चिंदी बाजार:

0
0

उन्हाळ्यात बिडीपत्ता तोडुन झाल्यावर आमच्या हातात ब-यापैकी पैसे यायचे. एकदा बिडीपत्त्याचे पैसे आले कि गावाकडे हाटाला ( आठवडी बाजार) जाणा-यांची लाट येते. हे दिवस म्हणजे वर्षभरात जी काहि खरेदीची स्वप्नं बघितलेली असायची ते खरे होण्याची वेळ होय. खरंतर मे महिन्यात विदर्भात जी काही कडक उन असते त्याला बघता बाहेर जाण्याचं धाडस करण खुप अवघड गोष्ट आहे, पण आमच्या गावात मात्र हे जणु उत्सवाचे दिवस असतात. ४५-४६ तापमानात दुपारचे बारा वाजता बाजाराला जाणारी माणसं ढिगानी दिसतात.


ट्रकनी प्रवास

पानं तोडुन संपल्यावर येणा-या पहिल्या सोमवारी तर पेरमिलीला जाणा-या लोकांची इतकी गर्दी असायची कि आम्हाला बस मधे जागाच मिळत नसे. आलापली-भामरागड रोडवर कुडकेल्ली फाटा आहे, त्या फाट्यावरुन कुडकेल्ली गाव ३ किमी आत रानात वसलेलं आहे. पहिल्या सोमवारी आम्ही अगदी सकाळीच हाटाची तयारी करुन फाट्यावर येऊन पेरमिलीसाठी काही मिळते का म्हणुन वाट बघत बसायचो. तेंव्हा अहेरी-भामरागड रोडवर फक्त एकच बस धावायची. सकाळी १० ला अहेरी वरुन सुटायची भामरागडची पहिली फेरी करुन, पुन्हा सायंकाळी ५ वा. तीच बस भामरागडला मुक्कामी जात असे. अशा प्रकारे फक्त एकच बस त्या मार्गावर चालत असे. आणि बस व्यतिरिक्त BILT चे बांबू आणणारे ट्रक मात्र १२ महिने चालातात. ट्रक वाले बसच्या तुलनेत कमी पैसे घेतात, मग आम्ही ट्रकची वाट बघत बसायचो. त्या दरम्यान बस आली तर आम्ही बस न धरता ट्रकच्याच प्रवासाला प्राधान्य दयायचो. हे ट्रक मात्र बांबुनी इतके खचाखच भरलेले असतात कि त्या वाटेवर रोज एकतरी ट्रक उलटायचाच. पण बांबुनी भरलेला ट्रक उलटल्याने कुणालाच लागत वैगरे नाही, कारण एक तर भरलेला ट्रक खुप हळुच धावतो, व उलटताना अगदी हळुच एक बाजुल झोक जाउन कडेच्या झाडांवर टेकत उलटतो. मी स्वत: दोन तिन वेळा हा अनुभव घेतला (आला) पण कुणालाच काही होत (फारसं लागत वैगरे) नाही. पण आल्लापल्लीच्या पुढे मात्र रस्त्याच्या कडेनी झाडं नसल्यामुळे ट्रक उलटल्यास जीवित हानी होण्याची शक्यता जास्त. आणि याच्या अगदी उलट याच रस्त्यावर जर खाली ट्रक उलटला की जीवीत हानी व्हायची. हे सगळं माहीत असुन सुद्धा आम्ही ट्रकनीच प्रवास करायचो.

