मृत्यू आणि मी

0
0

कालच ऋषाचा मृत्यूवरचा लेख वाचला. आणि झटकन मन एकदम फार मागे गेले.
४-५ वर्षाचा असेन तेव्हा. सकाळीच सकाळी आमच्या बाबांचा कंपनीतमधला मित्र घरी आला. त्याने त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली. कसे काय गेले कितीवेळ झाला? वगैरे प्रश्न झाले. मग त्याने कोणाकोणाला निरोप दे ते बाबांना सांगितले व पुढचे निरोप द्यायला पुढे गेला. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते. मग बाबांनी हाफडे येईन असा निरोप एका दुसर्‍या मित्राबरोबर पाठवला व त्याला पक्याचे वडील वारले आहेत ते सर्वांना ऑफिसात सांग असे सांगितले. मग बाबा पुढची तयारी करण्यासाठी मित्राच्या घरी गेले. एव्हाना मी जागा झालो होतो. आईला विचारले "ते गेले म्हणजे कुठे गेले?"
आई: "बाप्पकडे"
मी: "मग बाबा कुठे गेले आहेत आत्ता?"
आई: "त्यांना पोचवायला"
मी: "कुठे पोचवायला?"
आई: "बाप्पाच्या घरी"
मी: "मग बाबांना माहीत्येय बाप्पाचे घर कुठे आहे ते?"
आई: "नाही रे. मधेच रस्त्यात सोडून येणार? मग ते आजोबा जातील पुढे"
मी: "मग बाप्पा कुठे राहतो"
आई: (आकाशाकडे बोट करून) "वर"
मी: "मग बाप्पाच्या घराला आपल्यासारखा जीना आहे का?"
आई: "हो"
मी: "मग तो दिसत का नाही आकाशात?"
आई: "पुण्यवान माणसांना दिसतो"
मी: "मग ते आजोबा बाप्पाकडे का गेले?"
आई: "त्यांना बोलावणं आलं बाप्पाचं म्हणून ते गेले"
मी: "मग बोलावणं कधी येतं बाप्पाचं?"
आई: "वेळ आली की येतं"
मी: "मला जाता येईल बाप्पाकडे?"
आई: "नाही, असं कोणालाही नाही जाता येत बाप्पाकडे?"
मी: "कां?"
आई: "मोठा झालास की कळेल. चल उठ दात घास"

आईने मला दुसर्‍या कामाला लावून विषय संपवला. पण प्रश्न मनात तसाच राहीला. हळू हळू आजूबाजूची जुनी खोडं पडत होती.आणि कोणना कोणतरी बाप्पाकडे गेले म्हणून बाबा त्यांना पोचवायला जात होते. पण प्रश्न कायम. मग हळूहळू मंदिरातली आजूबाजूची प्रवचनं ऐकू लागलो तसं हे कळलं की सगळेच मरतात केव्हा ना केव्हातरी. माझ्यासाठी हा धक्का होता.म्हणजे मी पण मरणार तर केव्हा ना केव्हातरी. २-३रीत असेन तेव्हा. फार भिती वाटायची. पण आमच्याघरी भागवतादी अनेक पुस्तके त्यांच्यातल्या कथा इ. होते; ते वाचायचो. मग त्यात परमेश्व्वर भक्ताच्या हाकेला कधीही धावून येतो फक्त प्रेमाने हाक मारावी लागते हे कळले. मग भिती कमी झाली. म्हणलं आला मृत्यू तर मारायची हाक देवाला. ती भिती कमी झाली. पण ते मरण तर अटळ आणि वेळ न सांगता येते, आता काय करायचे? आणि 'मन चिंती ते वैरीही न चिंती' या न्यायाप्रमाणे जवळचे कोणी म्हणजे आई, बाबा कोणी गेले तर काय करायचे? हि चिंता देखील मनास सतावायची.

तेव्हा पुण्यामधे रविवारी बरेच NDA कॅडेट फिरताना दिसायचे. त्यांचा रुबाब, कमावलेलं शरीर पाहून त्याक्षेत्राबद्दल फार आकर्षण वाटायचे. पण त्याततर कायम शीर तळहातावर घेऊन फिरावे लागते. ठिक आहे त्या रुबाबासाठि काहीही कुर्बान करु. मग मिलीटरीत जायचे म्हणून मी आणि माझे २-३ मित्र पिसाटल्यासारखे व्यायाम करू लागलो.

