आम्ही काय कुणाचे खातो . . .

0
0

रविवार सकाळ. मी लवकरच आवरुन सेल्स टॅक्सची आलेली नोटीस घेऊन हेर्‍याकडे निघालो. आता हेर्‍याला चांगला सटकवायचा हे डोक्यात होतं. त्याचं घर माझ्या घरापासून अगदी चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर. मी चालंत निघालो.

हेरंब नागनाथ- आमचा कट्ट्यावरचा मित्र. माझ्यासारखाच टॅक्स प्रॅक्टीशनर. फक्त प्रॅक्टिसमध्ये मी त्याला सिनिअर. आम्ही दोघेही आधी नोकर्‍या करंत होतो. त्या सोडून नंतर व्यवसायात आलो. अगोदर मी आणि नंतर तो - अदमासे दहा वर्षानी. कट्ट्यावरचे आम्ही दोघे समव्यावसायिक असल्यामुळे आमचं सूत जरा जास्तंच जमलेलं. हेरंब धार्मिक, आध्यात्मिक वृत्तीचा. त्याची हि वृत्ती समोरच्याला जाणवेल इतपत ठळक. डोळे एकदम भेदक, कपाळावर केशरी गंधाचा टिळा, गळ्यात स्फटीकाच्या मण्यांची माळ, कानात चक्क भिकबाळी. आणि सदैव काहीतरी गूढ, अदभुत गोष्टींवर बोलणारा. अंगात धार्मिकता तर इतकी भिनलेली कि, एखादा देवाधर्माचा विषय निघाला की तो पोटतिडकीनी बोलत असे. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये त्याला स्वामी म्हणंत. बोलणं रोखठोक, सडेतोड. भाषा अर्वाच्य शिव्यांनी भरलेली. मलाच काय तो जरा वचकून असे. कदाचित व्यावसायिक-सिनिअ‍ॅरीटीचा परिणाम असेल. त्याचं वाचन बर्‍यापैकी होतं, त्यामुळे बोलताना कुठल्यातरी पुस्तकातला, गोष्टीतला संदर्भ, त्यातली वाक्यं, ओळी, उतारे.. मध्येच टाकत असे. नेहमीच्या ऐकणार्‍याला ते कळे पण एखाद्या नवख्याला पट्कन कळंत नसे. त्याचा एक अलौकीक गुण म्हणजे - बर्‍याचवेळेला समोरच्या माणसाचे वागण्याचा, बोलण्याचा त्याला अगोदरच अंदाज येत असे. त्यामुळे कुणी जरा वेडंवाकडं वागायला, खोटं बोलायला लागलं कि ह्याच्या शिव्याचा मारा सुरू. मग तो त्याचा क्लायंट असो नाहीतर नातेवाईक.

फार वर्षापूर्वीची गोष्ट. साधारण बारा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी व्यवसायात नविनच होतो. धंदा मिळविणे महत्वाचे. पैसे काय नंतर मिळतीलच अश्या विचाराचा. त्यामुळे बर्‍याच वेळेला माझी फी थकीत रहात असे. फारच आर्थिक कुचंबणा व्हायला लागली की, मग मी माझे पैसे मागत असे. कधीकधी सहज चक्कर मारून क्लायंटला फार न दुखावता वसुली करायचा प्रयत्न करी.
असंच एकदा माझी बरीच थकीत फि एका संध्याकाळी क्लायंटकडून आणायला मी निघालो होतो. त्यासुमारास हेर्‍या नोकरी करत होता. ऑफिस सुटल्यावर कट्ट्यावर येऊन बसलेला होता. एकटाच होता. मी त्याला म्हणालो "येतोस कां बरोबर, डेक्कनपर्यंत? वसुलीसाठी चाललोय"
"येतो कि, माझ्या चहा-बिडीची व्यवस्था कर, बास्"
आम्ही क्लायंटकडे निघालो. वाटेत जाता-जाता त्या क्लायंटसंबंधी थोडी चर्चाही झाली. आम्ही ऑफिसात पोहोचलो. आत गेल्यावर, बाहेरच्या रिसेप्शनिस्ट-कम-अकौंटट मुलगी "अरे ! काळे सर तुम्ही ? बसा, तुम्ही आल्याचं आमच्या साहेबांना सांगून येते". म्हणून ती आत गेली आणि लगेचच आतून आमचा क्लायंट "अरे ! काळेसाहेब या! या!" म्हणत बाहेर आला. "अरे, कविता जरा आमच्यासाठी तीन चहा सांग, आणि तुला हवा असेल तर तुही घे" ती चहा सांगायला निघून गेली. मी हेर्‍याची ओळख करून दिली नाही. कारण सुरवातीलाच त्यानं हेर्‍याकडं बघितलं तेव्हा पटकन नजर वळवून माझ्याकडे पहायला सुरवात केली. कदाचित हेर्‍याचे डोळे बघूनच त्यानं ओळख करून घेण्याचा विचार सोडून दिला असावा.

