सती, सतीबंदी, महाराष्ट्रातला समाज अन धर्ममार्तंड

0
0

सन १८२९ साली थोर समाजसेवक राजा राममोहन रॉय यांच्या पुढाकाराने बंगालमधे सुरु झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालिन गव्हर्नर जनरल वुइल्यम बेंटिंक याने सतीबंदीचा कायदा केला अन ती अमानुष प्रथा बेकायदा ठरली. अनिष्ठ रुढी, सामाजिक परंपरा, भारताच्या वेगवेगळ्या भागातल्या कडवट धर्ममार्तंडांनी लावलेला धर्माचा चुकीचा अर्थ यामुळे सतत अन्याय्य वागणुकीला बळी पडणार्‍या, पिचत गेलेल्या महिलावर्गाला हा मोठाच दिलासा होता. असा कायदा करुनही सतीची प्रथा पुर्णपणे बंद झाली नाहीच हे अगदी आधुनिक काळातल्या रुपकंवर सारख्या प्रसंगांमुळे स्पष्ट झालेच आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर कार्य होण्याची गरज आहे हे देखील राजस्थान, हरियाणा आणि देशातल्या अन्य भागातल्या सतीमाँ मंदिरांमधे भरणार्‍या जत्रा आणि नवस बोलण्यासाठी/ फेडणार्‍या भाविकांच्या अलोट गर्दीवरुन स्पष्ट होते.

अश्या परिस्थितीत सतीप्रथेचा महाराष्ट्रातला इतिहास उदबोधक आहे. सतीबंदीचा कायदा होण्याआधी तब्बल सहा वर्षे महाराष्ट्रातली सतीची परंपरा बंद झाली होती आणि तोही इथल्या धर्ममार्तंडांच्या आणि शास्त्र्यांच्याच पुढाकाराने हा डॉक्युमेंटेड तरीही उपेक्षित राहिलेला इतिहास आहे. जरी अनेकदा सामाजिक न्याय हा जरी अमानुषतेकडे झुकत असला, तसा जगभरातल्या सर्व समाजांबाबत ते खरे असले, तरीही मराठी समाजाचा हा इतिहास म्हणजे धर्माचा योग्य अर्थ लावुन पुरोगामी समाज कसा न्यायनिवाडा करु शकतो याचेच एक दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. परंतु दुर्दैवाने हा इतिहास अगदी मराठी माणसांना आणि त्यातील बुद्धीवाद्यांनाही ही माहिती नाही त्यामुळे अनेकांची धर्म, सामाजिक न्याय याबाबत चुकीच्या माहितीवर आधारित दिशाभुल करणारी मतेच नव्या पिढीच्या समोर सतत येत जाते व त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होत रहाते ही खेदाचीच बाब आहे.

मुळात सतीप्रथा महाराष्ट्रात सार्वत्रिक अशी कधी नव्हतीच. सती ही संकल्पना होती ती केवळ उच्च जातींमधेच. बहुजन समाजाने ती कधीच स्वीकारली नव्हती. उलटपक्षी बहुजन समाजात विधवा विवाहाची चाल होती हे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्या सन १९१८ मधे पाट या विषयावर व्यक्त केलेल्या विचारांमधुन स्पष्ट होते. हे विचार इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड सात व आठ - समाजकारण आणि राजकारण या डॉ. मु. ब. शहा यांनी संपादित केलेल्या व धु़ळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशीत केलेल्या ग्रंथामधे पृष्ठ ४२९ येथे आहेत.

राजवाडे म्हणतात, "शुद्र वगैरे जातींत पाट लावण्याची चाल आहे. गतभर्तॄकेशी किंवा त्याक्तभर्तृकेशी किंवा भतृत्यकेशीं कोणी लग्न लावले म्हणजे त्या पुनर्विवाहाला पाट लावणे किंवा पाटाचे लग्न म्हणतात." व्याससंहिता अथवा व्यास्मृतीतील तेराव्या व चौदाव्या श्लोकांचा संदर्भ देत ते पुढे म्हणतात, "ब्रम्हदेवाने पुर्वी एकदेह असलेला जोड मनुष्यप्राणी मधोमध चिरला आणि त्याची दोन शकले केली. एका शकलाचें नवरे केले आणि दुसर्‍या शकलापासुन बायका केल्या. बायको जोपर्यंत पुरुषाने केली नाही तोवर तो अर्धा समजला जात असे..."

