नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला......"

0
0

प्रवास सूचीवर मुंबई ते कैरो उड्डाण ७३७-८०० विमानाने असल्याचे वाचून थोडा विरस झाला. ही ३ * ३ आसन रचनेची विमाने देशांतर्गत प्रवसाला ठिक असली तरी मोठ्या प्रवसाला थोडी अडचणीची वाटतात. मात्र तिथे पोहोचण्याची / तिथुन परत येण्याची सोयीस्कर वेळ आणि वाजवी किमतीत हव्या असलेल्या तारखांना असलेली उपलब्धता - तिही ऐन मोसमात या निकषांवर इजिप्त एअर हा सर्वोत्तम पर्याय होता. संपूर्ण प्रवास नियोजन करुन देणार्‍या माझ्या मित्राने मला आगाऊ कल्पना दिलीच होती की ही विमानसेवा काही मोठी खास नाही पण वरील निकषांप्रमाणे योग्य आहे आणि वाइट नक्की नाही. आधी चौकशी केलेली बरी, नपेक्षा आयत्या वेळी उड्डाणे रद्द करणारी सेवा गळ्यात पडली तर सहलीचा बट्ट्याबोळ व्हायचा. रॉयल जॉर्डन चे विमान ठरलेल्या वेळेत निघतेच असे नाही आणि निघते तेव्हा ठरलेल्या स्थळी थेट जातेच असेही नाही; समजा मुंबईला निघालेल्या विमानाला अचानक कलकत्त्याचे घसघशीत मालवाहु भाडॆ मिळाले तर ते उड्डाण कलकत्तामार्गे मुंबई असे बदलण्यात येते असे ऐकुन होतो. बाकी एअर इंडियाने प्रवास केलेल्याला इतर कुठल्याही विमानसेवेबद्दल तक्रार असायचे काही कारण नसते म्हणा. असो.

मी, पत्नी व चिरंजीव असे तिघे होतो. तिघांना मिळुन साठ किलो बोजे सामानात नेता येत असतानाही (खांद्यावरचे ओझे वेगळे हो!)आपले सामान कमी आहे असे अनेकदा ऐकावे लागले. मी दुर्लक्ष केले. मात्र प्रवासात उगाच लोढणे नको म्हणुन मला माझी चित्रण तिपाई घेण्यास मनाई केली गेली होती. असो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. दहाचे उड्डाण म्हणताना आम्ही नियमानुसार मुकाट्याने सातलाच दाखल झालो. खरेतर तिथे तीन तास ताटकळणे हा काही सुखाचा अनुभव नाही पण वेळ पाळलेली बरी. विमान आणि डॉक्टर यांची एकतर्फी शिस्त असते. तुम्ही उशीरा आलात तर तुमचे उड्डाण वा ठरलेली वेळ गेली. मात्र तुम्ही वेळेवर आल्यावरही तुम्हाला आपल्या सोयीने घेण्याचे अधिकार या दोहोंकडे असतात. त्यांची कारणे नेहमीच ’रास्त व अपरिहार्य’ असतात, आपण काय ते रिकामटेकडे. विमनतळावर सर्व सोपस्कार संपवुन आम्ही उड्डाणद्वारासमोर येऊन स्थिरावलो. दिवसाचे उड्डाण म्हणजे कंटाळवाणा प्रकार.

उड्डाणपत्र, बहिर्गमन, सुरक्षा तपासण्या वगैरे सोपस्कार संपवुन आम्ही आमच्या निर्दिष्टीत उड्डाणदरवाज्या समोरील जागेत आसनस्थ झालो. पलिकडील खुल्या उपहारगृहात कर्मचार्‍यांची जमवाजमव सुरू होती. आमच्याच उड्डाणदरवाज्याने एअर ईंडियाच्या परदेशातुन आलेल्या उड्डाणाचे आता चेन्नाईला प्रस्थान होते. आता यांचे उड्डाण कोणत्या दरवाज्यावर लावले आहे ते जाहिर केले नव्हते की ते त्यांनाच आगाऊ माहित नव्हते हे तेच जाणोत, पण दर पाच मिनिटांनी होणार्‍या उद्घोषणेबरोबर दारावरचे तसेच आसपास वावरणारे कर्मचारी तोंडाने ’चेन्नै, चेन्नै’ असे कोकलत होते. मला माझ्या लहानपणचे ठाणे स्थानक आठवले. स्थानका बाहेरील टॅक्सी अड्ड्यावर लाकडी बांधणीच्या डॉज, प्लायमाउथ गाड्या उभ्या असायच्या आणि चालक व त्यांचे अडते स्थानकाबाहेर पडणार्‍या उतारुंकडे पाहत ’भिवंडी एक शीट’ असे ओरडत असायचे. गाडीची क्षमता वा उपस्थित उतारूंची संख्या काहीही असो, ’भिवंडी एक शीट’ हे परवलीचे वाक्य होते.

