ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग २

0
0

पुर्वसूत्र - ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १

सकाळी उठल्यावर परत हॉटेलच्या तळमजल्यावर जाउन नाष्ट्यासाठी मॅनेजरकडे माधुकरी मागायला सुरुवात केली, आमच्या दोघांचा अगम्य भाषेत गोन्धळ घालुन झाल्यावर, तो मला हाताला धरून कीचन मधे घेउन गेला. त्या आचार्‍याने, मी आणि मॅनेजरने थोडावेळ ईंग्रजीशी झटापट केल्यावर मी परवलीचा शब्द उच्चारला - हिंन्दुस्थान, आमीताब बाछ्छान.. पुन्हा समोर बटाटे, टमाटे, लॅट्युस वगैरे.(चला दीवसातले एक महत्वाचे काम तर झाले.)पण गेल्या काही तासांच्या अनुभवावरुन या देशाविष्यी उत्सुकता तर निर्माण झाली होती. त्यानंतर दिवसभर ह्या देशाविषयी प्रवचनामध्ये भक्तगणांच्याकडून (मी मलाही न कळणार्‍या विषयातला कॉर्पोरेट ट्रेनर आहे.. उगाच समजूतीचा घोटाळा नको..) शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. प्रत्येकाने त्या देशाची वेगवेगळी वैशीष्ठ्ये सांगितली पण एक सुर कायम होता - ईराणी सौंदर्यवती (बाकी याचा पुसटसा अंदाज वर्गातच आलाच होता.. माझ्याच वर्गात १२ पुरूष आणि ८ स्त्रिया.. चुकलो.. सुंदर स्त्रिया, पिस्ते आणि आमीताब बाछ्छान (काही ईराणी संस्कृतीचा अभिमान नसलेल्यांनी 'शॅहॅरूक खॅन' चं पण नाव घेतले, पण ते क्वचितच )

संध्याकाळी एका भक्ताबरोबर (अर्थातच आमीताभचा वशिला लाऊन ) तेहरान शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो, आणि समोर उलगडत गेला एक सुंदर अनुभव..

थोडेसे जुन्या पद्धतिचे तेहरान शहर, अगदीच गगनचुंबी ईमरतींचे जंगल नाही आणि अगदीच पूणेरी पेठा पण नाहीत, थोडी नजर उंचावल्यावर आश्चर्याचा सुखद धक्काच. शहराच्या शेजारी अवर्णनीय सुंदर बर्फाच्छादीत पर्वतमाला. (माझ्या मध्यमवर्गीय मना.. स्वेटर आणला नाही हे आत्ता आठवायलाच हवयं का?) पण ह्या सर्वाहूनही अधिक सुंदर म्हणजे पर्शियन सौंदर्यवती. (तिथेच ईराण म्हणजेच पर्शिया हे त्याने सांगीतल्यावर पुन्हा अत्यानंद..) रस्त्यावरुन जाणार्‍यायेणार्‍या पर्शियन ललना पाहणार्‍याच्या मानेचा नक्कीच करकोचा करतात, ८-१० जरी पर्शियन सौंदर्यवती आपल्या चित्रपटसृष्टीत आणुन सोडल्या तर सगळ्या हीरवीणींना .**लाच लावतील.. मला आधी कळेना 'पहावं की न पहावं' (चाल - टू बी.. ऑर नॉट टू बी ) पण माझ्या सर्व प्रवासात जवळ जवळ सगळ्या चालकांनी आणि स्थानीक सहकार्‍यांनी.. " पर्शियन विमेन, वेरी ब्युतीफूल.. सी सी.. " म्हणून मलाच प्रोत्साहन दिले (त्यातल्या काहिंच्या डोळ्यात ' सरड्याची धाव कुंपणापर्यन्त' असा भाव का दिसला बरें..).