अगदी उच्चजातींमधेही पतिनिधनानंतर बायका सरसकट सती जात नसत, तशी अपेक्षा नसे आणि सती न जाणार्‍या बायकांचे हक्क संरक्षिण्याचे प्रयत्न केले जात असे समजण्यालाही वाव आहे. शिवाजी महाराजांची आई जिजाऊ, त्यांच्या बहुतेक सर्व पत्नी, ज्या रायबागन नावाच्या स्त्री सरदाराबरोबर भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी लढाई केली व ती जिंकल्यावर तिचा सन्मान केला ती, अश्या अनेक उच्चजातीतील बायका सती गेल्या नव्हत्या. उलटपक्षी एका विधवेवर जबरदस्तीचा प्रयत्न केला म्हणुन रांझ्याच्या बाबाजी पाटीलाचे हातपाय शिवाजी महाराजांनी तोडले असेही समजतात. याखेरीज केशवपन सारख्या परंपराही सतीप्रथा सार्वत्रिक नव्हती हेच दर्शवतात.

ज्या बायका सती जात नसत त्यांना रंडकी बोडखी अश्या नावांनी ओळखले जाई. त्यांच्या अनेक अधिकारांवर गदा येत असे परंतु त्यांच्या जगण्याचा हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत असे असे देखील दिसते. अश्या बायका कुण्या पुरुष नातेवाईकाकडे आश्रित म्हणुन रहात व त्यांचे संरक्षण करणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे ही त्या पुरुष नातेवाईकाची जबाबदारी असे. अश्या बायकांच्या मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या पैतृक अधिकारांचे ते वयाय येईपर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी देखील त्या पुरुष नातेवाईकाची असे व ती नीट पार न पाडणार्‍याकडे उपेक्षेने पाहिले जात असे. अर्थातच ही सर्वंकष व्यवस्था नव्हती पण व्यवस्था निर्माण करणाचा समाजाचा प्रयत्न नक्कीच होता आणि तत्कालिन परिस्थितीत तो अभिनंदनीय होता याबाबत शंकाच नाही.

क्रमशः

उत्तम

1

सुरुवात. वाचतो आहे, काही शंका आहेत त्यांचे लेखमालेच्या पुढच्या भागांत निरसन होईल याची खात्री आहे.

+१ उत्तम सुरवात...

2

+१

उत्तम सुरवात...

मोथुर

3

या पाट लावणे प्रकाराला काही ठिकाणी मोथुर म्हणतात. आमच्या जीवन शिक्शन मंदिरात बांगरवाडीची प्वॉरं क्वाँचा मोथुर लागला याची चविष्ट चर्चा करीत असत.
तारुण्यात एखाद्य स्त्रीचा पती गेल्यावर तिने उरलेल आयुष्य कसे काढायचे? तिच्या लैंगिक प्रेरणा तशाच दाबुन किती दिवस ठेवणार? त्या( स्वतःच्या व इतरांच्या) दाबुन ठेवता याव्यात म्हणुन केशवपन पांढरी साडी वगैरे अनाकर्षक गोष्टी कर्मकांडात आणून प्रस्थापित केल्या. लैंगिक प्रेरणांपेक्षा अन्य जैविक प्रेरणा या नेहमी अग्रक्रमात राहतील याची काळजी घेतली गेली. पोटाला नाही आटा आन म्हने चोटाला उटन वाटा हे आमच्या स्वगत मधील एका म्हातार्‍याचे वाक्य हाच संदेश देत.
एक उत्तम विषय क्रमशः घेतल्या बद्दल अभिनंदन


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वेगळाच विषय

4

वाचतो आहे.

एकूणच सुरूवातीपासूनच

5

एकूणच सुरूवातीपासूनच महाराष्ट्र पुरोगामी होता हे सतीप्रथेला झालेल्या विरोधातून स्पष्ट होते.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आक्षेप...

6

एका गोष्टीवरुन पुरोगामी अथवा प्रतिगामी म्हणणे चुकीचे वाटते....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

वाचतो आहे एकेकाळी अत्यंत

7

वाचतो आहे एकेकाळी अत्यंत ज्वलंत अश्या विषयाबद्दल आपल्याला खुप कमी माहीती आहे पण ही लेखमाला आपल्याला पुर्ण माहीती व सखोल माहीती देण्याचे कार्य करेल असे नक्की वाटत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाचते आहे. ह्या विषयावर

8

वाचते आहे. ह्या विषयावर लिहायला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.

विषय ज्वलंत आहे. या आणि अशा

9

विषय ज्वलंत आहे.

या आणि अशा इतर मुद्द्यांकडे बघताना त्या काळची सामाजिक परिस्थिती विचारात घेतली पाहिजे असं वाटतं.
ज्या गोष्टी आता संपूर्णपणे चुकीच्या वाटतात त्याच कदाचित त्या काळी आवश्यक असतील.(अर्थात हे विधान सती प्रथे बाबत निश्चीतच नाही)

वाचते आहे. गतभर्तॄकेशी किंवा

10

वाचते आहे.

गतभर्तॄकेशी किंवा त्याक्तभर्तृकेशी किंवा भतृत्यकेशीं

अशा शब्दांचे मराठीतून अर्थ लिहीले तर समजायला मदत होईल.

शब्दांचे अर्थ....

