मैफल (फोटूंसहित)

0
0

शीर्षकावरून एखाद्या गाण्याच्या मैफलीबद्दल वाचायला मिळेल असे वाटले ना? नाही तसे काही नाही. गाण्याचे आपले ऋणानुबंध छान जुळले असले तरी सूर एवढे जुळलेले नाहीत की अधिकाराने त्यावर काही लिहावे.

आज सकाळीच वपुंच्या महोत्सव मधील जिंदादिल माणसाची आठवण आली. आयुष्यातील छोट्या छोट्या आनंद साजरा करणारा, आपल्या आनंदाच्या झाडाची चार फुले इतरांच्या अंगणातही पडावीत म्हणून त्या अनुभवाला कोणाबरोबर तरी शेअर करणारा साधासुधा माणूस. एक दिवस वपुंना घेऊन चहा पाजायला घेऊन गेला 'आजचा आनंद' साजरा करण्यासाठी; आनंद कुठला तर भर रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात आपली तहान भागवणार्‍या मांजराच्या पिलाचे पाणी पिऊन होईपर्यंत थांबून राहणारा एक कारवाला दिसला म्हणून. म्हटले आपण इतके संवेदनशील तर नाही पण निदान आजची मैफल जी फक्त आपल्याला अनुभवायला मिळाली तिचा आनंद तरी शेअर करूया. आणि शेअर करायला मीमकरांइतके हक्काचे लोक कुठे मिळणार, नाही का?

आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे पहाटे ८ वाजता उठून आम्ही चहा आणि वर्तमानपत्राचा लुफ्त घेत होतो तर परिचित असा 'टीट टीट' आवाज ऐकू आला. खिडकीतून डोके बाहेर काढून समोरच्या वठलेल्या बदामाच्या फांदीवर बसलेल्या त्या आमच्या मित्राला दर्शन दिले आणि सुप्रभात म्हटले. हा आमचा मित्र रोजच भेटतो आम्हाला. सदैव वटवट करीत असल्याने त्याचे नावच मुळी 'वटवट्या' (Ashy Wren Warbler) ठेवले गेले आहे. याशिवाय शेंडीवाला बुलबुल (Red Whiskered Bulbul), ठणठणीत तब्येतीचे भारद्वाज हे ही रोजचेच.

From Birds

या शेंडीवाल्याच्या घरट्यात डोकावण्याचा प्रमादाबद्दल डोक्यावर याच्या चोचीचे फटकारेही खाल्ले आहेत एकदा.

पण आज मात्र पूर्ण मैफल होती. पहिला जास्वंदीच्या झाडावर भेटला तो इटुकला पिटुकला "शिंजीर", झळझळीत चॉकलेटी पाठ नि पिवळे-पांढरे पोट, चोच किंचित पुढे वाकलेली. त्या चोचीचा उपयोग उलटे लटकून फुलातून रसपान करताना नेमका कोन साधण्यासाठी होतो. त्याच्या बरोबर तसाच पिटुकला (अगदी नवजात बालकाच्या मुठीइतका छोटा) "फुलचूष" (Flower-pecker) आणि त्याचा जोडीला चक्क आज "बया"बाई पण होत्या. हे दोन पक्षी आमच्या जुन्या घरी नेहमी भेटायचे. तिथे पुढे आणि मागे पाऊलभर जमिनीचा तुकडा होता, त्यात मी काही आवडती फुलझाडे लावली होती. कुंपण म्हणून वापरलेल्या कर्दळीच्या फुलांवर या दोघांचा फार जीव. मस्तपैकी उलटे लटकून कर्दळीची कोवळी फुले खाणे ही त्यांच्या सुखाची परमकल्पना असावी.

From Birds

हा शिंजीर.

From Birds

हा फुलचूष नाही पण त्याचा भाईबंद असलेला जांभळा सूर्यपक्षी (purple sunbird)

तिथे शेंडीवाल्या बुलबुलाचा भाईबंद असलेला 'शिपाई बुलबुल' (Sipahi Bulbul) हा ही दर्शन द्यायचा. पण गेल्या काही वर्षात याचे दर्शन झालेले नाही. (आणखी तिसरा प्रकार हा हिरव्या बुलबुलचा, जो एकदोनदा दिसला, पण फार दोस्ती झाली नाही). आता नव्या घरी (फ्लॅट असल्याने) झाडे लावणे वगैरे इल्ले. पण सुदैवाने मागच्या इमारतीमध्ये खास जागा ठेवून झाडे लावल्यामुळे ह्या आमच्या मित्रमंडळीची सोय झाली आहे.