कुठे घरी संपर्क साध, कुठे कॉफी घे, कुठे आपल्या बरोबर कुठले उतारू आहेत ते आजमावुन कुणी बोलका दिसल्यास नमस्कार चमत्कार कर, असे करीत वेळ काढत असताना अखेर आमचे उड्डाण जाहिर झाले आणि आम्ही सरसावलो. सुरक्षा रक्षकांबरोबर विमनसेवेचा सेवकवर्गही आत शिरणाऱ्यांच्या तपसणीत तैनात होत. कर्मचारी वर्ग हसतमुखाने वावरत होता हे पहुन बरे वाटले. विमानात शिरलो आणि आसन व्यवस्था बरी वाटली. दोन रांगांमध्ये बर्‍यापैकी अंतर होत. अगदी ऐसपैस नाही तरी गुडघे समोरच्या आसनाच्या पाठीला घासत नव्हते ही जमेची बाजु. जवळ पास सहा तास एकाच जागी बसायचे म्हणताना खरेतर बोईंग ७७७ श्रेणी वा एअर बस ३३० श्रेणी हवी. जनता दर्जाची आसनेही मोकळी व सुखद असतात. योगायोगाने आमच्या रांगेतील पलिकडच्या तीनही आसनांवर कुणीच न आल्याने ती ओस पडलेली लक्षात आली. चिरंजीवांनी विमानाचे दरवाजे बंद होण्याची उद्घोषणा होताच आम्हाला सोडुन त्या आसनांपैकी मधल्या आसनावर टोपी, जाकीट वगैरे टाकत स्वत: खिडकी ताब्यात घेतली. डोळ्यावर भगभगीत प्रकाश नको वाटत असला तरी खिडकीच्या झापा काही वेळ तरी उघड्या ठेवणे अनिवार्य होते. साधारण अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर विमान आकाशात झेपावले. थोड्या वेळाने सेवक वर्ग न्याहरी घेउन आला. पलिकडील एका षौकिनाने ’फक्त खायलाच’ का? अशी उघड विचारणा केली तेव्हा सेवकाने हॅ हॅ करीत साळसूदपणे सांगितले की आजकाल लोक फार पितात आणि मग इतर प्रवासींना त्याचा उपद्रव होतो त्यापेक्षा आम्ही अपेयपानाला थाराच देत नाही! सकाळी सकाळी कुणी पीत नसावे असा माझा समज मागे एकदा दुबई हून पहाटे साडेचारच्या उड्डाणात दूर झाला होता. उड्डाणानंतर पाउणेकतासात सेविका ढकल गाडी घेउन अवतरताच अनेक भाविकांनी पहाटे पाच सव्वा पाचला काकड आरती केलेली पाहुन मी थक्क झालो होतो. इथे पिण्याच्या आनंदापेक्षा ’फुकट आहे तर का सोडा’ हा भाव अधिक प्रबळ असावा.