दरम्यानच्या काळात टिव्हीवर शनिवारी दुपारी असाच मनेका गांधींच्या संस्थेद्वार निर्मीत 'हेडस अ‍ॅण्ड टेल्स' हा कार्यक्रम लागायचा. तो पाहण्यात आला. त्यात प्राण्यांवर होणारे नृशंस अन्याय चित्रीत करून दाखवत असंत. तसेही लहानपणापासून घरच्या संस्कारांमुळे नॉनव्हेज खात नव्हतोच. त्यामुले मेलेले प्राणी पाहण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. पण त्या दिवशी मात्र टिव्हीवरचे दृष्य पाहून जीव हेलावून गेला. महाराष्ट्रातल्याच कोणत्यतरी देवीसमोर बळी देण्याचा विधी त्यात दाखवत होते. त्या खाटकाची सुरी सरसर त्या बोकडाच्या गळ्यावरून फिरत होती. त्या बोकडाच्या छाताडावर खाटकाने एक गुडघा दाबून ठेवला होता. त्याच्यावर रक्त उडून तो रक्ताने माखला होता. फसफस करून दूध उतू जावं आणि जमिनीवर वहावं तसं त्या बोकडाचं रक्त जमिनीवर वहात होतं. डोळ्याने ते दृष्य पाहवत नव्हतं पण टिव्ही बंद करण्याचाही धीर होत नव्हता तसाच बघत राहीलो. म्हटलं किती वेदना होत असतील बिचार्‍याला. मृत्यूनेच सोडवले असेल. बास्स त्यानंतर चहा पिताना, जेवताना खाताना तेच दृष्य डोळ्यासमोर यायचे. कसंतरीच व्हायचं. जेवण जात नसे २-३ दिवस. आई-बाबांना वाटे हा इतरवेळे नीट जेवणारा आता जेवत का नाही. मग ठरवलं डोळ्यासमोर आणायचंच नाही ते दृष्य. ते विचार मनात येण्याआधीच जेवण संपवोन उठायचं. ही योजना चांगली चाल्ली. पण ती ही पुढच्या आठवड्यापर्यंत. परत पुढच्या शनिवारी हेड्स अ‍ॅण्ड टेल्स बघितलं. या वेळेला तर गाभण मेंढीच्या पोटातले पिल्लू काढून त्या कोवळ्या जीवाची कातडी कमाविणारर्‍या खाटकाचे दृष्य दाखवित होते. पुन्हा तेच मागच्या वेळ सारखे. मग वडील मला डॉक्टरकडे घेऊन गेले.डॉक्टरांनि काहीही झाले नसल्याचा निर्वाळा दिला. मग डॉक्टरांच्या बहुतेक लक्षात आलं. त्यांनी मला विचारलं काही असं पाहीलस का जेवणात पडलेलं की ज्यामुळे जेवणाची किळ्स यावी. म्हटलं हो. मग सगळा वृत्तांत त्यांना कथन केला. त्यावर डॉक्टर म्हणाले की अशा गोष्टी मुद्दाम पाहू नकोस पण कधी पहावं लागलं तर मन मात्र खंबीर पाहीजे. अरे तू तर हे टीव्हीवर पाहीलस; प्रत्यक्ष पाहीलं असतंस तर काय झालं तसतं रे तुझं. आणि तुला मिलिट्रीत जायचंय ना? मग! तिथे डोळ्यासमोर प्रत्यक्ष मरणारा माणूस कसा पाहशील. खरोखरच धक्कादायक वाक्यं होती ती. मी मनात विचार करायला लागलो खरंच आहे. न जाणो उद्या आपल्यावर अशीच मरायची वेळ आली तर. कोणीतरी गळ्यावरून कराकर सुरी फिरवत आहे. स्स्स्स्स. किती वेदना. खरोखर मरणाने लवकर यावे म्हणून प्रार्थना करत असेन तेव्हा मी. पण माझ्या खरोखर समोर असे कोणाला कापले तर? मग मनात विचार आला की हे बघायला धैर्य जमा करायलाच पाहीजे.

