आज पुन्हा मरणास पाहिले

0
0

मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.

असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे. याच बरोबर मृत्यूमुळे घडणार्‍या घटनांचा मागोवा घेण्याबरोबरच थेट मृत्यूला भिडणारे काहि चित्रपट आहे. असेही अनेक चित्रपट आहेत मात्र इथे मी लिहिणार आहे सध्या मी पाहिलेल्या चित्रपटांबद्दल. प्रत्येक चित्रपटाने मृत्यूकडे केवळ वेगवेगळ्या तर्‍हेने पाहिलं नसून त्यावर स्वतःचं असं भाष्य केलं आहे.

पहिला चित्रपट आहे आपला मराठ्मोळा "सुखांत". संजय सूरकरने काढलेला हा चित्रपट पहाणे बरेच दिवस बाकी होते. मात्र बघितल्यावर विषय डोक्यातून जाईना

चित्रपट आहे एका अंथरुणाला खिळलेल्या श्रीमती सीता गुंजे (ज्योती चांदेकर) ह्या स्त्रीचा आणि तिच्यावर नितांत प्रेम करणार्‍या तिच्या वकील मुलाचा (अतुल कुलकर्णी), त्यांच्यातील नात्याचा आणि मुख्य म्हणजे मृत्यूचा. एका असाध्य आजाराने लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार सीताबाई गुंजे मागतात आणि ही मागणी मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावतात.

अतूल कुलकर्णी आपल्याच आईने केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात लढतो. त्या निकालाचे काय होते यासाठी तुम्ही चित्रपट बघाच. पण त्याहून महत्त्वाचे आहे सूरकरांनी विचार करायला लावणं. समाजात वावरताना काही व्यक्तींकडे बघितलं की वाटतं की यांना जिवंत का म्हणावं? फक्त श्वास चालु आहे म्हणून? मरणयातना भोगून त्यांना जगायला लावण्यापेक्षा त्यांना दयामरण का देऊ नये? चित्रपट छान आहेच पण त्याहीपेक्षा त्याने डोक्याचा पार भूगा करेपर्यंत विचार करण्यास भाग पाडले हे विषेश

sukhant Dead man Walking

दुसरा चित्रपट आहे "डेड मॅन वॉकिंग". शॉन पेनचा अप्रतीम अभिनय आणि अत्यंत सशक्त कथा. शॉन पेन ला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. त्यांच्या मनात आहे तो फक्त द्वेष. अश्यावेळी तो एका मिशनरी ननला पत्र लिहून बोलावतो. दोघांमधली ओळख वाढत जाते. मी खून केलेला नाहि असे ह्या गुन्हेगाराचे म्हणणे असते. एक शांत नन व एक खून व बलात्काराच्या आरोपांबद्द्ल मृत्यूदंड झालेला गुन्हेगार यांच्यातले संवाद अतिशय रोचक आहेत.

शॉनने खरंच गुन्हा केला असतो का? त्याला मृत्यूदंड देणे बरोबर असते का? ह्या गोष्टी चांगल्या फूलवल्या आहेतच पण त्याच बरोबर प्रेक्षक विचार करू लागतो की मुळात मृत्यूदंड देणेच गरजेचे आहे का? मृत्यूदंड हा "इर्रिवर्सिबल" दंड झाला. जर गुन्हेगाराने हा गुन्हा केलाच नव्हता असे कालांतराने सिद्ध झाले तर हा दंड म्हणजे सरळ सरळ गुन्हेगार नसणार्‍याचा खून झाला. यात शॉनचे एक वाक्य फारच मस्त आहे "याक्षणी इतके नक्की सांगु शकतो की एखाद्याचा जीव घेणे अतिशय वाईट गोष्ट आहे. मग तो जीव मी घेतला सो, तुम्ही घेतला असो किंवा तुमच्या सरकारने". मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लावणारा हा चित्रपट. चुकवू नये असा.

अजून एक चित्रपट आहे, "टाईम टू किल". एखाद्या व्यक्तीने विषिष्ट परिस्थितीत केलेला खून हा खून समजला जात नाहि. मात्र या चित्रपटात तो खून न्यायालयातच घडतो. एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीच्या ९ वर्षाच्या मूलीवर दोन गोरे नराधम बलात्कार करतात. यामुळे पेटलेला हा नायक, त्यांना कोर्टात घेऊन जात असताना दोघांना मारून टाकतो. की कथा त्यानंतरच्या न्यायालयिन लढाईवर आहे.

