"५ मे" ~ बालकविंचा हा स्मृती दिन (१९१८ च्या या तारखेस त्यांचा अपघाती म्रुत्यु झाला होता.)आज आकाशवाणीवर बालकवि यांच्याविषयी एक खास कार्यक्रम सादर करण्यात आला, जो अगदी योगायोगाने मला ऎकायला मिळाला. निवेदक बालकविंच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवत होते इतक्या तन्मयतेने त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या वेळेत या जादुगाराचे मराठी भाषेतील योगदान प्रस्तुत केले.
चला आपल्या संस्थळावर या निमित्ताने प्रतिभेचे ईश्वरदत्त देणगी लाभलेल्या या कवीची आपणास आवडलेली, स्मरणात राहिलेली, अभ्यासलेली वा इतर कोणत्याही प्रसंगाने मनात रुंजी घालत असलेली "कविता" आठवू या.....आणि मराठी शारदेच्या प्रांगणात आपल्या तेजस्वाने सदैव लखलखत असणा-या या अढळ ता-याचे स्मरण करु या....!
मी जाणीवपूर्वक "फ़ुलराणी" व "श्रावणमास" या दोन कवितांना न घेता (कारण....या दोन्ही प्रत्येक मराठीप्रेमीच्या ह्र्दयात घर करुन आहेत) त्यांची याच पठडीतील "संध्यारजनी" चा विचार करु इच्छितो. बालकवि हे नेहमी स्वप्नरंजनात दंग झालेले असल्यामुळे निसर्गाच्या रम्य देखाव्यात त्यांची सर्व स्वप्ने साकार होताना दिसतात. निसर्गातील एखादे द्र्श्य पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर एक कल्पनाचित्र त्याचसमयी तरळू लागते आणि थोड्याच वेळात असल्या कल्पनाचित्रांची परंपराच तयार होते. "संध्यारजनी" कवितेतील तारकांच्या आगमनाचे हे मनमोहक वर्णन :
संध्येच्या खिडाकीत येउनी ही हसरी तारा,
हळुच पाहते, खुणावितेही ’या - या’ कोणाला ?
पलिकडचा तो तेजोमय नव पडदा सारुन
बघते, हसते, क्षणात लपते, ही दुसरी कोण ?
लाजत, लाजत असाच येइल सारा स्वलोक,
मुग्ध बालिका जमतिल गगनी आता नवलाख
आली होती भरती, आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला
कल्पतरुंची फुले उडाली की वा-यावरती ?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती ?
नव टिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे ?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे ?
विश्वशिरावर टोप चढविला हि-यामाणकांचा !
केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या महान कवीला विनम्र वंदन !!!
गीतनिद्रा तव आंत अखंडित...
उत्तम उपक्रम. आनंदी, निसर्गरम्य कविता लिहिता लिहिता बालकवी 'कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला' सारख्या ओळीही लिहून गेलेत. त्यांची 'पारवा' कविता ही अशीच वेगळी, स्वतःच्या मनःस्थितीवर लिहिलेली. लताबाईंच्या गाण्यातून जाणवणार्या दु:खाच्या अंडरप्लेसारखी ('मौनराग'मधला याच मनोवस्थेवरचा दॉमिएच्या चित्राबद्दलचा एलकुंचवारांचा लेखही सुरेख आहे, तो आठवला.)
भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो, खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे, घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत, सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची, गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात, गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे, दुखते खुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान, गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची, पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज, करूणगीते घुमवीत जगी आज
दुःखनिद्रा ती आज तुला लागे, तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे, तुला त्याचे भानही नसे बा रे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
'कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला'
फारच सुंदर कविता निवडली आहे, नंदन जी.... "भिंत खचली....कलथून खांब गेला..." या दोनच लहानश्या वाक्यांत मोडकळीस आलेल्या ओसाड धर्मशाळेचे वास्तव स्वरूप बालकवींनी वाचकासमोर प्रकट केले आहे. ("मौनराग" मी अजुनी वाचले नाही, पण आता आपण दिलेला संदर्भ पाहून जरुर वाचेन.)
