ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट

0
0

अठराव्या शतकात कधीतरी औद्य़ोगिक क्रांती झाली आणि तेव्हापासून जग काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माणसाने भरमसाठ जंगलतोड, वारेमाप ऊर्जावापर, बेसुमार प्रदूषण करून रम्य निसर्गाचे राडे करून ठेवलेले आहेत. त्यात गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, रासायनिक उत्पादन, कृत्रिम पदार्थ यामुळे निसर्गाशी नातं तुटलेलं आहे. आणि आता तर ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचं अस्तित्वच त्याने धोक्यात आणलं आहे.

हे झालं पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवजातीचं चित्र. अर्थातच अतिरंजित आहे, पण त्यात तथ्यही नाही असं नाही. यावर उपाय काय? तर एक उपाय असा सांगितला जातो की ऊर्जेचा वापर करून आपण जो कार्बन डाय ऑक्साइड (याला सुटसुटीतपणे कार्बन म्हणण्याची आजकाल प्रथा आहे, ती मी पाळेन - न चा पाय मोडून.) निर्माण करतो, त्यामुळे हे सर्व होतं. तेव्हा काहीही करून कार्बन् कमी केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जावापर कमी केला पाहिजे. शहरीकरणात रम्य बालपण हरवलेल्या, कॉंक्रीटच्या जंगलात घुसमटणाऱ्या व आपण आपली मुळं विसरलो अशी अपराधी भावना असणाऱ्या आपल्या मनाला हे चटकन पटतं, आकर्षक वाटतं. पण हे खरं उत्तर आहे का? त्यासाठी आपल्याला काही गणितं करून अधिक चांगलं उत्तर सापडतंय का हे पाहावं लागेल.

सुरूवातीला काही आकडेवारी. या पृथ्वीवर सुमारे ६.७ अब्ज लोक राहातात. ते सगळे मिळून सुमारे वीस टेरावॉट ऊर्जा सतत वापरत असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दरडोई हजार वॉट (एक किलोवॉट) पॉवरचे तीन दिवे दिवसरात्र सतत ढाणढाण जाळत असण्याइतकी ऊर्जा वापरतात. त्यात अर्थातच विद्युत ऊर्जेचा भाग किती आहे हा प्रश्न उत्तर द्यायला कठीण आहे. कारण मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापर हा वाहतूक व उत्पादनासाठी होतो. हिशोबाच्या सोयीसाठी एक तृतियांश ऊर्जा ही विद्युत स्वरूपात किंवा विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी खर्च होते असं धरूया. जर थोडे वेगळे आकडे असले तर या गणिताच्या आकडेस्वरूपातल्या उत्तरात फरक पडेल, पण संकल्पनेत फारसा फरक पडणार नाही असं वाटतं. जर कोणी अधिक अचूक आकडेवारी दिली तर मी ती गणितात व उत्तरात समाविष्ट करेन. नाहीतर येणाऱ्या उत्तराची एरर मार्जिन जास्त गृहित धरून आपण निष्कर्ष काढू. विद्युत ऊर्जेचा वापर आपण दरडोई सरासरी (सुमारे) एक किलोवॉट इतका करतो. म्हणजे दरडोई दर ताशी एक युनिट. आता तुम्ही म्हणाल की आमचं बिल तर तेवढं येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे, विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी ही संपूर्ण ऊर्जा आहे. त्यात ही सगळ्या जगाची सरासरी आहे, व इतर प्रगत देश भारताच्या कितीतरी पट अधिक वीज करतात. शिवाय काही भाग अप्रत्यक्षपणे उत्पादनासाठी वापरलेल्या विद्युत ऊर्जेत सामावलेला आहे.

प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी ही ऊर्जा वाचवणं हा प्रभावी उपाय आहे का? वर्षात ३६५ * २४ = ८७६० तास असतात. जगातल्या सर्वांनी तासभर ऊर्जा वापरली नाही, तरी दशसहस्रांशापेक्षा फार जास्त फरक पडणार नाही. त्यात पुन्हा उत्पादनाची ऊर्जा त्यात नाहीच - त्यामुळे तो परिणाम त्याहूनही कमी. आणि हे फक्त विजेचं - तेल, पेट्रोल वाचवण्यासाठी तुम्हाला प्रवासही कमी करावा लागणार. म्हणजे एक तास वीज वाचवली तर २० टेरावॉट सतत वापरल्याऐवजी १९.९९९५ टेरावॉट सतत वापरल्याप्रमाणे आहे... हेही सर्वांनी केलं तरच.

असल्या दशसहस्रांश वा लक्षांश टेरावॉटच्या मागे लागण्याऐवजी एक आख्खा टेरावॉट जर वाचवता आला तर? आणि तेही फारसे कष्ट न घेता?

तसा उपाय आहे. तो सर्वांना माहीतही आहे, पण आपल्याला त्याचं गणित माहीत नसल्याने तो किती प्रभावी आहे याची आपल्याला कल्पना येत नाही.

सर्वांनी झाडं लावावीत. पण किती?

