नाईलच्य देशात - ४ : स्फिंक्स

0
0

एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला. camel
आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो. पिरॅमिड्सच्या बरोबर मधून जाताना रस्त्याच्या पलिकडे वाळुतुन घोडागाडी व उंटवाले देखिल आता धंदा संपवुन खालच्या अंगाने निघाले होते. वर काहीसं मळभ, सर्वत्र प्रकाश परावर्तित करणारी वाळु आणि त्या पार्श्वभूमिवर ती घोडागाडी व उंट यांचे छायाकृती चित्र टिपायची संधी मी सोडली नाही. क्षणात गाडी थांबवुन खाली उतरलो आणि ते दृश्य टिपुन परत आलो व गाडी उताराला लागली.
/

दोन अंगाला दोन महा पिरॅमिड्स मागे राहिली होती व समोर उजव्या अंगाला स्फिंक्सचे मंदीर दिसले. दगडात कोरलेली ती २१ मीटर उंच आणि ७३ मीटर लांब स्फिंक्सची भव्य आकृति दूरूनही स्पष्ट दिसत होती. अंगात पुन्हा उत्साह संचारला. गाडी थांबताच आम्ही स्फिंक्सच्या दिशेने निघालो. संपूर्ण परिसराला पर्यटकांचा वेढा पडला होता. आम्ही क्षणभर मागे वळुन पाहिले तर डावीकडे खाफ्रेचे पिरॅमिड, उजवीकडे खुफुचे पिरॅमिड, मधून उतरत येणारा रस्ता आणि खाली सर्वत्र वाळुचे साम्राज्य तर वर निळे आकाश असे विलोभनिय दृश्य दिसले.
view

आणि नजरेत पुन्हा एकदा भरली ती भारून टाकणारी भव्यता. समोर पासष्ट फूट उंचीचा स्फिंक्स चा पुतळा खुजा ठरविणारी भव्यता. खाली दिलेल्या चित्रातील स्फिंक्सच्या डाव्या बाजुने पिरॅमिड्सच्या दिशेने जाणाऱ्या मानवी आकृत्या पाहताच त्या भव्य वास्तूंची कल्पना येईल.
pyramid sphynx

स्फिंक्स विषयी अनेक हकिकती प्रचलीत आहेत. सिंहाचे शरीर व मानवाचे मस्तक हे सिंहाचे सामर्थ्य, चापल्य व माणसाची बुद्धिमत्ता याचे प्रतिक मानले जाते. अशी एक हकिकत आहे की त्या वाटेने जाणाऱ्या वाटसरूला स्फिंक्स प्रश्न विचारीत असे आणि उत्तर बरोबर देणाऱ्याला पुढे जाउ देत असे. मात्र उत्तर चुकले तर तिथेच खतम! कुणी म्हणे की हे स्फिंक्स सर्वत्र नजर ठेवुन असतात. ते आपल्या कानांनी ऐकत असतत, डोळ्यांनी पाहत असतात मात्र तोंड उघडुन बोलत मात्र नाहीत. बोलतात ते दहा हजार वर्षातुन एकदा, आणि तेही देवाला काय घडत आहे त्याचा वृत्तांत सांगण्यसाठीच. हे मानवी मस्तक म्हणजे राजाचे मस्तक आहे. इजिप्तमध्ये इथेच नव्हे तर सर्वत्र असलेले राजे - राण्यांचे पुतळे पाहताना प्रकर्षाने नजरेत भरतात ते मोठे व टवकारलेले कान. आपल्या जनतेचे म्हणणे राजा ऐकुन घेण्यासाठी दक्ष राजा सदैव जागरुक असतो याचे प्रमाण म्हणजे मोठे व पुढे झुकलेले कान. head

हे मस्तक बहुधा राणी हॅशेप्सूट हीचे असावे असा एक प्रवाद आहे. स्फिंक्सच्या पुतळ्या भोवती बव्हंशी नष्ट झालेले त्याचे मंदिर आहे. या पुतळ्याकडे पाहता त्याचा चेहरा बराच विद्रूप केला गेला असल्याचे जाणवते. मूर्तीपूजेच्या कट्टर विरोधात असलेल्या अरब मुस्लिमांनी सूर्यदेवता, नाग देवता वगैरे देवतांना मानणाऱ्या या चेहेऱ्याचे नाक तोडुन काढले आहे तर डोळेही खोबनीतुन काढले आहेत. इथल्या मूर्तीकलेचे असामान्य वैशिष्ट्य म्हणजे काही विशिष्ठ दगडातुन कोरलेले व मूर्तीच्या चेह्ऱ्यावरील खोबण्यात बसविलेले विलक्षण जीवंत डोळे. चित्रातील मूर्तीच्या डोळ्यांच्या खचा पाहिल्या असता त्यातील बुबुळ हे काढुन टाकलेले सहज समजतात.