ईस्लामी राजवट आणि शरीया कायदा असल्यामुळे स्त्रियांना सर्व शरीर झाकून घेण्याची सक्ती. सगळ्याजणी काळा गुढग्यापर्यंतचा कोट (खालची निळी तंग जीन्स कुठल्या शरीयात बसत असेल? ) आणि डोक्यावर काळा रुमाल केस झाकण्यासाठी वापरतात, फक्त चेहरा व हात दर्शनिय. पण हा पोशाखाचा निर्बंध वगळता बाकि काही निर्बंध मलातरी आढळले नाहीत. सर्व व्यवहारांत स्त्रियांचा बरोबरीने सहभाग दिसतो.(त्यातल्यात्यात ड्रायव्हिंग करणार्‍या स्त्रिया हॉर्न न वाजवता आडव्या येउन आपण शिव्या द्यायला तोंड उघड्ल्यावर गोड हसून सूसाट वेगाने निघूनही जातात)

ईस्लामी राजवटीच्या बाकि असहिष्णु खुणा मात्र सतत जाणवत राहातात,दूरचित्रवाणी वर फक्त तीनच वाहिन्या आणि प्रत्येक वाहिनीवर नखशिखांत झाकलेल्या स्त्री पुरुषांच्या मालीका. (तीकडची एकता कपूर काय विषय वापरत असेल बरं ? बाकी ती एकता कपूर असेल तर तिला विषय कशाला लागेल म्हणा..) दिवसातून ५ वेळा नमाजाच्या वेळेला तीनही वाहिन्यांवर कुठल्यातरी मुख्य अथवा ऊप मौलविंचे नमाज प्रक्षेपण कंपल्सरी..आपल्याकडे हॉटेल मधे टॉवेलसाबण ठेवतात तसे प्रत्येक खोलीत नमाजाची सतरंजी आणि कुराणातील आयते लीहिलेल्या मातिच्या प्रतिमा ठेवणे कंपल्सरी. संपूर्ण दारुबंदी.(काळ्याबाजारात मीळतेच..) लोकांना व्यक्त व्हायला साधने कमी म्हणूनच असेल कदाचीत पण ईराण हा जगातला चौथ्या क्रमांकाचा ब्लॉगर देश आहे.

देशाचा कायदा मुस्लिम, सरकार कट्टर मुस्लिम. लोक मात्र कमालीचे सहीष्णु आणि ह्या सगळ्या घोळाला कावलेले दीसले.(अर्थात आता बहुतेक देशांतील परीस्थिती पहाता सर्व सरकारे समुद्रात नेउन बुडविली तर लोक सगळेच चांगले.) मी त्यांचं सरकार, कायदे वगैरेंविषयी टोकरल्यावर (आगावपणा, दुसरं काय?) सर्वात जास्त ऐकलेले वाक्य म्हणजे " वुई आर फर्स्ट पर्शियन.. देन मुस्लिम्स" , त्यांच्याकडून कळालेला ईतिहास असा. अरबस्थानांतून जशी आक्रमणें पुर्वेला हींन्दुस्थान वर झाली तशी पश्चिमेला त्यांच्यावर झाली, त्यानंतर तेथील स्थानीक पारशी लोक परागंदा होउन, जीव वाचवून भारतात आले. (पर्शियन म्हणजेच आपल्याकडचे पारशी हे समजल्यावर पुन्हा एकदा अचंबा, आ वासणे वगैरे वगैरे..) मग मीपण टाटा, वाडिया वगैरे पारशांची नावे सांगून जवळीक वाढवली.

तसे अमेरीकाविरोधी बोलणारे माझ्या पाहण्यात कोणी आले नाहि. पण रस्त्यांवर मात्र अमेरीकाविरोधी फलक काय, अमेरिकेच्या झेंड्यावर क्षेपणास्त्रे काय. याही बाबतीत जरा टोकरल्यावर अमेरीका विरोध सापडलाच नाही उलट आमच्याच सरकार चे जरा अती होतय असा सूर आढळला.(एकाने खोमेनीच्या पोस्टरखालीच ऊभे राहून हे सांगीतल.)