एक झाड लावल्याने किती फरक पडू शकतो? याचं उत्तर आहे की सौ सोनार की, एक लुहार की या म्हणीत! मनुष्य सोनाराच्या दोन वर्षाच्या मुलाच्या खेळण्यातल्या हातोडीप्रमाणे २० टेरावॉटचे टक टक करत असतो. तर त्याच वेळी सूर्य आपल्या प्रचंड घणाने १,७४,००० टेरावॉटचे घाव घालत राहातो. ग्लोबल वॉर्मिंग होतं ते मुख्यत्वे सूर्यामुळे असं म्हटलं तर त्यात काही गैर नसावं. सौर ऊर्जा म्हटली की आपल्याला महाग सोलर पॅनेल वगैरे डोळ्यासमोर येतात. पण सूर्यप्रकाश शोषून घेऊन ती ऊर्जा साठवून ठेवणारी अत्यंत स्वस्त 'यंत्रं' आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत. आसपास असलेल्या झाडांमध्ये शेकडो टेरावॉट शोषले जात असतात. त्यातले अजून काही शोषले गेले तर त्याचा दुप्पट ते तिप्पट फायदा होईल. एक म्हणजे, उष्णता रासायनिक ऊर्जेत शोषली गेल्याने पृथ्वी तापणं कमी होईल. दुसरं म्हणजे घरं गार करण्यासाठी जी त्याहून अधिक ऊर्जा लागते ती वापरणं कमी होईल. तिसरं म्हणजे झाडं कार्बन् शोषून घेतील, त्यामुळे भविष्यातलं ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. तर प्रश्न असा आहे की एक टेरावॉट वीज वाचवण्याचा परिणाम साधण्यासाठी प्रत्येकी किती किंवा (किती शे) झाडं लावावी लागतील?

सुर्याची पृथ्वीवर पडणाऱ्या ऊर्जेचा आपण साधारण अंदाज करू. सूर्य भर माथ्यावर असताना ती प्रत्येक स्क्वेअर मीटरला सुमारे १४०० वॉट असते. पण अर्थातच चोवीस तास ती कायम नसते, त्यामुळे बारा तास सूर्यप्रकाश गृहित धरला तर त्याचं उत्तर सुमारे साडेतीनशे वॉट इतकी येईल. पावसाळ्यात ती कमी असते वगैरे गोष्टी गृहीत धरल्या तरी ते उत्तर साधारण २५० वॉट इतकं येतं. तुम्ही जर १ स्क्वेअर मीटर इतका सूर्यप्रकाश शोषून घेतला तर तुमचा किमान २५० वॉटचा फायदा होतो. पण तो तिथेच थांबत नाही. जर ती उष्णता घरात येण्यापासून वाचवलीत तर तुम्हाला घर थंड करण्यासाठी एसी, पंखा यासाठी तितकीच कमी ऊर्जा वापरावी लागेल. घर जर थंड राहिलं, तर तुमचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा वापर करणारा फ्रिज अधिक कार्यक्षमपणे चालतो. त्यामुळे तेवढी विद्युत निर्मितीसाठी कोळसा व तेल जाळणं वाचेल. १ युनिट वीज निर्माण करण्यासाठी या प्रक्रियेतली इनएफिशियन्सी, ट्रान्समिशन लॉसेस वगैरे लक्षात घेतले तर सुमारे ५ युनिटचा कोळसा किंवा तेल लागतं. याचा अर्थ २५० वॉटमुळे तुम्ही सुमारे १२५० वॉटइतकी अधिक शक्ती वाचवाल. म्हणजे होणारा परिणाम हा जवळपास सव्वा किलोवॉटइतकी ऊर्जा न जाळण्याने होईल इतका असेल. आणि हे तासाभरापुरतं नाही, तर जोपर्यंत तुम्ही ती झाडं जगवाल तोपर्यंत दर तासाला १.२५ युनिट इतकी बचत होईल. आधी सांगितलेल्या गणिताप्रमाणे, जर जगातल्या प्रत्येकाने दरडोई १ स्क्वेअर मीटर इतकी ऊर्जा शोषून घेतली व तीमुळे वीज वाचली तर सुमारे नऊ टेरावॉट इतकी ऊर्जा वाचेल.

प्रथमदर्शनी या गणितात घोळ वाटतो. पुन्हा पुन्हा वाचून बघितलं तरी नक्की काय यावर बोट ठेवता येत नाही. थंड करण्याची ऊर्जा वाचवून आपण वापरतो तितकी सगळीच ऊर्जा कशी वाचेल? पण चूक तर काही काढता येत नाही. घासकडव्यांनी काही तरी गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटतं. उत्तम. हे गणित थोडं गंडलेलं आहे, त्याचं खरं उत्तर मी तुम्हाला सांगेन. फक्त त्यापूर्वी एवढंच म्हणेन की हाच सुधृढ शंकाखोरपणा पर्यावरणवादी जेव्हा काहीतरी गणित करून सांगतील तेव्हाही ठेवा. दुर्दैवाने आपल्याला गाळीव आकडेच मिळतात, ते आकडे जितक्या काटेकोरपणे तपासले जावेत तितके जात नाहीत. ते खोटे नसतात, पण त्यातली गृहितकं फाईन प्रिंटमध्ये राहातात. पुढच्या काही लेखात पर्यावरणवाद्यांच्या असल्या गंडलेल्या गृहितकांच्या गणितांवर प्रकाश टाकता येईल का बघीन.