हे दोन दोस्त भेटले म्हणून खूष होतोय तर पलिकडच्या सुबाभूळाच्या झाडावर मि. टीट (Tit) यांनी दर्शन दिले त्यांच्या पलिकडे वरच्या फांदीवर श्री दयाळ (Magpie Robin) यांनी 'ट्विट' करून आपणही आले असल्याची वर्दी दिली. टीट हा शिंजिरापेक्षा थोडा मोठा, करड्या रंगाचा पक्षी, याची ओळख म्हणजे साहेबांचे दोन्ही गाल हे अगदी खास पावडर लावल्याप्रमाणे पांढरे, त्यावर डोळ्यावर भुवईप्रमाणे दिसणारी जाडसर काळी रेघ. या रेघेमुळे साहेबांचा चेहरा उगीचच जरा रागीट दिसतो.

From Birds
From Birds

दयाळ आणि त्याचा भाऊ.

श्री दयाळ हे तुलनेने प्रेमळ, सुरेख तजेलदार निळा रंग, त्यातून दोन्ही पंखाखाली निघणारी पांढरी रेघ; एखाद्या ऐटबाज पण गततारूण्य सौदर्यवतीच्या सौंदर्यावर वयाची मोहोर उठविणार्‍या पांढर्‍या बटेची आठवण करून देणारी. याचा एक भाईबंद आहे त्याचे मराठी नाव आत्ता आठवत नाही पण इंग्रजी नाव Indian Robin, हा जरा तुलनेने गरीब पक्षी, मळकट राखाडी रंगाचा नि बुडाखाली बुलबुलसारखा पण अगदी फिकट भगव्या रंगाचा पॅच असलेला. हे दोन्ही रॉबिन ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे क्रिकेट्च्या बॅट्चा दांडा जसा मूळ भागाला वेगळा चिकटवलेला असतो तशी चिकटवल्यासारखी दिसणारी शेपूट, जी सतत वरखाली हलत असते. वर उल्लेख केलेले शिंजीर, वटवट्या हे देखील याच शेपूटहलव्या पंथाचे.

याशिवाय अतिपरिचयात् अवज्ञा झाल्याने दुर्लक्ष झालेल्या आणि मधे अचानक गायब झाल्याने चर्चेत आलेल्या चिमण्याही अनेक दिवसांनंतर दिसल्या. आश्चर्य म्हणजे आज त्यांच्यावर वृद्धत्वाची कळा दिसली. आमच्या लहानपणी वचवच करून डोके उठविणार्‍या नि सतत कार्यमग्न दिसणार्‍या तजेलदार चितकबर्‍या रंगाच्या या बाया आज उदासवाण्या दिसल्या. बिलकुल आवाज न करता अतिशय संथपणे त्यांचे खाणे शोधणे चालू होते. रंग देखील जाणवण्याइतपत फिकट होता, ह्या त्याच का अशी शंका घ्यावी इतका. काय झाले यांना कुणास ठाऊक.

From Birds

हा हॉर्नबिल ऊर्फ शिंगचोच्या.

ही मैफल आज रंगलेली. पण मैफलीचे काही उस्ताद आज भेटले नाहीत. पण काही वळणावर त्यांनि दर्शन दिले आहे. यात ठिपक्यांचा मुनिया, फक्त त्यांच्या प्रवासाच्या मोसमात दिसणार्‍या गुलाबी रंगाच्या भोरड्या (आमच्या आजूबाजूचे प्लॉट रिकामे होते तेव्हा तेथील झुडपांवर दिसायच्या, आता त्या जागी काँक्रीटचे जंगल झाल्यानंतर कधी दिसल्या नाहीत), सदैव ट्रॅक ट्रॅक करीत राहणार्‍या सातबाया (किंवा सातभाई/बैरागी. खरेतर वटवट करीत असल्याने सातबाया हे नाव अधिक समर्पक आहे. हास्य ), पुणे विद्यापीठात दिनचर्या चुकून सकाळी ८ वा. दर्शन दिलेले "शृंगी" घुबड (याने एखाद्या भोचक म्हातारीप्रमाणे मान आधी आडवी हलवून मग पुढे झुकवून माझ्याकडे नीट पाहून घेतले, काय ऐट होती लेकाची) पुणे विद्यापीठाच्या जुन्या कँटिनसमोरच्या 'अ‍ॅलिस पार्क' मधील अजस्र झाडांवर भेटलेला "शिंगचोच्या" (hornbill), बयेच्या खोप्यातून तिची अंडी पळवून गट्ट करताना पाहिलेला "टकाचोर" हे काही मैफलीतील सोबती, कुठेतरी भेटतात, जुन्या आठवणी जागवतात. मग मी ही अशी मैफल जिवाभावाच्या मित्रांबरोबर साजरी करतो.