"बोला काळेसाहेब काय विशेष..काल कोल्हापूरला गेलो होतो, परत निघायला उशीर झाला, रात्री अकराला निघालो तिथून. रात्रीचं ड्रायव्हींग. जागरण झालं. डोळे अजून चुरचरताहेत. बरं एक सांगा .. जनरल टॅक्स रेट चेंज झालाय कां हो ?" - क्लायंट
"झालाय, पण अजून नोटीफिकेशन आलं नाही, आल्यावर मी तशी मेल टाकीनच, तोवर आहे त्याच रेटनी कॅलक्युलेशन करा" मी. तेवढ्यात चहा आला. आम्ही सरकारचे सेल्स टॅक्सविषयीचे धोरण, नियम, अटी, अडचणी ह्यावर गप्पा मारंत चहा प्यायलो. हेर्‍याची चुळबूळ सुरु झाली होती. कारण.. सिगारेट.
क्लायंट खुर्चीवरुन उठला आणि म्हणाला " आपण आंतच बसू यां कां? माझ्या केबीनमध्ये". मग थांबून परत म्हणाला "कविता जरा आत ये" क्लायंट आत गेला. मग ती अकौंटंट मुलगी आंत गेली.
मी हेर्‍याला म्हणालो "चल". तो माझ्या कानाशी लागून म्हणाला "तू जा आंत, मी नाही येत, बाहेर थांबतो रस्त्यावर बिडी मारंत. तुझं झालं कि ये कोपर्‍यावरच्या टपरीवर. आणि ऐक हा काही आत्ता तुझे पैसे देणार नाही.
"कशावरून" - मी
"बघंच तू, हेर्‍या खुर्चीवरुन उठत म्हणाला "चल.. मी बाहेर वाट पाहतो, माझा पुतळा करू नकोस, लवकर ये, तुझ्याकडची चहा-बिडी राह्यलीये".