दरम्यान आम्ही घर बदलले व उपनगरात रहायला आलो. शाळेच्या रस्त्यावर तेव्हाच्या अविकसित उपनगरातली म्हणजेच गावतली खाटकाची दुकानं होती. त्यातच एक अशरफी चिकन शॉप. या दुकानाशेजारीच शोपीस नावाचे शोभिवंत माशांचे(मत्स्यांचे) दुकान. याचे मालक एक वृद्ध होते. आम्हि कायम त्या दुकानासमोर उभे राहत असू. शोभेच्या मासोळ्या बघत. त्यां दुकानाशेजारीच अशरफीवाल्याचे कोंबड्यांचे पिंजरे होते. त्या दिवशी तो अशरफीवाला पिंजर्‍यातून काही कोंबड्या बाहेर काढत होता. म्हटलं बघूया कोंबडी प्रत्यक्ष कापताना कशी दिसते ते. मी सरसावून बघू लागलो. त्याने त्या कोंबड्यांना त्यांचे एक तंगडे धरून उचलून वरती ओट्यावर टाकत होता. मग त्याने एका लोट्यात गरम पाणी भरून घेतले. मग एक कोंबडी पकडली तिच्या तोंडात थोडे गरम पाणी टाकले तिच्या गळ्यावर सटकन एकदा चॉपर फिरवला व तिला शेदारच्या मोठ्या पिंपात टाकले. ती आतमधे विचित्र आवाजात ओरडत होती. त्यामागे दुसरी तिसरी. अशा सगळ्या १०-१२ कोंबड्या कापून आत मधे टाकून झाल्यावर आतून कोलाहल ऐकू येत होता. मग त्यातल्यात्यात थंडावलेली एक कोंबडी बाहेर काढली. तिचा पंजा पार ताणून लांबला होता. तिची पांढरी पिसे पार लाल झाली होती. पाहताना मला घाम फुटला पण मी निग्रहाने बघत राहीलो. कदाचित माझ्यापुढे असा एखादा माझा मित्र वगैरे मरून पडला तर पेटून उठणं वगैरे दूर पण कमीत कमी मी घेरी येऊन पडणार नाही हे तरी बघितलं पाहीजे. पण जो मेला त्याला पाहून मी पेटून उठेन? जो आप्त स्वकीय असा पडला असेल त्याचा माझ्यासमोर अशा प्रकारे मरण्याचा धक्का मी पचवू शकेन? हैराण झालो. म्हणलं कदाचित त्या रक्त, मांसाच्या घृणेवर विजय मी मिळवेनही पण त्या आप्ताच्या मृत्यूवर म्हणजे त्याच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर विजय मिळवू शकेन?
मग सुरू झाली प्रॅक्टिस. रोज त्या अशरफीमधे जाऊन कोंबड्यांची कत्तल बघणे किंवा शेजारच्या मटणाच्या दुकानासमोर थांबून सकाळी बरोबर ८ला कापला जाणारा बोकड पाहणे सुरु केले. नंतर ते पहायची सवय झाल्यावर प्राणी मरताना पाहून त्याच्या रक्त मांसाची घृणा गेली पण त्या यातनेचे काय हा प्रश्न आ वासून तसाच समोर उभा.

त्यामुळेच कधी मला नंतर मोठा झाल्यावरही नॉनव्हेज खावेसे वाटले नाही. रक्तमांसाची मला घृणा आता राहीली नाही पण प्रश्न हा पडतो त्या प्राण्याचा जसा तडफडून जीव गेला तसा माझा गेला तर तो सहन करायची माझी तयारी आहे का? केवळ दुसर्‍याला माझे मांस खाण्यासाठी हवे असेल तर ते देण्यासाठी निस्पृहपणे असे मरण स्वीकारू शकतो का? उत्तर आलं 'नाही'. म्हणूनच मी अजूनही मांशासन नाही करीत. कदाचित माझी विचारसरणी असेलही चुकीची असेल; मांस निर्माण करण्यासाठीच ते पशू निर्माण केले, वाढवले जातात वगैरे वगैरे सगळं ठीक.पण माझ्यासाठि तरी माझा विचार मला बरोबर वाटतो. कारण मला माहीत आहे कधीही त्या प्रश्नाचें उत्तर 'होय' असे देण्याइतकं माझं मन मोठं होणार नाहीये.