(ऋणनिर्देशः दयाळाचा सोडून इतर सर्व फोटो "http://www.cse.iitk.ac.in/~amit/birds" इथून साभार. दयाळाचा फोटो विकीवरून)

क्या बात है रामभाऊ!!! छानच

1

क्या बात है रामभाऊ!!! छानच की... फोटू पण टाका ना.

क्या बात है!

2

सुरेख लेख. (पीजे वार्निंग) तुमच्या लिसनिंगच्या कौशल्याला 'हिअर, हिअर!' अशी दाद द्यावीशी वाटते. (/पीजे वार्निंग)

क्या बात है! सुरेख लेख.

3

असेच म्हणतो.


-Nile

वो हो क्या बात है!!!!

4

वो हो क्या बात है!!!!

अहा..

5

मैफल मस्तच.. बिपिन म्हणतो तसे फटूही टाकलेत तर अजूनच छान!
स्वाती

क्या बात क्या बात क्या बात

6

ररा मैफील सहीच!!

बाकी बिका म्हणाले तसेच. अगदी एखादा फोटो शेवटी टाकला असतात तरी मैफिल अजुन एका उंचीवर पोहोचली असती.

+१

7

असेच बोल्तो

आता कसं..

8

आता कसं, मैफल खरी सजली आहे, मस्त फोटो!!
स्वाती

+१

9

अगदी!

सुपर्ब!

फटु झकास

10

फटु झकास हास्य

खरेच सुंदर फोटो व लेखन.

11

खरेच सुंदर फोटो व लेखन.

मस्त फोटो आणि लेखनही.....

12

मस्त फोटो आणि लेखनही..... हास्य

जबरदस्त लेख आहे. अजून येवू

13

जबरदस्त लेख आहे. अजून येवू द्या.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लिहीत रहा...!

14

मस्तच मैफल...

मस्त रे रामभौ, लेख आणि कलाकार

15

मस्त रे रामभौ,
लेख आणि कलाकार उत्तम.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

राम्भाउ

16

मस्तच की हो.

मस्त

17

मस्त

झक्कास! रामभाऊ, बरं झालं हा

18

झक्कास! रामभाऊ, बरं झालं हा लेख स्वस्थपणे वाचण्यासाठी ठेवून दिला होता ते!!

मागे काही दिवस सकाळी लवकर उठून जॉगिंगला जात होते तेव्हा विद्यापीठातच आयुकाच्या मागच्या बाजूला यातले काही कलाकार दिसायचे. पण मैफिल ऐकण्यापेक्षा आणि फोटो काढण्यापेक्षा जास्त भर तब्येतीवर असल्यामुळे काय घालवलं हे आत्ता कळत आहे. सोमवारपासून पिटुकला कॅमेरा घेऊन जॉगिंगला सुरूवात केली पाहिजे.