उड्डाण बव्हंशी आखाती देशांवरुन जात होत; कधी भूभाग तर कधी समुद्र. मी कॅमेरा काढला आणि मांडीवर घेउन बसलो. काही बरे दिसले तर टिपु असे म्हणत असतानाच खाली निळ्याशार पाण्याच्या कडेने पांढऱ्या वाळुच्या भूमीवर वसलेले कुठलसं शहर दिसलं. d1

मग बराच वेळ खाली निळं पाणी आणि वर निळशार आकाश, मधेच कुठेतरी पोह्यांवर नारळ भुरभुरल्यागत विखुरलेले पांढरे तुरळक ढग असे दृश्य दिसत होते. s2

काही वेळातच एक मजेशीर चाळा मिळाला. खाली सागरात निळे पाणी आणि लाटा यांवर तरंगत एक मालवाहु जहाज आपला मार्ग आक्रमीत होते. लवकरच आम्ही त्याला ओलांडले. आता ते जहाज अगदी बरोबर खाली होते. पुढे निळे पाणी आणि त्याला भेदत जाणारे जहाज व त्याच्या मागे फेसाचा शुभ्र पिसारा असे सुरेख दृश्य दिसत होते. आणि बघता बघता आमचे विमान वाळवंटी भूभागाकडे वळले तर ते जहाज उजव्या अंगाने निघुन गेले. आता नजर पोचेल तिथे फक्त वर आकाश आणि खाली वाळु होती. वाळुच्या टेकड्या म्हणताच आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ठ दृश्य उभे राहते. मात्र इथे जवळपास ३५ हजार फूट उंचीवरुन सरळ रेषेत खाली बघताना मात्र वेगळेच रुप दिसत होते. d2

आणि अचानक वाळवंटतातील तिरकस सरपटणार्‍या सापासारखा एक काळाशार रस्ता खालुन उलगडत गेला. रस्ता दुभजकावर जमलेल्या वाळुच्या कणांमुळे दुतर्फा पसरलेला तो रस्ता खरोखरच पाठीवर सोनेरी रेघ असलेल्या सर्पासारखा भासत होता. d3

तो देखणा रस्ता नजर खिळवुन ठेवणारा होता. मात्र पुढच्याच क्षणी मनात विचार आला, की आपण अशा रस्त्याने जात असताना मोटारीतले इंधन संपले वा यंत्रात बिघाड झाला तर???? अंगावर काटा आला.

वाळवंटात हिरवळ हा शब्दप्रयोग ऐकला होता, पण खाली अक्षरश: ओसाड वाळवंटात वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार हिरवळी पाहुन मी थक्कच झालो. नक्कीच या हिरवळी गोलाकार भागात खास निर्माण केलेल्या असाव्यात आणि त्यांना विशिष्ठ आकार दिलेला होता. घड्याळात वेळ दाखविणारे काटे सरकताना सरकलेल्या भागात जर तबकडीचा रंग वेगळा झाला तर कसे दिसेल तदवत चतकोर, सव्वा चतकोरांसारखे अनेक वर्तुळाकार सलग दिसत होते. d4

सध्या जोमाने जाहिरात करत असलेल्या टाटा डोकोमो ला आपली अक्षर रचना या हिरवळीकडे पाहुन सुचली असावी का असा एक मजेशिर विचार मनात येउन गेला. हा काय प्रकार असावा हे कुतुहल अद्यापही मनात आहे. कुण्या आखातस्थाने यावर माहिती द्यावी ही नम्र विनंती. अशा हिरवळी अनेक ठिकाणी दिसल्या, माझ्या निरिक्षणानुसार त्या हिरवळी साधारण मोठ्या रस्त्याच्या आसपास होत्या.

जसजसे आम्ही अफ्रिकेकडे, खुद्द इजिप्तकडे जवळ सरकु लागलो, तसे खालचे वाळवंटही बदलले. वाळुच्या टेकड्या व पठारांची जागा आता मोठ्या खडकाळ पर्वतांनी घेतली होती. पर्वत म्हणजे जणु थिजलेला लव्हारस! एखाद्या मुशितुन साच्यात ओतुन एकसंध पाडावे असे कडे पर्वत माथ्यांवर पसरलेले होते. d5