आमचे एक जवळचे नातेवाईक आजोबा. जे मोठे कर्तृत्ववान. त्यांनी पुण्यात येऊन मंगल कार्यालय सुरु केले. पुढे त्यांच्या मुलांना त्याच व्यवसायात आणून रुजवले. व मुलांनीही आपले व्यावसायिक कर्तृत्व स्वतंत्रपणे सिद्ध केले. ते ८०व्या वर्षापर्यंत अगदी ठणठणीत होते. प्रकृती उत्तम. आयुष्यभर पूर्णतः निर्व्यसनी. पण अचानकच त्यांना पोटात दुखू लागल्याचं निमित्त झालं आणि कर्करोगाचं निदान झालं. ३री स्टेज. त्यापुढे काही होणे शक्य नाही, बस. त्यांच्या इच्छेनुसार मुलांनी त्यांना अंतकाळासाठी कणकवलीच्या घरात नेले. तिकडे कर्करोगाने रौद्ररूप धारण केले होते. जसे एखाद्या पिसवीत चेंडू भरावेत तसे त्यांच्या पोटतले ट्यूमर वरून दिसू लागल होते. आम्ही पहायला गेलो तेव्हा ते वेदनांनी कण्हत होते जोरात. पोटात अन्न कणभरही जात नसे. Sad त्यामुळे अंगात त्राण नाही. नंतर नंतर कण्हणे पण क्षीण झाले. कर्करोगाचे निदान झाल्यापासून ६८व्या दिवशी ते गेले. मधले ६८ दिवस कसे काढले असतील त्यांनी देव जाणे. त्यांची वेदना पाहून पुन्हा एकदा माझे मन ढवळून निघाले. अशी वेळ माझ्यावर आली तर. पण या वेळेला असा विचार केला की या गोष्टी आपल्या हातात थोडीच आहेत. आलीच वेळ तर करु सहन नाहीतर कण्हू जोरजोरात त्या आजोंबासारखे. मग मन स्थिरस्थावर झाले जरा.

दरम्यानच पेपरात वरदानंद भारती यांच्या समाधीची बातमी आली. त्यांनी विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून पद्मासनात समाधी घेतली. बर्‍याच वॄत्तपत्रातहि ही बातमी आली होती. त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना आधी बोलावून घेतले होते व समाधिविषयी सूचितही केले होते. मग मनात विचार आला असे पाहीजे आपले मरण आपल्याला पाहीजे तसे आपण बोलावू तेव्हा. कदाचित हेच मुख्य कारण असेल माझ्या अध्यात्मप्रेमामागे. केवळ मृत्यूचे भय? नाही मृत्यूवर विजय. अगदी नचिकेत्यासारखे यश नाही मिळणार पण म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे? हास्य

झटाझट

झटपट वाच्लं. पुन्हा सवडीने वाचेन. लेखन दमदारच...
पुन्हा वाचलं. आधी बरंच काही लिहूया असं वाटत होतं. नंतर मात्र नाही. मृत्यू या एकाच नव्हे तर यातना, वेदना अशा गोष्टींभोवती भिरकटत बसलो आहे.
याचाच अर्थ लेखन दमदार. फार खोलात जाऊन काही सांगत नाही, पण विचार करायला लावतं हे निश्चित.
अवलिया काय लिहिणार आहेत त्याची प्रतीक्षा करतोय. कारण नचिकेताचा उल्लेख या लेखनात आला आहे.

उत्तम

म्रुत्युबद्दल कधी एवढा खोलात जाऊन विचार नाही केला.
पण लेख मात्र उत्तम झालाय

वाचायला घेतलं आणि वाचतच गेलो.

वाचायला घेतलं आणि वाचतच गेलो. ताकद आहे लिखाणात पुपे!! मानला तुला!!

मीही लहानपणी एकदा कुतूहलापोटी ईदच्या दिवशी मुस्लिम वस्तीत जाऊन बोकड कापताना चोरून (म्हणजे घरच्यांना न सांगता) पाहिला होता. घरी येऊन सारखं तेच तेच डोळ्यांसमोर दिसून उलटी झाली होती. आई ओरडू लागली होती कशाला जायचं तिकडे वगैरे म्हणत.. पण बाबांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. मांसाशन करत नव्हतोच. ते पाहिल्यापासून तर कधीच इच्छाही झाली नाही.

लेख बाकी विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.

मस्त

दमदार लेखन.

बाकी रणजित देसाई यांच्या कादंबरीतल एक वाक्य आठवल " मृत्युचं भय बाळगणार्‍याला समृध्द जीवन जगता येत नाही....."

मस्त रे पुप्या, वाचताना

मस्त रे पुप्या,
वाचताना थांबायची ईच्छाच झाली नाही, एका दमात वाचुन काढला. हास्य

यालाच म्हणतात का स्वांतसुखाय?

!!

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सुन्न झालं डोकं लेख

Sad

सुन्न झालं डोकं लेख वाचुन......