संपूर्ण जुन्यावळणाचे गोरे ज्यूरी ह्या कृष्णवर्णीय व्यक्तीला खूनाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देतात का? मृत्यूदंड देताना केवळ गुन्हा बघितला जातो की गुन्हेगाराचा वंश, रंग वगैरेही लक्षात हेतल्या जातात? ह्यावर चित्रपट सुंदर भाष्य करतो.
A time to kill Taste of cherries

याव्यतिरिक्त काल एक इराणी चित्रपट पाहिला "टेस्ट ऑफ चेरीज". हा ही मॄत्यूला थेट भेटायला आतूर असलेला चित्रपट. चित्रपट सूरू होतो एका मध्यामवतीन व्यक्तीपासून. तो तेहरानमधे एका रोजगार-नाक्यावर कोणी 'लायक' व्यक्ती शोधतो आहे. पण त्याला हवी तशी व्यक्ती न दिसल्याने तो शहराबाहेरच्या निर्जन विभागात जातो. इथे आधी कळतच नाहि की असं कसलं काम आहे की तो माणूस शोधतोय. पुढे तो वेगवेगळ्या लोकांना काम करणार का विचारतो. त्यासाठी प्रचंडमोठा मोबदला देण्याचंही कबूल करतो. मात्र काय काम ते सांगत नाहि.

त्यामुळे अगदी कचराउचलणारा, पडक्या गराजचा मालकही त्याचा नकार देतो. पुढे तो एका तरूण सैनिकाला लिफ्ट देतो. त्याला कामाची थोडी कल्पना देतो तर तो सैनिक घाबरून गाडीतून उडी टाकून पळून जातो. हळुहळू प्रेक्षकाला उलगडु लागते की काम काय आहे. काम असे असते, की त्या रात्री ह्या व्यक्तीने आत्महत्या करायची ठरवले असते, आणि जर तो मेला तर त्याला जमिनीत गाडण्याची मदत त्याला हवी असते.

सबंध चित्रपटात त्याला का मरायचे आहे हे कळत नाहि. मात्र त्याची अत्महत्येच्या आधीची घालमेल छोट्या छोट्या प्रसंगांतून छन उलगडलि आहे. पुढे त्याला काय अनुभव येतात? कोणी मदत करते का? वगैरे प्रश्न कथेवरोबर हळूवार पणे उलगडत जातात. जरा चित्रपट स्लो आहे. शिवाय तो कोणत्याही शेवटाला पोहोचण्या आधीच संपतो. पण तरीही मृत्यूला भेटायला उत्सूक असणार्‍या ह्या व्यक्तीचा एक दिवस आपल्याला खूप विचार करायला मात्र लावतो.

या सगळ्या चित्रपटांतून मृत्यू वेगवेगळ्या रुपात भेटला. त्याची क्रुरता, त्याची ओढ, त्याची अपरिहार्यता, त्याची आसक्ती, त्याची भिती, त्याचा ध्यास, त्याचा माणसाअ माणसाला दिसणारा वेगळा रंग उलगडत गेला. मृत्यूला वेगवेगळ्या रंगांत, ढंगांत बघताना जाणवतो तो म्हणए मृत्यूचा थंडपणा. मृत्यूच्या आधी वा नंतर काहिहि घडो आल्यावेली तो येतो आणि थंडपणे दिलेले काम करतो

मृत्यूवरच्या चित्रपटांचा परिचय इथेच संपवणार होतो. पण काहितरी राहिल्यासारखे वाटत होते. ह्या मृत्यूने डोक्यात आलेलं विचारांचं वादळ केवळ गद्यात बांधता आलं नाहि. त्यामुळे हा लेख लिहिताना काहि ओळी सुचल्या त्याही देतो:

आज पुन्हा मरणास पाहिले
मृत्यूच्या जगण्यास पाहिले

त्या वृद्धेच्या मिटत्या डोळी
त्या अनवट नेमक्या अवेळी
डोळ्यांमधले कृतार्थ अश्रू
गंगाजल ओठांस लाविले||

फासावरचा ओघळ मोठा
प्रत्येकाच्या डोळी होता
डोळ्यांस झेपत नसताही
हिय्या करूनी त्यास पाहिले||

वेळ संपली नराधमाची
चक्काचुर होळी स्वप्नांची
किंकाळी फुटण्याच्या आधी
त्यास नळीच्या आत पाहिले||

झोपेच्या गोळ्यांची घुंदी
कधी उतरली नाहि त्याची
अन स्वप्नांच्या गावामध्ये
त्यास एकदा सोडून पाहिले||

दूर्धरातला दूर्धर रोगी
मृत्यूशय्येवरचा योगी
त्याच्याओठी हास्य पाहूनी
मृत्यूचे मी मरण पाहिले||

अतिशय उत्तम लिहले आहेस यार..