हम्म

19

तसं असेल तर तुम्ही आणखी एक महोत्सव मिसला/मिसत आहात असे दिसते. फेब्रुवारी-मे हा विद्यापीठात फुलांच्या महोत्सवाचा काळ असतो. सर्वात प्रथम मुख्य इमारतीसमोरील जमिनीच्या तुकड्यावर लावलेली छोटी फुलझाडे फुलतात. तिथे जांभळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या पिटुकल्या फुलांचा गालिचाच पसरल्यासारखे दिसते. मग फुलते ती शाल्मली, निष्पर्ण झाडावर गर्द लाल किंवा गुलाबी रंगाची मोठी मोठी फुले आणि त्यावर रसपानासाठी येणारे झाडून सारे पक्षी, अगदी कावळ्यासकट. मग पळस-पांगारा फुलतात. नमस्काराला जोडलेल्या हाताच्या ओंजळीसारखे फूल, लालभडक रंगाचे. त्यांनंतर फुलतो शिरीष आणि पर्जन्यवृक्ष (यांच्यात काय फरक आहे मला माहित नाही, फुलांच्या रंगावरून/टेक्स्चर वरून मी फरक करतो). नवरदेवाच्या पगडीवरील तुर्‍यासारख्या गुलाबी फुलांनी भरून गेलेला हा अजस्र वृक्ष खर्‍या अर्थाने राजा म्हणता येईल (शिरीष अजूनही फुललेले आहेत). पर्जन्यवृक्षानंतर येतो तो अग्निवृक्ष अर्थात 'गुलमोहर' आणि त्याचा मवाळ भाऊ म्हणजे 'नीलमोहर' (हा खरेतर बहाव्याचा भाऊबंद पण आपण नावाने त्याला गुलमोहराशी जोड्ला आहे) आणि त्याबरोबर सोनेरी पाऊस पडत असल्याचा भास होणार बहावा.

आता आठवले तसे लिहिले, एखाद-दोन झाडे/वृक्ष विसरलो असेन. याशिवाय मला ओळखू न येणारे, किंवा भारतीय नसलेले असे काही वृक्ष्/झाडे असतील. एकूण हा काळ म्हणजे विद्यापीठातील 'मज्जानु लाईफ'. सध्या शिरीष, गुलमोहर, बहावा, - कदाचित पळस ही - यांचा लुफ्त तुम्हाला घेता येईल. फटू काढले तर आमच्यासाठी इथे टाका.

भारी

20

मस्त फोटो आहेत.

दयाळ पक्षी पाहून लहानपणी वाचलेल्या 'दयाळ पक्ष्याचे घरटे' असे काहीसे नाव असलेल्या गोष्टीची आठवण झाली.

हॉर्नबिल अगदी म्हातारा पक्षी दिसतो आहे.

सहमत

21

हॉर्नबिल अगदी म्हातारा पक्षी दिसतो आहे.
हास्य हॉर्नबिल हा Bombay Natural History Society (BNHS) चे बोधचिन्ह म्हणून वापरला गेला आहे तेव्हा छान राजबिंडा पक्षी असेल असा माझा समज होता. प्रथम पाहिला तेव्हा तुमच्यासारखीच प्रतिक्रिया झाली होती माझी.

हॉर्नबिल हा जगभरात वेगवेगळ्या

22

हॉर्नबिल हा जगभरात वेगवेगळ्या रूपात आढळतो. शिंगचोच्या हे त्याच्या अनेक प्रजातींपैकी एक. अर्थात भारतात शाधारणतः हाच आढळतो. मात्र आता अंदमानला पुढील चित्रातल्या सारखा हॉर्नबिलही बघायला मिळाला (चित्र आंतरजालावरून साभार)
Hornbill

बाकी वेगवेगळया प्रजातींच्या चित्रे व माहितिसाठीविकी जिंदाबाद


-ऋ

वा

23

हा हॉर्नबिल तुलनेने मोठ्या आकाराचा. मी जो फोटो दिला आहे - आणि जो BNHS चे बोधचिन्ह म्हणून विराजमान आहे - तो ग्रे हॉर्नबिल. वर बुलबुलचे तीन प्रजातींचा उल्लेख केला आहे. याव्यतिरिक्त एक लालबुड्या (Red Vented) असतो. या एकाच गटातील पक्षी वेगवेगळे ओळखणे हा सरावाचा आणि आनंदाचा भाग आहे.

बरोबर.. लालबुड्याचे बुडच केवळ

24

बरोबर.. लालबुड्याचे बुडच केवळ लाल असते.. तर लालगा (लालगाल्या .. लालगा हे कोकणातले नाव) चा गाल व बुड दोन्ही लाल असते.. शिवाय लालगा ला तुरा पण असतो हास्य (तुम्हि लेखात फोटो दिला आहे तो लालगा)

या एकाच गटातील पक्षी वेगवेगळे ओळखणे हा सरावाचा आणि आनंदाचा भाग आहे.