यात गंडलेला भाग आहे तो तुम्ही २५० वॉटची उष्णता कमी केलीत तर तितकीच वीज थंड करण्यासाठी वाचेल या गृहितकात. घर थंड करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही तितकीशी वाचत नाही - कारण ती विशिष्ट महिन्यांतच व विशिष्ट प्रदेशातच लागू असते. म्हणजे या आकड्याला सरळसरळ दहा पटीने भागावं लागतं. तरी सुमारे एक टेरावॉट उरतोच. तो खोटा नाही. या गणितातल्या त्रुटी दाखवून कोणी हा १ टेरावॉट नसून ०.१ टेरावॉट आहे असं सिद्ध करून दाखवलं तरी ०.१ टेरावॉट म्हणजे १०० गिगावॉट हे लक्षात घ्या. पन्नास कोयना प्रकल्प. कायमचे बंद. १ टेरावॉट आकडा जर बरोबर असेल तर सुमारे पाचशे कोयना प्रकल्प. कायमचे बंद.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही शहरवासीय, आम्ही कुठून इतकी झाडं लावणार. तर ते तितकं बरोबर नाही. आपल्या प्रत्येक घरांना खिडक्या असतात, भिंती असतात. पुण्यात तर सर्व खिडक्यांना, ग्यालऱ्यांना ग्रिल लावण्याची सर्रास पद्धत आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला मनीप्लॅंट वगैरेसारख्या वेली चढवून देता येतात. (कुठचे वेल चढवायचे याबाबत मला फारशी माहिती नाही. पण ती माहिती शोधण्यासारखी आहे) एक स्क्वेअर मीटर खऱ्या अर्थाने करण्यासाठी उभे सुमारे अडीच ते तीन स्क्वेअर मीटर करावे लागतात. (पूर्वाभिमुखी खिडक्यांना निम्माच वेळ पूर्ण सूर्यप्रकाश मिळतो, त्यात उभ्याचा फ्याक्टर वगैरे धरून...) पण जर सर्व खिडक्यांवर वेल चढवले तर पाच ते दहा स्क्वेअर मीटर अगदी अशक्य नाही. हा उपाय घरी करता येईल त्याहीपेक्षा अधिक परिणामकारकपणे वेगवेगळ्या ऑफिस बिल्डिंगींमध्ये करता येईल. अनेक कंपन्यांमध्ये दिवसभर एसी असतो. तसंच सद्यस्थितीत अनेक कंपन्याना आपली हिरवी प्रतिमाही सादर करण्याची इच्छा आहे. संपूर्ण बिल्डिंगसाठी लागणारा एसीचा खर्च व ऊर्जा यामुळे कितीतरी प्रमाणात कमी करता येईल. तुमच्या कंपनीत चौकशी करून बघा. तुमच्या बिल्डिंगला जर गच्ची असेल तर तिला वेलींचा मांडव घालून घेता येईल का याचा विचार करा, विशेषत: तुम्ही जर सर्वात वरच्या मजल्यावर राहात असाल तर.

वेली, झाडं लावण्याने नुसताच एक टेरावॉट वाचेल असं नाही, हिरवाईने वेढलेलं घर असण्यातनं जी प्रसन्नता मिळते तिची किंमत कुठच्याच एककात करता येत नाही हेही आहेच. इतकंच नाही तर ते एक प्रतीकदेखील आहे. दिवाळीत आपण पेटवलेल्या ज्योतीप्रमाणे ती हिरवी ज्योत सतत पेटती राहाते. आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना त्याविषयी सांगता येतं. यातूनच सकारात्मक लोकशिक्षण होतं. आपल्या घरी आलेल्यांना उत्साहाने सांगता येतं - एक स्क्वेअर मीटरची पानं फुलवा. तो एक सकारात्मक कार्यक्रम होतो. आणि ज्योतीने ज्योत पेटवता येते. प्रतीकं ही त्या प्रश्नाचा अर्क असणारी, कायम फुलणारी, काहीतरी हाताला लागणारी, डोळ्याला दिसणारी असावीत असं मला वाटतं. गांधींनी असहकार चळवळ पुकारली. ही मूलत: नकारात्मक चळवळ होती. पण त्यांनी त्या चळवळीचं प्रतीक निवडलं ते म्हणजे मीठ. त्यांनी लोकांना मीठ खाऊ नका असं सांगितलं नाही (तसं सांगणं खरं तर गांधींच्या अतिरेकी कठोर आत्मनकारी मनोवृत्तीला अधिक भावलं असतं तरीही...). ते शेकडो किलोमीटर चालत गेले, आणि समुद्रावर जाऊन त्यांनी मीठ बनवलं. एक दिवस मीठ न खाऊन जितकं लोकशिक्षण झालं असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शिक्षण लाखो लोकांनी एकाच वेळी मीठ बनवण्याने झालं.

पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं. पण त्याचबरोबर एवढं लक्षात घेतलं पाहिजे की गेली साडेचार अब्ज वर्षांच्या पृथ्वीच्या आयुष्यात तिची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. मनुष्य आत्ता आत्ता तिची काळजी घेण्याचा विचार देखील करू लागला आहे. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. पण अजून मनुष्याची शक्ती - साधक व बाधक दोन्ही, मर्यादितच आहे. जेव्हा मनुष्यजात आपल्या सर्व जीवघेण्या प्रश्नातून मुक्त होईल तेव्हा पर्यावरणाचा नक्कीच विचार करेल. दहा अब्ज सक्षम, सुशिक्षित, समृद्ध लोक काय करू शकत नाहीत? आपल्या मध्यमवर्गीय घरात वेल लावणं आपल्याला काहीच वाटत नाही. ते प्रत्येक घरटी करणं शक्य आहे. पण हा प्रश्न एकदाचा कायमचा धसाला लावण्यासाठी गरज आहे ती म्हणजे सहारा, गोबी, थर वाळवंटात नवीन वृक्षराजी लावून त्यांचं नंदनवन करण्याचा. तसं झालं तर वर्षाला हजारो टेरावॉटचा कार्बन् शोषला जाईल. ते अशक्य नाही. त्यासाठी पैसा पाहिजे, शक्ती पाहिजे, ऊर्जा पाहिजे. पण जोपर्यंत आपल्याच घरात रोगराई, निरक्षरता, बालमृत्यू, अन्याय, गरीबी, भ्रष्टाचार, सामाजिक शोषण, बालकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत हा पैसा व शक्ती झाडं लावण्यात खर्च करता येणार नाही हे वास्तव आहे. पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी हे प्रश्न सोडवावे लागतील. अगदी पूर्णपणे नाही, पण निदान अमेरिकेत आत्ता ज्या पातळीपर्यंत सोडवले गेले आहेत तिथपर्यंत तरी. त्यासाठी या बाबतीत मागे असलेल्या भारत, चीन, आफ्रिकन राष्ट्रांनी तरी आधुनिकीकरण करून अधिकाधिक शिक्षण, आरोग्य व समृद्धी यावर भर दिला पाहिजे. जेव्हा सर्व जग आत्ताच्या अमेरिकेइतकं समृद्ध होईल तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न हातात घेता येईल. हा दिवस दूर नाही. गेल्या तीस वर्षातला विकासाचा दर बघितला तर जगाची नव्वद टक्के लोकसंख्या त्या पातळीवर जायला अजून फारतर ५०-७५ वर्षं लागतील. तोवर आपल्याला जमेल तितकं व्यक्तिगत पातळीवर करत राहाणं व ही हिरवी ज्योत जिवंत ठेवणं हेच आपल्या हाती आहे.

अहो मराठीत सांगा की, झाडे

1

अहो मराठीत सांगा की,

झाडे लावा झाडे जगवा.....

(केवढा दम लागला वाचतावाचता........)


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

जुनंच तंत्र

2
(केवढा दम लागला वाचतावाचता........)

उत्तम. एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर वाचायला झेपणार नाही असं मेगाबायटी लिहायचं हे जुनंच तंत्र आहे. मग लोकं 'भीक देतो, पण कुत्रं आवर' म्हणतात. हास्य

पटतयं... पण पुर्ण पटतयं असे

3

पटतयं... पण पुर्ण पटतयं असे देखील नाही.
परंतू,

झाडे लावण्याचा मुलमंत्र जो तुम्ही सांगत आहात तो मात्र १००% पटतो आहे हास्य
मी स्वतः ह्यासाठी काही ना काही प्रयत्न नक्की करेन.

* लहानपणी गावी अंगणात लावलेली रोपं आज.. चांगलेच वनराईचे रुप घेऊन उभे आहेत त्यांच्याकडे पाहताना ऊर भरुन येतो व त्यात जो आनंद आहे तो नक्कीच स्वर्गिय आनंद आहे.. हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मुद्दे पटले, पण हे

4

मुद्दे पटले, पण हे लिहिण्यासाठी किती टेरावॅट ऊर्जा लागली???

मी इथे नवा आहे...

5

त्यामुळे मला नक्की किती लिहिलेलं लोकांना झेपतं हे माहीत नाही. मी त्रोटक गमतीदार लिहिलं तर

आंबे टाईपच्या धाग्यावर आपण ११० + प्रतिसाद मारु शकतो पण एखादा सती सारखा किंवा जागतिक संदर्भ असलेला अथवा जो विषय आपल्याला कळालाच नाही तेथे गप्प बसायचे नाही तर टिपी करायची... हा सर्व सामान्य नियम झाला आहे असे वाटत आहे.. असो

अशा कॉमेंटा येतात. व त्यावर मला लांबलचक, रुक्ष प्रतिसाद द्यावे लागतात.

मुळात मी पर्यावरणाबद्दल थोडक्यात लिहिलं तेव्हा मला 'लेखमाला लिहा' अशी सूचना आली. आता लेखमालेत लांबलचक लिहिलं तर त्याचीपण चेष्टा होते.

नक्की कुठे चुकतंय माझं? की सर्वच नवीन सदस्यांना अशीच वागणूक दिली जाते? या त्रासाला टिकून राहातात तेच खरे कट्टर मीमकर बनतात का? मीदेखील पुढे नवीन सदस्यांना असंच रॅगिंग करेन? वाटत नाही...

(संदिग्ध, व्यामिश्र मनस्थितीतला नवखा) राजेश

राजेश असे त्रस्त होउ नका,

6

राजेश असे त्रस्त होउ नका, तुम्ही लिहित रहा Stare इथे कोणीहि कोणालाही त्रास व्हावा म्हणुन गमंत करत नाहित हो,
गंमत घडुन जाते मात्र, आणी तुम्ही वाईट वाटुन घेता. मी तुम्ची माफी मागते हवीतर पण तुन्ही लिहा .माझ मराठी तुम्ही समजुन घ्यावे.

लोकांना झेपतं की नाही ह्याचा

7

लोकांना झेपतं की नाही ह्याचा विचार करु नका साहेब. आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहून मोकळे व्हायचे व बाकी सर्व वाचकावर सॉडून द्यायचे हास्य

असो,

बाकी..