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
+१
मलाही बालकवि म्हटले की हीच कविता आठवली.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
निसर्गाशी तद्रूप होऊन भक्ती
"....मलाही बालकवि म्हटले की हीच कविता आठवली. >>
बरोबर... पण कदाचित जो आनंद मानवी जगातील दु:खपूर्ण व नैराश्यजनक वातावरणात कवीला प्राप्त करून घेता येणे शक्य झाले नाही तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी बालकवी यांनी निसर्गाशी तद्रूप होऊन त्याच्यावर भक्ती करण्यास सुरुवात केली असती असे वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
अरूण
खरंच उत्तम उपक्रम!! मागे एकदा ईमेलमध्ये त्यांची एक 'अरूण' नावाची कविता वाचली होती. वाचताच भिडली हृदयास अगदी!! कविता बरीच मोठी आहे. त्यातला मला सर्वात जास्त आवडलेला काही भाग देत आहे.
तेजाने न्हाणिते जगाला कोण सखे बाई
नवल अगाई तेजोमय तू तेजोमय मीही
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनी
विरहकाल संपला गा गडे प्रेमाची गाणी
या मेघाच्या कुंजामध्ये ही लपली कोण?
तिला बोलवा पुरे गडे गं हा तुमचा मान
अम्ही गवळणी हृदयरसांनी पूजू प्रेमाला
प्रेमकाल हा म्हणोत कोणी अरुणोदय याला
पूर्व दिशेशी गोफ खेळतो कृष्णगडी बाई
उधळित सोने सर्व तयाच्या लागू या पायी
मधुस्मिताने विश्व भरू गं शंकित का म्हणुनी
सर्व सारख्या हासावे मग कोणाला कोणी
गोफ चालला गगनमंडळी रंग नवा आला
त्यात लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला
विनयवती ती पूर्व दिशा मग अधोवदन झाली
तो प्रेमाची अद्भुत लहरी वसुधेवर आली
-------------------------------------------------
ऊठ कोकिळा भारद्वाजा ऊठ गडे आता
मंगल गानीं टाका मोडुनि जगताच्या चित्ता
सरिते, गाणे तुझे सुरांमधि या मिळवी बाई
साध्याभोळ्या तुझ्या गायना खंड मुळी नाही
पिवळी कुरणे या गाण्याने हर्षोत्कट झाली
गाउ लागली, नाचू लागली वेडावुनि गेली
चराचरांच्या चित्ती भरले दिव्यांचे गान
मूर्त गान हे दिव्य तयाला गाणारे कोण?
दिव्य गायने दिव्य शांतता दिव्याचे झोत
वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयात
त्या दिव्याने स्वर्भूमीचे ऐक्य असे केले
त्या दिव्याने मांगल्याचे पाट सुरू झाले
मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी
वाग्देवीने सहज गुंफिली मग त्याची गाणी
(अख्खी कविताच टाकू का? तसे असेल तर प्रतिसादास उत्तर देऊ नये..)
"अरुण"
होय.... खूप मोठ्ठी कविता आहे "अरुण".... चक्क ९८ सुंदर सुंदर अशा ओळींची.... ज्या वाचून मन अक्षरश: त्यातील स्वरमाधुर्याने मन डोलून जाते. कवितेची सुरुवातच रंग उधळत येते :
"पूर्व समुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची
कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची ?"
अहाहा..... "लाल गुलालाची मूठ !!!" काळजाला हात घालणारी प्रतिमा.... एका क्षणात पूर्व दिशा नजरेसमोर येते.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
अगदी अगदी.. "लाल गुलाबाची
अगदी अगदी.. "लाल गुलाबाची मूठ" तर अगदी भन्नाटच कल्पना आहे!!
पूर्व समुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची
कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची?
पूर्व दिशा मधु मृदुल हासते गालीच्या गाली
हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल काली
क्षितिजाची कड सारविली ही उज्ज्वल दीप्तीने
सृष्टिसतीने गळां घातले की अनुपम लेणें?
हे सोन्याचे रक्तवर्ण हे, हे पिवळें कांही
रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगांही
उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
कुणि लावला विशुद्ध कर्पूररस अपुल्या अंगा?
नादमय, गेय अहाहा!! इतकी सुरेख कविता की रोज सकाळी उठल्या उठल्या वाचावी.. दिवस चांगल्या मूडमध्ये जाणार यात तिळमात्र शंका नाही!!
इतकी सुरेख कविता
".....दिवस चांगल्या मूडमध्ये जाणार यात तिळमात्र शंका नाही!! >>>>
१० पैकी १० गुण !!
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
अरूण चितारी नभःपटाला रंगवतो
अरूण चितारी नभःपटाला रंगवतो काय?
प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोणी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?
दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलत्या गगनात
स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडळांत
रात्रीला शेवटची मंगल गीते गातात?
किंवा 'माझी चोरुनि नेली मोत्यांची माला'
म्हणुनि नभःश्री रुसली आली लाली गालाला?
