मीमराठी वरील वाचकांना माझा नमस्कार. हा लेख सुमारे तीन आठवड्यांपूर्वी इतरत्र प्रसिद्ध झाला होता, व तुमच्यापैकी काहींनी तो वाचलाही असेल. (नावं तीच दिसतात, पण आयड्यांचा काय भरवसा? शिवाय न वाचता प्रतिसाद देणारेही असतातच ना.) पहिलाच लेख इथे लिहिताना शिळ्या कढीला ऊत आणायचा उद्योग केल्याबद्दल क्षमस्व. परंतु ही लेखमाला असल्याने एकदम पाचवा भाग इथे टाकण्याऐवजी संपूर्ण माला पहिल्यापासून आली तर ते अधिक उचित होईल असं वाटलं म्हणून हा प्रपंच.
राजेश
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते
>(सरस्वतीदेवीला व ती नसल्यास तिच्या आईला अर्पण. तुम्ही या दोहोंपैकी कोणी नसल्यास हे तुम्हाला अर्पण नाही.)
आयुष्य म्हणजे एक विडा असतो
प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो
फार कठीण, पण तो सोडवायचा असतो
अशी कविता करायला कोणाला आवडणार नाही? आपल्या प्रियकराला त्याच त्याच साजणगहिऱ्या हाका नवीन शब्दांनी मारायला कोणाला नाही भावणार? जिवाच्या काहिलीनंतर त्या उकळत्या तेलात एका सुंदर खुसखुशीत कवितेचा मेदूवडा तळता आला तर एखादं चर्चेचं वर्तमानपत्र वाचत, किंवा कलादालनातले निसर्गी फोटो बघत, विडंबनाच्या कुरकुरीत पेपरडोश्याबरोबर, आणि एखाद्या लावणीच्या झणझणीत सांबारात बुडवून तो कोण मिटक्या मारत खाणार नाही? अशी खुमासदार प्लेट जर एखाद्या हाटेलात किंवा घरी मित्रांना सर्व्ह केलीत, तर त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव का होणार नाही? खूप नवशिके कवी प्रयत्न करतात, पण पदार्थ जमला नाही म्हणून निराश होऊन जातात. त्यात त्यांची काव्याच्या अन्नपूर्णेवर - सरस्वतीवर श्रद्धा नसते, साधना कमी पडते, पूजेची सामग्री कमी पडते असं नसतं. (खबरदार कोणी गैर अर्थ काढला तर! पण ज्यांना ते कसे काढायचे हे माहीत नसेल त्यांनी आधी हे वाचा). त्यांना मंत्रांचं ज्ञान नसतं एवढंच.
पूर्वी जग सोपं होतं, सुंदर होतं. त्याकाळी हे प्रश्न उद्भवतच नसत. कविताही आय.पी.एल. मधे नाचणाऱ्यांसारखी उठवळ झगझगीत नव्हती. ती साधीभोळी, मराठमोळी होती. आणि ती करण्यासाठी त्या काळी जाती असायची. त्यावर बसले की आपोआप ओव्या सर्वांनाच सुचायच्या. आजकाल नवीन तंत्रज्ञान आलं, त्यात ती जातीही गेली आणि त्या ओव्याही. जातं घेणं, आणि दळत बसणं हे कष्ट आहेत. ते कष्ट टाळण्यासाठी चक्क्या आल्या. गृहस्थाबरोबरच नोकरीला बाहेर पडणाऱ्या गृहिणीला मदत करायला घराघरात फूड प्रोसेसर आले (गृहस्थ अजूनही मदत करत नाहीत ही गोष्ट अलाहिदा). अन्नपदार्थ वाटण्यासाठी (म्हणजे देऊन टाकण्यासाठी किंवा भास होण्यासाठी नव्हे) जसे फूड प्रोसेसर वापरले जातात तसे ज्ञान वाटून त्याचा सहज खाता येईल, पचायला सोपा असा भुगा करण्यासाठी आपण वर्ड प्रोसेसर वापरतो. एकंदरीतच आजकाल संगणकाचा जमाना असल्यामुळे संगणक प्रणालीचा वापर जीवन सुकर करण्यासाठी झालेलं आहे. मग तीच प्रणाली वापरून कविता का करता येऊ नयेत? त्यासाठी रंगबावरं व्हा, उन्मुक्त व्हा, आणि ध्येयवेड्या रूपरेषा शोधत भिरभिरा - हे सगळं झंझट कोणी सांगितलंय? हे तर जातं घेऊन दळत बसण्यापेक्षाही वाईट. म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. कोणी सांगितल्येत एवढे कष्ट?