सुरेख लेख रे पुप्या. >>असेल

सुरेख लेख रे पुप्या.

>>असेल माझ्या अध्यात्मप्रेमामागे. केवळ मृत्यूचे भय? नाही मृत्यूवर विजय. अगदी नचिकेत्यासारखे यश नाही मिळणार पण म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे?

हास्य

१००% सहमत.

आज तुझा लेख वाचल्यावर पहिल्यांदा असे वाटले की मांसाहार त्यागावा.. असो.
विचार नक्की झाला की सांगेनच.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

विचार....!

आपल्या हिन्दु संस्कृतीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असे आहे की एखादा संस्कार आपणास जरी आवडला नसेल तर ज्यांना तो आवडतो किंवा जे तो पाळतात त्यांच्याविषयी अभद्र बोलायचे नाही, लिहायचे नाही.... नेमकी हीच बाब मला आपल्या या भावनिक लेखात प्रकर्षाने आढळली जी निश्चितच अनुकरणीय आहे. जगात सर्वत्र दोनच प्रकारचे जीवन जगणारे लोक आहेत ~ एक शाकाहारी व दुसरे अर्थात मांसाहारी. वर्ण, धर्म, शिकवण, संस्कृतीचा उत्कर्ष, र्‍हास, इतिहास, जडणघडण आदी बाबी या बर्‍याचदा तुमच्या बुध्दीशी निगडीत असतात. मांसाहारी मोघल आणि ब्रिटीश या दोघांनी मिळून जवळजवळ ५०० वर्षे निरंकुश शाकाहारी हिंदुंच्यावर राज्य केले म्हणून मांसाहार हा श्रेष्ठ आणि शाकाहार हा कनिष्ट असे मानणे बालिशपणा ठरेल. "आम्हाला वाहते रक्त पाहवत नाही.... त्या प्राण्याच्या वेदना असह्य होतात....मी दिवसभर नीटपणे जेऊ शकलो नाही..." असे विचार हे दुबळेपणाचे नव्हेत तर आपणाला मिळालेल्या शिकवणीचे प्रतिसाद आहेत, ते तुमच्यासाठी आदर्शवत ठरू शकतात.

केवळ मृत्यूचे भय? नाही मृत्यूवर विजय..... "मी मृत्युला भीत नाही....." यात मला तरी कुठले शौर्याचे लक्षण दिसत नाही. ती एक मनाला घातलेली समजुत आहे. अमुक एक भीत नाही म्हणून तो सैन्यात भरती झाला आणि तमुक एक भितो म्हणून झेड.पी.त कारकुन झाला असे मानने हास्यास्पद आहे. अंगावर कुत्रे आले म्हणून टमरेल टाकून शेतातुन पळून आलेला एक सैनिक मला माहित आहे, तर पंचगंगेच्या पुरात अडकलेल्या बहीणभावाला दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी धडाडीने वाहत्या लालभडक पाण्यात उडी घेणारा एस.टी. चा कंडक्टरदेखील मी पाहिलेला आहे. मृत्युचे भय किंवा त्यावर विजय या साक्षेपी कल्पना आहेत, ज्या केवळ पुस्तकातच शोभतात.

"कर्करोगाचे निदान झाल्यापासून ६८व्या दिवशी ते गेले. मधले ६८ दिवस कसे काढले असतील त्यांनी देव जाणे...." ६८ दिवसात आजोबांना मृत्युचे भय वाटत नसेल? निदान एकदा तरी त्यांना असे वाटले नसेल का की, जरी ३री अवस्था असली तरीही मी यातुन वाचेन? ६८ दिवसांचा हाच लेखाजोखा असेल. मृत्युवर विजय ही देखील आपल्या अतिसुशिक्षित मनाचा एक लोभसवाणा खेळ आहे. साधे आमटीत मीठ कमी पडले तरी करणारीवर (आई, पत्नी, बहीण वा अन्य कुणी...) खेकसणारी आपली जमात... कुठला विजय आणि कसला पराक्रम !

"मग मनात विचार आला....असे पाहीजे आपले मरण आपल्याला पाहीजे तसे आपण बोलावू तेव्हा.....

असे झाले किंवा होणार असेल तर मानवी समाजात खर्‍या अर्थाने क्रांतीची सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.

एक वैचारीक लेख वाचण्याची संधी दिली तीबद्दल आभार.



