मै ऐसा क्यूं हूं?

0
0

जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. हास्य

बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. माळ्यावर ट्रंकेत पुस्तकं. ग्यालरीतल्या शेल्फात पुस्तकं. माझ्या कप्प्यात अर्ध्या भागात कपडे, अर्ध्या भागात पुस्तकं. असं सगळं.

अगदी सुरूवातीला वाचलेली पुस्तकं म्हणजे (बहुधा) ज्योत्स्ना प्रकाशनाची अथवा केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं. राजाराणी, राक्षस, त्याचा पोपटात असलेला जीव वगैरेंची. वेगळ्याच एका अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी. सुट्टी असो नाही तर शाळा असो... रोज एखादे तरी पुस्तक वाचायचोच. मग रात्री स्वप्नातही तेच दिसायचं. अर्थात तेव्हा राजकन्या वगैरे पेक्षा तो राक्षस, पोपट आणि त्याच्या राजपुत्राशी होणार्‍या लढायाच जास्त दिसायच्या स्वप्नात. पण एकंदरीत मजा यायची. जसजसा थोडा मोठा झालो तसतसं मग क्षितिज विस्तारले. बाबा दर शुक्रवारी का अशाच कोणत्याशा वारी 'द इलस्ट्रेटेद विकली ऑफ इंडिया' आणायचे, ऑफिसातून येताना. त्यातली रंगीत चित्रं बघायला मजा यायची. त्यातच ओळख झाली 'फँटम'ची. फँटम, त्याची लेडी डायना, जंगल, मधून मधून त्या फँटमचा होणारा मि. वॉकर, सध्याच्या फँटमचा पूर्वज जो पहिल्यांदा फँटम झाला, त्याने कवटी हातात घेऊन घेतलेली शप्पथ, फँटमची मुलं, म्हातारा गुर्रन हे सगळं मला अगदी अजूनही खरं वाटतं. आता, हे सगळं काल्पनिक आहे असं माहिती आहे, पण वाटत नाहीच अजूनही. अजून थोडा मोठा झाल्यावर भेटली, इंद्रजाल कॉमिक्स. बाबांपाशी हट्ट करून पेपरवाल्याकडे दर आठवड्याचे नवीन प्रसिद्ध झालेले कॉमिक्स टाकायला लावले होते. त्यात प्रामुख्याने मँड्रेक आणि त्याचा पैलवान सहाय्यक लोथार यांचे कारनामे असत. जादूचे कॉलेज, तिथला प्रिन्सिपॉल थेरॉन आणि ते मनाच्या शक्तीचे प्रयोग इत्यादी हे केवळ अद्भुत.

त्याच वेळेस आणि त्याच बरोबरीने वेड लावले होते ते अमर चित्रकथांनी. माझ्या मते अगदी अजूनही 'कॉमिक्स' या प्रकारातली ही सगळ्यात छान अशी मालिका आहे. या चित्रकथांनी माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलाला भारतिय हिरोज आणि भारतिय संस्कृतीतल्या गोष्टींचा प्रच्चंड खजिना अतिशय नेटकेपणाने खुला केला. रामायण, महाभारत वगैरे तर आहेच... पण राजपुतान्यातल्या राणा संगा, राणा प्रताप, राणी पद्मिनी सारख्या थोर आणि शूर व्यक्तींचा परिचय मला झाला. आजही मला अमरचित्रकथांचा संपूर्ण संग्रह माझ्या मुलींसाठी विकत घ्यायची इच्छा आहे. अमर चित्रकथांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रेखाटनं आणि साधी सरळ भाषा. नुसती बघत रहावी अशी रंगसंगती. अमर चित्रकथांना माझ्या मनात एक अगदी वेगळेच स्थान आहे. नेहमीच राहील. चांदोबा आणि किशोर मासिकं तर अगदी नववीत वगैरे जाईपर्यंत दर महिन्याला घरी येत असत.