अगदी बरोबर.. असा आनंद दिर्घकाळ टिकतो हा स्वानुभव आहे

बाकी मगाशी प्रतिसाद लिहिताना हॉर्नबिलचे भारतीय नाव आठवत नव्हते.. ते आता हुडकले आहे.. ते "धनेश" असे नाव आहे. वरचा मी दिलेला फोटो मलबारी धनेशचा आहे. (संदर्भः भारतीय पक्षी: सलीम अली)


-ऋ

बरोबर

25

म्हणून ग्रे हॉर्नबिल हा 'राखी धनेश' म्हणून पण ओळखला जातो. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर 'धनेश' हे नाव एखाद्या गरूडासारख्या राजबिंड्या पक्षाला शोभते असे मला वाटते. हा गडी जरा गावरान आहे, म्हणून 'शिंगचोच्या'च बरे वाटते.
(अवांतरः आपल्याकडे 'चोच्या' लोक बरेचदा दिसतात, त्यात एखादा 'शिंगचोच्या' आहे का? हास्य )

अवांतर

26
अवांतरः आपल्याकडे 'चोच्या' लोक बरेचदा दिसतात, त्यात एखादा 'शिंगचोच्या' आहे का?

डोक्यावर शिंगं फुटल्यागत चोची मारणारे बरेच जण आहेत. त्यांना शिंगचोच्या म्हटलं तर चालेल काय?

सहमत

27

डोक्यावर शिंगं फुटल्यागत चोची मारणारे बरेच जण आहेत. त्यांना शिंगचोच्या म्हटलं तर चालेल काय?
एकदम सही व्युप्तत्ती श्रामो.

आता पाहिल्यावर

28

पक्षी ओळखता येतीलच अशी खात्री नाही तरीही मैफल ऐकायची इच्छा झालिये. मस्तच झालाय लेख!
"चितकब-या" रंगाच्या चिमण्या ह्यातला "चितकबरा(?)" रंग ह तुमचा शब्द का?

नाही

29

चितकबरा हा शद्ब माझा नाही. राखाडी+काळा अशा कुठल्याही pattern ला चितकबरा म्हटले जाते. चितमपल्लींच्या पुस्तकात याचा उल्लेख बरेचदा येतो. हा विदर्भातील जंगलवासींच्या एखाद्या बोलीभाषेतील शद्ब असावा.

वा वा वा!

30

मुंबईत आमच्या घराभोवती अजूनहि बर्‍यापैकी झाडे शिल्लक असल्याने दयाळ, भारद्वाज, बुलबुल, चिमण्या, मैना, कोकीळ, तांबट, पोपट, २-३ प्रकारचे बगळे नेहमी दिसत असतात. सुगीच्या हंगामात पूर्वी घराच्या खिडकीच्या बरोब्बर समोरच्या झाडावर नाचण पक्षी घरटं बांधायचा (वाईन ग्लासच्या आकाराचं सुरेख घरटं).. शिवाय खंड्या, करकोचे, हळद्या वगैरे पक्षी अजूनही मधुनच दर्शन देतात.

त्यांना आवाज काढताना 'पाहण्यासाठी' मी कितितरि वेळा त्यांच्याकडे बराच वेळ बघत बसतो. मात्र क्यामेरा नेहमीचा पॉइंट-अ‍ॅंड-शूट असल्याने फोटो कधीच काढता आले नाहित. आता तुमचे (म्हणजे तुम्ही काढलेले wink ) सुंदर फोटो बघून एस.एल.आर. घ्यायची इच्छा "क्ष"व्यांदा उफाळून आली आहे.

मैफील सुंदरच.. अजून येऊ द्या


-ऋ

घ्याच

31

एस एल आर.
खुलासा. फोटो मी काढलेले नाहीत. लेखाच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरून घेतले आहेत. माझा एस. एल. आर चार वर्षे डब्यात पडून आहे. Sad

फोटो नाहीत पण याच विषयासदर्भात ......

