एक ऐतिहासिक घटना: भाग ६: न्यायव्यवस्था

0
0

आधीच्या भागांत आपण राजकीय प्रशासकांची तसेच नागरी प्रशासकांची ओळख करून घेतली. आता या भागात खरेतर विधीमंडळावर लिहिण्याचा मानस होता. मात्र काहि बदलांचे नवे संदर्भ शोधतो आहे. तोपर्यंत तूर्तास न्यायव्यवस्थेची ओळख करून घेऊया.

जगातील सर्वाधिक अधिकार असलेल्या न्यायव्यवस्थांपैकी एक म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेकडे बघितले जाते. अर्थातच न्यायव्यवस्थेचा पसारा व या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. मात्र तरीही ह्या व्यवस्थेची ओळख आपण जमेल तशी करून घेणार आहोत.

समाज म्हटला की दोन व्यक्तींमधे, व्यक्ती समुहांमधे किंवा व्यक्ती आणि व्यक्ती समुहांत किंवा व्यक्ती/व्यक्तीसमुहांत व सरकारपक्षात भांडणे/असहमती/बेबनाव/अन्याय होण्याची शक्यता आलीच अश्यावेळी एका नि:ष्पक्ष व स्वायत्त व्यवस्थेची समाजाला गरज असते जी भारतीय न्यायसंस्था पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. भारतीय घटनेने न्यायव्यवस्थेला अनन्यसाधारण अधिकार दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायसंस्थेमधे इतर स्तंभांचा (जसे प्रशासक, विधीमंडळ) हस्तक्षेप फार कमी तर ठेवला आहेच शिवाय इतर सगळ्या विभागांना न्यायालयाचा निर्णय बंधनकारक ठरवला गेला आहे.

न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य / स्वायत्तता म्हणजे काय? याचं थोडक्यात उत्तर द्यायचं तर "संघराज्याची इतर अंगे जसे प्रशासक, विधीमंडळे यांना न्यायव्यवस्थेत अथवा त्याच्या निर्णयात हस्तक्षेप नसणे किंवा आडकाठी नसणे आणि न्यायाधिशांनी कोणत्याही भितीशिवाय नि:ष्पक्षपणे निकाल देणे". मात्र याचा अर्थ न्यायालये भारतात कोणासही उत्तरदायी नाहित असा होत नाहि. न्यायालयांमधे स्वतःची चढती भाजणी आहेच आणि सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना, त्यांच्या द्वारे अप्रत्यक्षपणे प्रशासक, मंत्रीमंडळाला व विधीमंडळाला व त्यांच्या द्वारे सर्वसामान्य जनतेला उत्तरदायी आहे.

वर आपण न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ते पाहिले.. मग प्रश्न असा येतो हे स्वातंत्र्य न्यायव्यवस्थेला घटनेने कसे दिले आहे? भारतीय घटनेने न्यायाधीशांच्या नियुक्तीपासून, त्यांचा कार्यकाळ, आर्थिक आघाडी वगैरे सर्व बाबतीत ठोस स्वायत्तता दिलेली आहे. भारतीय न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती न्यायव्यवस्थाच करते. सर्वोच्च न्यायाधीश, उच्च न्यायालयातील नियुक्त्या व उच्च न्यायालये पुढील अश्या क्रमाने नियुक्त्या होतात. सर्वोच्च न्यायाधिशांची निवड करताना साधारणतः सर्वोच्च न्यायालयातील सर्वात अनुभवी न्यायाधिशाची निवड मावळता न्यायाधिश व प्रशासकांच्या शिफारसीवरून करतात. मात्र इतर मुख्य न्यायाधिशांची निवड करण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांची शिफारस १९८३ पर्यंत आवश्यक असे. मात्र १९८० व नंतर पुन्हा १९८३ मधे असा मुद्दा निदर्शनास आणला गेला की सर्वोच्च न्यायधिशांची निवड राष्ट्रपती म्हणजेच अप्रत्यक्षपणे प्रशासक/मंत्रीमंडळ करते. तेव्हा त्यांची शिफारस ही निष्पक्ष नसण्याची शक्यता आहे. यावर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायधिशांची शिफारस राष्ट्रपतींना मानणे बंधनकारक केले मात्र सर्वोच्च न्यायाधीशांनी ही शिफारस करते वेळी चार जेष्ठ (सिनीयर) न्यायाधिशांच्या बरोबर सल्लामसलती नंतर करावी असे ठरविले गेले ते अजूनही चालु आहे.