आंबे टाईपच्या धाग्यावर आपण ११० + प्रतिसाद मारु शकतो पण एखादा सती सारखा किंवा जागतिक संदर्भ असलेला अथवा जो विषय आपल्याला कळालाच नाही तेथे गप्प बसायचे नाही तर टिपी करायची... हा सर्व सामान्य नियम झाला आहे असे वाटत आहे.. असो

हे तुमच्यासाठी नव्हते ना कोणा एकाला लक्ष करणारे !
समजवून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही लिहीत राहा आम्ही वाचत आहोतच थोडे फार मस्करी करणारे प्रतिसाद येणारच त्याचा त्याच अंगाने विचार करुन सोडून देत जा अथवा मस्करीनेच उत्तर देत हसून मोकळे व्हायचे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अत्यंत विचारप्रवर्तक लेख आहे,

8

अत्यंत विचारप्रवर्तक लेख आहे, पुर्ण माहीती घेऊन प्रतिसाद देतो.

छान लेख आहे ...

9

घासकडवीसाहेब, लेखमाला वाचतो आहे.
आंतरजालावर एका वेगळ्याच धाटणीची विधायक लेखमाला म्हणुन याचे कौतुक करु वाटते.

वाचतो आहे, जमेल तशी भर घालत जाईन.
ह्या भागात आलेला 'वॄक्षारोपणाचा' मुद्दा रोचक आहे, सध्या तसे प्रयत्नही चालु आहेत असे वरकर्णी दिसत आहे, अर्थात त्याची करेक्ट आकडेवारी सध्या माझ्याकडे नाही.
तुमच्या प्लानिंगनुसार 'एनर्जी रिसायकलिंग' आणि 'पर्यायी इंधने' ह्यावर पुढच्या काही भागात भाष्य करावे ही विनंती. कारण कितीही करावे म्हणले तरी उर्जेचा वापर कमी होणार नाही, उलट वाढतच जाणार आहे, मग त्यातुन सध्या जी उर्जी वाया जाते त्याचा वापर कसा करता येईल किंवा भविष्यात काय उपाय असु शकतील ह्याबाबतीत आपली मते वाचायला आवडतील.

सध्याच्या विकासाच्या व्याख्येनुसार यापुढे अशीच जंगले तोडुन वसाहती आणि उद्योग स्थापन केले जातील, सध्यातरी ह्याला दुसरा सोपा आणि फिसीबल असा पर्याय दिसत नाही.
उदा : पहिल्यांदा बेंगलोर हे 'ग्रीन सिटी' म्हणुन प्रसिद्ध होते, आता वाढत्या विकास आणि व्यवसायामुळे इथली झाडी कमी होत आहे व त्याचे सरळ परिणाम ह्या उन्हाळ्यात दिसत आहेत. पण ह्याला पर्याय म्हणुन सध्याच्या स्थानापासुन ( पक्षी : बेंगलोर) दुर अशा ठिकाणी दुसरे पर्यायी औद्योगिकनगर वसवणे ही आयडिया प्रॅक्टिकली शक्य नाही किंवा खुप खर्चिक आणि अवघड आहे असे वरकर्णी दिसते आहे.
ह्या आणि शाच इतर मुद्द्यांवर आपले भाष्य वाचायला आवडेल.

- छोटा डॉन

मस्त! गणितं आवडली. गंडलेल्या

10

मस्त! गणितं आवडली.

गंडलेल्या गणिताचे पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.

वृक्षारोपण आणि काही प्रश्न,

झाडे कार्बन् घेतात त्याच बरोबर उष्णता, मिथेन (आणि रात्री कार्बन्?) इ. सोडतात. त्याने गणितात कीती फरक पडतो हे पहावे लागेल. (अश्याच काही कारणांनी वृक्षारोपणाला काही शास्त्रंज्ञांना संपुर्ण पाठींबा दिसत नाही)

१ स्क्वेअर मीटर इतका सूर्यप्रकाश शोषून घेतला तर तुमचा किमान २५० वॉटचा फायदा होतो

एका मिटरला झाडे इतकी उर्जा शोषतात का? सगळी झाडे शोषतात का? साधारण कीती वयाचे झाडं झाल्यावर इतकी उर्जा शोषली जाइल? इ. ने आकडा थोडा-फार लहान होत जाइल.

तरी सुद्धा झाडे लावण्याची कल्पना मान्य आहेच.

पुढील भागांची वाट पहातो आहे.


-Nile

गणिते रोचक आहेत. झाडे लावा हा

11

गणिते रोचक आहेत. झाडे लावा हा मंत्र पटला..
मात्र झाडे लावा बरोबरच आहेत ती झाडे तोडु नका हा मंत्र अधिक प्रभावी ठरावासे वाटते. विषेशतः जुनी झाडे- खरंतर वृक्ष- जेव्हा तोडली जातात तेव्हा केवळ ग्लोबल वॉर्मिगच नाहि तर त्या झाडाभोवतीच्या सार्‍या स्थिरचरसृष्टीची हानी होत असते. शहरांमधे झाड टोडल्यास दुसरे लावण्यासंबंधी नियम कसे आळले जातात हे माहितच आहे.