भारताविषयी व मुख्यतः चित्रपट्सॄष्टीविषयी आतोनात उत्सुकता. (काय नशीब बघा मी स्वतः ईराणी चीत्रपटांचा भोक्ता आहे (माझीद़ माझिदी वगैरे.) पण कोणी त्यविषयी बोलेचना. ईराणी संगीत, चित्रपट ईतके अप्रतीम असताना त्यांना बॉलीवूड कसे सहन होते अल्ला जाणे.) सारखे हींदुस्थान, आमीताब बाछ्छान चालूच. मी कीतिही वेळा ईंडिया म्हणालो तरी त्यांच्या मुखी हींदुस्थानच. माझे प्रवचन ज्या रस्त्यावर होते त्याचे नावही गांधी स्ट्रीट. मी हींदुस्थानमधुन आलोय हे कळाल्यावर लोक जरा जास्त आपुलकीने आदरातिथ्य करत होते, अर्थात याला एक राजकीय पैलूही असु शकेल, एकाने मला ईराण-हींदुस्थान भाई भाई हेपण ऐकवले. ईराण-ईंडिया गॅस पाईपलाईन बद्दल म्हणाला " तो पाकीस्तान तेवढा मधे तडमडतोय ना.. नाहितर केव्हाच झाले असतं ते."

क्रमशः

पुढचा भाग - ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग ३

वाह छान मस्तं. ईराण बद्दल

1

वाह छान मस्तं.
ईराण बद्दल वाचून चांगले वाटले. इराण मधे ईस्लामिक क्रांती होण्याचे कारण काय होते बरे? कोणी सांगू शकेल काय?


-पुण्याचे पेशवे

लेख छान आहे. तेव्हढी कंसातली

2

लेख छान आहे. तेव्हढी कंसातली अदॄष्य वाक्य जरा कमी करा हो. वाचताना खूप त्रास होतो. नुसती कंसात टाकली तरी ती स्वगतं आहेत हे कळतं. सारखं सारखं सिलेक्ट करून वाचायचा कंटाळा येतो नी लिंक तुटत राहते.

+१

3

+१

ठीक आहे

4

करतो सुधारणा

ईरानची नवीनच ओळखत होते आहे

5

ईरानची नवीनच ओळखत होते आहे तुमच्या लेखातून... हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

इराणी क्रांती

6
इराण मधे ईस्लामिक क्रांती होण्याचे कारण काय होते बरे?

इराणी क्रांतीमध्ये इस्लामवादींखेरीज इतरही वेगवेगळे गट होते - अगदी मार्क्सिस्ट वगैरेही. पण खोमेनीच्या इस्लामवादी गटाने इतरांवर कुरघोडी करून नंतर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. इथे अधिक माहिती मिळेल. या पार्श्वभूमीवरचा 'पर्सीपोलीस' नावाचा एक मजेशीर अ‍ॅनिमेशन चित्रपट काही दिवसांपूर्वी गाजला होता. तोही पाहावा. त्यात इस्लामी नसलेल्या, पण क्रांतीला पाठिंबा देणार्‍या काही लोकांचे चित्रण आहे. त्यात असलेल्या इस्लामवाद्यांवरील टीकेमुळे इराणमध्ये चित्रपटावर बंदी येईल, असे वातावरण होते, पण अखेर तेहेरानमध्ये तो दाखवला गेला. इराणमध्ये आणि बाहेर इराणी तरुण वर्गात हा अतिशय लोकप्रिय झाला, कारण त्यात त्यांच्याच आकांक्षांचे चित्रण होते.

अवांतर १ - तिथल्या इस्लामी राजवटीस वैतागलेले अनेक इराणी पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांची वृत्ती आणि राहणी अत्यंत आधुनिक आणि पाश्चात्य प्रभावाखालची असते. अमेरिकेविरुध्द राग अजिबातच ऐकू येत नाही.
अवांतर २ - इराणी चित्रपट व इराणींशी प्रत्यक्ष संभाषण करताना ऐकू येणार्‍या पर्शिअनवरून मराठी-हिंदी भाषेत किती पर्शिअन शब्द आहेत, याचा वारंवार प्रत्यय येतो. काही उदाहरणे: जमीन, आसमान, बच्चा, दप्तर, रंग, दोस्त.


- चिंतातुर जंतू Stare
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

उत्तम माहीती व प्रतिसाद.