आम्हाला पाचवीपासून इंग्रजी सुरू झाले. हळूहळू अक्षरओळख झाली आणि वाचनाची गाडी त्या भाषेकडे वळायला लागली. सतत प्रयत्न केल्याने बर्‍यापैकी लवकर इंग्रजी वाचता येऊ लागले. रोजचे इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे हा तर नियमच झाला. माझ्या वडिलांना अ‍ॅगाथा ख्रिस्ती किंवा डॅफ्ने डु मॉरिएच्या कादंबर्‍या वाचायचा दांडगा शौक. त्यांच्याकडे बर्‍याचशा कादंबर्‍या संग्रही होत्याच. अर्थात हे सगळे वाचता येऊ लागे पर्यंत बराच वेळ गेला. पण पुस्तकं हाताशी असल्याने नेहमीच ती चाळली जात. मला आठवतंय, मी सातवीत की आठवीत असताना मला माझ्या आत्याने दिवाळीत शेरलॉक होम्सच्या सगळ्य कथांचा संग्रह दिला होता. सुट्टी संपायच्या आत वाचून संपले होते दोन्हीही खंड. बाबांच्या संग्रहामुळे हर्क्युल पायरॉची ओळख झालीच होती. मराठीतल्या गुरूनाथ नाईक वगैरेंची पुस्तकं तर तेव्हा सर्रास उपलब्ध असत. त्यांची तर पारायणं चालूच होती. एके दिवशी माळा साफ करताना, एका ट्रंकेत त्यांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या तरूणपणी जमवलेली अर्ल स्टॅनले गार्डनरची आख्खीच्या आख्खी पेरी मेसनची सिरिजच हाती लागली. थोड्याच दिवसात त्याचाही फडशा पाडण्यात आला.

अशा रितीने हळूहळू माझी वाचनाची सवय वाढत होती... अगदी हाताबाहेर जात होती असे म्हणले तरी चालेल. वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं.

पण माझ्या वाचनावर खरा प्रभाव असेल तर तो माझ्या काकाचा. घराण्याच्या गुणधर्माला अनुसरून तोसुद्धा वाचनकिडा आहेच. आमच्या घराजवळच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. खूपच सुसज्ज लायब्ररी होती ती. अजूनही आहे बहुधा. काका तिथे मेंबर. त्याची साहित्याची जाणही प्रगल्भ आहे. तो जी पुस्तके आणत असे ती दिवसा माझ्या ताब्यात असत. कथा / कादंबर्‍या / मासिकं अगदी भरपूर वाचन केलं त्याच्याजोडीने. लहान वय असल्यामुळे सगळंच कळलं असेल असं नाही, पण ती नावं, ती भाषा न कळत मनावर ठसत होती, संस्कार करत होती. काका 'ललित' मासिकाचाही सदस्य होता. दर महिन्याला त्याच्या जोडीने मीही नवीन अंकाची वाट बघत असे. 'ठणठणपाळ' तर लै हिट्ट होता त्यातला. अजूनही ते मिशाळ ठणठणपाळाचे सरवट्यांनी काढलेले व्यंगचित्र डोळ्यासमोर आहे. 'ललित'चा दिवाळी अंकही दणदणीत असायचा. माझ्या वडिलांचा आत्तेभाऊ साहित्यिक / प्राध्यापक वगैरे. तो नेमाडपंथी. म्हणजे, नेमाड्यांच्या अगदी रोजच्या बैठकीतला. त्या कनेक्शनमुळे माझा काकाही तसाच. कोसला, बिढार, झूल इत्यादी कादंबर्‍या घरच्याच संग्रहातल्या. अगदी शाळकरी वयातल्या. 'कोसला' पहिल्यांदा वाचली तेव्हा काहीतरी वेगळंच (पण त्या वयात नेमकं लक्षात न येणारं) असं काही आपण वाचतो आहे हे कळत होते त्या जाणिवेची आठवण अजूनही मनात घर करून आहे. महानोर, कोलटकर वगैरे नावं ऐकून माहित झाली. त्यापैकी महानोरांची कविता समजायला जास्त सोपी म्हणून त्याची पारायणं झाली. 'या नभाने या भुईला दान द्यावे' वगैरे ओळी तर मनात घर करून बसलेल्या. त्यावेळच्या नवीन वाटा चोखाळणार्‍या साहित्यिकांची ओळख अशा रितीने घरातच होत होती. काकाकडे 'फणीश्वरनाथ रेणू' या महान हिंदी सहित्यिकाची काही पुसकं / कादंबर्‍या होत्या. त्यापण वाचत होतो.