ह्या वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल उत्सुकता होती/आहे. तेव्हा लेखमाला वाचतोय.. पुढील भाग येऊदे

आवरून आठवलेलं अवांतर: माझ्या एका परिचितांनी घोडबंदररोड वरील वृक्षतोड व काहि मोठ्या वृक्षांना मुर्खासारखे खाडी किनारी हलविल्याने झालेला वृक्षसंहार फोटोसकट सर्व वृत्तपत्रांना पाठवला होता. कोणीही दखल घेतली नाहि (किंवा प्रकरण दाबले गेले)


-ऋ

आजचीच बातमी. सिधुदूर्ग मधे

12

आजचीच बातमी. सिधुदूर्ग मधे तापमान ४३ अंशापर्यंत गेलं आहे. वृक्षतोडीमुळे काय होउ शकतं याची भयानक नांदी आहे का ही??

बाप रे.. ! ४३ ....

13

बाप रे.. !

४३ .... Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चार अब्ज वर्षांपूर्वी

14

सिंधुदुर्गमधलं तापमान ६८ अंश होतं. केवळ वीस हजार वर्षांपूर्वी (गेल्या बर्फयुगात) ते ८ अंश होतं.

सांगायचा मुद्दा असा की गणितं करताना, आकडेवारी तपासताना व निष्कर्ष काढताना एक संयम पाळला पाहिजे. हे वृक्षतोडीमुळेच झालंय असं म्हणायला पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यापलिकडे काही आधार आहे का? या गणिती, क्लिष्ट लेखमालेमागे गृहितकं पुन्हा एकदा तपासून पाहाणे हा हेतू आहे.

तुम्ही तुमच्या विधानापुढे प्रश्नचिह्नं टाकली आहेत हे योग्यच केलं आहे. किती लोकांनी ती वाचली कोण जाणे.

राजेश

आकडे वगैरे

15

लेखमाला वाचतो आहे. पुढच्या भागांची प्रतीक्षा.
आकड्यांसंदर्भात पर्यावरणवाद्यांवरील रोख योग्यच. पण तो फक्त तेवढाच न ठेवता एकूणच आकडेबाजीकडे वळवलात तर अधिक महत्त्वाचे. शेवटी 'हिमालय' आकाराच्या चुका दोन्ही बाजूंनी होत असतात.
आकड्यांच्याही पलीकडं एक वास्तव असतं. त्याला माणूस म्हणतात. या माणसाचे म्हणून काही गुण-दोष आहेत. हा 'सहा'चा आकडा सर्वाधिक महत्त्वाचा. त्यातून अनेकदा जे खेळ होतात ते इतर साऱ्या आकड्यांना शून्य ठरवत असतात. तिथंही हा मुद्दा पोहोचत असतो.

लेखमाला वाचत आहे, आणि

16

लेखमाला वाचत आहे, आणि सविस्तर, स्पष्ट लिखाणाबद्दल आभार.

गेले काही महिने मी पुणे विद्यापीठाच्या एका टोकाला रहाते आहे. या भर उन्हाळ्यात झाडांच्या मधे रहाण्याचा किती फायदा होतो आहे हे चांगलंच अनुभवता येत आहे. गच्चीवर वेली चढवण्याची कल्पना उत्तम!
खिडक्यांवर वेली चढवून थंडावा वाढेल पण खोलीतला उजेडही कमी होईल. त्यासाठी थोडी ऊर्जा पुन्हा खर्च करावी लागेल.

(एक सूचना: नव्या भागांमधे मागच्या भागांची लिंक देता येईल का?)

चांगली लेखमाला.

17

चांगली लेखमाला. वाचतो आहे.

साधारण ह्याच धर्तीवरती (फक्त उर्जेऐवजी जागतिक तापमान वाढ), Michael Crichton याच एक पुस्तक वाचनात आल होत State of Fear, ज्यात त्यान Eco-Terrorist ची संकल्पना मांडली आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमान वाढीचा प्रश्न नक्की किती गंभीर आहे किंवा खरोखरच अस्तित्वात आहे का हे कोणीही निश्चीतपणे सांगू शकत नाही. तापमानवाढ आणि पर्यावरणाचा र्‍हास हे गंभीर प्रश्न आहेत, पण त्यासाठी केला जाणारा गवगवा खूपच जास्त आहे.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

लेखमाला वाचतो आहे.. आपण

18

लेखमाला वाचतो आहे..
आपण मांडलेले गणीत ईंटरेस्टिंग आहे...
झाडे लावा, झाडे जगवा मंत्र नक्कीच पटतो...


-निखिल

या लेखातील झाडे लावावीत या

19

या लेखातील झाडे लावावीत या मताशी कोणीच असहमत होईल असे वाटत नाही. पण त्या मुद्याकडे वळण्याआधी थोडे लेखातील काही विधानांबाबतः

हे झालं पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवजातीचं चित्र. अर्थातच अतिरंजित आहे, पण त्यात तथ्यही नाही असं नाही.

सर्वप्रथम पर्यावरणासंदर्भातील अनेक धोरणे ही पर्यावरणवाद्यांमुळे घेतली जात नाही आहेत तर त्यात असलेल्या शास्त्रीय अभ्यासामुळे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न आला की लगेच सर्व पर्यावरणवाद्यांच्या उरावर घालणे पण अतिरंजीत वाटते.

शहरीकरणात रम्य बालपण हरवलेल्या, कॉंक्रीटच्या जंगलात घुसमटणाऱ्या व आपण आपली मुळं विसरलो अशी अपराधी भावना असणाऱ्या आपल्या मनाला हे चटकन पटतं, आकर्षक वाटतं.