न्यायाधिशांचा कार्यकाल निश्चित ठेवला आहे. न्यायाधिशांना निष्कासित करण्यासाठी विधीमंडळाची "विषेश अनुमती" लागते (म्हणजे हजर सदस्यांचे २/३ बहुमत शिवाय एकूण सदनसदस्यांचा १/२ पाठिंबा). भारतात केवळ एकदा असा अयशस्वी प्रयत्न झाला आहे.

याशिवाय न्यायालयांना आर्थिक स्वायत्तता दिली आहे. न्यायाधिश व न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या पगारांना विधीमंडळाची अथवा प्रशासकांच्या अनुमतीची गरज नाहि. (आणि याचमुळे माहिती अधिकाराखाली नुकताच झालेला न्यायाधिशांची संपत्ती जाहिर करण्याचा वाद ताजा आहे).

=============
समांतर अवांतर:
१९९१ मधे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांना निष्कासीत करण्यासाठीचे आतापर्यंतचे एकमेव विधेयक १०८ लोकप्रतिनिधीच्या सहिनिशी मांडले गेले होते. न्यायमुर्ती रामस्वामी जेव्हा पंजाब हायकोर्टाचे न्यायाधिश होते तेव्हा त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यावर नेमलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने रामस्वामी यांना "स्वतःच्या पदाचा हेतु:पुर्वक आणि अशाघ्य वापर केल्याच्या तसेच सार्वजनिक पैशाचा वैयक्तीक उपयोग करण्यासंबंधी (मॉरली) दोषी" करार दिला होता.
या कमिटीच्या निर्णयानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाहि आनि त्यांच्या विरुद्धचे विधेयक संसदेपुढे मांडले गेले.
या वेळी संसदेत उपस्थित सदस्यांचे २/३ बहुमत प्राप्त तर झाले मात्र काँग्रेसपक्षाने सभात्याग केला असल्याने एकूण संसदसदस्यांच्या १/२ मत प्राप्त न झाल्याने हे विधेयक फेटाळले गेले
===============

न्यायसंस्थेची रचना:
भारतीय घटनेमधे भारताला एकमेव व एकसंध न्यायव्यवस्था प्रदान केली आहे. काहि इतर संघराज्यांप्रमाणे राष्ट्रीय न्यायालयाची (स्टेट कोर्ट्स्) संकल्पना भारतीय घटनेत नाहि. भारतीय न्यायव्यवस्थेचे रूप पिरॅमिडसारखे आहे, ज्यात सर्वोच्च न्यायालय सर्वात वरती आहे.

सर्वोच्च न्यायालयः
या कोर्टांतील बरेचसे अधिकार वर विषद केले आहेत. तुर्तास (विस्तारभयाने) केवळ सर्वोच्च न्यायालयाकडे पाहु. भारतीय सर्वोच्च न्यायालयाला जगातील एक अतिशय शक्तीशाली न्यायालय म्हणून बघितले जाते. सर्वोच्च न्यायालयाची शक्ती अनन्यसाधारण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र संपूर्ण बहरत देश आहे. भारतातील सर्व संस्था, व्यक्ती, मंडळे, सरकारे तसेच सर्व न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतीम मानला जातो (अपवाद मृत्यूदंड). सर्वोच्च न्यायालयाचे काहि प्रमुख अधिकारक्षेत्रे पुढीलप्रमाणे:
(ओरिजिनल): या अधिकारात काहि प्रकरणे थेट सर्वोच्च न्यायालयात चालवता येतात. साधारणतः या विभागात, आंतरराज्य तंटे, राज्य व केंद्र सरकारांतील तंटे वगैरे येतात
(अ‍ॅपेलेट): या अधिकारक्षेत्रात इतर कोर्टातील प्रकरणांवर आपील करता येते
(अ‍ॅडवायजरी): यात राष्ट्रपतींना काहि सार्वजनिक प्रश्नांवर कायद्याच्या दृष्टीने सल्ला देण्याचा अधिकार येतो.
(रिट): यात विविध मुलभूत अधिकारासंबंधी तंटे, तसेच हिबीयस कॉर्पस, वॉरंटस् वगैरे प्रकरणांवरील सुनावणीचा हक्क येतो.

