आईचे स्वगत (शेवटचा भाग)

0
0

आज दुपार कशी शांत गेली. हे पण वाचत पडले होते.
कधी नव्हे ते आज्जीबाईंचे प्रश्न संपलेले दिसले.
फोनही वाजला नव्हता.
मला थोडा विचार करायला वेळ मिळाला खरा.
वारंवार मला एकच प्रश्न मला छळत होता.सगळं काही एवढं सुरळीत का बरं चाललंय ? तंटा नाही. वाद नाहीत.
छे!छे! हे वेलणकर नव्हेत.तो उसळून येणारा राग. हातवारे करून आपलं मत ठासून सांगणं.एखाद्या मुद्द्यावर तासंतास वाद घालून अचानक शरण येणं.दिवसदिवस धुमसत राहणं .सगळं काही इतिहास जमा झाल्यासरखं वाटत होतं.
गणित बरोबर आहे असं वाटत होतं पण ताळा जमत नव्हता बाई.हातचा एक चुकून विसरल्यासारखं वाटत होतं. येउन जाउन मन परत परत तिथंच घुटमळत होतं.
मग एक आयडीया आठवली.
गणित पुन्हा पायरी पायरी ने मांडा.
जिथं चूकलं नाही असं वाटत तिथेच शोधा.चूक नक्की सापडेल.
विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही .
===============================================================
अहो मॅडम उठा आता. बाई, चक्क पाच वाजले होते.
हे समोर उभे. हातात चहाचा कप. माझ्यासाठी की काय?
हे हसले.
अमेरीकेला जायची तयारी.तू बाळाकडे बघणार . ...
आमच्याकडे कोण बघणार ?.... मी आपली तयारी करतोय.
काय एक एक बदल होतायेत या माणसात.एकापाठोपाठ एक धक्केच देतायत.
आताशा मी बघतेय यांचा टारगटपणा वाढतच चाललाय.
काल रात्री मी म्हटलं
अहो होईल ना माझ्या हातून सगळं काही नीट.
जावयासमोर लाज नको जायला.
मलातर बाई टेंशन येतंय.
मला म्हणतात कसे .. ....
टेंशन कशाला ?
आय-पील आहे ना. आधी काही कळलंच नाही.कळलं तेव्हा लाजून मेले गं.!!
===============================================================
आज सकाळी बघते तो हे बसलेत सूर्या चॅनेल बघत.
(पूर्वी रात्री गाणी बघायचे सूर्या चॅनेलवर.एकदा डोळे वटारून पाह्यलं तेव्हांपासून बंद.)
कायहो ?.........काय बघताय?..
म्हणतात कसे. बघतोय. समजते का बघू या जावयाची भाषा.
मी म्हटलं , अहो जावई आंध्राचा.तुम्ही बघताय तमीळ न्यूज.झालं नंतर तासभर तेलुगु चॅनेल शोधत बसले.
नंतर म्हणले आपली काशाची जुनी वाटी कुठाय?
झाली शोधाशोध सुरु
हे शोधणार.
आज्जीबाई डायरेक्शन देणार.
मी भाजी घेउन येईपर्यंत अर्धं किचन हॉलमध्ये.
ह्यांना चक्क हाकलं घराबाहेर .
मला म्हणाले औषधं आणून ठेवतो सगळी.ऐन वेळेवर धावपळ नको.
तासाभरानं आले ढीगभर औषधं घेऊन.
मी म्हटलं एवढी काय करायची हो औषधं?
सहा महिन्याची आणली.
अहो , जावई म्हणला सहा महिने तर खरोखर सहा महिने राहणार का काय?
चेहेरा लगेच गोरामोरा झाला. काहीच बोलले नाहीत.
मी पण थोडावेळ काही बोलली नाही.
जावयाच नाव घेतलं आणि तुझी फार फार आठवण आली गं.
ह्यांना पण राहवेना. जुना आल्बम चाळत बसले.
===============================================================
बराचं वेळ झाला.काहीतरी लिहीत बसले होते.
अहो, काय लिहीताय?
जुनी वही दाखवली.चक्क पाळणे वाचत होते.नव्या वहीत कॉपी करत होते.
थोडया वेळानं गुणगुणायला लागले.
अंकी पित्याने घेतले तान्हे
आई आळवते अंगाई गाणे
विश्वाला रमवाया,अजूनी हा जागा राजस बाळ...
ह्यांचा आवाज अगदी सुरेल.थोड्या वेळाने दुसरा पाळणा.
नीज सख्या , सुकुमारा , जो जो राज कुमारा
निद्रा घे मन हारा.
आपल्याच नादात गात होते.
माझ्या मनात काहूर .
ह्यांना झालय तरी काय?
कुठेतरी गणित चुकतंय.कालपासून छळणारं मन आणखी आणखी बेचैन होत गेलं.
===============================================================
रात्री वेगळाच विषय.
मला म्हणाले तुला बाळाची ताळू तेलानी रोज भरायची आहे.जमेल ना?
मी म्हटलं तुम्ही आता व्हीसा पासपोर्ट सगळं बघा.बँकेचं काम करा.
आजीना वन्संकडे ठेवायचं की शशीधरकडे. तो विचार करा.
सकाळपासून बघतेय. काहीतरी भलतंच चाल्लय तुमचं
माझ्याकडे टकमक पहात राह्यले.काहीच बोलले नाहीत.
मन माझं परत परत वेड्यासारखं विचारायला लागलं.
काय झालय या माणसाला.
गणित सुटेना. टाळा जमेना.
================================================================
बेडरुम चा दरवाजा बंद करून हे माझ्या जवळ बसले.मला बाई राहवेना.
अहो, माझी शपथ. काही होतंय का तुम्हाला. तुम्हाला असं बघायची सवय नाही हो मला.
मला काही सुचत नाहीय्ये कालपासून. सांगा ना.
काही नाही गं .बघत्येस ना धावपळ चालल्येय ती.
बेडवर आडवे पडले.साईड टेबलवरच्या काशाच्या वाटीकडे बोट दाखवून म्हणाले,
टाळू भरण्याची प्रॅक्टीस कर.माझ्या डोक्यावर तेल घाल .बाळाच्या घालतात तसं
मी ह्यांच डोक मांडीवर घेतलं.चार थेंब डोक्यावर घातले. हळूहळू बोटानी तेल जीरवत राह्यले.
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले.
माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना.
हे शांत झोपले होते. छातीवर हाताची घडी.संथ लयीत श्वास.
माझा एकटेपणा मला सोसवेना झाला.एसिचा खर्जातला आवाज सोडला तर बाकी सारं शांत शांत.
मी हलक्या आवाजात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.
शिरो मे राघव पातु

राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.
यांच कपाळ .गोरा रंग. चौरस खांदे. निर्भीड छाती.
रामरक्षेतला राम माझाच.माझी भिती हळूहळू पळायला लागली.
मी यांच्या अंगावर पातळ चादर घातली.मला वाटलं आता रामाला माझीच नजर लागेल.बेडरुमचा नीळा मंद दिवा सुद्धा मला सहन होईना.मी हळूच उठून बंद केला.यांच्या छातीवर डोकं टेकून पडले. हे हसल्याचा मला भास झाला.पण मला आता राहवेना
मुझे अपनी शरण् में ले लो राम.
================================================================
सकाळी आजीनी स्वतःच चहा करून घेतला.पावणेसहाचा गजर झालाच नाही
======================================================
सकाळी झालेला उशीर मला दिवसभर छळत होता.मनातला काटा निघाला होता पण मधूनच हलकास सल जाणवत होता.आजी समोर तर मला अगदी चोरट्यासारखं वाटत होतं.ताप उतरल्यावर कसं हलकं हलकं वाटावं तसं दिवसभरवाटत होतं.सकाळचा चहा दिल्यावर मी किचनमध्ये गेले.
हे आलेच पाठोपाठ.काय करत्येस?
काही नाही. ....
आणि तुम्ही सुध्दा आता कामाला लागा. स्वामींची जयंती आहे आज . विसरलात वाटतं .
ही मात्रा ताबडतोब लागू पडली.
मी नैवेद्याची तयारी करतेय . तोपर्यंत तुम्ही पूजेचं बघा.काल हरवलेली लय आज सापडली होती. घर नव्या उजेडानं भरून गेल्यासारखं वाटत होतं.
पूजा झाली. आरती मनासारखी झाली.आज्जी नी संपूर्ण हरीपाठ म्हटला.
सांगतेला सुरुवात झाली.
अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं.
माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल.
कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो.
नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं.
दिवस संपूच नये असं वाटत होतं
==========================================================
यादी तयार झाली. बेडेकरांच्या दुकानातून मेतकूट. सांडगे. नाचणीचे सत्व.
गोरा गांधीकडून वेखंडाची पावडर, बाळ गुटी,
सुतार चाळीच्या रमण विठ्ठल कडून डींकाच्या , अळीवाच्या लाडवाचं सामान.
येताना दादरला उतरून पांढरी मलमल.
आणि लवकर या.
बाहेर जास्तं काही खाउ नका .आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे.खरं म्हणजे मी उगीचच सूचना देत होते. माझ्या समाधानासाठी. प्रवासाची काळजी हेच वाहणार होते.
हे बाहेर पडले आणि मी माझ्या कामाला लागले.
हातात विणायच्या सुया घेतल्या पण वेग काही येईना. फिरून फिरून तेच तेच विचार यायला लागले.
केव्हढा लांबचा प्रवास. आपल्याला झेपेल ना सगळं?
मुलीला मदत होईल ना?.एक ना दोन ,हज्जार विचार मनात.मग फिरून वाटल हे आहेत ना सोबत.
सब सुख लहैइ तुमारी सरणा
तुम रच्छक काहू को डरना.
तीस वर्षाचा प्रवास सुरळीत पार पडला. प्रतारणेचा डाग नाही. अभद्र पैसा घरात कधी आला नाही.
मुलंही सोन्यासारखी.मनानी ही सगळी वर्षं याच्या पाठुंगळीस बसूनच प्रवास झाला.
आता उत्तरायणाची चिंता कशाला.विणकाम काही होईना.
एक खांब . दोन खिड्क्या. एक मुका.
विण भलतीकडेच जायला लागली.
शरू तुझ्या वेळची गंमत. माझी आई आली होती. वझ्यांच्या दवाखान्यातून मी चार दिवसात घरी आले.मग ह्यांची रवानगी झाली बाहेरच्या गॅलरीत.सहा महिन्याची शिक्षा.शेजारचे वर्तक रोज न विसरता विचारायचे.
काय? बाहेरच का?.....
हे पण कंटाळले. मग झालं .ठरलं. बोरिवलीला जाउ या रहायला.खूप त्रासाचं झालं. पण मुकाट्यानं कर्ज फेडत राहिले.
आणि लगेच शशी च्या वेळचे दिवस गेले.
नाना एक दिवस हसत हसत म्हणाले , नायगावात आपोआपच फॅमीली प्लॅनींग झालं असतं.
==========================================================
अडीच वाजले आणि दारावरची बेल वाजली.सप्रे मामी दारात उभ्या.
हुश्श करत आत आल्या .
कसला गं बाई पसारा सगळा?
अमेरीकेला जातोय.वाटलंच मला,मामी म्हणाल्या.
मी यांना म्हटलंच होतं शर्वरी आहेच अमेरीकेत तुम्ही न्यालच दादांना उपचारासाठी.
कुठे आहेत दादा? बेडरेस्ट सांगीतली आहेना? काय गं बाई, एव्हढे नेमस्त ...........
मला काही कळेचना?
मामी , काय बोलताय? ह्यांना काही झालेल नाहीय्ये.शर्वरीला मुलगा झालाय,म्हणून जातोय आम्ही.
मामी क्षणभर वेड्यासारख्या बघतंच राह्यल्या.
अरे देवा, म्हणजे दादांनी........
माझा तोल सुटला. मामी .. काय ते धड सांगा ना.
अगं परवा मी साठे डॉक्टरांकडे गेले होते ना तेव्हा दादा पण तिथेच होते. साठे दरवाजापर्यंत दादांना सोडायला आले होते
दादांना म्हणत होते,
दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं....
शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा.....
माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली.
हे देवा.... ह्या भल्या माणसानं काही सांगू नये मला....
आणि मी पण शहाणी........
मनात एकदम विज कडाडली.
हातचा एक इथेच राहीला होता.. गणिताचा ताळा इथेच चुकत होता.....
मामी काय पुढे बोलत होत्या मला काही कळेना....