की रात्रीचे ध्वांत पळाले, आशेची लाली
उत्साहाशी संगत होऊनि ही उदया आली?
किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
कीं आपणांवर आज पातली हीच खरी विजया?
की स्वर्गीच्या दिव्यांचे हे फुटले भांडार
जणू वाटते स्वर्गच त्यासह खाली येणार
प्रगट जाहले श्रीरामाचे पुष्पक किंवा हे
की सोन्याची पुरी द्वारका लखलखते आहे?
कविता इतकी सुंदर आहे की पूर्ण देण्याचा मोह आवरतच नाही!! काय काय म्हणून सांगायचें.. शब्दन् शब्द अप्रतिम!!
छान उपक्रम. बालकवीच्यां
छान उपक्रम.
बालकवीच्यां जास्तीत जास्त कविता येथे देता आल्या तर एक अमुल्य ठेवा निर्माण होईल ह्यात शंकाच नाही.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एक अमुल्य ठेवा .....
नक्कीच !! आणि या जादुगाराच्या एकाहून एक सरस रचना वाचताना "हे जग किती सुंदर आहे... असु शकते..." याची प्रचिती सर्वांना येईल. मराठी भाषेवर किती प्रेम होते या कवीचे याचा आपल्या सर्व सदस्यांना अंदाज येईल यात संदेह नाही.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
हळव्या निसर्ग कविता हे
हळव्या निसर्ग कविता हे बालकवींचे वैशिष्ठ्य.........त्यांच्या कविता डोळ्यासमोर चित्र उभे करतात
औदुंबर
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट्लागली हिरवी गरदी पुढें
पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाक्कुनी जळात बसला असला औदुंबर .
बालकवी
"औदुंबर"
".....पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर ...."
काळ येईल.... काळ जाईल.... पण बालकवींची "औदुंबर" काळाला पुरुन उरेल, इतकी ती आपल्या नसानसात भिनली आहे. ही एकमेव अशी कविता आहे की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अभ्यासक्रमात आपणाला पहायला मिळते..... १०० वर्षे झाली... पण "औदुंबर" तसाच डौलात, दाबात.... जळात... जोतीबासारखा राजेशाही थाटात बसला आहे.
(कुणी सांगावे... कदाचित आपल्याविषयीची ही चर्चादेखील वाचत बसला असेल...!!)
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
दोष असती जगतांत किती
दोष असती जगतांत किती याचें
नसे मजला सामर्थ्य गणायाचे;
दोष माझा परि हाच मला वाटे,
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?
दोष असती जगतात- असायाचे;
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्धसिंचनेही
शुद्ध होइ न जो, दोष असा नाही.
गड्या पूर्णा! मज आस तुझी नाही;
सख्या न्यूना! ये मार मिठी देहीं;
प्रीती माझ्या ह्रदयात करी वास
न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास!
~बालकवी
"दोष व प्रीती..."
"....न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास!>>>
या शेवटच्या ओळीला फार महत्व आहे, कारण मानवी जडणघडणीमध्ये "न्यूनत्व" असेल तरच "पूर्णत्व" कल्पनेला वाव असतो याची खात्री बालकवीना होती.... म्हणून न्यूनाचेही कवितेद्वारे आवाहन !
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
कुणी सांगाल का?
बालकवींच्या कवितांविषयी आता वाचत असताना 'श्रावणमासी', औदूंबर सारख्या कवितांच्या ओळी आपोआप आठवायला लागतात, मी तिसरी-चौथीत असताना एक कविता अभ्यासाला होती. ती कविता मला खूप आवडायची पण आता ती अर्धीच आठवते आणि त्या कवितेचे कवी कोण आहेत याबद्दल मला नक्की आठवत नाही पण ती बालकवींचीच कविता असल्याचे मला वाटते नसल्यास कृपया कोणाची कविता आहे हे आपल्यापैकी कोणास माहित असेल तर सांगावे.
कवितेचे नाव होते 'पाहुणा' आठवल्या तेवढ्या ओळी देत आहे.
' पाहूणा'
आज ये अंगणा, पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या,सोयरा साजिरा
वाजता नौबती, ये सखा सोबती
खेळवा संगती, हासरा लाजरा
कोवळे रूपडे, सावळे अंग रे
................. हा वसंतासवे सृष्टीला हासवे
राजा मंगळवेढेकर
यांनी लिहिलेली ही कविता आहे. तिच्यातल्या अजून काही ओळी अशा -
कोवळे देहुडे, सावळे रूपडे
पोपटी अंगडे शोभते सुंदरा
हा वसंतासवे, सृष्टीला हासवे
पालवे बोलवे भूमीच्या लेकरा
गीत गाता मुखी, नाचवा पालखी
छत्रछायाकृती मित्र आला घरा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. मनात बर्याच दिवसांनी असलेली शंका दूर झाली.