जनहित याचिका:
भारतीय न्यायालयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे "जनहित याचिका". या न्यायिक चळवळीमुळे न्यायालये आम जनतेच्या अधिक जवळ आली असे म्हटले जाते. १९७९ पर्यंत कोर्टांमधे प्रकरण / याचिका दाखल केल्याशिवाय न्याय मिळत नसे. शिवाय याचिकाकर्ता केवळ स्वतःसाठी याचिका दाखल करू शकत असे. पण १९७९साली कोर्टाने हा प्रकार बदलून न्याय देताना अन्याय होणार्‍याच्या वतीने इतरांनी/इतर व्यक्तीने याचिका दाखल करण्यास अनुमती दिली.
आणि हा प्रकार भारतीय न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढवणारा ठरला. आता स्वतःचेच नव्हे तर व्यापक समाजावर होणार्‍या अन्यायासाठी एखादी व्यक्ती/ संस्था/ समाजसेवक जनहित याचिका दाखल करू शकत होता. याबाबतीत बंधुआ मुक्ती मोर्चा वि. भारतीय गणराज्य, १९८४ या याचिकेच्या निकालातील न्यायमुर्ती भगवतींच्या शब्दात सांगायचं तर (स्वैर भाषांतर) "गरीबांचे प्रश्न हे बाकी समाजापेक्षा पूर्ण वेगळे आहे. आणि नेहमीच्या गदारोळात त्यांच्या प्रश्नांकडे कोर्टाचे दुर्लक्ष होऊ शकते. अश्यावेळी ज्यांना स्वतःच्या मुलभूत अधिकारांची कल्पनाच नाहि त्यांच्याकडून त्याच्या अंमलबजावणीचा हट्ट कसा अपेक्षित ठेवणार? तेव्हा ज्यांना स्वतःच्या मुलभुत अधिकारांसाठी लढण्याची जाण / कुवत नाहि त्यांच्यासाठी जनहित याचिका हा न्यायासाठीचा राजमार्ग आहे."

=================
समांतर अवांतरः
जनहित याचिकांमागे कारण होतं, १९७९ मधे भारतीय कैंदेमधे असलेले कित्येक कैदि त्यांच्या मिळू शकणार्‍या शिक्षेपेक्षा कितीतरी अधिक काळ खितपत पडले होते ही वृत्तपत्रात आलेली बातमी. कैद्यांच्या मूलभूत अधिकारांच्या पायामल्लीची ही बातमीच उच्च न्यायालयाने व पुढे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली व नवा पायंडा पाडला
===================

याच जनहित याचिकेचा तोटा देखील न्याय व्यवस्थेला भोगावा लागत आहे.
१. यामुळे एकूणच याचिकांचे प्रमाणे भरपूर वाढले आहे. त्यामुळे न्यायालयांवरचा ताण कित्येक पटिंनी वाढला आहे.
२. यामुळे न्यायालये आणि प्रशासन यांच्या अधिकारांची सीमारेषा धुसर होत चालली आहे. काहि ठिकाणी न्यायालयेच प्रशासनाने घ्यायचे निर्णय आदेशाच्या रुपात देत आहे. त्यामुळे जनतेचे राज्य ह्या संकल्पनेलाच धोका पोहोचेल का हा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे एकेकाळी प्रॉपर्टी अ‍ॅक्टवरून सूरू झालेली "विधीमंडळे व प्रशासन" वि. न्यायालये ही लढाई अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. १९७३ साली केसवानंद भारती खटल्यात जरी न्यायालयाने हा प्रश्न तत्त्वतः सोडवला असला (विस्तारभयाने हा रोचक भाग प्रतिसादात देईन) तरी जनहित याचिकांमुळे हा प्रश्न सतत उठत राहिल हे निश्चित.