आम्ही रस्त्यापासुन १५-२० मिटर दुर कुठल्यातरी कडुलिंबाच्या झाडाखाली सावलीत बसुन ट्रकची वाट बघायचो. या महिन्यात इतर सगळ्या झाडांची पाने गळाल्याने सावलीसाठी फक्त कडुलिंब हा एकमेव पर्याय असायचा. एखादया गाडीचा आवाज आला कि आम्ही धावत धावत रोडवर जायचो, आणि बरेच वेळा ट्रक ऐवजी कुठल्या तरी ठेकेदाराची किंवा सरकारी अधिका-यांची जीप असायची. मग आम्ही निराश होऊन परत त्या झाडाच्या सावलीत जाऊन ट्रकची वाट बघत बसायचो. केंव्हा केंव्हा ट्रक यायचा पण तो आधीच लोकानी भरलेला असायचा, मग ट्रक थांबवुन ड्रायव्हर म्हणायचा “ ट्रक मे अंदर (कॅबिन) जगा नाही है, कॅबिन के उपर बैठना हो तो चलो”. मग आम्ही लगेच होकार देऊन कॅबिनच्या वर बसायचो. मला तर खरच ईथे बसायला खुप आवडत असे. मग ट्रक हालत डुलत बांडिया नदिजवळ आला की मला त्या अरुंद पुलावरुन जाताना खुप भीती वाटायची. तो तेवढा पुल पार होईस्तोवर मी डोळे मिटून बसत असे, एकदा पुल पार झालं कि, परत ट्रक स्वारीचं पुर्ण आनंद घेत असे. आणि कॅबिनच्या आत बसल्यास माझं पुर्ण लक्ष त्या ड्रायवरकडे असे, तो गिअर कसे बदलतो, स्टेअरिंग कसं फिरवतो या सगळ्या गोष्टिंचं मला खुपच कौतुक वाटायचं. हे ट्रक ड्रायव्हर पण गप्पा मारण्यात खुप पटाईत असतात. एक तर ते मुळ गावापासुन खुप दुर या रानात येऊन त्या आदिवासी लोकांसोबत राहुन राहुन पार वैतागलेले असायचे, अशा वेळी आमच्या सारखी शिकणारी व हिंदी बोलता येणारी पोरं दिसली कि ते पोटभर गप्पा मारुन घेत. काही म्हातारे सरदार पण त्या रोड्वर गाडी चालवित, ते मात्र आमच्याकडुन पैसे घेत नसत. एकंदरित ट्रकचा प्रवस फार मजेशीर असायचा, गप्पा मारता मारता पेरमिली केंव्हा यायची हे कळायचंच नाही.

चिंदी बाजार पेरमिली:
बिडीपत्त्या नंतरचा आठवडी बाजार म्हणजे जणु काही जत्राच, इतर वेळी याच बाजारात जी काहि दुकानं येतात त्या तुलनेत या कालावधीत मात्र दुप्पट दुकान येतात. कारण व्यापारी वर्गासाठी हा धंध्याचा सिजन असतो. बाजारात वेगवेगळ्या वस्तुंसाठी वेगवेगळी जागा ठरवुन दिलेली असते. भाजीपाल्याची सगळी दुकानं एका रांगेत, नंतर कपड्याची, भांडीकुंडी, शेतकीय वस्तूची व इतर ब-याच प्रकारची दुकानं लागलेली असायची. या सगळ्य़ा दुकानांच्या पलिकडे म्हणजेच मुख्य बाजार जिथे संपतो तिथे कुठे तरी चिंदी बाजार सुरु व्हायचा. हा चिंदी बाजार म्हणजे चिंद्या विकायला ठेवतात कि काय असे वाटायचे. पण माझा चुलत/मावस (कारण हा दोन्ही कडुन नात्यात होता) भाऊ गजानन या चिंदी बाजारातला अनुभवी खिलाडी होता. त्यानी सांगितलं कि, ईथे विकायला आणलेले कपडे जुने व वापरलेले असतात, पण असतात मात्र भारी. चिंदी बाजारात सगळ्या प्रकारचे कपडे विकायला आणलेली असतात. अगदी जीन्स पॅंट, टि-शर्ट, साड्या, बरमुडे, कोट, टॉय, सुट, सफारी, स्वेटर इ. इ. अंगात घातल्या जाणा-या कपड्याचे सगळे प्रकार चिंदी बाजारात उपलब्ध असतात ते हि अगदी रास्त भावात. ८० % कपड्याना कुठेतरी लहान सहान भोकं वैगरे पडलेलं असतं पण उरलेले २०% कपडे मात्र अगदी छान असतात. काही कपडे तर अगदी नविनच वाटतात. बरं गावातील श्रीमंत, नौकरदार व पैसेवाली लोकं या चिंदी बाजाराकडे भिरकत सुद्धा नाही. हे चिंदी बाजार स्पेशली माझ्या सारख्या गरिब व अतिगरिब लोकांसाठीच असतं. चिंदी बाजारातुन फिरताना किंवा दुकानात कपडे घेताना एखादा गावचा माणुस दिसला कि तो चिड्वायचा, पण माझ्या सारखे हजारो तरुण ज्याना नविन कपडे घ्यायला परवडत नसे ते सगळे मात्र सोमवारी ईथे चिंदी बाजारात जुने कपडे घेताना दिसत. असा हा चिंदी बाजार म्हणजे माझ्या सारख्या गरिबांच्या जिव्हाळयाचं ठिकाण होतं ( आजही आहे).