32

यंदाच्या भीषण उन्हाळी वातावरणात अचानक गुलाबपाण्याचा अंगावर शिडकावा झाल्यावर जी प्रसन्नता अगदी सहजगत्या येते तोच अनुभव आपले या अतिशय सुंदर विषयावरील लेखन वाचताना वाटले. त्यातही फोटो दिले असल्यामुळे त्या गुलाबपाण्याला परत परत हवीहवीशी वाटणारी जी झालर प्राप्त झाली ती केवळ अनुपमेय आहे. मी या क्षेत्रातला अभ्यासक मुळीच नाही पण या ना त्या निमिताने विविध ठिकाणी खूप भटकावे लागत असल्याने डोंगरी भागातून जाताना काही वेळा या पक्षी दुनियेचे अनोखे दर्शन होते व वेळ असल्यास तेथील स्थानिकाकडून या मंडळीविषयी जमेल तशी माहितीही घेता येते. हा लेख वाचल्यानंतर आता मात्र असे वाटते की आपणही सोबत (यानंतर) एक चांगल्या दर्जाचा कॅमेरा घेऊन जाणे अतिशय गरजेचे आहे (कृपया याबाबतीत आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे ~ आय मीन कॅमेरा संदर्भात !)

मालवण/देवगड/कणकवली परिसरात "आचरे" नावाचे छोटेसे बंदर आहे, आजूबाजूला वस्ती विरळ असल्याने असेल कदाचित पण जंगल सदृश्य हवेहवेसे प्रफुल्लीत वातावरण आहे. त्या ठिकाणी दुपारच्या शांत निरभ्र वेळी आंब्याच्या एका डेरेदार झाडावर माझ्यासारखीच अत्यंत आरामात पहुडलेली विलक्षण राखी रंगाची एखाद्या शेठाणी सारखी गुबगुबीत खार पाहिली. खार म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सर्वसामान्यारीत्या जे चित्र येते त्याच्याशी फटकून वागणारी ही खारुताई होती ('खारू' पण म्हणू नये अशी उग्र दिसणारी होती). पोट भरले असल्यामुळे असेल कदाचित, तिची हालचाल अजिबात होत नव्हती, इतकेच नव्हे तर झाडालगतचे माझे अस्तित्व देखील तिने विचारात घेतले नव्हते, जणू काय तिची अपेक्षा अशी असावी कि मीच तिला घाबरून सुरक्षित अंतरावर थांबावे ~~ व तसा थांबलोही होतो. जरा कमी थेट मुन्गुसासारखी दिसणारी ती महामाया पाहून मी हर्षभरित झालो होतो. पोटभर पाहूल घेतले व शेजारच्या ~ तेथून थोडे लांब ~ जागेत बांधकाम चालू होते तेथील कंत्राटदारासारख्या दिसणा-या इसमास त्या खारीविषयी विचारले. अर्थात त्याला त्या खारीचे प्राणिशास्त्रीय नाव माहित असणे शक्य नव्हते (मलाही नाही !), पण त्या भागात अशा खारीना सर्व "रांखार" (की रानखार ?) या नावानेच ओळखतात असे ते गृहस्थ म्हणाले. (खरोखर फोटो काढायला हवा होता).

माझे कुतूहल पाहूल त्याने अशीही सूचना केली, "तुम्हाला बघायचेच असेल तर, असेच पुढे जावा, जरा आत तिथे हरोळी व हळडूची लयी घरे हायती." आता ही हरोळी म्हणजे कोण तसेच हळडू हे कुणाचे नाव आहे हे विचारण्याचा फंदात पडलो नाही, व "असेच पुढे" गेलोदेखील नाही. आता मात्र हळहळ वाटते. चला, परत कधीतरी !


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

पुण्यात?

33

अलिकडं ग्रेस यांचा 'चिमण्यांचा बहिष्कार' या शीर्षकाच्या लेखाचा (चुभूदेघे) अनुभवच सारखा घ्यावा लागतो. अशा काळात ही मैफल अनुभवता येते, यालाच भाग्य म्हणत असावेत.
रामभाऊ, तुम्ही पुण्यात असता ना? हे भाग्य कुठून लुटून आणलंत?
परवा कराडहून शिराळ्याकडं निघालो होतो. त्यावेळी वाटेत एक-दोन ठिकाणी प्रवाह लागले. पाणी होतं. वस्ती जवळपास नाही. तिथं पाचेक मिनिटं थांबल्यावर अनेक पक्षी दिसले. काही सुटे, काही थव्यात. हे असं काही पाहिलं की अनुभवास येणारा ताजेतवानेपणा वेगळाच (खरं तर, तो ताजेतवानेपणा अस्सल असतो, एरवी अनुभवता येत नाही सहजी; म्हणून त्याला वेगळाच म्हणायचं. शब्दांचंही महात्म्य आता असं कमी होत चाललंय)!!!