या विषयावर लिहिण्यासारखं बरंच आहे. प्रशासन व न्यायालयांतील वाद, पैसे चारून साक्ष देणे/फिरवणे व त्या द्वारे धनिकांना मिळणारा न्याय, वकिलांच्या ताब्यात असलेले याचिकाकर्ते व त्यामुळे न्यायास होणारा उशीर वगैरे बाजू देखील जमिनीवरील सत्यपरिस्थिती आहे. इतके असूनही भारतीय जनतेने न्यायालयांवर अजूनही विश्वास दाखवला आहे व तो वाढतो आहे असे मात्र शेवटी नमुद करावेसे वाटते.

ऋषिकेशा,

1

ऋषिकेशा,
'डार्केस्ट अवर'बद्दल लिही ना. विशेष म्हणजे ज्या पी. एन. भगवतींना आपण जनहित याचिकांचं श्रेय देऊ शकतो तेच त्या 'डार्केस्ट अवर'मधल्या निकालात 'डार्क' साईडला होते. यशवंतराव चंद्रचुडांसमवेत. रे आणि बेग हे इतर दोघं. हंसराज खन्ना अल्पमती विरोधात.
केशवानंद भारती खटल्याच्या निकालाचे वर्णन आणखी वेगळ्या शब्दांत समर्पकपणे करता येईल - भारतीय घटनेचा मूळ आकृतीबंध (बेसीक स्ट्रक्चर) बदलता येणार नाही, असा या निकालाचा अर्थ आहे.
पुढच्या काळात मात्र हे सारे असेच राहिले आहे का असा प्रश्न निर्माण होण्यासारखे निकाल आणि मतप्रदर्शने झाली आहेत हा भाग वेगळा.

सहमत

2

डार्केस्ट अवर अर्थात आणिबाणी खटल्याबद्दल म्हणा, केशवानंद खटल्याबद्दल म्हणा लिहायचे मनात होतेच (केशवानंदचा उल्लेख शेवटी केला आहेच).. फक्त लेखात अनेकदा कंसात म्हटल्याप्रमाणे हा भाग कितीही रोचक असला तरीही मुळ लेखाचा जो उद्देश आहे त्याला अवांतर झाले असते व लेखाचा विस्तार खूप झाला असता.. त्यामुळे मुळ लेखात टाकलेले नाहि.

मात्र सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक चुका व काहि ऐतिहासिक निर्णय यावर एखादा वेगळा लेख/विस्तृत प्रतिसाद टाकेन (फक्त बाकी आठवड्यात टंकायला फारसा वेळ मिळेनासा झालाय सध्या Sad )

जाता जाता: याच आठवड्यात एक अजून महत्त्वपूर्ण निकाल आला ज्यात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती न दिल्यास भरायचे रु.२५००० हे माहिती आयुक्तांच्या मर्जीने नव्हे तर सक्तीचे आहेत. कारण माहिती मागणारा पैसे भरून माहितीची मागणी करतो त्या न्यायाने तो माहितीचा ग्राहक झाला व त्याला माहिती वेळेत न मिळाल्यास दिवसाला क्ष (रक्कम विसरलो) या प्रमाणे जास्तीतजास्त रु.२५००० मिळालेच पाहिजेत असा निर्णय आहे. माहिती अधिकाराला शस्त्र म्हणून वापरणार्‍या सामाजिक कार्यकर्तांना दिलासा आहेच त्यापेक्षा माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीला अधिक सोपे करणारा निर्णय आहे. याचे दूरगामी परिणाम दिसतील असा कयास आहे.