एकदा चिंदी बाजार भागात शिरलात कि, विक्रेते नुसतं जोर जोरात ओरडत असतात. मधे गि-हाईकाना चालायला तेवढी जागा सोडून दोन्ही बाजुनी दुकानं थाटलेली असायची. एका चौकोनी जागेत चार बाजुला चार मोठे बांबु गाडुन वर व बाजुनी सावलीसाठी चादरी बांधलेल्या असायच्या, समोर कपड्याचे गठ्ठे सोडलेले असायचे व मागच्या बाजुला दोन उभ्या बांबुना दोन चार आडवे बांबु बांधुन एकावर पॅंट्स, दुस-यावर शर्टस व तिस-यावर साड्या वैगरे व्यवस्थीत रचुन डिस्पले तयार केलेला असे. चांगले चांगले कपडे मुद्दामहुन त्या डिस्प्ले मधे ठेवलेले जात. आम्ही एकदा चिंदी बाजारात शिरलो कि, काय घेऊ काय नाय घेऊ असं होऊन जायचं. त्या उपेक्षीतांच्या बाजारात आमच्या ईच्छा मात्र फुलुन जात असत.

पानतोडीच्या आधी जेंव्हा केंव्हा मी बाजाराला येत असे तेंव्हा आईनी सांगितलेल्या वस्तु व्यतिरिक्त चाराने सुद्धा खर्च करायला स्कोप नसायचा. पण मला त्या चिंदी बाजाराचं इतकं आकर्षन कि, नुसतं बघुन तरि याव म्हणुन तिकडे एक फेर फटका मारुन येत असे. पण क्रय शक्ती नसल्यामुळे खरेदी मात्र शुन्य.

या वेळी मी पानाचे पैसे घेऊन बाजारत स्वत:साठी खरेदी करायला आलो होतो. आता मात्र हक्काचे पैसे होते व गजानन भाऊ सोबत होता. तसं तो माझ्यापेक्षा ७-८ वर्षानी मोठा व त्याच्याकडे चिंदी बाजारत खरेदीचा दांडागा अनुभव. खरं तर मला चिंदी बाजाराची ओळख त्यानीच करुन दिली. तो दर वर्षी पानाच्या पैशातुन चार पाच मस्त ड्रेस घेत असे. त्याचे कपडे इतरांपेक्षा अगदी वेगळे असायचे. म्हणुन या वेळी मी सात आठ महिन्याआधीच ठरवलं होतं कि गजु दादाबरोबरच जायच.

आम्ही दोघं एका दुकानात थांबलो, त्याच्या मागच्या डिस्प्ले मधे छान छान कपडे अड्कविलेले होते. त्यातली एक पॅंन्ट हातात घेतली व भाव विचारला, दुकानदार म्हणे १० रुपये, पण गजुभाऊनी ती तिन रुपयात मागितली, हो नाही, हो नाही, करत शेवटी ५ रुपयात दुकानदार तयार झाला. आणि ती माझ्या जिवनातिल पहिली फुल पॅंट. त्या पॅंटला अगदी मागे एक लहानसं भोक होतं पण बाकी सगळी पॅंट चांगली होती. एकदाची पॅंट घेतली व टेलर कडुन रफु करुन घेतलं व एकदाचा फुलपॅंटकर झालो. मग मात्र मी एकटाच येऊन चिंदी बाजारातुन माझ्यासाठी फुलपँट व फुल शर्ट घेऊ लागलो. सांगितलेल्या किमती पेक्षा अर्ध्या किमतीत ती वस्तु मिळते याचा चांगलाच अनुभ आला होता. या पुढे पानाचे पैसे मिळाले की चिंदी बाजारातुन दोन आवडीचे ड्रेस घ्यायला विसरत नसे.

मला या बाजाराचं आकर्षण का? तर आम्हाला ९ वी पर्यंत शाळेत हॉप पॅंट घालावी लागे, आणि आमच्याकडे वर्षातुन फक्त एकदाच पैसे येत ते म्हणजे पानं तोडल्यावर. आता या पैशातुन शाळेसाठी लागणारे दोन ड्रेस (दोन हॉप पॅंट, दोन हॉप शर्ट) घेतले की परत काही घेण्यासाठी पैसे उरतच नसत. वरुन हायस्कुल मधे शिकतानचं वय असं असतं कि, मी मोठा झालो, आता मला फुलपॅंट हवी, इतरानी मला लहान म्हणु नये, किंवा मी लहान नाही हे दाखविण्याच्या वेगवेगळ्य़ा क्लृप्त्या सुरु होतात. या वयात हॉपपॅंट सोडुन फुलपँट केंव्हा एकदाची घालायला मिळते याची सगळेच वाट पाहतात. शाळेत नाही तर किमान बाहेर तरी घालायला आपल्या जवळ किमान एक तरी फुलपॅंट व फुल शर्ट असावं असं सारखं वाटत असे. तेंव्हा कापड घेऊन टेलरकडुन पॅंट-शर्ट शिवुन घेतल्या जात असे. मग कापड घेऊन शिवुन घेणे मला परवडण्यासारखं नव्हतं. आणि माझ्या सारखे हजारो समदु:खी गरिब मुलं या चिंदीबाजारातुन अगदी २० रुपयात पॅंट व शर्ट असा एक ड्रेस विकत घेत. आणि कुणाचं लग्न, गावात काही कार्यक्रम किंवा इतर कुठे बाहेर जायचं असल्यास, मी चिंदिबाजारातुन आणलेली फुलपॅंट घालुन मोठ्या रुबाबाने बाहेर पडत असो. आमच्या गावात अशी काही मुलं होती, जे नविन कापड घेऊन ड्रेस शिवून घेत. ते मात्र मला “क्या चिंदी बाजार” म्हणुन चिडवित असत. मला फार दु:ख होई पण पर्याय नव्हता. कुठे लग्न विधीचं कार्यक्रम असला कि मी फुलपॅंट घालुन जायचो खरा, पण हि पोरं माझी टर् उडवु नये म्हणुन त्यांच्या पासुन लपुन लपुन वेळ काढायचा. हिच पोरं जेंव्हा शिकायला तिकडे अहेरीत भेटायची तेंव्हा मी अभ्यासाच्या जोरावर सगळा हिशेब बरोबर करायला विसरत नसे.

मी मागच्या १५ वर्षात Peter England, Park Avenue सारखे Branded कपडे वापरतो. पण पेरमिलीच्या चिंदी बाजारातुन पहिल्यांदा घेतलेल्या त्या जुन्या पॅंट ची बरोबरी जगातली कुठलीच पॅंट करु शकत नाही. आजहि जेंव्हा गावाला जातो, तेंव्हा त्या चिंदी बाजारात न चुकता एक फेर फटका मारतो. सगळी चिंदीबाजारातली दुकानदारं नवलाईच्या नजरेने माझ्याकडे बघतात. माझ्या आंगावरच्या कपड्यांकडे बघुन कुणी दुकानदार बोलावत वैगरे नाही, पण मी मात्र संपुर्ण चिंदीबाजारात एक चक्कर टाकुन कपडे घेणा-या शेकडो मधुकराना मनसोक्त नजरेनी न्याहाळत असतो. आजच्या शहरी व दगदगीत हरवलेला मधुकर मला त्या चिंदी बाजारात आजही शेकडोच्या संखेनी सापडतो.

व्वा ! +१

1

व्वा !

+१


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

खुप मस्त लिहीता तुम्ही

2

खुप मस्त लिहीता तुम्ही हास्य

खुप आफाट व वेगळे विश्व आहे हो

3

खुप आफाट व वेगळे विश्व आहे हो तुमचे... !
आधीचा लेख उत्तम म्हणावा तो पर्यंत तुमचा आलेला नवीन लेख सर्वोत्तम वाटतो व परत नवीन आलेला लेख त्याहून ही सर्वोत्तम वाटतो..... तुमचे लेखन मातीशी जुळलेले असल्यामुळे अथवा मनाच्या आतून येत असल्यामुळे म्हणा... खुप आवडू लागले आहे.

सलाम !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा! आनंद झाला तुमच्यासारखी

4

वा! आनंद झाला तुमच्यासारखी शून्यातून वर आलेली माणसं पाहून. मला एकदा चिंदी बाजार बघायला आवडेल. तसा जुना बाजार आमच्या इथे असतोच पण त्यात कधी कधी आम्ही पण जाऊन खरेदी करायचो. तिथे मिल्ट्रीवाल्यांसाठीच्या जाड कापडाच्या पाठीवरच्या मोठ्या सॅक कधीकधी फार चांगल्या मिळतात. झालंच तर ट्रेकिंगला उपयोगी येणार्‍या छोट्या स्टोव्हचे स्पेअरपार्ट फक्त जुन्या बाजारातच चांगले मिळतात असा आमच्या आजू-बाजूला राहणार्‍या अनेक उच्च्भ्रूंचाही समज आहे. मधेच कधीतरी घरातल्या एखाद्या जुन्या जपून ठेवलेल्या रेडीओचे काही स्पेअर पार्टही जुन्या बाजारात चांगले मिळून जातात.


-पुण्याचे पेशवे

जबरदस्त

5

लेख अतिशय आवडला.

आता तुम्हाला भेटायचेच आहे. खरच तुमच्या गावात एक सहल काढूया. हास्य

सहमत

6

सहज(राव्+का+मामां)शी सहमत आहे...

एकदम एकमत! गावी गेलेच

7

एकदम एकमत!
गावी गेलेच पाहिजे...
जरा ऊनाचे काय ते बघा पण राव...

रफु...

8

>>>>एकदाची पॅंट घेतली व टेलर कडुन रफु करुन घेतलं>>>>
मी सुद्धा लहानपणी एकदा मोठ्या आतेभावाच्या पॅण्ट ला रफू करून वापरली होती. खरे तर रफु नेमके कसे करतात याचे कुतुहल मला शमवायचे होते. कापडाचे अंगचे काही धागे व काही नवे धागे असे काही बेमालूम एकत्र शिवतात ते लोक की बारकाईने पाहिल्या शिवाय समजतही नाही की कापड इथे फाटले होते. पण शिंप्याने दोन दिवसांनी देईन असे सांगून मला वाटेला लावले. बालपणीचे ते कुतुहल अजुनही तसेच बाकी आहे.

>>>> मी मागच्या १५ वर्षात Peter England, Park Avenue सारखे Branded कपडे वापरतो. पण पेरमिलीच्या चिंदी बाजारातुन पहिल्यांदा घेतलेल्या त्या जुन्या पॅंट ची बरोबरी जगातली कुठलीच पॅंट करु शकत नाही.>>>>
खरे आहे परिस्थितीशी संघर्ष करून जे यश मिळवले असते त्याचा आनंद काही औरच असतो.

नवे अनुभव विश्व

9

श्री.मधुकर, आपले अनुभवविश्व आतून आले आहे - बाहेरून नाही...
फार,फार महत्त्वाचा दस्त'ऐवज'आहे हा.
लिहित रहा.

"त्या उपेक्षीतांच्या बाजारात आमच्या ईच्छा मात्र फुलुन जात असत."

अरे, काय जबरदस्त वाक्य आहे!! तुम्ही अनेक प्रस्थापित मराठी साहित्यिकांपेक्षा उजवे लिहिता.

मीमराठीच्या संचालकांनी मधुकर यांच्या अनुभवांचे पुस्तक करावे ही विनंती.

+१

10

विसुनानांशी सहमत आहे.

खरय मधुकर तुमचं.... असा

11

खरय मधुकर तुमचं....
असा कपड्याचा बाजार नाही अनुभवला कधी. पण आमच्या सोलापूरात मंगळवार बाजार भरतो. तिथे देखील अशा सगळ्यांनी वापरून टाकून दिलेल्या वस्तु, जुने बंद पडलेले टेपरेकॉर्डर , इतरही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स (अर्थात बंद पडलेले) मिळतात. अर्थात जुना कपडे बाजार देखील असतो तिथे. पण माझा डोळा बंद पडलेल्या इलेक्टृओनिक वस्तुवर असायचा. टेपसाठी १०००-१२०० मोजायची ऐपत नव्हती तेव्हा. त्यामुळे मंगळवार बाजारातून एक जुने बंद पडलेले टेपचे किट आणले होते. त्यात काही इतर कंपोनंट्स बदलून छोटासा डेक तयार केला होता. तिथुनच विकत घेतलेल्या चांगल्या अवस्थेतील डायफ्राम असलेले उघडे स्पीकर मातीच्या डेर्‍यावर उपडे टाकून स्पीकर्स तयार केलेले. आज माझ्याकडे घरी जवळपास ७०,०००/- ची यामाहाची साऊंड सिस्टीम आहे (एनहान्सर) पण त्या पन्नास, साठ रुपयात बनवलेल्या डेकची सर नाही त्याला. हास्य
छान लेख आवडला.


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

मस्त मस्त मस्त

12

मस्त मस्त मस्त

विलक्षण लेखण...!!!

13

धमाल आहे हे लिखाण मधुकरराव.... एकदम मातीशी इमान राखून केलेलं. कुठंही कृत्रिमपणा नाही...जे आहे ते रोखठोक....आणि शब्दयोजना देखील अफलातून, विशेषतः श्री. विसुनानांनी त्यांच्या प्रतिक्रियेत घेतलेले वाक्य असो वा दुसरे एक "आजच्या शहरी व दगदगीत हरवलेला मधुकर मला त्या चिंदी बाजारात आजही शेकडोच्या संखेनी सापडतो....". आपल्या भामरागड भागातील आणखीन एक "मधुकर" जर हे वाचत असेल तर त्यालाही भरभरून येईल इतके अचूक निरिक्षण आहे हे ! व्वा !!

काही विलक्षण तेजाचे शब्दही सापडले मला.... उदा. "फुलपँटकर"....हे विशेषण ~~ झटकन एक आनंदित तरूण नजरेसमोर आला.
दुसरे ~~ "शेतकीय वस्तूची".... हा शेतकीय शब्द तर पहिल्यांदाच वाचनात आला पण त्यामुळे मराठीची टांकसाऴ किती समृध्द आहे हेही उमगले.

तुमच्या लिखाणाने आमच्या निपाणीच्या 'एकोणीसावी जात" लिहिणारे लेखक श्री. महादेव मोरे यांचा आठवण झाली.... त्याच जातकुळीतले लेखन आहे तुमचे.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

>>>मच्या लिखाणाने आमच्या

14

>>>मच्या लिखाणाने आमच्या निपाणीच्या 'एकोणीसावी जात" लिहिणारे लेखक श्री. महादेव मोरे यांचा आठवण झाली.... त्याच जातकुळीतले लेखन आहे तुमचे.

खरचं !!!!

१००% सहमत.

चिक्कोडीचा (राजे)


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काय

15

काय आठवण काढलीत राव! महादेव मोरे... सलाम. या माणसासारखा लेखक मराठीत पुन्हा झाला का हो?

महादेव मोरे...!!

16

श्री. राजे आणि श्री.श्रा.मो....

