आमच्या भागातिल लोकांसाठि हारो म्हणजे एक दावत, पार्टी, मजा या प्रकारात मोडणारं क्षण होय. हारो चा अर्थ आहे गावातिल सगळ्यानी एकत्र येऊन एखादया माणसाचं काम करुन देणे व त्या बदल्यात ज्यानी काम करवुन घेतलय त्या माणसानी कामाला आलेल्या सगळ्या माणसाना मोहाची दारु व डुक्कर जेवण दयायचं. हे काम कुठलही असु शकतं, जसं घर बांधणे, पेरनी करुन देणे, शेतातील बोडीला मोठी पार घालुन देणे किंवा दारात विहिर खोदने किंवा आजुन काही. म्हणजे आपण इकडे जी कामं पैसे देऊन करवुन घेतो तिकडे तिच कामं पैशाने करण्यापेक्षा हारो ठेवुन करण्याची पद्धत आहे. ज्या माणसाला कांम उरकत नसेल त्यानी तसं पाटलाकडे सांगायचं असतं, मग त्या रात्री पाटील गावात जाहिर करतो कि, “फलां फलां माणुस अमुक तमुक दिवशी या कामासाठी हारो ठेवत आहे, तरी गावातील जास्तीत जास्त लोकानी यावे, व काम करुन हारो जेवणाचा आनंद घ्यावा”. एकदा का हि Announcement झाली कि, आपण आलेल्या सगळ्या लोकाना पुरेल एवढी दारु व डुक्कर जेवण अशी सोय करायची असते. बरं या हारो मधे एक अघोषीत नियम आहे, हारोला येणारी कुठलीच व्यक्ती दारु पिऊन येणार नाही, त्यामूळे कामात अडचण होत नाही व हारो ठेवणा-यानी सुद्धा आधी दारु दयायची नसते. दिवसभर काम केल्यावर सायंकाळी जेवणाआधी दारु दिली जाते व दारु नंतर डुक्कर जेवण दिले जाते. आम्ही गावाला शिकताना शेतातली कामं करायला घरात माणसं कमी पडत नसत, पण जेंव्हा आम्ही (माझ्या दोन मोठ्या बहिणी, एक लहान भाऊ, एक लहान बहिण व मी) पाच भावंडं शिकायला बाहेर पडलो तेंव्हा मात्र घरी आई वडिल दोघेच असायचे. शेतातिल पेरणीच्या वेळी तेवढ्या एक दोन आठवड्याच्या सुट्टिवर आम्ही यायचो पण इतर वेळी घरची कांम आई वडिलाना उरकत नसत. पण Thank God आमच्या कडे हारो पद्धती होती (आहे), म्हणुन कुठलच कांम अडत नसे.
आमच्या घरचा हारो
आमच्याकडे शेतात विहीर वैगरे प्रकार आजही नाहीत. शेतातिल सगळ्यात वरच्या भागाला ज्या काही बांदया असतात त्याना एकत्र करुन मोठी पार घातली जाते व मोठ्या प्रमाणात पाणी अडवुन ठेवल्या जातं. नंतर गरजे नुसार खालील बांदयामधे पाणी सोडलं जातं. अशा या मोठ्या बांदीला बोड्डी म्हणतात. वरच्या पवसानी दगा दिला तर या बोड्डीतलं पाणी उपयोगी पडतं. आमच्या शेतात पण अशी बोड्डी तयार करायचं ठरलं, खरंतर मला सारखं वाटायचं कि, आपल्या शेतात पण बोड्डी हवी कारण गावात ज्यांच्या ज्यांच्याकडे बोड्डी होती त्याना चांगलं पिक मिळायचं. आमच्या घरी मात्र जेमतेमच धान्य पिकत असे. म्हणुन मला सारखं वाटायचं कि, आपल्या शेतातही बोड्डी असावी, पण बोड्डी बांधायला येणारा हारोचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता, म्हणुन वडिल बोड्डीचा विचारच करत नसत. पण एक दिवस आमच्या मामानी (आत्याचे धनी) मदतीचा हात दिल्यावर बाबानी एकदाचं बोड्डी बांधायचं जाहीर केलं. हि अवस्था आजही माझ्या गावातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची आहे. आजही ५०% लोकांच्या शेतात बोड्डी नाही, आणि ते हारो पण देऊ शकत नाही, एवढी गरिबी आहे आमच्या गावात. मग काय वडिलानी एकदा जाहिर केल्यावर आम्ही कामाला लागलो. ५०-६० लोकं कामाला येणार होती. एवढ्या लोकांची जेवणाची सोय करायची होती. आमच्या गावात आजही घरच्या उकळात धान कांडुन तांदूळ तयार केला जातो. माझ्या दोन मोठ्या बहिणी घरातिल दोन तिन कुडौ धान काढून आठवडाभर कांडुन दोन अडिच कुडौ तांदुळ तयार केला. मी लगेच मोहू भिजत घालुन दारु काढायच्या तयारिला लागलो. आम्ही घरिच डुकरं पाळायचो म्हणुन डुकराचां प्रश्न नव्हता. ८-१० दिवसात आम्ही सगळी तयारी केली. नंतर वडिल पाटलाकडे जाऊन हारोचं बोलुन आलेत, व एकदाचं आमचं हारो गावात Announce झालं. ठरलेल्या दिवशी अगदी सकाळीच ९ च्या दरम्यान ( पण घरुनच जेवण करुनच येतात) गावातील लोकं आमच्या शेतात जमली, वडलानी तिकडे त्यांच्या सोबत कामाची सुरुवात केली व ईकडे आईनी दुपारचा नाश्ता म्हणजे आंबिल व मोहु भाजायला सुरुवात केली. लोकानी ५०-६० जणांसाठी बनविलेली आंबिल व मोहू घेऊन मी बैलगाडीने १२ च्या सुमारास शेतात पोहचलो. बोड्डीची पार घालण्याचं काम अगदी जोरात चालु पाहुन मला फार बरं वाटलं. अर्ध्या पाउन तासात सगळ्यानी खेतुली/केतुल (शेतातली झोपडी) कडे मोर्चा वळविला. आता सगळ्याना आंबिला वाटण्याची वेळ होती. मी जवळच्याच टेंबराच्या झाडाची पान आधीच तोडुन आणुन ठेवलेली होती. टेंबराच्या एका पानात भाजलेलं मोहू व दुसरं पान नुसतच हातात दयायचं असतं. त्या दुस-या पानाचा चुव्वा (डोप्पाचा लहान भाऊ म्हणा) करुन त्यात लोक आंबिल घेत होती व मी आंबिल वाढत सगळीकडे फिरत होतो. एक घास मोहू व एक घुट आंबिल असं त्यांचं आंबिल पिण चालु होतं. वडिल व इतर दोन चार पोरं पन आंबिल वाढायला मदत करित होतीच. या मधल्या सुट्टील लोकानी पोटभरुन आंबिल पिली व मोहू खाल्ला. एकदाचा दुपारचा नास्ता झाला व सगळे जिकडे तिकडे रानात दिसेल त्या झाडाच्या सावलीत अंगावरच टॉवेल हातरुन झोपी गेले. तासाभरानी एक माणुस उठला व बोड्डीच्या पारी जवळ जाउन जोरात Announcement केली. अवघ्या दहा मिनिटात सगळी टिम कामावर हाजर होती. आता मात्र सुर्य उतरु लागला होता, उन थोडी कमी झाली होती. मग परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली व सायंकाळचे ५ वाजेस्तोवर बोड्डीचे काम सुरु होते.
पाच ५-५.३० च्या दरम्यान सुट्टी झाली, सगळे नदिच्या दिशेनी निघाले. आमच्या गावात नदी असल्यामुळे आम्हाला तशी घरि आंघोळ करण्याची सवय नाही. हि सगळी मंडळी नदिकळे निघाली तेंव्हा बाबा व मी घरी आलो. आता आम्हाला स्वयंपाकाची तयारी करायची होती. आमच्याकडे सार्वजनिक किंवा मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावयाचा असल्यास हे काम फक्त पुरुषच करतात. माझे चुलत भाऊजी अशा मोठ्या प्रंमाणावर स्वयम्पाक करण्यात अगदी तरबेज आहेत. त्याना सोबतिला घेऊन आम्ही सुरुवात केली. घराच्या मागे व पुढे अशी दोन आंगण आहेत. मागच्या आंगणात तिन मोठाले दगड ठेवून मोठी चुल तयार केली. गावातील पंचायती कडुन स्वयंपाकासाठी मोठाले गंजं (पातेलं, तोफ) घेऊन आलो. ६०-६५ लोकाना पुरेल एवढा भात मांडला (शिजायला ठेवला). ईकडे भात शिजत होतं तोवर भाऊजीनी एक तरुणाची मदतीने डुक्कर कापायला घेतलं. डुक्कराची कातडी खुप जाड असते म्हणुन कापणारा अगदी त्यातला अनुभवी माणुस असावा लागतो. एकदाचं डुक्कर कापुन झालं, दुसरीकडे पेटविलेल्या धुनीवर भाजून काढलं. त्यानंतर भाऊजीनी डुकराची भाजी बनविली. तोवर गावातिल सगळे हारो मेंबर नदिवर आंघोळ करुन परतले होते. सगळी मंडळी आंगणात चटई, पोते टाकुन बसलीत. आता सुरु झाला हारो जेवणाचा पहिला राउंड. मी व वडिलानी सगळ्यांच्या हातात एक एक टेंबराचं पान वाटत होतो व आमच्या मागुन गावातिल दोन