एकुण पसरलेल्या पर्वतरांगा पाहताना आपल्या सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यांवरील दुर्गांची आठवण न झाली तरच नवल. फरक इतकाच की कुठे हिरवळ वा मृदु जमिनीचा थांगपत्ताही नव्हता सगळा मामला दगडाचा. जणु खडक छिन्नीने फोडुन हा पर्वत कोरला असावा. या पर्वतांवरुन जलौघ वाहायचे दूरच, मात्र प्रवाही वाटांवरुन वाळु वाहत होती. अशाच वाळुच्या झर्‍यांनी सजलेल्या एका पर्वताच्या पायथ्याशी सोसाट्याच्या वार्‍याने धुरळा उडवायला सुरूवात केलेली दिसली. वाळुचे लोट आसमंतात पसरत टेकड्यांच्या माथ्यापलिकडे उधळताना दिसत होते.d5

मात्र एकाएकी या उदी तपकिरी निसर्गदृश्यात निळा रंग अवतरला! ते अविस्मरणीय दृश्य मी कधीच विसरू शकत नाही. d6

अलिकडे मऊसूत भासणार्‍या वाळुचे गालिचे, पुढे जेरी माउसच्या चीजसारखे दिसणारे व वाळुचे प्रवाह अंगावर वागवणारे पर्वत व त्या पलिकडे निळेशार पाणी!

आता प्रवास संपत आला होता असे घड्याळ सांगत होते. सेवकवर्गाचीही आवरासावर सुरू झाली. विमानातील चित्रपटलावर कैरोचा मार्ग दिसत होता, ठिपका जवळ येत होता. अचानक विमान डावीकडे झुकले व एक झोकदार वळण घेत विमान पुढे निघाले. विमान आता उंची कमी करीत बर्‍यापैकी खाली आले होते. एव्हाना वाळवंट गायब होऊन तिची जागा देखण्या निळ्याशार सागराने घेतली होती. मंचकावर भरल्यापोटी पसरून विश्रांती घेणारे ते समुद्रदेवतेचे रूप मोठे विलोभनिय होते. se1
निळ्या रंगाच्या अनेकानेक छटांनी नटलेले जणु ते निसर्गदृश्यच. संथ हलक्या लाटा, मधेच नितळ पाण्यातुन दिसणारा भूभाग तर किनार्‍याला जमिन व पाण्याचा तरंग असलेला काठ यांचा संगम असे ते दृश्य होते. विमान आणखी खाली झेपावले आणि तो क्षण अचूक साधत मी लाटांनी साय धरलेले जलपृष्ट व त्यावर परावर्तित होऊन चकाकणारे उन हे दृश्य टिपले.se2

आणि अचानक डोक्यात किडा वळवळला. नकाशात कैरो सरळ पुढे दिसत असताना आमचे विमान मात्र डावीकडे वळले होते आणि बराच वेळ तसेच जात होते. आतातर उंचीही घटत होती. वाईट शंका सहसा खोट्या ठरत नाहीत. मी उठुन काही विचारायच्या आतच उद्घोषणा झाली ’ खराब हवामानामुळे कैरो विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे विमान आता कैरो ऐवजी हुर्घाडा येथे उतरविण्यात येत आहे’ क्षणभर सन्नाटा आणि मग सर्वत्र एकच गलका उठला. ’आता काय?’ या प्रश्नाने सर्वांना चिंतित केले होते. मुंबईहून निघालेल्या विमानात बहुसंख्य उतारु भारतिय होते, सगळेच पर्यटक होते. जर आज कैरोला पोहोचलोच नाही तर न्यायला आलेले सहल आयोजक कुठे भेटणार? आपले विमान आता येत नाही तर ते कधी येईल हे त्यांना कसे समजेल? प्रत्येकाचा मुक्काम एकेका ठिकाणी नेमका ठरलेला. जर पहिलाच दिवस बुडाला तर सगळेच ओंफस! बोंबला! जरा वातावरण निवळल्यावर कर्मचार्‍यांनी खुलासा केला की ईजिप्तचे हवामान अत्यंत लहरी अहे. हवा कधी पलटेल काही नेम नाही. बरोबरच आहे, अगदी अर्धा तास आधी आम्हालातरी कुठे माहित होते? मनात अनेक प्रश्न होते पण उत्तर नव्हते. जेजे होईल तेते पाहणे यापलिकडे हातात काहीच नव्हते. असो. आता जे आहे त्यांत बरे शोधा हे खरे. मी अर्चनाला म्हणजे माझ्या पत्नीला व चिरंजीवांना उसने अवसान आणीत म्हणालो, ’चला रे आपल्या रुपरेषेत हुर्घाडा नव्हते ते अनायासे फुकटात पाहायला मिळतयं तर बघुन घ्या’. हुर्घाडा हे लाल समुद्राकाठचे ठिकाण, पर्यटनासाठी प्रसिद्ध. आता पुढची चिंता करण्यापेक्षा हुर्घाडाचे सौंदर्य दिसतेय तितके टिपुन घ्यायला मी सज्ज झालो. विशाल सागरात मधेच पसरलेली बेटं आणि पांढर्‍या-बदामीसर वाळुवर निळ्या रंगाच्या पाण्याने रंगवलेल्या छटा टिपताना मी रंगुन गेलो. se3
se4