'चिमण्यांचा बहिष्कार' या

34

'चिमण्यांचा बहिष्कार' या शीर्षकाच्या लेखाचा (चुभूदेघे) अनुभवच सारखा घ्यावा लागतो.
हम्म खरंच ज्यांना आपण गृहित धरतो त्यांच्याकडून दुर्लक्षिले जाणे हा किती हादरवून टाकणारा अनुभव असतो ते ग्रेससारखा माणूसच दाखवू शकतो. सुन्न करणारा लेख.

रामभाऊ, तुम्ही पुण्यात असता ना? हे भाग्य कुठून लुटून आणलंत?
मूळ आवड तर होतीच पण काही काळ केलेले ट्रेकिंग (पुण्याच्या आसपासच) हे एक कारण. भीमाशंकर, राजमाची, विसापूरचे जंगल इथे भटकताना मिळालेली देणगी आहे ही. अर्थात तेव्हा बस/रेल्वे तिकिटाचे पैसे जमविण्याची मारामार असल्याने कॅमेरा वगैरे शक्यच नव्हते. आता कॅमेरा आहे तर त्याचा उपयोग करण्याची संधी मिळत नाही अशी पंचाईत आहे.

आणखी एक म्हणजे मी सिंहगड रस्त्यावर रहायला आलो सुमारे २० वर्षापूर्वी. तेव्हा इथे फारशी वस्ती नव्हती आणि आसपास शेते, झाडे, मोठे वृक्ष भरपूर होते. त्यामुळे पक्षी मुबलक. घराभोवती जेमतेम ८x६ चा तुकडा अंगण म्हणून मिळाला होता त्यात काही झाडे लावली होती. जुईच्या वेलात शेंडीवाल्या बुलबुलाने घरटे केले होते. त्याची दोन पिले तिथे जन्मून उडून गेलेली पाहिली. ज्या दिवशी ते दोघे आमच्या घराच्या फाटकावरून पहिल्याने उडाले तेव्हा मलाच स्वातंत्र्य नव्याने गवसल्याचा आनंद झाला होता. (त्याच्या आई/बापाने एकदा माझ्या भोचकपणाबद्दल माझ्या डोक्यावर चोचींचा प्रसाद दिला होता तरीही). याशिवाय, वट्वट्या, शिंजीर यांचीही घरटी पाहिली, पण त्यांच्या पिलांचे काय झाले नक्की कळले नाही. बुलबुलाची पिले मात्र तीन आठवडे वाढत स्वतंत्र होताना पाहिली.

लिहिते व्हा.

35

@इस्किलार, ऋ, श्रामो: तुमच्या अनुभवांबद्दल आभार. अनुभव छोटे असले म्हणून खोटे असतात असे थोडेच आहे. लेखाच्या सुरवातीला वपुंच्या नायकाचा उल्लेख केला तो जाणीवपूर्वक. इतरांच्या दृष्टीने क्षुल्लक किंवा भाबडी असलेली गोष्ट आपल्यासाठी, लहानशा का होईना पण जपून ठेवण्याजोग्या - क्वचित इतरांबरोबर वाटून घेण्यायोग्य-आनंदाची असेल तर ती गोष्ट आपल्यापुरती श्रेष्ठ असतेच. या लेखानिमित्ताने लिहिलेत तसेच स्वतंत्रपणे लिहा. हीच विनंती इतरांनाही.

चौदा वर्षांपूर्वी...