आता वरचे काही शब्द वाचून तुम्हाला वाटलं असेल, वा, घासकडव्यांची भाषा म्हणजे अशी मोरपंखी आहे, अशी मोरपंखी आहे म्हणून सांगू - की अगदी नीलगर्भच. पण खरं सांगतो, सगळेच शब्द आपले असण्याची गरज नसते. शब्दांवर कोणाचीच मालकी नसते. कवितांवर असू शकते, पण त्या तुम्ही तुमच्या फूड प्रोसेसरवर पुरेशा दळून बारीक तुकडे केले की कुठचे कुणाचे हे सांगता येत नाही. अशा मयूरसिंहासनांमधून उखडून काढलेली शब्दरत्नं काजूसारखी अॅपेटायजर म्हणून कशी सादर करायची किंवा पुलावामधे कशी मिसळायची ही आणखीन एक समस्या नवीन कवी-गृहिणी कवी-गृहस्थासमोर असते. साध्या पाकक़ती करण्यासाठी पुस्तकं असतात, मीमराठीवरती व इतर अनेक स्थळांवरती सदरं असतात. पण कवीसाठी मात्र काही नाही. आजकाल सगळं काही ग्लोबल झालेलंय - ग्लोबल वार्मिंग, ग्लोबल मार्केट, ग्लोबल संस्कृती सपाटीकरण वगैरे वगैरे. पण हा कवींचा प्रश्नही ग्लोबलच आहे. तो किमान लोकली तरी सोडवायला हवा. ग्लोबल संपन्नतेमुळे बऱ्याच लोकांची पोटं आता भरलेली असतात. तेव्हा चंद्र बघितल्यावर त्यांनाही कोणाची याद येते, नुसत्या भाकरीचीच नाही. आणि ती याद संव्यक्त (सं आधी लावला की जरा वजन येतं, बाकी काही नाही...पण कवींना असल्या गोष्टी माहीत पाहिजेत) करण्यासाठी कविता करणं ही एक सामायिक, सामाजिक, आणि मूलभूत गरज होऊन ऱ्हायलीया. त्येच्या बाबतीत आपून समद्यांना काईतरी कराया हावंय. (आरारारारारारारा... चुकीच्या बोलीत शिरलो.... आणि त्यात दोन तीन ग्रामीण बोलींचं महाराष्ट्रीय एकात्मकीकरण पण झालं. आसो.) तर एकंदरीत काय की ही एक गरज आहे. आणि गरज ही तर शोधाची जननी असते.
या जननीनेच आमच्या मनात जन्म दिला (थोड्या पूजेनंतर, अर्थातच) कवितक या प्रणालीचा (अर्थ: कविता करणारा; जसे वाहक - वाहणारा, भोचक - भोच करणारा, करकटक - करकट करणारा इत्यादी). ती मी लोकांना तूर्तास तरी फुकट सादर करत आहे. निदान तिची हलकी आवृत्ती तरी. आता तुम्ही विचाराल, की यामागचे आमचे बिझनेस मॉडेल काय आहे? तर लोकांना आकर्षित करणे व त्यांच्या मनात आमच्या उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करून कधीतरी ते खिशातनं पैशे बाहेर काढतील अशी आशा करणे. तूर्तास तरी ते मॉडेल गंडलेले आहे असे कोणी म्हणेल. पण हे मी मराठी संस्थळावर सादर करत असल्यामुळे तसे असणारा मी पहिलाच नाही, हे सूज्ञांना कळले असेलच.