कुठे किंचित माथा वर असून बाकी पाण्याखाली गेलेली बेटे तर कुठे वाळुचे बेट असा खेळ चालला होता. अखेर हुर्घाडा विमानतळ आला आणि किनार्‍याची वस्ती दिसु लागली. ज्या वेळेस आम्ही कैरो गाठणार त्या वेळी आम्ही शेकडो मैल दूर हुर्घाडा येथे उतरून पडलो होतो.

क्रमशः

सुरेख लिहिले आहे.. मला सुध्डा

1

सुरेख लिहिले आहे..
मला सुध्डा पिणार्याचा राग येतो.
मागे एकदा मुम्बैला येताना मी एकटी होते. नवर्याने जरा लवकरच मला एअरपोर्ट वर सोडले.मी जाणार म्हटले कि तो खुप खुष असतो , हुन्द्डायला मोकळा. मी कन्टाळूण २ बायकांशी मैत्री केली. एकिशी जरा बरे जमले, तिने विचारले कुठली सिट? मग आम्ही गेटवर असलेल्या माणसाला सान्गितले कि बाबा रे आम्ही बायका एक-एक ट्या आहोत आम्हाला जवळ बसायचेय. तो म्हणाला शक्य नाही विमान फुल आहे. वर म्हणाला कि दुबै इज सेफ प्लेस. मी म्हणाले, माकडतोन्ड्या व्होट अबोउत मुम्बै? कंटाळुन आम्ही विमानात आपापल्या जागेवर बसलो. शेजार्याला रिक्वेस्ट कराविशी वाटली नाही. मग आचमनाला सुरवात झाली. माझ्या शेजारचा एवढा पित होता कि मेल्याने माझ्या जिन्स वर ते सरबट सान्द्लेन. सॉरी म्हणटाना जिभ जद झालेली लक्शात आली. मी मुम्बै ला उतरले तरी ही तो वास जात नव्हता Sad.
३ तास नाही प्यायले तर ह्याच्या जिव का जाणार? कशाला हि फ्यासिलीटी देतात विमानात?

कृ गै न

2

<मला सुध्डा पिणार्याचा राग येतो.>

बाईसाहेब, मला राग अजिबात येत नाही पण गंमत वाटते. तसा मीही अगदी सोवळा नाही पण कुठे काय कधी आणि किती आणि कुणाच्या संगतीत करावे याचे माझे काही संकेत आहेत.

पिण्याची सर्वात जास्त मजा कधी येते? जेव्हा ईतर पितात तेव्हा हास्य)
आता प्रत्येक वेळी रंगाच बेरंग करणारा एखादा निघतो खरा. चालायचेच.

सहमत आहे. असतात असे काही

3

सहमत आहे.

असतात असे काही नमुने..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुरेख लेखन

4

सुरेख लेखन हास्य

मस्त....

5

लेखन तर सुरेखच पण त्याबरोबर एव्हढे सुंदर फोटो म्हणजे दुग्धशर्करा योगच की. पुढील भाग वाचायला, पहायला उत्सुक आहे.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+१ सहमत. सुंदर लिखाण आणि

6

+१ सहमत. हास्य

सुंदर लिखाण आणि त्याचसोबत सुंदर फोटो हास्य

लवकर टाका पुढचा भाग. हास्य

हेच म्हणतो

7

अनेकदा सहमत एकदम...