मघाशी पिरॅमिड बघुन परत येण्या आगोदर आलेले मळभ दूर होऊन आता पुन्हा आकाश स्वच्छ निळे दिसु लागले होते. वर रणरणीत उन तर मधेच शिरशीरी आणणारी आन्हाददायक शितल झुळुक असा विरोधाभासी प्रकार होता. आम्ही समोरच्या अंगाने स्फिंक्सच्या डावीकडुन आत मांदिरात प्रवेश केला. मजबुत चौकोनी खांब व अजस्त्र डग्डांची चिरेबंदी भींत सोडता बाकी तिथे फारसे काही शिल्लक नव्हते. पुढे जाताच पुन्हा एकदा चिऱ्यांच्या चौकटीतुन पिरॅमिडचे दर्शन घडले. frame

मग आतल्या पिरॅमिडकडे जाणरा मार्ग सोडुन आम्ही उजवी कडच्या चौथऱ्यावर गेलो आणि त्या स्फिंक्सच्या नाना अंगानी वविध्यपूर्ण दिसणाऱ्या प्रतिमा टिपल्या. मग जरा आचरटपणाही केला, जे सहसा मी करत नाही: मी मागे सरकत अगदी भिंतीपर्यंत गेलो, पुढे चिरंजीवांना कड्याच्या अगदी जास्तीत जास्त पुढे स्फींक्सच्या रेषेत उभे केले वा कोन साधुन त्याला हात वर करत बरोबर तो त्या पुतळ्याच्या हनुवटीला हात लावतो आहे अशी छबी टिपली.
touch me

प्रत्यक्षात त्याच्या व पुतळ्याच्या मध्ये किमान शे दिडशे फूटाचे अंतर होते. लगोलग त्याच कड्यावरून अगदी मागच्या पायांपसून ते थेट मस्तका विस्तार टिपला. याच मंदिरात एक भुयारी मार्ग आहे जो अर्थातच आता बंद केला आहे; पण हा भुयारी मार्ग थेट पिरॅमिडजवळ उघडतो. बहुध खुफुच्या पिरॅमिडजवळ. मग ते पिरॅमिड्स व स्फिंक्स यांचे अनेक कोनातुन एकत्र दृश्य टिपले.
full

जसजसे आपले स्थान बदलावे तसे स्फिंक्सच्या पार्श्वभूमिवरचे पिरॅमिडही आपले स्थान बदलताना दिसत होते. कितीही वेळ पाहिले तरी समाधान होत नव्हते असा त्या वास्तूचा गुण असावा.

angle

पाय निघता निघत नव्हता. मात्र रात्र थोडी आणि सोंगे फार अशी एकाच दिवसात अजुन वस्तुसंग्रहालय, पॅपिरुसची निर्मिती व चित्रकला, इजिप्ती अत्तर, व अखेर खान ई खलिली बाजार असे सर्व काही पाहायचे होते व रात्रीच कैरोला अलविदा करायचे होते. आम्ही मुक्काम हलवला. जाताजाता ’शेवटचा एकच’ फोटु काढलाच.

end

फारच सुंदर ! फोटो आणि वर्णनही

फारच सुंदर ! फोटो आणि वर्णनही



पुष्करिणी

फोटोंना तर तोडच

फोटोंना तर तोडच नहि..नेहमीप्रमाणे..उत्तम लेखनशैली

>>वस्तुसंग्रहालय, पॅपिरुसची निर्मिती व चित्रकला, इजिप्ती अत्तर, व अखेर खान ई खलिली बाजार असे सर्व काही पाहायचे होते

लवकर येवुद्या

दुसरा फोटो ज्याम आवडला....

दुसरा फोटो ज्याम आवडला....

फोटो आणि लेखन दोन्ही जबरदस्त

फोटो आणि लेखन दोन्ही जबरदस्त

शेवटचा आवडला

शेवटचा फोटो फारच मस्त आलाय, अगदी पर्यटन विषयक मासिकांमधे छापावा असा.
वर्णन ही छान, पण थोडे अधिक वर्णन केले तर जास्त आवडेल.

असेच म्हणतो.

असेच म्हणतो.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मिमचे मालक आता नाहीत

त्यांच्या वतीने विचारतो -पुस्तक बनवून टाकू या का ?

+१

अनुमोदन

मी तर लेखमाला पुर्ण होण्याची

मी तर लेखमाला पुर्ण होण्याची वाट पाहतो Big smile

साक्षी साहेब परवानगी देणार नाही असे होणार नाही माहीत आहे मला wink

***

लेखाविषयी काय लिहू... व फोटोंनी तर निशब्द केले आहे मला..... Grade



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मालक, कशाला लाजवता?

एकतर माझ्या सामान्य निर्मितीला आपणं मोठे करु पाहता, वर माझी परवानगी मागुन लाजवता कशाला? इथे जे आहे ते सगळे आपलेच आहे की:)

रामदासशेठ व सहजराव व सर्व वाचकांचा आभारी आहे. प्रोत्साहनपर अभिप्रायांमुळे लिहायला उत्साह येतो हे खरे.

धनयावाद
कलोअ
साक्षी

ज ब रा !! मिमवर उभारलेलं

ज ब रा !!

मिमवर उभारलेलं पहिले लेखमालेरुपी 'पिरॅमिड'

सुंदर फोटो आणि ओघवते लेखन

सुंदर फोटो आणि ओघवते लेखन !
हे बघून वाचून मला आता इजिप्तची स्वप्नं पडायला लागलीत...
धन्यवाद !
हास्य



असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