-ऋ

जरूर

3

जरूर लिही. इथंच लिहावं, असं माझं म्हणणं नाहीच. स्वतंत्र लिही. वाट पाहतोय.

माहितीपूर्ण

4

लेख आवडला.

जनहित याचिकेसारखे इतर देशांत काही वेगळे कायदे असतील का?
खूपच चांगली माहिती मिळाली.

छान लेख व मालिका

5

मालिकेतले सगळे लेख वाचलेले नाहीत, गेले दोन तीन वाचलेले आहेत. अतिशय मोजक्या शब्दात जनतेचे अधिकार व ती राबवणारी सरकारी यंत्रणा यांचं स्वरूप काय असावं याचा आराखडा मांडणाऱ्या घटनेचं वर्णन आहे. प्रत्यक्षात त्या यंत्रणेचा वापर कसा होतो ही गोष्ट वेगळी.
तुम्ही घटनेचं सम्यक वर्णन केलेलं आहे. तिचा भल्यासाठी उपयोग, मूळच्या अपेक्षांची आत्तापर्यंत झालेली पूर्ती किंवा त्यातील कमतरता, न्यायसंस्थेने दिलेले ऐतिहासिक निर्णय याविषयीही वाचायला आवडेल.

उत्तम

6

हाही लेख उत्तम.

जनता न्यायालये (काही किरकोळ व प्रलंबीत खटले लवकर निकाली काढण्याकरता) किंवा काही खटल्यात जलद प्रक्रिया होण्याकरता जलद का द्र्तगती न्यायालये असा पण प्रकार ऐकला आहे ते काय असते?

जबरा !! बारकावे टिपल्यामुळे

7

जबरा !! बारकावे टिपल्यामुळे लिखाणमाला अजुनच वाचनीय झालीये ....ऋषीकेश ...माझा प्रश्न ...सध्याच्या जो माहिती अधिकार कायदा आहे त्याचे पालन न्यायालयाकडुनच योग्य तर्‍हेने न झाल्यास जनहित याचिका वापरता येते का ?

अतिशय उत्तम अशी लेखमाला चालू

8

अतिशय उत्तम अशी लेखमाला चालू आहे, पुढील भाग लवकर लिही रे केशा.. वाचतो आहे..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खरच मस्त ..

9

ऋषिकेश,
मस्त वाटतेय इतक्या सोप्या भाषेत वाचायला .. ह्याबद्दल वाचलेले .. नागरीकशास्त्राच्या पुस्तकात लहानपणी हास्य

राजे, याचं पण पुस्तक करा तयार हास्य

आभार आणि उत्तरे

10

सर्वप्रथम सर्व वाचकांचे आभार. प्रतिसाद देणार्‍यांचे विषेश आभार.. त्यामुळेच तर अश्या काहिश्या रुक्ष वाटणार्‍या विषयावर लिहायला हुरूप येतो.
आज थोडा एकगठ्ठा वेळ असल्याने माझ्या परिने काहि प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहे. मात्र यामुळे धागा वर येत आहे त्याबद्दल क्षमस्व


खटल्यात जलद प्रक्रिया होण्याकरता जलद का द्र्तगती न्यायालये असा पण प्रकार ऐकला आहे ते काय असते?


भारतीय न्यायालयांची व्याप्ती प्रचंड आहेच, त्यात जनहित याचिकांसारख्या याचिकांमुळे न्यायालयाचे काम प्रचंड वाढले आहे. एकूणच न्यायप्रविष्ट प्रकरणे व त्यावर न्यायदानासाठी लागणारे न्यायाधिश / वकीलच नव्हे तर इतर प्रशिक्षित कर्मचारीवर्गाचे प्रमाण व्यस्त आहे.