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेला मेघनाबरोबरचा संवाद. तिच्याशी बोलताना जुन्या आठवणी निघाल्या आणि मी विचार करायला लागलो. आज मला कोणी विचारले की तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडेल तर मी रात्री झोपेतसुद्धा 'वाचन' असे उत्तर देईन. मग 'मै ऐसा क्यूं हूं?' असा विचार करत असताना मला लहानपणापासून सहजतः मिळालेला पुस्तकांचा सहवास आणि माझ्यसमोर घरातले इतर लोक करत असलेले वाचन हे त्याचे मुख्य कारण आहे असे जाणवले. मग असा विचार आला मनात की एखादा धागा टाकावा. सगळ्यांनाच काही ना काही छंद असतो, आवड असते. माझ्यासारखी आणि माझ्यहूनही जास्त वाचनाची आवड असणारे थोर लोक इथे आहेत. त्यांच्या त्या त्या आवडीनिवडी अथवा छंद त्यांना कसे लागले असावेत? त्या लोकांनी त्यांचे अनुभव / आठवणी इथे शेअर कराव्यात अशी कल्पना.

प्रत्येकाने वाचन वगैरे बद्दल लिहावे असे नाही. मला वाचनाचा छंद आहे. अजून कोणाला पर्यटनाचा असेल, कोणाला गिर्यारोहणाचा असेल. कोणाला चित्रकलेचा अथवा संगिताचा असेल. कोणी जुन्या हिंदी गाण्यांचा / चित्रपटांचा शौकिन असेल. तर प्रत्येकाने असे काहीना काही लिहावे ही अपेक्षा.

मस्त धागा, छान विषय

बिकांप्रमाणे बहुतेक वाचकांची सुरवात अशीच झाली असावी. परिक्षेचा काळ सोडला तर लायब्ररीमधुन दररोज पुस्तके आणत असु. पुस्तकांप्रमाणे घरी रेडीओही सदा सर्वदा चालू असे. त्याचा परिणाम म्हणून देखिल गाण्याच्या भेंड्यांचा खेळ तासनतास व जेव्हा घरातले सगळे सामील व्हायचे तेव्हा तर दिवसेंदिवस चाले बर पुढचे गाणे आता उद्या "अमुक" अक्षर आले आहे लक्षात ठेवा असे करुन दिवसाचा खेळ थांबायचा. संध्याकाळी बाहेर मैदानात किमान अंगणात काहीना काही खेळ खेळला पाहीजे घरात फक्त वाचत बसायचे नाही (पाउस सोडून) अशीही ताकीद असे.

आमच्या घरी (आई व बाबा दोघांकडचे नातेवाईक) सिनेमाची देखील आवड होती. इतकी की मला काही वेळा घरून शाळेत द्यायला चिठ्ठी मिळली आहे की आमचा पाल्य कु... उद्या शाळेत काही कौटुंबीक समारंभानिमित्त येउ शकणार नाही. व आम्ही घरचे ३ ते ६ च्या शोला गेलो आहे.

तशी आमच्या घरच्यांनी मी काही वादन शिकावे म्हनुन असफल प्रयत्न केला कारण तेव्हा मित्रांसमावेत जेव्हा मिळेल तेव्हा क्रिकेट अगदी फूलपीच, हाफ पिच, वन टप, फ्रेंच क्रिकेट हे उपलब्ध असलेल्या मित्र व चेंडूवर (प्लेस्टीक, रबर, टेनीस, कॉर्क, बूच)

उत्तम धागा.

वाचनाची आवड मलापूर्वीपासूनच

वाचनाची आवड मलापूर्वीपासूनच फार कमी आहे. माझी अभ्यासाची पुस्तकेदेखील बरेच वेळेला न वाचल्यामुळे कोरी असत. कुठलेही पुस्तक मनाच्या चंचलपणामुळे ४० पानांपेक्षा जास्त वाचू शकत नाही. Sad
बिका,
लेख छान.



-पुण्याचे पेशवे

लहानपणी मलाही खुप आवड होती

लहानपणी मलाही खुप आवड होती वाचनाची. माझी आई चान्दोबा आणत असे व माझ्या शेजारची रुपाची आई ठकठक.
आम्ही शेअर करुन वाचत असु. Big smile

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी नीजरुप तुझे !
छंदाच अस आहे. जिथे जाईल तिथे तो आपले समछंदी माणस शोधत राहतो. छंदाचा अतिरेक झाला कि माणस त्याला छंदीफंदी म्हणतात. त्यापुढे गेला कि व्यसनी म्हणतात. व्यसन आणी छंद याच्यातील सीमारेषा पुसट आहे. अगदी श्रद्धा अंधश्रद्धेसारख्या. व्यसनी बनायच असेल तर प्रथम छंद असावा लागतो .