एक प्रश्न विशेष करून अमेरिकास्थित भारतीयांना: आपल्यातील किती जणांना शहरात राहणे आवडते आणि कितीजण सबअर्ब अर्थात शहरापासून लांब उपनगरात रहातात? अमेरिकेतील शहरीकरण हे बर्‍याचदा जागेची मर्यादा सोडल्यास सुसह्य असते, तरी देखील तेथे रहाण्याचा कल नसतो. ज्यांना (भारतात आणि इतरत्र) शहरीकरणात गर्दीत वगैरे रहावे लागते त्यांना घुसमटण्यामुळे अपराधी भावना नसते तर त्रागा असतो.

त्यात ही सगळ्या जगाची सरासरी आहे, व इतर प्रगत देश भारताच्या कितीतरी पट अधिक वीज करतात. शिवाय काही भाग अप्रत्यक्षपणे उत्पादनासाठी वापरलेल्या विद्युत ऊर्जेत सामावलेला आहे.

या सरासरी संदर्भात जागतीक बँकेचा (इंटरनॅशन एनर्जी एजन्सीच्या सहकार्याने) खालील आलेख बघण्यासारखा आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान हे प्रगत देश मूलभूत उर्जेचा वापर किती करतात आणि ब्रिक देश (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) किती करतात तसेच सारे जग किती करते हे समजेल. त्यात जर त्या त्या देशाच्या शिरगणतीप्रमाणे, क्षेत्रफळाप्रमाणे, अर्थव्यवस्थेप्रमाणे पाहीले तर अनेक गोष्टी समजू शकतील... तुर्तास कौन कितने पानी मे हे समजण्यासाठी इतकेच दाखवत आहे.


Data source: World Bank, World Development Indicators - Last updated March 1, 2010

वरील मुल्यमापन तसेच या संदर्भात कोण किती प्रदुषण आजही करत आहे, याची माहीती वाचल्यास, "पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी हे प्रश्न सोडवावे लागतील. अगदी पूर्णपणे नाही, पण निदान अमेरिकेत आत्ता ज्या पातळीपर्यंत सोडवले गेले आहेत तिथपर्यंत तरी. " हे आपले वाक्य फारच विनोदी वाटते. असो.

तेव्हा काहीही करून कार्बन् कमी केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जावापर कमी केला पाहिजे.
उर्जा वापर कमी करणे याचा अर्थ वीजकपात करणे असा नाही आहे तर उर्जेचे व्यवस्थापन करणे हा आहे. ज्याचा फायदा केवळ पर्यावरणासच होत नसून उद्योगांच्या बाबतीत म्हणाल तर भागधारकांना (स्टेकहोल्डर्स ज्यात शेअरहोल्डर्सपण येतात) पैशाच्या व्यवस्थापनामुळे पण होतो. हे वास्तव आहे. म्हणूनच किती उर्जा (टेरावॅट मधे) वाचते हे महत्वाचे नसून किती कमी उर्जा ही कार्बन डाय ऑक्साईड्चे उत्सर्जीकरण न होता तयार केली गेली यात आहे अथवा कमीत कमी उर्जेत जास्तीत जास्त काम कसे करता येते यात आहे. याचे उदाहरण म्हणजे व्हाईट समोरील "नॅशनल ख्रिसमस ट्री". हे झाड, ख्रिसमसच्या हंगामात १८००० वॅट्स उर्जा जाळायचे. आता जीईच्या लाईट एमिटींग डायोड (एलईडी) च्या दिव्यांनी त्याच झाडाची त्याच काळासाठीची उर्जेची गरज ही ६००० वॅट्स झाली. त्यामुळे वास्तवात पुढील गणिते की किती (खर्‍या) झाडांनी (ख्रिसमस ट्री नाही) किती टेरावॅट उर्जा वाचते वगैरे पटली नाहीत.

ग्लोबल वॉर्मिंग होतं ते मुख्यत्वे सूर्यामुळे असं म्हटलं तर त्यात काही गैर नसावं.

गैर नसावे नाही, गैरच आहे. सुअलभीकरण करून बोलायचे झाल्यास, विचार करा: एका हॉलची किती लोक असू शकतात याची मर्यादा जर १०० असली, पण तेथे १०० च्या ऐवजी ३०० माणसे बसली, तर त्यातून निर्माण होणार्‍या कार्बन डाय ऑक्साईड वायूने काय होईल? मग एचव्हीएसी यंत्रणा कितीही योग्य असली तरी ती पुरेशी ठरेल का? आजचा जागतीक प्रश्न याच संदर्भात आहे. या संदर्भात खालील आलेख बघण्यासारखा आहे:


Fluctuations in temperature (red line) and in the atmospheric concentration of carbon dioxide (yellow) over the past 649,000 years. The vertical red bar at the end is the increase in atmospheric carbon dioxide levels over the past two centuries and before 2007.

म्हणूनच वरील लेखातील, "पहिल्या परिच्छेदात पर्यावरणवाद्यांनी रंगवलेलं मानवाचं 'आपल्या स्वार्थापायी पृथ्वीची वाट लावणारा' असं विकृत चित्र बघितलं", "विकृत" हा शब्द खटकला.

आता परत मुळच्या मुद्यावर येऊया; "वृक्षवल्ली आम्हा सोयरी..."