प्रथम काही मौल्यवान शब्द घ्यावेत. हे मौलिक असले तरी खूप स्वस्तात मिळतात, त्यामुळे ते मुक्त हस्ताने वापरावेत. शिरा करताना त्यात मोजके बेदाणे घालतात कारण बेदाणे महाग असतात व रवा स्वस्त असतो. शब्दांच्या बाबतीत तसं नसतं. त्यामुळे बेदाण्यांचाच शिरा व त्यात थोडासा रवा असे असल्याने काही बिघडत नाही. आम्ही चारोळ्यांचेच बनवलेले श्रीखंड खाल्लेले आहे.
असो, तर मौलिक शब्द घ्या. सुरूवात एकानेच करा.
जसे : आयुष्य, मैत्री, प्रेम, नातं, अस्तित्व इत्यादी. आयुष्य वापरण्याचा कंटाळा आला असल्यास जीवन किंवा जगणं वापरलं तरी चालेल.
या मौलिक शब्दाला आपण क्ष म्हणू
नंतर यमक साधणारे काही शब्द घ्यावेत जसे
विडा - तिढा - किडा - पिडा - सोडा - ओढा यांना य१, य२ असं म्हणू. घरगुती उपाहारासाठी पाच-सहा पुरतात. पण फारच पिळून जनसामान्यांत मानवतावादी कवी म्हणून मान्यता करून घ्यायची असेल तर किमान दहा वापरावीत. ही शक्यतो नामं असावीत. पण जसजशी तुम्ही प्रगती कराल, तसतशी तुम्हाला क्रियाविशेषणं देखील वापरता येतील. (काही अॅडव्हान्स्ड कवी क्ष आणि य सारखेच वापरतात...पण तो पुढचा धडा)
मग प्रत्येक य शब्दाला लागू असणारी क्रियापदं घ्यावीत.
उदा. विडा - रंगणे, तिढा - सोडवणे, पिडा - सहन करणे यांना आपण क१, क२, क३ म्हणू
त्या प्रत्येक जोडीसाठी एक विशेषण घ्यावं. उदाहरणार्थ
विडा - रंगणे - लाल लाल
तिडा - सोडवणे - फार कठीण
त्याला आपण व१, व२, असं म्हणू
आता आपली कविता तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे जुळवावे
क्ष ठरवलेला आहे.
प्रत्येक य, व, क साठी
लिहा
---------क्ष म्हणजे एक य असतं
---------व सारखं ते क करायचं असतं
जर (य,व,क संपले हे सत्य)
तर (कविता संपली, बाहेर पडा)
(सत्य) नसल्यास,
एक ओळ रिकामी सोडा
पुढचे य, व, क घ्या, "लिहा" वर परत जा.
आता सूत्रप्रणालीतले तज्ञ मला या प्रणालीतल्या चुका सांगतील, व अधिक परिणामकारक प्रणाली आहेत हेही सांगतील. विशेषत: "अमुक विधानावर जा" असा प्रयोग जाणते करत नाहीत. त्यांना मी एवढेच म्हणेन की तूर्तास नवख्यांना असल्या तांत्रिक बाबींनी गोंधळवून टाकण्याऐवजी त्या अधिपद्धतीची (अल्गोची - (अल् गोची {कंस सोडवण्यासाठी अक्षय पूर्णपात्रेंना [ते प्रस्तुत <हा शब्द फेटीश<दुवा> असल्याचेही सांगतात > परिस्थितीत खूप कंस |दुवा| वापरत असतात] बोलवावे} असं वाचू नये)) माहिती सोप्या भाषेत द्यावी यासाठी ते आलेलं आहे. कवितक च्या प्रो आवृत्तीत हे दोष नाहीत. (अगदीच गंडलेलं नाही बरं का आमचं बिझनेस मॉडेल!)
ही प्रणाली चालवली की खालील कविता तयार होते.