7

उत्तम माहीती व प्रतिसाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पर्शिअन शब्द

8

आणखी काही उदाहरणे
दूरूश्त. साधा (सीम्पल ह्या अर्थाने)

सध्याचा इराण

9

२००९ च्या निवडणुकींनंतरचा इराण हा एका मोठ्या संक्रमणावस्थेतून जात आहे. सरकारने विरोधकांची मोठ्या प्रमाणावर दडपशाही केलेली आहे. परदेशी वार्ताहरांवर प्रचंड निर्बंध आहेत. जाफर पनाही या सुप्रसिध्द दिग्दर्शकाला झालेली अटक पुष्कळ गाजली. या सर्व राजकीय वातावरणाविषयी आपणास स्थानिक लोकांकडून काही कळले असल्यास ते जाणून घ्यायला आवडेल.


- चिंतातुर जंतू Stare
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

छान लेखमाला .. वाचतोय

10

छान लेखमाला .. वाचतोय ..
..
डोक्यावर काळा रुमाल केस झाकण्यासाठी वापरतात, . पण हा पोशाखाचा निर्बंध वगळता बाकि काही निर्बंध मलातरी आढळले नाहीत

या रुमालास "चादोर" असे म्हणतात. सौदीच्या तुलनेत हे निर्बंध सौम्य असले तरी हे किती तापदायक आहेत याची कल्पना "नॉट विदाऊट माय डॉटर" आणि मीना प्रभूंच्या "गाथा इराणी" या महिलांनी लिहिलेल्या पुस्तकावरून येते.


काय नशीब बघा मी स्वतः ईराणी चीत्रपटांचा भोक्ता आहे पण कोणी त्यविषयी बोलेचना

Big smile .. हे हे .. पिकते तिथे विकत नाही ते हेच असावे !

वाचतोय..

11

वाचतोय..

चालूदे

12

चालूदे

मस्त ... लेखणाची,अधेमधे चिमटे

13

मस्त ...

लेखणाची,अधेमधे चिमटे काढणारी, खुशखुशीत शैली आवडली ,

एकूणच मुस्लिम जगाविषयी बटबटीत

14

एकूणच मुस्लिम जगाविषयी बटबटीत वर्णन किंवा गूढतेचे वलय असे परस्पर विरोधी चित्र दिसते. तुमचे लेखन संतुलित वाटले. आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे. हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

" वुई आर फर्स्ट पर्शियन.....

15

" वुई आर फर्स्ट पर्शियन.. देन मुस्लिम्स"
खरे आहे, स्वत्वाचा अभिमान असणारे लोक आहेत. इथे सौदी मधे ऐकले आहे की सौदी अरबिया सर्वाधिक सावध रहातो ते इराण पासुनच. मध्यंतरी अरब न्युज मधे असेही वाचले की जर इराणच्या अण्विक प्रकल्पांवर हल्ला करायचा असेल तर सौदी हवाई क्षेत्रावरून उड्डाण करायला सौदीची हरकत नाही. असा सौदी अरेबिया व इजरायल चा गुप्त समझौता झालाय.( खरे वाटत नाही ना?)

आभार..

16

पुण्याचे पेशवे, आदीजोशी, छमी, राजे, चिंतातुर जंतू, अभिरत, भिरभि-या, प्रभो, सोना, सुहास, माया, श्रीकांत१९..सर्वांना धन्यवाद
खूप आधी लेखन सुरू करायचे होते पण लिहायला हुरुप, धाडस येत नव्हते. बख्खळ विषय सतत डोक्यात असतात पण 'कशाला लिहायचं' 'कोण वाचणार' असं वाटत राहायचे..
मित्रांनी (काही मीम सभासदांची पण) पिच्छा पुरवल्यामुळे लिहायला लागलोय. जमतय असे वाटतय.. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाने अजुन हुरूप वाढला..

अहो अभार नंतर... जरा पुढील

17

अहो अभार नंतर...

जरा पुढील भाग टाका लवकर wink

* छान लिहीत आहात साहेब खरोखर आवडले मनापासून.

* व २२५ वाचकांना विसरला राव तुम्ही wink

ज्यांनी तुमचे लेखन वाचले Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद राजे..

18

>>जरा पुढील भाग टाका लवकर
टाकलाय.. पण त्यापुढच्या भागात संपवणार आहे..

>>* छान लिहीत आहात साहेब खरोखर आवडले मनापासून.
हे आपले उग्गाच.. नवख्या माणसाला चढवता काय.

>>* व २२५ वाचकांना विसरला राव तुम्ही
खरच की, (वाचकसंख्या कशी बघतात हो?)