सुरवातीस म्हणल्याप्रमाणे झाडे अधिक लावणे आणि त्याचे उपयोग याला पूर्णपणे पाठींबा किमान तुकारामापासून आपण समाज म्हणून देत आहोत असे समजायला हरकत नाही. wink मात्र त्याचा संदर्भ हा उर्जेच्या गणिताशी प्रत्यक्ष नाही आहे. या संदर्भात थोडासा अनुभवः

इपिएच्या अनुदानाने या संदर्भात मी बॉस्टनजवळील समरव्हील नामक पूर्णपणे शहरी भागाचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून संशोधन केले होते. (हे संशोधन अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हील इंजिनयर्सने प्रसिद्ध देखील केले होते. शिवाय इतरत्र ही ते वापरले गेले होते. असो.) त्यात अनेक गोष्टी होत्या. फक्त एकच या सदंर्भातील गोष्ट येथे सांगतो: समरव्हील हा शहरी आणि (अमेरिकेच्या मानाने) घनदाट लोकसंख्येचा भाग असल्याने येथे एकंदरीत झाडे कमी आहेत असे वाटत होते. तरी हे शहर "ट्री सिटी युएसए" म्हणून फेडरल सरकारच्या प्रोग्रॅममधे जाहीर झालेले आहे. मग आम्ही उपग्रहाद्वारे थंडीत (पानगळीनंतरची) आणि वसंतऋतुतील छायाचित्रे घेतली. आणि आर्कजिआयएस तसेच काही विशिष्ठ संगणकीय प्रोग्रॅम्स वापरून या शहरात हिरवळ किती असते याचे दहा विभागात तसेच पूर्ण शहराचे एकत्रीत असे विश्लेषण केले. त्यातील पूर्ण शहराचे उत्तर थोडक्यात असे:

  • १८% झाडे,
  • ४८८.१ एकर वृक्षाच्छादीत,
  • एकूण कार्बन स्टोअरेज - २४,२२७.०९टन्स
  • सांडपाणी प्रदुषणातून वाचवलेले: ४,३१५,०३९ क्युबिक फीट
  • कमी झालेले हवेचे प्रदुषण ५०,६८९ पाउंड्स
  • वगैरे

हे सर्व विश्लेषण करताना वर धनंजय आणि नितीन यांनी म्हणल्याप्रमाणे, या भागातील झाडे, या भागातील हवामान, भौगोलीक तसेच औद्योगीक परिस्थिती, आदी गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.

एका अभ्यासाप्रमाणे अशा प्रकारच्या शहरात २५% झाडे हवीत. त्यामुळे ७% कमी आहेत ही वस्तुस्थिती समजली. या संशोधनाचा उपयोग हा झाडे पुढे लावावीत का नाही या संदर्भात झाला. तरी देखील एक वेगळीच समस्या अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे लावण्यासंदर्भात आली: अमेरिकन डिसअ‍ॅबिलीटी अ‍ॅक्ट! त्या प्रमाणे जितके अंतर झाड आणि कुठल्याही प्रॉपर्टीच्या बांधापर्यंत हवे त्यापेक्षा ते कमी अंतर होऊ लागले. Sad

त्या व्यतिरीक्त अजून एक अनुभव; मोठे सरकार छोट्या सरकारांना झाडे लावायला पैसे देते पण त्याची निगराणी करायला नाही. परीणामी त्याची जी लाखांच्या घरातील किंमत असते तो एक मोठा प्रश्न होतो. (अर्थात तरी देखील येथे स्थानीक सरकारे झाडे लावतात).

या संशोधनात अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे वृक्षच्छादीत नसलेला जो भाग होता, तो सार्वजनीक नसून लोकांच्या घरामागील होता. का? कारण येथे घनदाट वस्तीमुळे गाड्या ठेवायला जागा जास्तीत जास्त करण्यासाठी अगदी कायद्यापुरती माती असलेली जमीन ठेवून उरलेले अनेकांनी काँक्रीटीकरण केले/करावे लागले...

आता तुमचा राग असलेले अनेक पर्यावरणवादी सध्या मागे लागले आहेत की ग्रीन रूफस सर्वत्र करा. त्याने उर्जा वाचेल, उन्हाळ्यात एसी कमी लागेल वगैरे... सर्व खरे आहे, पण स्ट्रक्चरल इंजिनियरींगचा विचार केल्यास अनेक घरांची छपरे अशी हिरवळ डोक्यावर ठेवूच शकत नाहीत हे वास्तव आहे. पण ते समजावणे अवघड जागेचे दुखणे होते....

असो. थोडक्यात तपमान बदलाच्या जगात, झाडे हे एक उत्तर आहे पण पूर्ण उत्तर नाही. तसेच जागतिक तापमान वृद्धीचे कारण हे नुसते नैसर्गिक म्हणणे आणि स्वतःची (माणसाची) जबाबदारी झटकणे हे काही पटत नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. हास्य


विकास देशपांडे

उत्तर

20

या लेखावरच 'लय लांब' असे प्रतिसाद आले, पण तुमचा प्रतिसाद काही कमी लांब नाही. त्यात मी 'तिकडे' उत्तर दिलं असल्यामुळे इथे तेच चिकटवून मीमराठीची कागदं संपवू इच्छित नाही.

लवकरच पुढचे लेख लिहीन. याच दोन लेखांवर सगळी चर्चा केली तर नंतर बोलायला काही शिल्लकच राहाणार नाही हास्य