आयुष्य म्हणजे एक विडा असतं
लाल लाल सारखं ते रंगणं करायचं असतं
आता ही वाक्यं अगदी कवितेतलं काही कळत नाही अशा वाचकांनाही भावत नाहीत. सुदैवाने कवितेतलं काही कळत नाही अशा साध्या कवींनासुद्धा ती सुधारता येतात. थोडीशी डागडुजी केली की झालं. असतं च्या ऐवजी असतो, सारखं रंगणं करायचं च्या ऐवजी रंगवणं, रंगवायचा वगैरे केलं की मी मूळ उद्धृत केलेली कविता मिळते.
आयुष्य म्हणजे एक विडा असतो
प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो
फार कठीण पण तो सोडवायचा असतो
आहे की नाही सोपी? कवितक मध्ये अशा सर्व मौलिक शब्दांच्या याद्या तयार आहेत. सुमारे दोन लाखांवर यमकांच्या बांधलेल्या पुड्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे क्ष निवडायचे, योग्य ती यमकं निवडायची, त्याला सूचित केलेली विशेषणं निवडायची - की एक गरमागरम कविता तयार! वरच्या उदाहरणात मी थोडा अभिनव प्रयोग केला आहे हे सूज्ञांच्या लक्षात आलं असेलच. पहिल्या दोन ओळीत मी दोन वेगवेगळे क्ष - आयुष्य आणि प्रेम वापरले आहेत. आता त्यांची अदलाबदल सहज शक्य आहे.
प्रेम म्हणजे एक विडा असतो
आयुष्याने लाल लाल रंगवायचा असतो
थोडा अधिक उत्साह असलेल्यांसाठी कवितक मधली नवीन तंत्रं सांगतो. द्विरुक्ती, आणि प्रश्निकरण. याने सध्याच्याच शिळ्या पदार्थाला नवीन फोडणी दिली जाते. खाणाऱ्याला तो शिळा आहे हे कळतही नाही. उदाहरणार्थ. तिढ्यापासून
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो तिढा ------------याने एक वेगळंच वजन येतं.
आयुष्य म्हणजे एक तिढा असतो का? --------किंवा---- आयुष्य म्हणजे एक तिढाच का असतो?
इतका कठीण तो सोडवायचा असतो का?-------किंवा--- इतका कठीण तो सोडवायचाच का असतो?
याने सगळ्या कवितेला एक वेगळं व्यक्तिमत्व येतं. किंवा आणखीन एक वेगळी पद्धत म्हणजे यमकी शब्द हे सगळे तुमच्या मौल्यवान शब्दाशी यमक साधणारे ठेवावे. म्हणजे आयुष्य, धनुष्य, मनुष्य वगैरे. त्याला द्विरुक्तीची ट्रीक वापरून मी एकदोन ओळी लिहून दाखवतो
आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणजे धनुष्य असतं...
जड असलं तरी ते पेलायचं असतं
पण यमक साधणारा शब्द हा स्वतशीच यमक साधतो. तेव्हा जर क्ष = य = प्रेम घेतलं तर आपल्याला खालच्या ओळी मिळतात.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
सगळ्यांचंच ते सेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
ईश्वर आणि अल्ला यांचं ते नेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
बहुतेकांचं ते खूप लेम असतं
इथे मी पहिल्या ओळीत क्ष आणि य एकच वापरले...आता काही वेळा पहिली ओळ तीच ठेवून धृपद म्हणून वापरता येते, मधल्या ओळी आणखीन कठीण प्रणालीने बनवता येतात. पण ते फार अॅडव्हान्स्ड झालं. त्याआधी प्रथम तुम्ही पावसावर वगैरे कविता लिहून थोडी प्रॅक्टीस करा. सध्याच्या ज्या कविता दिसतात त्यातले बरेच लोक असले प्रयोग करून बघताना दिसतात. कवितकमुळे मानवी कष्ट कमी होतात. लवकरच येणारे आय फोन अॅप तुम्ही घेतले तर तुम्ही मुलीला डे केअरमधून घरी घेऊन येताना रिक्षात बसल्याबसल्या एखादी कविता करू शकाल. मग काय स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. हे प्रयोग करून करून कंटाळा आलेला आहे (मला तसे फारसे दिसलेले नाहीत, तरीही) त्यांच्यासाठी अधिक क्लिष्ट प्रणाली आहेत. पण त्यांविषयी पुढच्या लेखात.