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

मस्त लेखन... सवडीने विस्तृत

मस्त लेखन... सवडीने विस्तृत लिहितो

लेखन फारच सुंदर! माझ्या त्या

लेखन फारच सुंदर! माझ्या त्या लेखाने जर इतकं छान आणि कसदार लेखन वाचायला मिळणार असेल तर अजून लिहिन म्हणतो wink

बाकी लिहिलेला पहिला प्रसंग नुकताच एक जर्मन (ऑस्ट्रीयात घडणारा) चित्रपट "द व्हाईट रिबन" पाहिला त्यातील मुलाचा आणि त्याच्या आईचा ड्वायलागही असाच रोचक होता. भारतात जसा हा विषय टाळला जातो तसा त्या संवादात तो टाळलेला नव्हता. तो काहिसा असा होता (स्मरणातून लिहितोय एक्झॅक्ट नाहि आठवत)
..... (सुरवात साधारण वरील प्रमाणे)
:
:
"मग कोण कोण मरतं?"
"सगळे कधी ना कधी मरतातच"
"मग तु पण मरणार आहेस?"
"हो मी पण"
"आणि मी?"
"हो तूपण .. पण त्याला खूप वेळ आहे"
"आपण मरायचं नसेल तर काय करायचं?"
"सगळे कधी ना कधी मरतातच"
"पण तु माझ्या आधी मरणार का नंतर?"
"बहुतेक आधी"
मुलगा रागवून निघून जातो
तो मुलगा इतका गोड होता आणि एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर असे प्रश्न विचारत होता की डोळ्यात पाणी आलं



-ऋ

भन्नाट....

आत्ता गडबडीत आहे. सविस्तर प्रतिसाद द्यायचा आहेच. तो नंतर देईन.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

उच्च लेखन पुपे....सविस्तर

उच्च लेखन पुपे....सविस्तर प्रतिसाद नंतर देतो...

चांगला विषय

छान लेख. ह्या निमित्ताने मरणाचे नियोजन ह्या महत्वाच्या विषयावर चांगले विचार यावेत.

प्रकाशकाकांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

पुपे छान लिहीले आहे हो.

पुपे छान लिहीले आहे हो. कसदार!




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख खुप छान जमला.

लेख खुपच छान जमला.

वरदानंद भारती म्हणजे "अप्पा" च ना ? आमचे गुरु आहेत ते. दर २ महिन्याला आम्ही गोरठ्याला जात असतो.
अप्पांची आठवण झाली... खुप छान वाटलं.

रोज जायचा यायचा रस्ता सेनापती

रोज जायचा यायचा रस्ता सेनापती बापट रोड ..म्हसोबा गेट वरून ...साधारण गटारी अमावस्येच्या आसपास इतकी लोकं रांग लाउन शेळ्या-मेंढया बळी द्यायला उभे असायचे...पहिल्यांदा काही कळल नाही पण नंतर ...पोलिस चौकी समोरच आहे,पोलिस नुसते पहात असायचे, मी एकदा जाउन विचारायचा प्रयत्नही केला होता की हे चाललय ते कायदेशीर आहे का ( शहराच्या मध्यवर्ती भागात सार्वजनिक जागेत बळी देणं)
उत्तर मिळाल नाही..या शेळ्या-मेंढ्यांना अगदी शेवट्पर्यंत लोकं कुंकू, हार वहात असतात्....कदाचित त्या शेळ्यांना मृत्यू पुढ्यांत ठेपलेला कळतही असेल...
मुंबै-पुणे रस्त्यावर तारा-हाइट्स च्या अगदी नजिक एक छोटं देवीच देउळ आहे ...ते फारस इतर वेळेस लक्षात ही येत नाही पण एका विशिष्ट महिन्यात प्रचंड गर्दीन लोकं शेळ्या मेंढ्या घेउन उभे असतात्...काप्णार्‍या माणसाशी पैशावरून चाललेली घासाघीस ऐकली आहे मी, तिथेही एक पोलीस बसलेला असतो..तो फक्त रांग ठीकठाक करत असतो...त्या शेळ्या रस्त्यावरून पहाताना अंगावर काटा येतो..

स्टील प्लांट मध्ये काम करताना एक कामगार भट्टीत पडला ( माझ्या समोर नाही ), काहीही हातात लागणं शक्यच नव्हतं..रोज पहाण्यातला माणूस फक्त काही क्षणांत कार्बन / कॅल्शिअम झाला...



पुष्करिणी