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

छान लिहिलय......

आमच्या घरी मी लहान असताना पुस्तकं असायची ती जड जड मॅथॅमॅटिक्स, सायन्स असली. शहरापासुन लांब खेड्यात बुकस्टॉल नव्हते अन त्यात आम्ही रहायचो गावापासुन लांब. मग सगळे एकमेकांची पुस्तकं उसनी घेऊन वाचायचो. कुणाच्याही घरी गेलं की समोर दिसेल ते पुस्तक वाचत बसायचो. शेजारी एकांकडं श्री यायचं ते वाचताना भलतंच थरारक वगैरे वाटायचं. शाळेच्या लायब्ररीत मे महिन्यात नवी पुस्तक खरेदी व्हायची ती सगळी पुस्तकं जुलै पर्यंत वाचुन व्हायची. नंतर कॉलेजात्त गेल्यावर मग फुटपाथवरची जुनी पुस्तकं विकत घेण्याचा नाद लागला त्यात सगळा पॉकेट्मनी खर्च करायचा. तेव्हापासुन पुस्तक विकत घेणं सुरु झालं ते अजुन पण सुरुच आहे.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मलाही वाचायला खूप आवडतं,

मलाही वाचायला खूप आवडतं, सगळ्या प्रकारची पुस्तक वाचते. मी वाचनालयात जाउन वाचत असे ...मे महिन्याच्या सुट्टीत अगदी ११ ते ५. किराणामालाच्या दुकानातून सामान आणल की त्या सगळ्या कागदांचे नीट गठ्ठे करून ठेवण ( आणि पुड्याचा दोरा सांभाळून ठेवण हास्य ) हे मी स्वतःहून अंगावर घेतलेल काम होत...कारण अर्थातच रद्दी विकल्यानंतर येणारे पैसे ...हे सगळे कागद मी वाचत असे, इंग्रजी वाचायची सुरूवात रद्दी वाचता वाचताच झाली. एकाच वेळी एकाच विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तक त्रयस्थपणे वाचायला फार मजा येते...
दुसरा छंद म्हणजे मला व्याख्यान ऐकायलाही फार आवडतात्.....या सगळ्याचा इव्हॉल होण्यात बराच हात आहे...अर्थातच प्रक्रिया अजून चालू आहे.
ट्रेकिंग आणि कॅम्पिंग पण बरच करते..बरेचदा रस्ते चुकते फिरता फिरता ...पण माझ्यासाठी आत्तापर्यंत जर्नीच डेस्टिनेशन्पेक्षा आनंददायी ठरला आहे



पुष्करिणी

छान

झालाय लेख.
तशी माझी वाचनाची आवड खूपच मर्यादित आहे. पेशन्स कमी हेही कारण आहेच.
भयकथा मात्र जाम आवडतात. खासकरून नारायण धारपांची कादंबरी किंवा कथा-संग्रह.

बाकी अर्थातच स्वामी, म्रुत्युंजय, श्रीमान योगी, पानिपत या तर ऑल टाइम फेवरिट आहेत.

वाचन..

मला आठवतं, तहानभूक विसरुन वाचत सुटणे..
लायब्ररीतून घरी येई पर्यंत धीर निघायचा नाही आणि रस्त्यातच पुस्तक उघडून वाचत वाचत घरी यायचे, कोणीतरी ते पाहून घरी सांगायचे.. मग...
घरी पुस्तकेच पुस्तके आणि आवर्जून कोणी वाचायला सांगण्याआधीच मी कधी वाचायला लागले ते मला आता आठवतच नाही, सुट्टीतही पुस्तकांचे ढीगच्या ढीग फडशा पाडत, दिवाळीच्या सुटीत चकल्या, चिवड्याची बशी आणि दुसर्‍या हातात किशोर किवा कुमारचा दिवाळी अंक हे तर कायमच..
कितीतरी अशा आठवणी तरंगत वर आल्या बिपिन तुझ्या लेखाने..
स्वाती

धागा फाट्यावर मारला आहे.

धागा फाट्यावर मारला आहे.