36

चौदा वर्षांपूर्वी म्हणजे मी अविवाहित असतांना माझ्या घरात ट्युबलाइट्वर एका बुलबुल ने घरटे केले होते. मी त्याच खोलीत झोपत असे व मच्छरदाणी धुणे जरुर होईतो कधीच काढत नसे. केरवारे वगैरे बॅचलर मंडळी जेव्हडे करतात तेव्हडेच. अर्थातच इथे कोणीच रहात नसावे असे बुलबुल जोडीला वाटले असावे. रोज बुलबुल कुटुंबाच्या चिवचिवाटने जाग येई तेव्हा छान वाटे पण रात्रपाळी करुन आल्यावर मला झोपायचे असे अन या बुलबुलांच्या गप्पा जोरात सुरु असत तेव्हा वैताग येत असे. पण मी ते सहन केले, बुलबुलांकरता खिडकी उघडी ठेवावी लागे मग पावसाचे पाणी आत येउन झोपमोड ठरलेली. काही दिवसांनी पिले मोठी झाली, उडून गेली. बुलबुल जोडपे पुन्हा काही आले नाही. माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या तेव्हाच्या भावी पत्नीला मी सांगीतले की माझ्या खोलीत बुलबुल राहतात तर तिला खरे वाटले नाही, नंतर रिकामे घरटे तेव्हढे तिला पहायला मिळाले.
तर असे ते बुलबुल अन ते सुंदर दिवस!! रमताराम तुमच्या लेखाने आज ते दिवस पुन्हा आठवले.

हम्म

37

चांगला अनुभव. बाकी हे बुलबुल इतके सुरेख मंजूळ आवाज काढतात की त्या साल्या चिरकणार्‍या पोपटाचे कौतुक करणार्‍या वेडपटांची कीव करावीशी वाटते. अर्थात झोपमोड करणार्‍या बुलबुलच्या मंजूळ आवाजाचे कौतुक करणे अवघड आहे म्हणा.

http://videos.howstuffworks.c

38

मस्त

39

लेख उशीरा वाचला फार आवडला. फोटोंमुळे काही जुन्य़ा मैफली आठवल्या.. छान

सात वर्षांपूर्वी

40

एक लालबुड्या बुलबुल कावळ्यांपासून जीव वाचवायला आमच्या घरात आला .नविन उडायला शिकणारे पिल्लू म्हणा.माझ्या भावानी त्याला मलम लावून त्याच्या जखमा बर्‍या केल्या. शाईच्या नळीतून दूधात अँपीसीलीन मिसळून दिले. हा सोबती गेले सात वर्षं आमच्या घरी आहे. सुरेख शिळ वाजवून गाणे म्हणतो. जे त्याच्या लहानपणी शिकला तेव्हढेच .आता नविन काही शिकत नाही. माणसांची पारख त्याला आहे. अनोळखी व्यक्ती घरात आली की किंचाळून थैमान घालतो.आम्ही चार वेळा त्याला पिंजर्‍यातून काढून बाहेर अंगणात सोडून दिले पण तासाभरानी स्वारी घरात परत.
चांगला लेख .सुरेख छायाचित्रे.
काही वेळा आपले सांगताना आपण दुर्‍याचे कौतुक करायला विसरतो खरे.

सुरेख

41

अनुभव इथे टंकल्याबद्दल आभार. बुलबुल - खास करून शेंडिवाला - इतका मंजुळ आवाज काढतो की एरवी गाणारे पक्षी म्हणून उल्लेख होणार्‍या पोपट (किर्र किर्र आवाज काढतो म्हणून संकृतात याला 'कीर' असे नाव दिले असावे - पु.ल.), मैना, कोकीळ या पक्ष्यांबरोबर याचा उल्लेख का होत नाही कुणास ठाऊक. खरेतर याचे गाणे वर उल्लेखलेल्या कोणत्याही पक्षापेक्षा कितीतरी मधुर असते.
याला ऐतिहासिक संदर्भ असावा. कदाचित बुलबुल हे स्थानिक पक्षी नसावेत. त्यांचा उल्लेख फारसी साहित्यात पुष्कळ वेळा येतो, आपल्याकडे नाही. त्यामुळे ते तिकडून आयात केले असल्याचा आणि नंतर इथे रुळल्याचा (naturalized bird) संभव आहे.

मैफल मस्त जमलीय! माझ्या

42

मैफल मस्त जमलीय! माझ्या किचनच्या खिडकीतून बरेचदा असे पाहुणे दर्शन देऊन जातात, विशेषतः औदुंबराला फळं आली, की सकाळी सकाळी सुरेख पक्षीदर्शन होतं.


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

मॉडेल अगदी पोझ दिल्यासारखे

43

मॉडेल अगदी पोझ दिल्यासारखे बसलेले आहेत. मस्त लेख अन फटू पन.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही