण नशीब माझ्याबरोबर होतं.
तेही माझ्याबरोबर तुरुंगातून निसटलं आणि र्अध जग पालथं घालून भारतात पाऊल ठेवेपर्यंत नशिबाने माझी पाठराखण केली.
मी भारतात आलो.
मुंबईतल्या माफिया टोळ्यांमध्ये घुसलो. बंदुका आणि बॉम्बच्या चोरटय़ा आयातीत सहभागी झालो. खोटय़ा नावांनी वावरलो. बनावट नोटांचे व्यवहार, स्मगलिंग, तोतयेगिरी.. ज्यात त्यात तोंड घालत फिरलो. जगातल्या तीन वेगवेगळ्या खंडांमधल्या कित्येक देशांच्या अधिकाऱ्यांनी मला जेरबंद केलं. मारझोड झाली. जीवघेणे वार झाले. अर्धपोटी- उपाशी राहिलो. ऐन युद्धात सापडलो. बंदुकांच्या नागडय़ा टोकासमोर उभं राहण्याच्या वेळा आल्या.
लढलो.
जिंकलो नाही, पण जिवंत राहिलो.
माझ्याबरोबरीचे कित्येक बळी पडले, कुत्र्याच्या मौतीने तडफडून मेले, धुळीला मिळाले. त्यातले कितीतरी माझ्यापेक्षा पुष्कळ बरे होते. जिवंत राहायला लायक होते.. पण माझ्या डोळ्यांदेखत ते संपले.
त्यातल्या कित्येकांना मीच जाळलं. कित्येकांना खड्डय़ात पुरलं. नकळत झालेल्या एका अपराधाचं प्रायश्चित्त भोगणाऱ्या त्यातल्या अनेकांच्या कहाण्या मला ठाऊक होत्या. क्षणभराच्या प्रेमासाठी आयुष्याचा वनवास भोगणाऱ्या आणि क्षणाच्या द्वेषासाठी आयुष्याचा वणवा केलेल्या त्यातल्या कित्येकांना मी ओळखत होतो. रक्तामांसात लडबडलेले.. त्यांचे मुडदे जाळताना, पुरताना त्यांच्या कहाण्या माझ्या आयुष्यात मिसळत, मुरत गेल्या. मी पुरता लडबडलो.
.. पण ही माझ्या कहाणीची सुरुवात नव्हे.
माफियांच्या टोळ्यांमध्ये घुसलो, त्याच्याही आधी सुरू होते माझी कहाणी.
मुंबई नावाच्या शहरात पाऊल ठेवलं, ती माझ्या कहाणीची सुरुवात.
त्याच क्षणी दैवाने पहिला फासा फेकला.
कार्ला सारानेनपर्यंत मी पोहोचलो आणि तिच्या गर्द हिरव्या डोळ्यांत डोळे घालून पाहिलं, त्या क्षणी खरा खेळ सुरू झाला.
जगातली प्रत्येक गोष्ट सुरू होते तशीच माझीही झाली.
तीच तीन पात्रं..
एक स्त्री.. एक शहर.. आणि थोडंसं नशीब!
मुंबईत पाऊल ठेवल्याक्षणी पहिल्यांदा मला काय जाणवलं असेल, तर वास!
वेगळाच.. अनोळखी वास!!
विमानातून बाहेर पडलो, तर विमानतळावर पोहोचायच्याही आधी मधल्या अरुंद बोळकंडीतच माझं नाक त्या वासाने भरून गेलं.
तोवर मुंबईच काय, भारताबद्दलसुद्धा फारसं काही ऐकलं नव्हतं कधी.
तो वास श्वासात खोल भरून घेतल्यावर मला ताजंतवानं वाटलं.
सुटल्यासारखं!
मोकळं, स्वतंत्र!
तुरुंगातून पसार झाल्यानंतरच्या स्वातंत्र्याचा पहिला वास.
त्याक्षणी ‘त्या’ वासाची ओळख नव्हती.
अर्थही नव्हता कळलेला.
आता कळतो.
मुंबईचा तो वास!
आशा, अपेक्षा आणि न मरणाऱ्या स्वप्नांचा गंध असलेला गोड, घामट वास!
स्वार्थ, द्वेषाचा स्पर्शही नसलेला.
आणि
अखंड लालसेने लडबडलेला, घुसमटून, गुदमरून टाकणारा, विरजलेला आंबट वास.
प्रेमाचा लवलेशही नसलेला.
देव-देवतांचा वास.
दैत्य-दानवांचा वास.
किडत, गंजत गेलेल्या, खिळखिळ्या झालेल्या आणि राख झटकून पुन्हा उभ्या राहणाऱ्या साम्राज्याचा वास.
शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तिथे पाठलाग करत येणारा खारट समुद्राचा निळा वास आणि खडखडत धडधडणाऱ्या यंत्रांचा रक्तरंजित लोखंडी वास.
सहा कोटी प्राण्यांच्या वळवळण्याचा, सरपटण्याचा वास, त्यात संख्येने निम्म्या असणाऱ्या माणसांच्या आणि उंदरांच्या हगण्या-मुतण्याचा वास.
त्या वासाला असंख्य गंध.
जगण्याच्या अविरत धडपडीचे,
थोडय़ा यशाचे,
प्रचंड अपयशाचे,
त्यातून येणाऱ्या हिमतीचे,
धैर्याचे आणि स्वप्नभंगाचे.
दहा हजार हॉटेलांचा वास.
पाच हजार देवळांचा, मशिदींचा, दग्र्याचा, चर्चेसचा वास.
अत्तरं, अगरबत्त्या, धूप, कापूर आणि ताज्या फुलांनी दरवळणाऱ्या शेकडो बाजारांचा वास.
मसाल्यांचा.. माशांचा वास.
कार्ला एकदा म्हणाली होती.
‘इट्स द वर्स्ट गुड स्मेल ऑफ द वर्ल्ड.’
अख्ख्या जगात इतका भयानक चांगला वास दुसरा नसेल!
खोटं नव्हतं तिचं म्हणणं.
एरवीही ती योग्य तेच बोलायची नेहमी.
.. इतक्या वर्षांनी आजही मी जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊल ठेवतो, त्या प्रत्येक क्षणी पहिली जाणीव एकच-
‘तो’ वास....
रस्त्यावरच्या गर्दीला चिरत घाईघाईने धावणाऱ्या एका गोष्टीकडे मी थक्क होऊन पाहत राहिलो- बैलगाडय़ा. शेपटीवाल्या बैलाच्या गळ्यात जोडलेली छोटी हातगाडी आणि त्यावर लादलेला तऱ्हेतऱ्हेचा माल. कलिंगडाचे ढीग, तांदळाची पोती, सॉफ्ट ड्रिंकची लाल-निळी खोकी, कापडाचे तागे, सिगारेट्सच्या पाकिटांची बंडलं, बर्फाच्या थंडगार लाद्या.
एक गोष्ट सर्वत्र भरून राहिली होती.
- पैसा.
फुटपाथवरच्या फाटक्या दुकानांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार उघडपणे चाललेले दिसत होते. प्रभाकर म्हणाला, ‘‘कोणत्याही देशाची करन्सी आणा, इथे ती बदलून मिळेल. डॉलर्सचे रुपये, पौंडाचे डॉलर्स.’’
- नोटांच्या गड्डय़ा इकडून तिकडे फिरत होत्या.
आणखी एक..
भिकाऱ्यांच्या टोळ्या.
कुणी भीक मागतंय. कुणी दोरीवर चालून, माकडं नाचवून पैसे मागतंय. शिवाय गारुडी. रस्त्यावर बसून बासरी वाजवणारे, गाणारे, पिंजऱ्यातल्या पोपटाकडून भविष्य सांगणारे, हात पाहणारे, वेश्यांच्या झुंडी आणि दलालांच्या रांगा.
आणि पायाखालचा रस्ता?
- अत्यंत अस्वच्छ. गुवा-मुताने, घाणीने बरबटलेला, आजूबाजूला कुजलेल्या कचऱ्याचे ढीग. बाजूला कचरा. पायाखाली कचरा. शिवाय रस्त्याच्या कडेने असलेल्या उंच इमारतींच्या खिडक्यांमधून वाहत्या रस्त्यावर बिनधास्त कचरा फेकला जात होता तो वेगळाच. क्षणाक्षणाला कचऱ्याचे ढीग वाढत होते आणि खाऊन खाऊन माजलेल्या गलेलठ्ठ उंदरांच्या उद्दाम टोळ्या.
एवढय़ा गर्दीत, कलकलाटात रस्त्यावर दिसणाऱ्या भिकाऱ्यांवरून माझी नजर हटेना. लुळे, पांगळे, आंधळे, महारोग होऊन हातापायांची बोटं झडलेले, हात तुटलेले, पाय फुटलेले.
जगाच्या पाठीवरला प्रत्येक रोग झालेल्या अशक्त, अस्वच्छ, भुकेल्या माणसांच्या झुंडी दुकानात, हॉटेलात, रस्त्यावर दिसेल त्याच्यापुढे हात पसरत सरपटत होत्या. विमानतळावरून बाहेर पडल्या-पडल्या धावत्या बसच्या खिडकीतून दिसलेलं झोपडपट्टीतलं दारिद्रय़ पाहताना मी हादरलो होतो. या रस्त्यावरून चालताना इतकी लुळीपांगळी माणसं दिसत होती की, माझ्या धट्टय़ाकट्टय़ा, निरोगी शरीराची मला लाजच वाटली, पण या वेळी माझ्यासोबत प्रभाकर होता. त्याने मला नाण्याची दुसरी बाजू दाखवली.
रडत-भेकत पोटासाठी हात पसरणारे केविलवाणे भिकारी होते, तशा पोटापुरतं मिळाल्यावर राहत्या रस्त्याशेजारच्या छोटय़ा गल्लीत सावलीची निवांत जागा बघून पत्त्यांचा डाव मांडलेल्या टोळ्याही दिसत होत्या. जो तो खूश, खेळात रमलेला.
कुणाला उघडय़ा रस्त्यावर सुखाची शांत झोप लागलेली.
कुणी जेवत बसलं होतं.
ढोपरापासूनचे पाय तुटलेल्या एका म्हाताऱ्या, पांगळ्या भिकाऱ्याच्या चाकांच्या गाडीवर बसून पोरांची झुंड धमाल करत होती.
हसण्या-खिदळण्याला नुसता ऊत आलेला.
- प्रभाकरचं माझ्याकडे बारीक लक्ष होतं.
‘‘हाऊ आर यू लायकिंग अवर बॉम्बे?’’
- शेवटी त्याने उत्साहाने विचारलंच.
मी पटकन म्हणालो, ‘‘आय जस्ट लव्ह इट!’’
- त्यातलं एक अक्षर खोटं नव्हतं.
खरंच, मुंबई मला मनापासून आवडली होती. चैतन्याने ओसंडणारी, पाशवी, हिंस्र; पण सुंदर. ब्रिटिश राजवटीच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या जुन्या, दगडी इमारतींना चिकटून उभे असणारे सिमेंट काँक्रीटचे टोलेजंग सांगाडे, जिथे तिथे उभी दुकानं. त्या गर्दीत मांडलेला रंगीबेरंगी माल- भाज्या, फुलं, रेशमी कापड- सगळं एकत्रच. रस्त्याच्या डाव्या-उजव्या हाताला उभ्या असणाऱ्या प्रत्येक दुकानातून, रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक टॅक्सीतून मला वेगवेगळं संगीत ऐकू येत होतं. आजूबाजूला सर्वत्र रंगाचा कल्लोळ. भेलकांडून टाकणारे कसले-कसले वास आणि मुख्य म्हणजे एवढय़ा गर्दीत धावणाऱ्या प्रत्येक नजरेत दिसणारं हास्य.
जगाच्या पाठीवर कुठेही मी इतक्या प्रसन्न, चैतन्याने ओसंडणाऱ्या माणसांची गर्दी पाहिली नव्हती.
आणि सगळ्यात महत्त्वाचं-
स्वातंत्र्य!
प्रत्येक जण स्वतंत्र होता.
धमनीतून रक्त वाहावं तसं शहराच्या कोंदट हवेतून स्वातंत्र्य वाहताना दिसत होतं. मुंबईत पाऊल ठेवल्या-ठेवल्या झोपडपट्टय़ांच्या दरिद्री रांगा मला अमानुष वाटल्या होत्या. रस्त्यावरचे भिकारी पाहताना स्वत:ची लाज वाटली होती, पण या माणसांच्या गर्दीतून फिरताना जाणवलं, आपल्याला वाटतं तितकी ही माणसं असहाय, दयनीय नाहीत. त्यांना स्वत:चं एक आयुष्य आहे. मुंबई नावाच्या या शहरात ते जगण्याची त्यांना मुभा आहे. त्यांना कुणी रस्त्यावरून हाकलून लावत नाही. वस्त्या गलिच्छ आहेत, म्हणून रातोरात झोपडपट्टय़ांवर बुलडोझर चालवले जात नाहीत. त्यांचं आयुष्य सोपं नाही, हे मान्य; पण श्रीमंतांचे बंगले असतात, त्याच वसाहतीत, त्याच गल्ल्यांच्या कोपऱ्यावर या फाटक्या, दरिद्री माणसांना रात्रभरासाठी डोकं टेकवता येतं. श्रीमंतांनी उभारलेल्या; श्रीमंतांसाठीच्या सार्वजनिक बागांमध्ये भिकाऱ्यांची नागडी पोरं धिंगाणा घालत खेळू शकतात.
द सिटी वॉज फ्री.
आय लव्ह्ड इट!
पण एक मात्र होतं..
आजूबाजूला उसळत्या, चैतन्यशील कल्लोळामागची ऊर्जा नक्की कोणती, हे मला समजण्याला काही मार्ग नव्हता. मी लोकांचे चेहरे वाचू शकत होतो, पण त्यांची भाषा मला समजत नव्हती. गर्दीतली माणसं कशासाठी भांडतात, कोणत्या प्रेमाने गळ्यात गळे घालतात, कशाकरता एवढी धावतात, त्यांचे स्वभाव.. पायघोळ काळे बुरखे, रंगीबेरंगी साडय़ा आणि फेटय़ांमध्ये लपेटून माझ्या नजरेसमोर धावणारी त्यांची संस्कृती.. हे सगळंच मला परकं होतं. म्हणजे नजर खिळवून ठेवणाऱ्या गुंतागुंतीच्या महानाटय़ाचा प्रयोग समोर सुरू असावा आणि पात्रांच्या तोंडी शब्दच नसावेत; तसंच काहीतरी झालं होतं.
- तरीही माझ्या नजरेला नजर मिळवणाऱ्या प्रत्येक अनोळखी चेहऱ्याला मी हसून प्रतिसाद देत होतो.
ते सोपं होतं.
हसणं.
मी माझ्या देशातून फरार झालेला.
अपराधी, गुन्हेगार माणूस.
जगभरचे पोलीस माझ्या पाळतीवर. पकडला गेलो तर माझ्या डोक्यावर मोठं इनाम.
- तरीही मुंबई नावाच्या शहराने मला श्वास घेऊ दिला. त्या हवेतलं मुक्त स्वातंत्र्य मी हपापल्यासारखा पीत राहिलो.
.jpg)