मी केबीनमध्ये गेलो. खुर्चीवर बसलो. "बोला, काळेसाहेब काय विशेष?" - क्लायंट.
"ह्या बाजूला आलोच होतो, म्हंटल तुमच्याकडे चक्कर टाकून पेमेट निघतं कां ते बघावं" - मी
नाही नां ..पण, पुढच्या आठवड्यात देतो. नक्की. चोवीस नाही पण निदान दहा हजार तरी नक्की देतो. रिकव्हरीसाठीच गेलो होतो कोल्हापूरला, पण काही उपयोग झाला नाही. पुढच्या आठवड्यात येताहेत ते पैसे. ते आले कि तुमचे लगेच दहा हजार देतो.उरलेले महिनाभरात क्लियर करतो.आणि तुम्ही कशाला येता मीच येतो, किंवा कुणालातरी पाठवीन पैसे द्यायला.
मग मी काय बोलणार. म्हंटल "ठिक आहे, पुढच्या आठवड्यात या". मी निघालो आणि ऑफिसमधून बाहेर पडलो. कोपर्‍यावरच्या पानवाल्यासमोर फूटपाथवर हेर्‍या सिगारेट ओढत उभा होता. माझी वाटच पहात होता.
मला पाहील्यापाहील्या सिगारेटच थोटूक फेकून जोरजोरात हसंत सुटला.
"हा..हा..हा.., कोल्हापूरला पैशेच आणायला गेलो होतो काळेसाहेब, पण काम झालं नाही. असंच म्हणाला नां तो भा*खाऊ"
नतद्रष्ट आहेस हेर्‍या तू, तुझा पायगुण चांगला नाही. लेका तुझ्यामुळे पैसे मिळाले नाहीत. तुला उगाच आणलं मी. आणि हॅलो..मिष्टर नागनाथ तो मला पैशे देणार आहे, बरं कां. सगळे नाहीत. पार्ट पेमेंट दहा हजार. पुढच्या आठवडयात.
सोड, तुला पैशे मिळंत नाहीत. बेट लावतोस ?
बरं ते जाऊ दे ! तुला कसं कळ्ळं रे, पैसे मिळणार नाही म्हणून आणि तो रिकव्हरीला कोल्हापूरला गेला होता ते?
अरे भाई .... ! अपना अंदाज हमेशा सही. ठरलेली चहा-बिडी होऊन जाऊ दे, मग सांगतो. बरं एक सांग ती बाहेरची स्कोडा त्याची आहे कां रे ?
हो !
म्हणजे हाही अंदाज बरोबर निघाला माझा.
म्हणजे ?
चल चहा पिताना सांगतो.
मी आणि तो चहा प्यायला एका हातगाडीपाशी थांबलो.
चहा पिता-पिता हेर्‍या म्हणाला "तो कोल्हापूरला गेला होता हि थाप आहे. त्याच्याकडे बक्कळ पैसे आहेत, पण तुझी फी द्यायची त्याची इच्छा नाही. तुझी बिलं दोन वर्षापासून थकीत आहेत. त्यानं तुला पुरतं ओळखलं आहे लेका. त्याची कोल्हापूर ट्रिप, जाग्रण..हे सगळं तुझे पैशे द्यायचे नाहीत म्हणून तयार केलेली कारणं. एक नंबरचा चिंधी साला. त्यानं माझ्याकडे बघितल्यावर त्याच्या डोळ्यांत, चेहर्‍यावर मला जे हावभाव दिसले, त्यावरूनच माझ्या लक्षात आलं कि हा बाबा काही तुला पैशे देणार नाही. समयसे पहले, नसीबसे ज्यादा कुछ नही मिलेगा. .कालेसाब.
बरं ते सोड. मी देऊ कां तुला तुझे पैशे वसूल करून?. आख्खे... बोल... दहा टक्के माझं कमीशन .. म्हणजे दोन हजार चारशे. कमीशन काढून घेऊन उरलेले तुला देतो. चल डील करु.
दोन हजार चारशे ..? जास्त होतात. हेर्‍या.. हे पठाणी व्याज आहे. बरोबर सांगतोएस नां ?
तुझा जन्म कुठल्या हॉस्पिटलचा रे ? डॉ.सौ.माधवी जगन्नाथ लेले हॉस्पिटल, सदाशिव पेठ, पुणे ३० कां ?.. कंजूस स्साला. नको तुझे पैशे. मिळाल्यावर पचायचे नाहीत. इमिजिएटली मला अ‍ॅक्सिडंट व्हायचा. हॉस्पिटलमध्येच भरायला लागायचे.
बरं! पंधराशे देतो. सगळे पैशे अगोदर हातात आणून द्यायचे. मग कमीशन.
सॉरी .. म्हणजे पंधराशे ओक्के, पण अगोदर कमीशन काढून घेईन, तुझे पैशे नंतर. वाटल्यास आजच्या चहा-बिडीचे आठ रुपयेसुध्दा त्यात अ‍ॅड करून देतो. खुष . .?
चहा-बिडीचे पैशे? बरं बरं ... मग सगळेच दे. आजपर्यंत लाख वेळा चहा पाजलाय मी तुला माकड्या...! बरं ते जाऊ दे, पण .. तु काय आयडीया लढवणार आहेस, ते सांग?
ते तुला काय करायचं, तो माझा प्रश्न.. तुला पैशे मिळाले म्हणजे बास नां ? फक्त मी सांगतो तसं करायचं. तुझे पैशे तुला त्यानं ठरवलेल्या दिवशीच मिळतील. आणि सगळे. चोवीसच्या चोवीस. बरं, चेक मिळाला, तर तू मला कॅश द्यायची. एका हातानं कॅश द्यायची, दुसर्‍या हातानं चेक घ्यायचा.
चेक नाही पास झाला तर...?
सोड .. शक्य नाही. त्याची चड्डी काढून घेईन. शिवाय स्कोडाचे स्पेअर्स खूप महाग असतात म्हणे...
हेर्‍या फालतूपणा नको हां.. क्लायंट आहे तो. उगीच माझ्या व्यवसायाला काळीमा नको लागायला.
मग मला समजावणीच्या सुरात हेर्‍या म्हणाला "नाही रे ! मी तसं काहीही करणार नाही, तुझ्या क्लायंट बरोबरसुध्दा मी वेडवाकडं वागणार नाही .. ओके. पण हे ही तितकंच खरं कि, त्याचा जर चेक मिळाला तर तो अन्पेड रिटर्न जाणार नाही. ती माझी जबाबदारी .. मग ठरलं ?
मी म्हटलं "चालेल, चलो..मग कधी भेटायचं"
"आज शनिवार, येत्या गुरूवारी भेटू . . . बाय द वे, माझ्या एका मित्राचा इंजिनियरींग वर्कशॉप आहे. अ‍ॅन्सिलरी युनिट आहे. तो असाच वर्षानुवर्षे फि न मागणार्‍या सेल्सटॅक्स कन्सल्टंटच्या शोधात आहे. तुझा फोन नंबर देऊ कां त्याला?" माझी हेटाळणी करंत हेर्‍या म्हणाला.

क्रमश :

गजब वेग आहे सर... वाचतो आहे..

1

गजब वेग आहे सर...

वाचतो आहे.. काय आयडिया लढवली असेल ह्याचाच विचार करतो आहे....

लवकर लिहा सर..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

2

+१

मस्त...........पुढे लिहा वाट

3

मस्त...........पुढे लिहा वाट पहतोय

वाचतोय

4

वाचतोय

वाचतोय..

5

वाचतोय..

कथेची चांगली मांडणी आणि उत्तम

6

कथेची चांगली मांडणी आणि उत्तम वेग. कदाचित पूर्वी स्वतःचा व्यवसाय केल्यामुळे असेल पण पात्रे आणि प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.

पुलेशु आणि पुढील लवकर यावेत अशी अपेक्षा.

चिन

छान लिहिल आहे.रंगतदार आहे

7

छान लिहिल आहे.रंगतदार आहे

हा हा हा. वाचतोय. ओ काळेकाका

8

हा हा हा. वाचतोय. ओ काळेकाका लिव्हा की पटापटा म्होरं.


-पुण्याचे पेशवे

पात्रे आणि प्रसंग अगदी

9

पात्रे आणि प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले व वेग ही सुरेख आहे, वाचतो आहे.