देवा रे देवा.....
बेड रेस्ट.... काहीही होउ शकतं....आणि मी तिरिमिरीत जागची उठले....
ह्यांचा मोबाईल बंद....शशीला फोन लावला....बंद
हातपायाला मुंग्या यायला लागल्या...तोंडाला कोरड पडली...
आज्जीला उठवलं....सगळं सांगीतलं....आज्जी धिराची...
तिनं मला जवळ घेतलं.....घाबरू नकोस गं ...दादा समर्थ आहे....
अहो , मामी सांगतायत ते तर ऐका ...
ऐकलं सगळं....काही तरी गडबड दिस्तेय....मामी वेंधळीच आहे गं . ...दादा यील आत्ता.
मला कुठचा धीर....
तेव्हढ्यात परत बेल वाजली.....
दारात वॉचमन आणि एक अनोळखी माणूस.
मी साळुंखे... हवालदार ...
परत एकदा विज कोसळली...
मी मट् कन खालीच बसले....
आज्जी पुढं झाली ... काय हवय.....
काही नाही आज्जी ....पासपोर्टसाठी अर्ज केलाय ना...
हो.. हो... हो...
तेच सांगायला आलेलो .....
देवा.. काय रे घडी ही ....
मला कळेना.
धावा मनात सुरु झाला
आत सज्ज धनुशा...
रक्षणाय मम राम....
.............मी सोफ्यावर कोसळलेच....
परत बेल....
आज्जीनी दार उघडलं......
हे दारात उभे.....