1

अतिशय उत्तम लिहले आहेस यार.. !

हास्य

कविता तर अप्रतिम !

सर्व चित्रपट पहायचे आहेत... आजच लिस्ट मध्ये टाकतो... पाहण्याच्या हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुरेख

2

मृत्यूविषयी आणखी एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे बर्गमनचा 'सेवन्थ सील', प्रत्यक्ष मृत्यूशी बुद्धीबळ खेळणार्‍या सरदाराचा. एक वेगळाच अनुभव. त्याचबरोबर बर्गमनचाच वाईल्ड स्ट्रॉबेरिज ज्यात मृत्युची चाहूल लागलेला डॉ. बोर्ग, आपल्या आयुष्याचा लेखाजोखा घेत असणारा.

वाईल्ड स्ट्रॉबेरीज काहि

3

वाईल्ड स्ट्रॉबेरीज काहि वर्षांपूर्वी पाहिला आहे, कथा नीट स्मरत नसली तरी आवडल्याचे आठवते. मात्र सेवन्थ सील पाहिलेला नाहि. कल्पना रोचक वाटत आहे. आजच डाऊनलोड करायला लावतो


-ऋ

र्‍हुशिकेश समजा आमाला असे

4

र्‍हुशिकेश समजा आमाला असे पिच्चर पघायचे आसतीन तर मंग काय कराव लागन?


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तुमास्नी सरकारी लायनीपरमानं

5

तुमास्नी सरकारी मंजे कायदेशीर लायनीपरमानं जायचं असेल तर मला नै माहित
मी तर टोरेंट वापरतो आनि एका रातीत पिच्चर डाऊनलोड हास्य


-ऋ

६४कबपस

6

मप्ल्याक ६४ कबपस कणीक्षन हाय . म्हंजे ९ रात्रीच लागायच्या. डीवीडी अस्ती त मंग पघितली अस्ती


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शिंपल

7

र्‍हुशिकेश समजा आमाला असे पिच्चर पघायचे आसतीन तर मंग काय कराव लागन?
आमाला इचरा ना. आमी ज्या दोन पिच्चरबद्दल लिवलंय त्ये हैत आमच्याकडं. पघायचेत आसत्यान तं द्येतो.

पकाकाका, द सेवन्थ सील इथं

8

पकाकाका, द सेवन्थ सील इथं बघा! भारतात ही लिंक चालेल का नाही, ६४च्या स्पीडवर कशी चालेल कल्पना नाही. पण ट्राय करायला हरकत नाही.

(मी भारतात ऑनलाईन पिच्चर बघितले नाहीत कधी, त्यामुळे मला कल्पना नाही.)

>>(मी भारतात ऑनलाईन पिच्चर

9

>>(मी भारतात ऑनलाईन पिच्चर बघितले नाहीत कधी, त्यामुळे मला कल्पना नाही.)

बघू पण नयेत... Sad

काय प्रॉब्लम काय आहे काय कळत नाही.. दिल्लीला असताना टी-१ च्या लाईनवर देखील चित्रपट सरळ दिसत नव्हता... अटकत अटकत दिसायचा व आता टाटाचे ३.१ एम्बीचे ब्रॉडबॅन्ड असताना पण तसेच Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

त्यामुळे हा लेख लिहिताना काहि

10

त्यामुळे हा लेख लिहिताना काहि ओळी सुचल्या त्याही देतो:
स्फुरल्या म्हणावे.

दूर्धरातला दूर्धर रोगी
मृत्यूशय्येवरचा योगी
त्याच्याओठी हास्य पाहूनी
मृत्यूचे मी मरण पाहिले||

विशेष आवडल्या


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

काही तरी इंटरेस्टिंग आहे हे

11

काही तरी इंटरेस्टिंग आहे हे wink

पहा पाहू..... मल्लिकाला नका हो पाहू... स्टोरीचा अंदाज घेता येतो का पहा Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चार चित्रपट....