मुलं दारु घेऊन त्या पानाच्या चुव्व्यात ओतत होती. त्याच्या मागुन एक माणुस डुकराची मटन चकणा म्हणुन वाढत होता. त्या दिवशी लोकाना भरपुर दारु दयायची असते. आम्ही तशी जंगी तयारी केली होती. दारुचा पहिला रांऊड झाला व लगेच त्यांच्या बसल्या ठिकाणीच पत्रावळ्या लावायला सुरुवात केली. पत्रावळ्याच्या मागोमाग भात आणि भातारच मटन व रस्सा वाढायला सुरुवात झाली. आणि पाण्या ऐवजी दारु मात्र अगदी जेवण संपेपर्यंत वाढावी लागली. लोकानी जेवनाचा भरपुर आनंद घेतला. जेवणं झाल्यावर लोकानी आपापल्या घराची वाट धरली पण काही पट्टीचे बेवळे असतात त्याना मात्र जेवनांनंतरही दारु हवी होती. आणी याची आम्हाला पुर्वकल्पना व तायारीही होती. आम्ही त्याना परत दारु दिली, शुद्ध हरवेस्तोवर दारु पिऊन घराची वाट विसरणारेहि काही दिवे होते. मग आम्ही एकेकाला त्यांच्या घरापर्यंत पोहचवुन रात्री उशीरा झोपी गेलो. अशा प्रकारे हारोची सांगता झाली, आणि आमच्या शेतात एकदाची बोड्डी तयार झाली.
किती वेगळं आणि 'सामाजिक' जग
किती वेगळं आणि 'सामाजिक' जग आहे हे...
या जगाची तुम्ही ओळख करून देत आहात.. मनःपूर्वक धन्यवाद !!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
+१
+१
वेगळीच पद्धत आहे ही. कोणतं
वेगळीच पद्धत आहे ही. कोणतं गाव तुमचं??
मी कधीच असं काही ऐकलेलं नव्हतं.
छान ओळख करून दिली एका वेगळ्याच सामाजिक जीवनाची.
- प्राजु
हारो...
अगदी डोळ्यापुढे उभी राहिली (कधीही प्रत्यक्षात न अनुभवता). दादा शब्द कमी पडताहेत. सलाम!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हेच म्हणतो
अगदी हेच म्हणतो.
+१
+१
अनुभव लिहित रहावे.
वाचण्याची आतुरता आहे.
असेच म्हणतो !
असेच म्हणतो !
हारो
बद्दल ऐकले होते पण पुर्णपणे आत्ता समजले
अरे एका नवीनच व्यवहार / कार्य
अरे एका नवीनच व्यवहार / कार्य मदत प्रकाराबद्दल माहीती मिळाली.
आवडले
एकदा तुमच्या गावी भेट द्याला हवी साहेब खास ह्यासाठीतरी नक्कीच...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जाशिल तेव्हा मला सांग... मी
जाशिल तेव्हा मला सांग... मी पण येईन
एकदा तुमच्या गावी भेट द्याला हवी साहेब
मी पण ...मी पण...येणार. माझं पण टिकीट काढायचं !
हारोचा आनंद...!!
मधुकररावांनी शब्दरुपाने अक्षरशः जिवंत केली आहे ही प्रथा. "हारो" संज्ञा तर प्रथमच वाचली आणि ज्ञानात भर पडली. कोल्हापूर ग्रामीण भागात अशा प्रकारच्या काम-मोबदल्यास (पूर्वी) "पावनेर" केला असे म्हणायचे. पण जिल्ह्यात उस आणि साखर कारखान्याने जशी सुबत्ता आली त्यामुळे अशा पध्दतींचा हळुहळु लोप होत गेला आहे आणि "रोख" पैशाना भलतेच महत्व आले आहे. "रस्सामंडळ" हा आणखीन एक प्रकार मात्र आजही टिकून आहे, म्हणजे कामाचे ठरलेले पैसे तर त्या कामगारांना द्यायचेच, शिवाय ज्या दिवशी काम संपेल त्या रात्रीचे मटणाचे जेवण यजमानाकडे असा प्रघात आहे, अर्थात अशा ओल्या पार्टीला मित्रपरिवारही हजर असतोच.
झाडाखाली डुकराच्या मटणाचा रस्सा शिजत असताना वार्यासमवेत त्याचा वास आसमंतात असा भरून राहतो की त्या वासाच्या ढगातच तोंड खुपसून बसावे अशी आजुबाजूच्या लोकात इच्छा निर्माण होते.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.
हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. छान!! लिखाणही छान!!
हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.
हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. छान!! लिखाणही छान!!
छान मस्तं वर्णन. कुडौ वगैरे
छान मस्तं वर्णन. कुडौ वगैरे शब्दं अजूनही कोकणात वापरात आहेत. कुडौ (कोकणी उच्चार कुडव), पायली, खंडी अशी मापं अजूनही कोकणात वापरात आहेत. शक्यतो खंडावरच्या धान्याच्या वाटण्या अशाच होतात. भात आलं की ४ खंडी पीक आले तर २ खंडी मालकाचं २ खंडी कुळाचं.
पूर्वी जेव्हा लोका़कडे पैसे नसंत तेव्हा नुसत्या जेवण घालायच्या बोलीवरही लोक कामाला येत. कोकणात पूर्वी असलेल्या सार्वत्रिक दारिद्र्यावर मात करण्यासाठी शोधलेला उत्तम उपाय होता.
मधुकरराव,
लेख एकदम आवडला.
-पुण्याचे पेशवे
अरे वा...
मधुकर, सातपुड्यात यालाच भिलोरी, पावरीत लाहा म्हणतात. या शब्दाच्या इतर छटाही असतील. पण ही परंपराच आता खंडित होत चालली आहे. अशा स्थितीतील तुमचा हा अनुभव उभारी देणारा होता. या विषयाच्या अभ्यासासाठी तुमच्याशी संपर्क साधावा लागेल याची नोंद केली आहे.
एक नंबर
वैयक्तिक आयुष्याला अधिकाधिक महत्त्व देणार्या नि इंटरनेटवर तथाकथित सोशलायझेशन शोधणार्या नागर मंडळींनी आवर्जून घ्यावा असा धडा. (नशीब अजून दारू नि डुक्कर यावरून एखादा ईSSS-कार वा संस्कृती-निषेध वगैरे उमटला नाहीये.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
निकोप रिती....
"....(नशीब अजून दारू नि डुक्कर यावरून एखादा ईSSS-कार वा संस्कृती-निषेध वगैरे उमटला नाहीये.)...
अगदी माझ्या मनातील हे वाक्य श्री.रमताराम यांनी आपल्या शब्दात उमटविले आहे. मलाही अगदी असेच वाटले की, कुणी "सोवळेओवळेकर" येऊन या धाग्याचा निषेधबिषेध करतो की काय... कारण अशा पांढरपेशी प्रवृत्तीनीच समाजातील काही जुन्या निकोप रिती नाहीशा करून टाकल्या आहेत. सुदैवाने या धाग्यावरील आता पर्यंतच्या सार्या प्रतिक्रिया या श्री.मधुकरराव यांना अशा पध्दतीचे लिखाण पुढेही चालू ठेवण्यास प्रोत्साहित करतील यात संदेह नाही.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
नशीब अजून दारू नि डुक्कर
नशीब अजून दारू नि डुक्कर यावरून एखादा ईSSS-कार वा संस्कृती-निषेध वगैरे उमटला नाहीये
हा हा हा. वाक्य वाचून हसू आले. म्हणजे अशी अपेक्षा होती का कोणीतरी मद्यपान-मांसाहार निषेध करावा या धाग्यावर येऊन? म्हणजे सर्व उच्चभ्रू मिळून त्याला उदारमतवादाचे धडे देतील व ते कित्ती मोठ्ठे आहेत असे दाखवतील. असो चालूद्या.
-पुण्याचे पेशवे
वेगळा..
वेगळाच अनुभव, नवी माहितीही मिळाली.
स्वाती
नशीब अजून दारू नि डुक्कर
नशीब अजून दारू नि डुक्कर यावरून एखादा ईSSS-कार वा संस्कृती-निषेध वगैरे उमटला नाहीये.) >>>>
अगदी असेच म्हणतो ...
छान लिखाण
मधुकरजी
हारो कधी ठेवता त्याची नुसती दवंडी द्या . हा पठ्या लगेच हजर. एकदम चित्रमय लेख.
मोहाच्या दारुची एकदा चव घ्यायची आहे हो. लवकर ठेवा.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
सुंदर लेख...
सुंदर लेख...
लिखान छान आहे
लिखान छान आहे..! मधुकरराव तुमचे अनुभव असेच लिहित चला...
मस्त लिहिता तुम्ही...
श्रीवर्धन
मस्त आयडिया आहे ही..
कामाच काम हि होतय आणी पार्टिपण.. पहिल्यांदाच ऐकलय या बद्द्ल
+१ मस्त लिहीलय
+१
मस्त लिहीलय
वेग्ळ्च सामाजिक जीवन आणि
वेग्ळ्च सामाजिक जीवन आणि परंपरा, अनुभव अतिशय उत्तम मांडलाय. अजून वचाय्ला आवडेल.
पुष्करिणी