या पाककृतीने हजारो पदार्थ तयार होतात. ते एकाच चवीचे असले तरी दिसायला खूपच वेगळे असल्यामुळे तुम्ही खूप कमी कष्टात सुगरण/बल्लवाचार्य म्हणून मान्यता पावता. हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही (तसे तिखटजाळ पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आम्ही लवकरच जळजळीत गजला कशा लिहाव्यात यावर लिहू.) त्यावर "वा: छान गं", "मस्तच गं", "पाणी आलं गं", "सुंदर कल्पना गं", "कसं सुचतं गं", "किती सहज शब्दात सांगितलंय" अशा प्रतिक्रिया हमखास आपल्या आप्त-मित्रांकडून येतात. एकदोन कडवी उद्धृत होणंही येतंच. जर तुम्ही तरुण असाल, व याला चाली लावून लोकांपुढे सादर केले तर तुम्हाला आधुनिक पिढीचा आवाज म्हणून मान्यता मिळते व तुमच्या कविता प्रचंड पॉप्युलर होतात.
या लेखमालेतल्या पुढल्या लेखांत आम्ही सदाबहार प्रेमकाव्ये, तू व मी (किंवा तो व ती) चे पद्य संवाद, हिरवीकंच रानओली निसर्गचित्रं या सोप्या पदार्थांची कवितक प्रणालीद्वारे निर्मिती कशी करावी यावर मार्गदर्शन करू. नंतर थोडे कठीण पदार्थ - जहाल गजला, सामाजिक कविता, रूपकात्मत भाष्ये कशी करावी याचाही अभ्यास करू. जमल्यास कुठच्याही कवितेला छप्परतोड प्रतिसाद कसा द्यावा याची प्रणाली सापडते का याचाही शोध घेऊ. त्यानंतरच्या पायऱ्यात प्रतिबिंबांचा जादूटोणा करणे, वगैरेसारखे अधिक क्लिष्ट विषय हाताळू. या प्रत्येकासाठी अधिपद्धती वेगळी असते. ती काय असते हे जाणून घेतले की एकंदरीतच काव्य म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. निदान तुमचा व तुमचे काव्य वाचणाऱ्यांचा तरी तसा समज होतो. समजणे आणि समज होणे यात तसा फारसा फरक नाहीच शेवटी.
मी वाचकांना अशी विनंती करतो की प्रेम हा क्ष घेऊन व तुम्हाला सुचणारे विशिष्ट व्यवसायातले य घ्या. यमकांची अट थोडी ढिली झाली तरी चालेल. तयार होणारी कविता खाली प्रतिसादात डकवा. तुम्हाला किती चांगली कविता होईल याचं आश्चर्य वाटेल. (हिंट इतर क्षची पेरणी अधूनमधून करावी)
तर मंडळी, तुमचे स्वत चे क्ष, य, क, व, घ्या आणि क्षणात यशस्वी कवी व्हा! (आणि कविता डकवा)
कवितकची आवृत्ती इथे मिळेल (कदाचित). त्यात सध्या काही कीडे असल्यामुळे तुम्हाला भिंतीवर डोकं आपटल्याचा भास होईल. पण नाहीतर ती प्रणाली हातीच चालवूनसुद्धा कविता करता येतील.
मी वापरलेलं मयूरसिंहासन.
हॅ हॅ हॅ... म्या बी कवी हुणार
हॅ हॅ हॅ... म्या बी कवी हुणार .. अभ्यास करायची गरज नाय.. लेख वाचल्यावरच कळाले कविता कश्याशी खातात ते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
येऊ देत बाकी चार भागही एकदम
आधीचे भाग वाचले आहेत. तेव्हा प्रतिसाद एकदम ५व्या भागावर
अवांतरः मी म वर स्वागत
-ऋ
-ऋ
क्षमा नाही
आमच्या मते लेखन वाचन शिळ अस काही नसत. कुणा वाचकासाठी ती पुनरावृत्ती असेल पण पुनरावृत्ती हा पुनर्प्रत्ययाचा आनंदही देत. दुसरी गोष्ट अशी कि काहि वाचकांसाठि ते पुर्णतः नवीन असणार आहे अशा वेळी जुन्या वाचकांना दुर्लक्ष करण्याची सोय आहे. दुर्लक्ष करणे म्हणजे अनादर करणे नव्हे. काही वाचक हे फक्त मी मावर असणार आहेत. सर्व संकेतस्थळे धुंडाळणे त्यांना शक्य नसते.
अशावेळी त्यांची 'सोय ' सहज करता आली तर ती करावी ना! तेव्हा आपल्याला क्षमा नाही .
कोण म्हणतो रे उकिरडे फुंकायला वेळ नसतोहॆहॆहॆ आपल्याला लेख टाकण्याची प्रेमळ शिक्षा इष्टापत्ती म्हणुन स्वीकारावी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
>काही वाचक हे फक्त मी मावर
>काही वाचक हे फक्त मी मावर असणार आहेत. सर्व संकेतस्थळे धुंडाळणे त्यांना शक्य नसते
+१
असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ह्या लेखमालेच्या शेवटी आम्ही
ह्या लेखमालेच्या शेवटी आम्ही कवी बनणार का??
-निखिल
काही पाककृत्या निश्चितच जमतील...
करून बघा. आणि प्रतिसादात डकवा...
राजेश
गुर्जी, मागच्या वेळेस वेळ
गुर्जी, मागच्या वेळेस वेळ नसल्यामुळे सगळेच गृहपाठ राहिले होते. आता पुन्हा परीक्षा देते, अंमळ मदत करा.
===================================
क्ष = विडंबन, य = खाज, व = चिडवणं, क = मधूनच
विडंबन म्हणजे एक खाज असते
चिडवण्यासारखं ते मधूनच करायचे असते
यापुढे काही सुचत नाही आहे.
=====================================
यातले क्ष आणि य कोणते?
म्याप म्हणजे म्याप म्हणजे म्याप असतो
पण माझा, त्याच्या, तिसर्याचा सारखाच का नसतो?
म्याप म्हणजे म्याप म्हणजे म्याप असतो
बनवताना सगळ्यांच्याच डोक्याला ताप असतो
म्याप म्हणजे म्याप म्हणजे म्याप असतो
डोक्यावरच्या छताचा तो काप असतो
===================================
असो. गुर्जी, तुम्ही सफरचंदाचे व्यापारी आहात का?
वा वा...
नवनवीन विद्यार्थी अभ्यासाला लागले हे पाहून बरं वाटलं.
तुम्ही खाज ने सुरूवात केली आहे तेव्हा मी बाज (खाट या अर्थाने), लाज, आग वगैरे करून दाखवतो. व कोणते ते उघड होतीलच.
विडंबन म्हणजे एक बाज असते,
अधूनमधून ती कुरकुरवायची असते.
विडंबन म्हणजे एक लाज असते,
दुसऱ्याच कोणाची ती काढायची असते.
विडंबन म्हणजे एक आग असते,
काड्या सारून, पेटवून ती लावायची असते.
सांभाळून हं, तो तुकडा पडेल तुमच्या डोक्यावर व तुमची चिकन लिट्ल सारखी अवस्था व्हायची. (संदर्भ 'आकाशावरची भाष्ये')
सफरचंदाचा व्यापारी नव्हे, नुसताच चहाता व वापर्ता आहे. ज्या काही थोड्या महाभागांनी त्यावर खत्रूड टीपा मोजण्याची वगैरे कृती लिहून पैसे केले अशांचा मी दुस्वासकर्ताही आहे.