"पाहुणा"
"पाहुणा" या कवितेच्याच धर्तीवर कविवर्य भा. रा. तांबे यांची "हे कोण गे आई ?" नावाची एक अतिशय सुंदर कविता आठवली.... ती शोधून काढली.... आपणा सर्वांसाठी.
"नदीच्या शेजारी ! गडाच्या खिंडारी
झाडांच्या ओळीत ! वेळून्च्या जाळीत
दिवसा दुपारी ! जांभळी अंधारी
मोडके देऊळ ! त्यावरी पिंपळ
कोण गे त्या ठायी ! राहते गे आई ?
चिंचांच्या शेंड्यांना ! वडांच्या दाढ्याना
ओढोनी हालवी ! कोण गे पालवी ?
कोण गे तो जोराने ! मोठ्याने मोठ्याने
शीळ गे वाजवी ? पांखरा लाजवी ?
सारखी किती वेळ ! ऐकू ये ती शीळ ?
वाळली सोनेरी ! पाने गे चौफेरी
मंडळ धरोनी ! नाचती ऐकोनी !
किती मी पाहिले ! इतकेची देखिले --
झाडांच्या साउल्या ! नदीत कांपल्या !
हाका मी मारिल्या ! वाकोल्या ऐकील्या
उरात धडधडे ! धावता मी पडे
पळालो तेथून ! कोण ये मागून ?"
---- अप्रतिम... एका छोट्याला आलेला निसर्गाचा अनुभव !
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
मस्तच
मस्तच आहे कविता। अगदी 'पाहूणा' कवितेतील यमक व लयबद्धता या ही कवितेत दिसून आली. अजुन एका सुंदर कवितेचा आस्वाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार।.
"अप्सरांचे गाणे".....
बालकवींची एक खेळकर कविता..... "अप्सरांचे गाणे"
सुमनांचा गर्भामाजी ! रसरंग भरली ताजी,
आजूबाजूला वसली ! शुभ्र अदिशिखरे सगळी,
सांभाळुनी उतरा बाई ! वेळ गडे स्नानाची ही
गर्द दाट मधली झाडे ! मंदमंद हलवा थोडी;
पराग, सुमने हसलेली ! नीट बघा पायाखाली,
पुष्पांचा बसला थाट! हळू हळू काढा वाट
गोड सुवासाचे मेघ ! आळसले जागोजाग;
हिमकणिका त्यांच्या पडती ! गोड गोड अंगावरती;
पुनीत ही गंगामाई ! स्नान करा झटपट बाई,
संध्याच्या कोमल किरणी ! नटुनी थटुनी वस्त्राभरणी
गुंजतसे अक्षयगीता ! बैसुनी त्या भृंगावरते;
मग अपुल्या भराभर जाऊ ! देवांचे दर्शन घेऊ.
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
"औदुंबर" ".....पाय टाकुनी
"औदुंबर"
".....पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर ...."
काळ येईल.... काळ जाईल.... पण बालकवींची "औदुंबर" काळाला पुरुन उरेल, इतकी ती आपल्या नसानसात भिनली आहे. ही एकमेव अशी कविता आहे की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अभ्यासक्रमात आपणाला पहायला मिळते..... १०० वर्षे झाली... पण "औदुंबर" तसाच डौलात, दाबात.... जळात... जोतीबासारखा राजेशाही थाटात बसला आहे.
(कुणी सांगावे... कदाचित आपल्याविषयीची ही चर्चादेखील वाचत बसला असेल.....
आणि त्याच्या शेजारी ' बी ' ह्यांचा चाफा सुद्धा.... खंत करणारा ..... ह्या दोन्ही कविता कळायला अवघड गेल्या.तशीच ती ' ....रात्र काळी घागर काळी.... '
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
चाफा/रात्र काळी
>>> आणि त्याच्या शेजारी ' बी ' ह्यांचा चाफा सुद्धा.... खंत करणारा ..... ह्या दोन्ही कविता कळायला अवघड गेल्या.