12

अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित विश्लेषण असलेला लेख. या चार चित्रपटापैकी "सुखांत" हा मराठी चित्रपट सोडल्यास सर्व चित्रपट मी पाहिलेले आहेत. शॉन पेन हा तर अभिनयाचे दोन वेळा ऑस्कर मिळविलेला कलाकार. किंबहुना मानवी मनाची चाललेली घालमेल (प्रामुख्याने जगणे आणि मरणे या दोन बाबीशी निगडीत....) दाखविणाऱ्या अनेक कथानकाशी त्याचे नाव खूप निगडीत आहे. "Dead Man Walking" या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा उल्लेख आपल्या लेखात येणे फार गरजेचे होते. कारण तो आहे "टिम रॉबिन्स".... हा आणि "डेड मन" ची नायिका "सारा सारांडन" पती-पत्नी असून या कुटुंबाचा शॉन पेन अविभाज्य घटक आहे. "मृत्यु"चेच कथानक असलेले व या दोघांनी अभिनित केलेला "मिस्टिक रिव्हर" असाच एक दर्जेदार चित्रपट, ज्यासाठी पेन आणि रॉबिन्स या दोघानाही ऑस्कर्स मिळाली. टिम हा देखील एक फार संवेदनशील अभिनेता (आपल्याकडील संजीवकुमार धर्तीवर...) असून त्याने आपल्या अभिनयाने "शॉशंक रिडेम्प्शन" अविस्मरणीय केला आहे.

"मृत्युदंड" असावा कि नसावा या कथानकावर आपल्याकडेदेखील बी. आर. चोप्रा यांचा "कानून" हा गीतविरहीत हिंदी चित्रपट खूप गौरविला गेला होता. दुर्दैवाने मला हा कलात्मक चित्रपट पाहायला अजून मिळालेला नाही.... मात्र यावर वाचले आहे भरपूर.

"टेस्ट ऑफ चेरीज".... हा चित्रपट मला अगदी अनपेक्षीतपणे टाटा स्काय डिशवर "वर्ल्ड मूव्हीज" या चॅनेलवर पाहायला मिळाला. लेखात उल्लेख केलेल्या बाबीत फक्त एकच भर घालतो ~~ या चित्रपटाचे चित्रीकरण. निव्वळ "सुमो" सारख्या गाडीतुन इकडेतिकडे प्रवास असे विचित्र कथानक असुनही फोटोग्राफीमुळे कुठेही कंटाळा येत नाही. सबटायटलची अजिबात आवश्यकता नसलेला हा चित्रपट सर्वांनी जरूर अनुभवावा.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

मिस्टिक रिव्हर फारच छान

13

मिस्टिक रिव्हर फारच छान चित्रपट.. एक बालपणातील घटना तीन मित्रांचे आयुष्य कायमचे बदलते.. इतके की ते त्यातील एकाचा अंत होऊनच कथा संपते.

या लेखातच मी मिस्टिक रिव्हर बद्दलही लिहिणार होतो.. पण वाटले ४ म्हणजे खूप झाले हास्य


-ऋ

मिस्टिक रिव्हर....

14

"....इतके की ते त्यातील एकाचा अंत होऊनच कथा संपते....."

होय... आणि त्यातही वाईट म्हणजे ज्याचा मृत्यु होतो तो पूर्णतः निर्दोष असतो, इतकेच नव्हे तर लहान असताना मोटारीत दोन धटींगणांनी त्याच्यावर केलेल्या लैंगीक अत्याचारामुळे आयुष्यभर ती वेदना उरी बाळगुनच तो आयुष्य जगतो व त्यातच मित्राकडून मारला जातो हे त्याहुनी अधिक वाईट. पत्नीची साथ नाही, शेजार्‍यांची नाही, समाजात दु:स्वप्नांसह जगणे.... यावर कडी म्हणजे ज्या मित्राने समजून घेतले पाहिजे तोच मित्र आपल्या मुलीच्या हत्येचा जिम्मेदार म्हणून याच्याकडेच पाह्तो. खरोखरी "मिस्टिक रिव्हर...". टिम रॉबिन्सने साकार केलेले हे पात्र मला तर शॉन पेनपेक्षा जास्त भावले.


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

"टाईम टू किल"

15

"टाईम टू किल" अप्रतिम आहे .. बाकी पण उत्तमच

खूप छान लिहिलेस ऋ. सुखांतचीही

16

खूप छान लिहिलेस ऋ. सुखांतचीही डीव्हीडी नाही का? Sad

छान लिहिले आहेस...

17

छान लिहिले आहेस...

मस्तंच रे ऋषा. छान लिहीले

18

मस्तंच रे ऋषा. छान लिहीले आहेस.
मला लहानपणापासून मरणाची भिती फार वाटायची. फार म्हणजे फार. मग "मन चिंती ते वैरीही न चिंती" अशा पद्धतीने मनात वाईट विचार येऊ लागत. मग जवळचे कोणी गेले तर त्यांच्या शिवाय मी कसा राहीन असे विचारही मनात येत. त्यानंतर एकदा हेड्स अ‍ॅण्ड टेल्स हा टीव्हीवरील कार्यक्रम पाहीला ६-७वीत असेन तेव्हा. त्यात कापले जाणारे बकरे, त्यांच्या मानेवरून सरसर फिरणारी सुरी याची विषेश घृणा वाटे मग २-२ दिवस जेवण जात नसे. घरच्यांना वाटायचे की काही पोटाचा विकार आहे म्हणून जेवण जात नाही की काय. मला मिलीटरीत जायची फार इच्छा होती. काही कारणामुळे नाही पूर्ण झाली ती पण तेव्हा असंच वाटायचं मी साला मरणारा प्राणी नाही पाहू शकत मग माणूस कसा पाहीन? मग पुढे म्हणजे ८वीत असताना थोडे क्रूर व्हायचे ठरवले. मग कॉलनीच्या मागच्या झोपडपट्टीतल्या चिकनच्या दुकानावर जाऊन तिथली कोंबड्यांची कत्तल अनिमिष डोळ्यांनी आणि थंड डोक्याने पाहू लागलो. सुरवातीला काही दिवस त्रास होई पण नंतर सवय झाली. मग हळूहळू बकरे वगैरे कापताना तिथे जाऊन उभा रहायचो. त्या असहाय्य प्राण्याची तडफड पाहून वाटायचं या प्राण्याचं मुंडकं खाटकन उडवून का नाही मारत त्याला. मारून खायचं तर खा ना पण मरताना नरक यातना तरी देऊ नका. पण पुढे जाऊन मन घट्ट झालं. ३-४ वर्षांपूर्वी हायवेवर अ‍ॅक्सिडँट पाहीला. जागीच गेला होता मोटारसायकलवाला. पण या सगळ्या जमविलेल्या धैर्यामुळे त्या छिन्नविछिन्न झालेल्या देहासमोर उभे राहून बाकीच्या वाहनांना बाजूने जा असे सांगू शकलो.
असा विचारही येतो मनात की माझं असं झालं तर? पण तसे झाले तर ते भोगायला मी जिवंत थोडीच असणार आहे. साला देह नश्वर आहेच तर त्या मरणाची भिती कशाला बाळगा.
पण एक मात्र नक्की या मृत्यू नावाच्या विषयानं मला फार फार पिडलं होतं एके काळी.


-पुण्याचे पेशवे

बापरे! त्या खाटीकखान्याजवळ

19

बापरे! त्या खाटीकखान्याजवळ उभं रहायचं म्हणजे प्रचंड धैर्य हवं.. सलाम तुला!!!!

बाकी मला स्वतःला स्वतःच्या मृत्यूची फार भीती अशी नसावी (म्हणजे आतापर्यंतच्या ट्रेकिंगवगैरेच्या वेळी जीवावर बेतलेल्या प्रसंगांवरून असा अंदाज आहे). पण इतरांचे मृत्यू मात्र फार दु:ख देतात हे नक्की Sad


-ऋ

पुपे,

20

पुपे, हे लिहा सविस्तर. प्रत्येकी आठ-दहा शब्दांच्या पंधरावीस वाक्यात उरकू नका. या अनुभवाभोवती आणखी बरंच काही असेल. एकदा मनात खोल उडी मारून पहा... हास्य

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्द्ल

21

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्द्ल मनापासून आभार


-ऋ