11

गतभर्तॄका, त्याक्तभर्तृका, भतृत्यका हे जुन्या मराठीत वापरले जाणारेच शब्द आहेत. आधुनिक मराठीत गतभर्तॄका = विधवा, त्याक्तभर्तृका = जिने नवरा स्वतः सोडला आहे अशी घटस्फोटीता, भतृत्यका = जिला नवर्‍याने सोडली आहे अशी घटस्फोटीता असे त्यांचे अर्थ होतात.

हे शद्ब रेफरन्स म्हणुन वापरलेल्या राजवाडे यांच्या डायरेक्ट कोटमधले आहेत. ते बदलण्याचा हक्क वापरकर्त्याला नसतो तर मुळ लेखकालाच असतो. जर असे बदल केले तर तो संदर्भ (रेफरन्स) दुषित (कॉन्टॅमिनेटेड) ठरतो आणि संपुर्ण लिखाणाची विश्वासार्हता वादग्रस्त ठरते असा नियम असल्याने मी ते बदलले नाहीत.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मूळ क्वोट देतानाच त्यांचे

12

मूळ क्वोट देतानाच त्यांचे अर्थ कंसात, तसं लिहून दिले, किंवा समजावून सांगितले तर हरकत नसावी! असो.

अभिनंदन प्रसन्नदा एका नवीन

13

अभिनंदन प्रसन्नदा एका नवीन विषयाला वाचा फोडल्याबद्दल. याबद्दलचा (सतीप्रथाबंदीबद्दलचा) पुसटसा उल्लेख आचार्य धर्मपाल यांच्या पुस्तकात वाचल्यासारखा वाटतो.


-पुण्याचे पेशवे

वाचतो आहे.. ह्याविषयावर फारषी

14

वाचतो आहे..
ह्याविषयावर फारषी माहिती नाहिए..


-निखिल

वेगळा आणि रोचक

15

वेगळा आणि रोचक विषय. सुरवात चांगली झाली आहे. पुढे वाचण्यास उत्सुक.
लेखन केवळ भार्यासतीपद्धतीपर्यंतच सिमीत न राहता मातृसती, कन्यासती तसेच आजीने सती जाणेही इ. पद्धतीवरही टिप्पणी करेल / माहिती देईल येईल अशी अपेक्षा करतो.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

-ऋ


-ऋ

चांगली लेखमाला

16

वाचतो आहे. प्रतिसाद पुढचे भाग आल्यावर मग देईन.

चांगला विषय...

17

नवीन माहीती कळत आहे.

अश्या बायका कुण्या पुरुष नातेवाईकाकडे आश्रित म्हणुन रहात व त्यांचे संरक्षण करणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे ही त्या पुरुष नातेवाईकाची जबाबदारी असे.

इतके हे सरळ होते का? त्या स्त्रीयांना कुठल्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागायच्या, असा प्रश्न पडला आहे...

बाकी या वरून केवळ नंतर कथा माहीत असून आणि नाट्यावलोकनात काही महत्वाचे भाग बघूनही जे नाटक एकदम डोक्यात बसले त्या बॅरीस्टर मधील विजया मेहता आणि सुहास जोशींनी रंगवलेल्या भुमिका आठवल्या.

लहानपणी आमच्या घरी महीन्याभरातून एकदा, एक सोवळ्या आजीबाई पैसे मागायला येयच्या. आई-बाबा मला अथवा माझ्या बहीणीस काही हातात पैसे देऊन त्यांना देयला लावायचे. त्यावेळीस तेव्हढे करून झाले की ही गोष्ट मनातून पूर्ण निघून जायची, खेळ-अभ्यास जे काही असेल त्यात परत लक्ष जायचे. पण आत्ता या विषयामुळे अचानक ते आठवले आणि कुठल्या अवस्थेत त्या आजीबाई (आणि तशाच इतर अनेक) राहत असतील हा विचार मनात येऊन अस्वस्थता आली...


विकास देशपांडे

>>इतके हे सरळ होते का? >>

18

>>इतके हे सरळ होते का? >> नक्कीच नसेल... Sad

जीव

19

जीवाच्या रक्षणाचा मुद्दा ध्यानी आला. लेखन पूर्ण झाले की मग धाग्यावर चर्चा करू. माझ्या काही शंका आहेत, त्या विचारेन. माझे हे मुद्दे केवळ धर्म आणि अ-धर्म (अधर्म नव्हे) या अंगाने जाण्याऐवजी समाजशास्त्राच्या (खरं तर नव्या भाषेत सोशल अँथ्रोपोलॉजी) अंगाने जातील. कारण मी त्याच दृष्टीने या मुद्यांकडं पाहीन.
राजवाडे पूर्ण न वाचल्याचा पश्चाताप पुन्हा एकदा होऊ लागला आहे! Sad

वाचतो आहे ...

20

वाचतो आहे ...