--- शांताबाईंनी (बहुतेक) 'कविता स्मरणातल्या' ह्या पुस्तकात 'चाफा'बद्दल लिहिलं आहे. गाण्यात समाविष्ट नसलेया काही कडव्यांच्या संदर्भाने (सृष्टी सांगे खुणा, आम्हा मुखस्तंभ राणा, मुळी आवडेना... आणि दिठी दीठ जाता मिळून इ.) ही कविता रुसलेल्या प्रियकराची समजूत घालणारी (आणि तांब्याच्या कविताप्रमाणे) ईश्वराला उद्देशून, अद्वैतवादाची मांडणी करणारी आहे असं वाचल्याचं आठवतं. पुस्तक मिळाल्यावर अधिक भर घालतो.
'रात्र काळी' बद्दल येथे वाचता येईल. सुरुवातीच्या ओळी 'मोरा गोरा अंग लई ले'ची आठवण करून देणार्या.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
रात्र काळी घागर काळी । यमुना
रात्र काळी घागर काळी ।
यमुना जळें ही काळीं वो माय ॥१॥
बुंध काळी बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसीली ते काळीं वो माय ॥३॥
एकली पाणीया नव जाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ॥५॥
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
मस्त धागा
मस्त धागा
उत्तम संग्रह
उत्तम संग्रह
बालकवींची एक कविता होती
बालकवींची एक कविता होती शाळेच्या पुस्तकात ... आठवत नाही आहे...
* हिरवे हिरवे गार गालीचे.. असे काहीतरी होते आहे का कुणाकडे..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
".....फुलराणी"
ही तर बालकविंच्या अनेक प्रसिद्ध कवितापैकी एक..... ".....फुलराणी"
"हिरवे हिरवे गार गालिचे - हरित तृणाच्या मखमालींचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रुलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी - झोकी घ्यावे, गावी गाणी;
याहुनी ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फ़ुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हांसत आला - चुंबून म्हणे फुलराणीला --
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !
क्रमिक पुस्तकात इतकीच कविता होती.... मात्र मूळ कविता एकूण ११ कडव्यांची (६६ ओळींची आहे ..... देऊ का?
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"
पुर्ण आहे का.. खुप आनंद झाला
पुर्ण आहे का..
खुप आनंद झाला पाहून कविता पुन्हा एकदा... शाळेत पोहचल्या सारखं वाटतं.. तो बेंच, त्या खिडक्या समोर पवार मॅडम... नुतन मराठी विद्यालय समोर उभे राहीले राव क्षणात.. एक आश्रु ओघळला...
खुप खुप धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पूर्ण कविता..... " फुलराणी"
जरुर आहे .... उलट्पक्षी बालकविंची ही कविता टाईप करण्यासही खूप आनंद मिळतो..... कारण? त्यातील जादूमय शब्द, जे तुम्हाला इतरत्र कधीच भेटू शकत नाही.... या निमित्ताने आपल्या बोटांना या शब्दांची ओळख होते....आणि मायमराठीमध्ये असेही काही कमालीचे शब्द आहेत याची जाणिव तरी होते....!!
वरील दोन कडव्यानंतर......
"आंदोली संध्याच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते; निजले रान - निजले प्राणी थोरलेलहान.
अजून जागी फुलराणी ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?
या कुंजातून, त्या कुंजातून - इवल्याशा या दिवठ्या लावून,
मध्यरात्रीच्या निवांत समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनी राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होऊन !
प्रणयचिंतनी विलीनवृत्ती - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होऊनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -
"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळूच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ गे पाहुनी चित्ती - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वार्यावरती फिरता फिरता --
हळूच आल्या उतरून खाली - फ़ुलराणीसह करण्या केली,
परस्परांना खुणवुनि - त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्भूमिचा जुळवीत हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीही अजुनी फुलराणी ती !
तेजोमय नव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशांला,
जिकडेतिकडे उधळीत मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालूनी - हांसत हांसत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबी फेटा - झकमकणारा सुंदर मोठा !
आकाशी चंडोल चालला - हा वाड्.निश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे ! - साध्या भोळ्या फुलराणीचे !
गाऊ लागले मंगलपाठ, - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा - कोकीळ घे ताणावर ताणा !
नाचू लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते ! सावध सारे ! - सावध पक्षी ! सावध वारे !
दंवमय हा अंत:पत फिटला - भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्या रवांनी- कुणी गेली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफीत होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथील वनदेवीही - दिव्या आपुल्या उच्छ्वासांही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंगतगुंगत कवि त्या ठायीं - स्फूर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनीं फुलराणीला !
==========================
नूतन मराठीची आठवण अगदी काव्यमय आहे !! मी महाराष्ट्र हायस्कुलचा... तिथे मराठीच्या नावाने सारा "आनंद"च होता.... नकोच ती आठवण !
~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"