धन्यवाद.

वा! मस्त धागा!!

वाचनाची आवड बाबांमुळे लागली. त्यांना खूप वाचनाची आवड. बरे ज्या गावी जायचे त्या गावी कुठून ना कुठून एकतरी ग्रंथालय शोधून काढायचे. त्यांच्यामुळे बरीच पुस्तके मिळालीत लहानपणापासून. अर्थात् तेव्हा लिहिलेले सगळेच समजायचे असे नाही, पण भाषेची ओळख व्हायला, प्रेम लागायला त्यामुळे मदत होते हे मात्र खरे.

चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, अमर चित्रकथा इथपासून सुरुवात होऊन मग गोट्या, फास्टर फेणे असे वळण घेत वाचनाची गाडी कादंबर्‍या, कथा-रहस्यकथा अशी आली. नंतर आत्मचरित्रे, काही संत वाङ्मय (ही माझ्या आजीची देण) अशी त्यात भर पडत गेली.
लहानपणी आजीने रामायण, महाभारत, भागवतातील गोष्टी सांगीतल्यामुळे परत वेगळे वाचले नाही कधी!

एक आठवण सांगतो -
एकदा बाबांनी विचारले "का रे? पुलंचे कोणते पुस्तक छान वाटले?"
"मला त्यांचे लेखन आवडत नाही अन् समजतही नाही!!!" इति मी, इयत्ता ७वी ब.
बाबांचा चेहरा अस्सा खास झाला ना.. "गाढवा, अशी त्यांची किती पुस्तकं वाचलीस रे तू??"
"एकच.. तेही पूर्ण नाही.. कारण, समजले नाही.."
"पुस्तकाचं नाव?"
"सुंदर मी होणार"
बाबांनी डोक्याला हात मारून घेतला.. मग म्हणाले, "तुला माझ्या संग्रहातले त्यांचे हे एकच पुस्तक मिळाले होय रे वाचायला? अरे ते नाटक आहे.. ते बघायचे असते. मी देतो ते वाच आधी, मग बाकीचे काम." असे म्हणून मला "गणगोत" दिले अन् सांगीतले सध्या फक्त "दिनेश" वाच. बाकीचे नाही वाचले तरी चालेल.
मी "हो" म्हटले पण हळूच त्यांना विचारले, "पण जर नाटक बघायचे असते तर तुम्ही घरी ते पुस्तक का आणलंत?"
पण बाबांचा रागवलेला चेहरा बघून, "मी खेळून येतो" असे म्हणून उत्तराची वाट न बघता पोबारा केला. Big smile

बाकी "का" हा प्रश्न लहानपणापासून बेमुर्वतखोरपणे सगळ्यांना विचारण्याच्या सवयीमुळे बोलण्या अन् मार खूप खाल्लाय हा भाग निराळा. (आजकाल लोक या प्रकाराला मुजोरी असेही म्हणतात.. म्हणू देत च्यायला.. आपलं काय खेटर अडतंय होय! )

असो. पु.ल. नंतर आमचे दैवत झालेत ते नेहमीसाठीच.
वाचना व्यतिरिक्त बर्‍याच गोष्टींची आवड आहे -
चित्रकला - रेखाटने (रंगांच्या वाटेला म्या सहसा जात नाही!)
फोटोग्राफी करणे
सिनेमा बघणे
कविता वाचणे व लिहिणे
बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल खेळणे व बघणे
कॉम्प्युटरवर गेम खेळणे
(अखंड) बडबड करणे
स्वतःचा व इतर व्यक्तींचा स्वभाव जाणण्याचा प्रयत्न करणे
कोणत्याही गोष्टीला "का?" हा प्रश्न प्रथम स्वत:ला अन् मग दुसर्‍यांना विचारून भंडावून सोडणे

(काही अरसिक लोकं आळशीपणा/हलकटपणा असेही म्हणतात खालच्या छंदांना -)
टी.व्ही. वर काहीही बघण्यालायक नसतांनाही तासन् तास उगाच रिमोट घोळवणे
वाट्टेल तेव्हा झोपणे, उगाच लोळत पडणे
उगाच वाद घालत बसणे, चिडवणे.. इत्यादी.. 8)

बापरे! बरीच मोठी यादी झालीये की ही.. पुरे करतो आता! हास्य

(स्वच्छंदी) राघव