मी धावतंच पूढे गेले....
दोन्ही दंड धरून यांना गदगदा हलवलं.....
काय हो हे असं
ह्यांना कळेचना..
माझा हात धरून सोफ्यावर बसवलं
शांत हो आधी...
मी थोडी सावरले.रडत रड्त सगळं काही सांगीतलं
हे आपले शांतच.
आणि मग मोठ्यानी खदखदा हसले.....माझा जीव चालला होता.
वेडी का काय तू
मामी अर्धवट....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला...
सुजाथाला दिवस गेलेत.
तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला.. अर्धवटच मामी पण .
आता कळलं. बाई , केवढा गोंधळ घातलास....
म्हणून मी म्हणतो कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ........
मी शांत झाले.परत घरात सोनेरी पिवळा उजेड दिसायला लागला...
हे हसले म्हणाले ......
मी एकटा कसा जाउ गं तुला पाठुंगळीस घेउन जाईन.
आजी पुढं आली मला परत जवळ घेतलं.
मला कितीतरी छान छान वाटायला लागलं.

(आता थांबू या.)

ह्म्म्म्म्म!! खूप सुंदर

1

ह्म्म्म्म्म!!
खूप सुंदर लिहीलय

>>(आता थांबू या.) नका थांबू

2

>>(आता थांबू या.)

नका थांबू काका... येऊ दे अजून.. छान लिहले आहे सर्व भाग हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओघवते लिखाण...

3

खुप छान लिहीलं आहेत तुम्ही. वाचता-वाचता प्रसंग नजरेसमोर आले. सगळेच भाग छान जमले आहेत.

<<दिवे मालवल्यावर सगळे कबुलीजबाब मुकाट देतात.(मला उगाचचं असं वाटतं की सगळ्या पुरुषांना उजेडाची भिती वाटते आपला उणेपणा कबूल करण्यासाठी )आपली वाट बघण्याची तयारी हवी. सगळं काही आपोआप सुरळीत हो>> १००% सहमत....


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

>>>(आता थांबू या.) लिहीत रहा

4

>>>(आता थांबू या.)

लिहीत रहा काका.

>>दिवे मालवल्यावर सगळे कबुलीजबाब मुकाट देतात.(मला उगाचचं असं वाटतं की सगळ्या पुरुषांना उजेडाची भिती वाटते आपला उणेपणा कबूल करण्यासाठी )आपली वाट बघण्याची तयारी हवी. सगळं काही आपोआप सुरळीत होत.

हास्य

सुंदर लेखन हो काका....

5

सुंदर लेखन हो काका.... हास्य

खरं अनघड लेखन हे...

6

सगळेच भाग अप्रतिम!

दिवे मालवल्यावर सगळे कबुलीजबाब मुकाट देतात.(मला उगाचचं असं वाटतं की सगळ्या पुरुषांना उजेडाची भिती वाटते आपला उणेपणा कबूल करण्यासाठी )आपली वाट बघण्याची तयारी हवी. सगळं काही आपोआप सुरळीत होत.

असंच काही नाही. विचारा माझ्या बायकोला! wink


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

नेहमीप्रमाणे ____/\____

7

नेहमीप्रमाणे ____/\____

नेहमीप्रमाणे जबरदस्त लिखाण

8

नेहमीप्रमाणे जबरदस्त लिखाण ...

रामदास काकांना ईथे लिहीताना पाहुन आनंद झाला हे वेगळे सांगणे न लगे !!

लिहा...!

9

नेहमीप्रमाणे जबरदस्त.
अन् हो थांबू नका...लिहीत रहा.
हास्य

मस्तं.. जबरदस्त..

10

(पूर्वी रात्री गाणी बघायचे सूर्या चॅनेलवर.एकदा डोळे वटारून पाह्यलं तेव्हांपासून बंद.) Laughing out loud

छान स्वगत!

11

छान स्वगत!


*****

>>(आता थांबू या.) जेव्हा वाटत

12

>>(आता थांबू या.)
जेव्हा वाटत की काही संपु नये तेव्हाच ते संपत Sad

या क्रमशः मालिकेचा मुळीच कंटाळा आला नाही.
आणि काकांना पुढचा भाग कधी? अशी विचारायची वेळही येउ दिली नाही.

समस्त क्रमशः मंडळाने रामदास काकांचा कित्ता गिरवावा.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सुंदर लेखन.

13

सुंदर लेखन.

छान !!!

14

सुन्दर...

हे थांबू नये

15

हे थांबू नये असेच वाटतेय

प्रशांत

ओघवत्या भाषेतलं...

16

मनाला भिडणारं सुंदर लिखाण...!!

खुप आवडलं.


दिप्ती जोशी