मला फार आनंद झाला "महादेव मोरे" या नावाबाबत तुम्ही इतके भावुक झाला हे पाहुन. किती समृध्द केली आहे या माणसाने सीमाभागातील मराठी भाषेची ठेवण !! विद्यापीठात असताना असेच एकदा निपाणीच्या देवचंद कॉलेजमधील एन.एस.एस.चे पाच-सहा स्वयंसेवक मा.कुलगुरूना अर्जुननगर येथील कार्यक्रमाला नेण्यासाठी कॅम्पसमध्ये आली होती. कुलगुरू अजून मिटींगमध्ये असल्याने, व वेळ असल्याने ते स्वयंसेवक फिरत चहाच्या निमित्ताने कॅन्टीनमध्ये आले. तिथे आमच्या एम.ए.च्या वर्गातील दोन विद्यार्थी त्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी या नवागताना चहासाठी हाक मारली. त्यांच्या हातातील रा.से.योजना शिबीर कार्यक्रमपत्रिका पाहिली तर आमच्या दुर्दैवाने आदल्या दिवशीच "श्री.महादेव मोरे, सुप्रसिध्द लेखक यांचे माझी निपाणी" या विषयावर व्याख्यान झाले होते. मी फार हळहळलो. एकतर मोरे हा गृहस्थ फार लाजाळु आणि आपल्या भाषेला शहरी माणूस हसतो म्हणून शहरातील कार्यक्रम कधी स्वीकारीत नाही, त्यात अर्जुननगरचे बोलावणे घेतले त्याला कारण म्हणजे देवचंद कॉलेजला निपाणीतील मराठी कुटुंबाची सारी मुले शिकतात म्हणून... (कन्नडवासियांची "बागेवाडी कॉलेज"ला जातात)... शिवाय त्या युवकांना "महादेव मोरे" हे रसायन चांगलेच माहित होते. विशेष म्हणजे ते जसे चारचौघात बोलतात तसेच लिहितात, त्यामुळे मला ती संधी हुकल्याचे त्यावेळी फार वाईट वाटले. आज या निमित्ताने त्यांची फार आठवण झाली.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

>>कन्नडवासियांची "बागेवाडी

17

>>कन्नडवासियांची "बागेवाडी कॉलेज"ला जातात)..

सहमत.

खरं आहे हे.

कन्नड आस्मिता नावाचा जो प्रकार आहे / प्रवृती / स्वभाव आहे तो कुठेतरी आपल्यात नक्कीच कमी पडतो लिहीन कधी तरी ह्या विषयावर !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुंदर लेखन.........समोर जिवंत

18

सुंदर लेखन.........समोर जिवंत चित्र आहे असं वाट्त होत.

विलक्षण प्रत्ययकारी लेखन

19

+१. असेच म्हणतो.

तो ट्रक, त्यात कोंबलेली माणसे, खाचखळग्यातला प्रवास, बाजार, घासाघीस - सगळं डोळ्यासमोर घडतंय असे वाटत होते. विलक्षण प्रत्ययकारी लेखन.

अजून भरपूर आठवणींचा खजिना इथे मिमवर सादर होऊ द्या. वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे नंतर या आठवणींचे पुस्तक यथावकाश बनावे.

+१ भरपूर लिहा इकडे, फार छान

20

+१
भरपूर लिहा इकडे, फार छान लिहिता तुम्ही.


पुष्करिणी

एकदम वास्तवदर्शी लिखाण.

21

एकदम वास्तवदर्शी लिखाण.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सुंदर लिखाण आहे..

22

मधुकरराव,
सुंदर लिखाण आहे..! तुमच्या लिखाणाला सलाम..!
अजुन येऊद्यात...


श्रीवर्धन

तुमचे सगळेच लेख खुप वाचनिय

23

तुमचे सगळेच लेख खुप वाचनिय आहेत. हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

खूप छान

24

खूप छान लिहिले आहे...

अस्सल अनुभव

25

एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जाणारे हे लिखाण कुतुहलाने वाचत आहे. असेच अजून येत राहूंदेत.

सुरेख

26

प्रत्ययकारी लिखाण. चिंदी बाजारासारखी जागा ही खरेच अनुभवण्याची जागा असते. तसा आमच्या इकडेही जुन्या बाजाराचा फेरफटका मारण्याची आमची सवय होती. आम्हाला बार्गेनिंग बिल्कुल जमत नसल्याने खरेदी करण्याच्या फंदात पडलो नाही कधी, पण इतरांची सौदेबाजीची लढाई धमाल असे. सुरवातीला एखाद्या किंमतीला गिर्‍हाईकाला उलटून बोलणारा विक्रेता शेवटी त्याच किंमतीला विकत देताना पाहून गंमत वाटे. अर्थात तो पहिला अपमान सहन करायची सहनशक्ती हवी. मग मजाच मजा.