हं... विचार करून समजण्याचा
हं... विचार करून समजण्याचा प्रयत्न करत आहे.
गुर्जी, तुमची विडंबनावरची कविता पाहून आता तुम्ही विद्रोही कवी आहात का असा संशय येतो आहे.
गुर्जी, भुर्जी, खुर्ची यांवर काही कविता करता येईल का?
येईल की...
म्हणजे, करा की... सगळेच गृहपाठ जर गुर्जींच्या डोक्यावर मारले तर शिक्षणाचा उपयोग काय? कोणीतरी बीजगणित, भूमितीचा उपयोग काय असं विचारलंच होतं ना...
राजेश
श्रीगुरू चरण सरोज रज..अस
श्रीगुरू चरण सरोज रज..अस म्हणून होमवर्क कवितक पुष्प-पाकळी गुर्जींच्या चरणी सादर अर्पण
प्रेम म्हणजे कधी विषामृत-लंगडी
कधी खो द्यायचा तर कधी खेळायची कबड्डी
प्रेम म्हणजे एक दोन साडे-माडे-तिन
कधी आउट तर कधी लिव्ह-इन
प्रेम म्हणजे कधी दडपे पोहे
कधी धपाटे तर कधी कान्होले
प्रेम म्हणजे कधी ओनियन उत्तप्पा
कधी गोड पापा तर कधी कोरड्या थापा
पास होइन का ते सांगा गुर्जी ?
पुष्करिणी
उत्तम
वा. यात आउट व इन वर केलेला श्लेष आवडला. थोडं वरच्या वर्गातल्या पाठांचं काव्य आहे, पण पास न करण्यासाठी ते कारण कसं देणार?
यात तुमच्या लक्षात आलं असेलच की प्रेम बदलून जीवन किंवा नातं घातलं की नवीन कविता तयार होते. आहे क्की नाई गम्मत.
राजेश
सर, 'ढ' विद्यार्थांच्याकडे
सर,
'ढ' विद्यार्थांच्याकडे जरा स्पेशल लक्ष देता का
(ढ) राजे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा रे वा...
काय पण स्वत:ला ढ म्हणवून घेणारे... समजा तुम्ही संस्थळ हा मौलिक शब्द घेतला तर लेखातल्या मूळ उदाहरणातले विडा (उचलणे), तिढा (सोडवणे - की पाडणे?), गाडा (ओढणे) अशा कितीतरी पंक्ती लिहिता येतील. इतर डा कारांत शब्दही सुचतात, पण तुम्हालाच त्याची अधिक अनुभूती असेल असं वाटतं. शेवटी खऱ्या अनुभवातनं येतं तेच खरं काव्य. कवितकाच्या मार्केटिंगमध्ये आम्ही हा मुद्दा लपवून ठेवतो, पण कधी कधी तो वळवळतोच एखाद्या किड्यासारखा. (आणखीन एक डाकारांत शब्द!)
राजेश
हा हा ! बघतो ट्राय करतो
हा हा !
बघतो ट्राय करतो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एकदम मज्जाच आहे ही... गुर्जी
एकदम मज्जाच आहे ही... गुर्जी असेच तुमचे आशिर्वाद पाठीशी असूद्या
पुष्करिणी
पुढचा भाग टाका न राव!!!
पुढचा भाग टाका न राव!!!
-निखिल
छ्या फारच लांब हो तुमचे ते
छ्या फारच लांब हो तुमचे ते हे... लेखन. किती वेळ वाचत आणि हसत रहायचे!
-पुण्याचे पेशवे
माझी ही एक ओळ प्रेम म्हणजे
माझी ही एक ओळ
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
काहींकरीता ते फॅन्टास्टीक गेम असतं.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
विजुभाउचे खोदकाम चालू झालं
विजुभाउचे खोदकाम चालू झालं वाटतं!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."