न्यायदानाच्या काहिश्या किचकट प्रक्रियेत काहि प्रक्रिया खरोखरच वेळकाढू असल्या तरी काहि प्रक्रिया जाणीवपूर्वक/मुद्दाम व्यावसायिक / आर्थिक कारणांमुळे वेळ खाणार्‍या प्रक्रिया तयार केल्या आहेत. यावर सरकारने ४५० दृतगती न्यायालये प्रायोगिक तत्त्वांवर चालु केली होती. प्रयोग यशस्वी झाल्यावर आज जवळ जवळ २०००+ अशी न्यायालये आहेत.

या कोर्टात छोटी ते मधम स्वरूपाची प्रकरणे दाखल करता येतात. केस दाखल केल्यावर एका वर्षाच्या आत उभी राहणे बंधन कारक असते. शिवाय यात न्यायालयांना दरमहा १४ सेशन्स खटले किंवा २०/२५ क्रिमिनल / सिविल खटल्यांना संपवणे बंधनकारक असते. याचा उपयोग केवळ नागरीकांनाच नाहि तर सरकारला होतो. कारण त्यामुळे तुरूंगावर येणारा ताण खूप कमी होत आहे.

अधिक माहिती इथे मिळेल

सध्याच्या जो माहिती अधिकार कायदा आहे त्याचे पालन न्यायालयाकडुनच योग्य तर्‍हेने न झाल्यास जनहित याचिका वापरता येते का ?

याबाबत निश्चित माहिती शोधूनहि मिळाली नाहि. मात्र माझ्या त्रोटक माहितीनूसार उत्तर देतो (पुढील माहिती पडताळलेली नाहि याची नोंद घ्यावी)
जर मागितलेली महिती दिली गेली नाहि तर संबंधित माहिती आयुक्तांकडे तक्रार करता येते. तिथेही उत्तर मिळाले नाहि तर माहिती मागणार्‍या व्यक्तीला/संस्थेला न्यायालयात जाता येते.. मात्र जनहित याचिकेमागे याहून व्यापक अर्थ आहे.

समजा उद्या क्ष ने काहि माहिती मागूनही, सार्‍या प्रक्रीयेनंतरही मिळाली नाहि, तर त्याला कोर्टात केस करता येते .. मात्र ती जनहित याचिका नसेल. (मात्र त्या एका प्रकरणात दिलेला निकाल इतर न्यायदानावेळी रेफर करता येतोच). मात्र एखाद्या माहितीला माहिती अधिकाराअंतर्गत वर्गीकृतच केले नसेल किंवा त्याबाबत संभ्रम असेल किंवा न्यायालयाने असे वर्गिकरण मानण्यास नकार दिला तर त्यावरील न्यायालयात जनहित याचिके स्वारे आपिल करता यावे.

सध्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांच्या माहितिचे प्रकरण खुद्द सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. ती जनहित याचिकाच आहे.


जनहित याचिकेसारखे इतर देशांत काही वेगळे कायदे असतील का?


तूर्तास कल्पना नाहि. कोणाला माहित असल्यास वाचायला आवडेल.


-ऋ

दुव्याबद्दल धन्यु

11

धन्यु ऋ.

सुरेख लेखमाला चालु आहे...

12

सुरेख लेखमाला चालु आहे...

वाचत आहे.

13

वाचत आहे.

जनहित याचिका

14

या वर अ‍ॅड शिंत्रे यांचे कालच वसंत व्याखानामालेत व्याखान झाले . बसल्या बसल्या रेकॉर्डिंग केले आहे. टाकतोच आता


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मी लेखाचे प्रिंन्ट काढून घेऊ

15

मी लेखाचे प्रिंन्ट काढून घेऊ शकते का ?
सर्व लेखांचे एकत्र प्रिन्ट कसे काढावे ?

प्रिंट काढू शकता. सर्व

16

प्रिंट काढू शकता.
सर्व लेखांचे एकत्र प्रिंट काढण्याची सुविधा फक्त ई-पुस्तक विभागात आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."