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

पुढील भाग वाचायला, पहायला

8

पुढील भाग वाचायला, पहायला उत्सुक आहे, मी पण !

सुरेख फोटो.. व नेहमी प्रमाणेच

9

सुरेख फोटो.. व नेहमी प्रमाणेच सुंदर लेखन.

पुढील भागाची वाट पाहतो आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फोटो काहीच्या काही सुंदर.

10

फोटो काहीच्या काही सुंदर. लेखनही मस्त.

फोटो आणि लिखाण दोन्ही भारीच

11

फोटो आणि लिखाण दोन्ही भारीच आहेत. हास्य

छान लेखण. फोटो दिसत नाहीयेत.

12

छान लेखण. फोटो दिसत नाहीयेत. घरी जाऊन बघेन.


-पुण्याचे पेशवे

मस्त!!

13

मला पण जायचं आहे कैरो ला .. माहिती उपयोगी पडेल हास्य

सुरेख लेखन! आणि फोटोजबद्दल तर

14

सुरेख लेखन!
आणि फोटोजबद्दल तर काय बोलू... केवळ जबरा!! तपकिरी दृश्यात अचानक आलेल्या निळ्या रंगाचा तो फोटो खासच.. जतन करावा असा! वाह!! मस्तच!!!

अतिशय सुरेख फोटो आणि लेखनही

15

अतिशय सुरेख फोटो आणि लेखनही हास्य

उत्तम लिखाण आणि फटू तर लई

16

उत्तम लिखाण आणि फटू तर लई भारी...कैरो ला कधी अन कसे पोहोचता आहेत?

अवांतर: >> तो देखणा रस्ता नजर खिळवुन ठेवणारा होता. मात्र पुढच्याच क्षणी मनात विचार आला, की आपण अशा रस्त्याने जात असताना मोटारीतले इंधन संपले वा यंत्रात बिघाड झाला तर????
कन्या रास का आपली?

पन्द्या हुशार आहे

17

Big smile पन्द्या हुशार आहे

हा हा हा... पंड्या.. लै भारी

18

हा हा हा... पंड्या.. लै भारी रे wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त!!!

19

मस्त!!!

ग्रेट

20

हिरवळी संबंधी...

21

सर्वसाक्षीसाहेब,
माझ्या माहितीनुसार त्या गोलाकार हिरवळी ही शेतं असावी. त्यांना पाणी देणारी (तसेच इतर मशागत करणारी)यंत्रणा ही मध्याभागी केंद्रबिंदू ठेऊन गोलाकार फिरते म्हणून शेताचा आकार जरी चौकोनी असला तरी त्यातली लागवड मात्र गोलाकार केलेली दिसते.
मी इतरत्रही अशी शेतं पाहिली आहेत...

आपला,
पिवळा माळी

धन्यवाद पिडांमहाशय

22

आपला तर्क बरोबर वाटतो. असेच असेल.
पण काही वर्तुळात अमूक चतकोर कोरे का असावेत? की दोन वेगेळी उत्पादने घतली जात असावीत?
अशा पद्धतित चैरसातील वर्तुळ लागवडीखाली येते पण उरलेली जमीन वाया जाते. मग केंद्रसिंचन अपरिहार्य आहे का? ज्या अर्थी इतक्या ठिकाणी दिसली त्या अर्थी ही रुढ पद्धत असावी
आपण आवर्जुन माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

आपला स्नेहांकित

साक्षी

सॉलीड !! पुढील भागाच्या

23

सॉलीड !!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

अप्रतिम छायाचित्रे

24

अप्रतिम छायाचित्रे हास्य

प्रवासवर्णनाबद्दल काय बोलावे,खूप दिवसांनी इतकं सुंदर लेखन वाचायला मिळालं.

छायाचित्रे विमानाच्या

25

छायाचित्रे विमानाच्या खिडकीच्या काचेतुन घेतलेली वाटत नाहीयेत. अप्रतिम !!
वर्णनही आवडले!


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

जबरादस्त सर

26

जबरादस्त सर